सामान्यकाळातील ३४ वा रविवार
२० नोव्हेंबर २०२२
“मी तुला नक्की सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकांत असशील.”
स्वर्गात आणि पृथ्वीवर ज्याचे प्रभूत्व आहे त्या ख्रिस्त राजाचा आज आपण सोहळा साजरा करीत आहोत. देव व प्रजा यामधील मध्यस्थ, सर्वांचा रक्षणकर्ता, शांतिदाता, सर्वांवर प्रेम करणारा असा प्रभू येशू ख्रिस्त, 'परात्वराचा पुत्र' असून त्याच्या राज्याच अंत होणार नाही (लूक १:३१-३३). ‘आपले सर्वांचे नागरिकत्व तर स्वर्गात आहे, तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा (वैभवाने) येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहोत' (फिलिप्पे ३:२०). .' त्या पश्चातापी चोराला प्रभू येशूने स्वर्ग राज्याचे अभिवचन दिले. आज |जगभरातील आपण सर्व ख्रिस्ती भाविक मोठ्या उत्साहाने ख्रिस्ताच्या वैभवाचा सोहळा साजरा करीत आहोत. पवित्र ख्रिस्तशरीर संस्कारातील भाकरीच्या रुपात असलेल्या ख्रिस्तराजाला आपले सर्वस्व समर्पित करु या.
✝️
पहिले वाचन :१शमुवेलच्या ५:१-३
वाचक : शमुवेलच्या पहिल्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"त्यांनी दावीदला अभिषेक करून इस्त्राएलवर राजा नेमले."
इस्राएलचे सर्व वंश हेब्रोनात दावीदकडे येऊन म्हणाले, “पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहो. गतकाली शौल आम्हांवर राजा असता इस्राएल लोकांची ने-आण करणारे पुढारी आपणच होता आणि परमेश्वर आपणाला म्हणाला होता, माझी प्रजा इस्राएल हिचा मेंढपाळ आणि अधिपती तूच होशील.” या प्रकारे इस्राएलचे सर्व वडीलजन हेब्रोनात राजाकडे आले आणि दावीद राजाने त्यांच्याशी हेब्रोनात परमेश्वरासमोर करार केला आणि त्यांनी दावीदला अभिषेक करून इस्राएलवर राजा नेमले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १२२:१-५
प्रतिसाद : “आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ."
१) “आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ,"
असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
हे येरुशलेम, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत
२) हे येरुशलेम, एकत्र जोडलेल्या नगरीसारखी
तू बांधलेली आहेस.
तुझ्याकडे वंश, परमेश्वराचा वंश,
परमेश्वराच्या नामाचे उपकारस्मरण करण्यासाठी चढून येतात.
३ )इस्राएलला लावून दिलेल्या निर्बंधांप्रमाणे
परमेश्वराच्या नामाचे उपकारस्मरण करण्यासाठी चढून येतात.
कारण तेथे न्यायासने,
दावीदच्या घराण्याची राजासने मांडली आहेत.
दुसरे वाचन कलस्सैकरांस १:११-२०
वाचक: पौलचे कलस्सैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“देवाने आपल्याला आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले आहे.”
ज्याने तुम्हांला प्रकाशातील पवित्र जनांच्या वतनाचे विभागी होण्याजोगे केले त्या पित्याची आम्ही उपकारस्तुती करतो. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले, त्या पुत्राच्या ठायी, खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे.
तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे. तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण आकाशात आणि पृथ्वीवर असलेले, दृश्य आणि अदृश्य असलेले, राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले, जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले, सर्व काही त्यांच्याद्वारे आणि त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आणि त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तोच शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आदी, मृतातून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की, सर्वामध्ये त्याला प्राधान्य मिळावे. कारण त्याच्याठायी सर्व पूर्णता वसावी आणि त्याच्या क्रुसावरील रक्ताच्या द्वारे शांती निर्माण करून त्याच्याद्वारे जे सर्वकाही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरीलअसो किंवा स्वर्गातील असो, त्याचा स्वतःबरोबर त्यांच्याद्वारे समेट करावा हे पित्याला बरे वाटले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभूच्या नामाने येत आहे तो धन्य ! आमचा पूर्वज दावीद ह्याचे राज्य सुवंदित असो.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक २३:३-४३
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“अहो, येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.' "
लोक पाहत उभे होते, पण अधिकारी थट्टा करत म्हणाले, “त्याने दुसऱ्यांना वाचवले. जर तो देवाचा ख्रिस्त, त्याचा निवडलेला असला तर त्याने स्वतःला वाचवावे.” शिपायांनी जवळ येऊन आंब त्याच्यापुढे धरून, त्याची अशी थट्टा केली की, "तू यहुद्यांचा राजा असलास तर स्वतःला वाचव.” “हा यहुद्यांचा राजा आहे," अशी पाटीही त्याच्या वरच्या बाजूला होती..
क्रुसावर खिळलेल्या त्या अपराध्यांपैकी एकाने त्याची निंदा करून म्हटले, “तू ख्रिस्त आहेस ना?” ते स्वतःला आणि आम्हांला वाचव.” परंतु दुसऱ्याने त्याचा निषेध करून म्हटले, "तुलाही तीच शिक्षा झाली असता तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय ? आपली शिक्षा तर यथान्याय आहे. कारण आपण आपल्या कृत्यांचे योग्य फळ भोगत आहो, परंतु ह्याने काही अयोग्य केले नाही," मग तो म्हणाला, “अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” तो त्याला म्हणाला, “मी तुला नक्की सांगतो, तू आज माझ्याबरोबर सुखलोकांत असशील.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : बायबलच्या शिकवणुकीनुसार परमेश्वर हा स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांचा सर्वेसर्वा सम्राट आहे. पृथ्वीतलावरील राजांचे जीवन पाहून इस्राएली लोकांनी परमेश्वर एक राजा म्हणून आपले पालन पोषण व संरक्षण कसे करतो त्याविषयी आपला अनुभव बायबलमध्ये कथन केलेला आहे. जन्म व मृत्यू अशा दोन्ही टोकांवर 'यहुद्यांचा राजा म्हणून ज्याची निर्भत्सना करण्यात आली त्या नाझरेथकर येशूचा हा सोहळा साजरा करीत असताना ख्रिस्तसभा आपल्यासमोर तीन चिंतने सादर करते:
अ. देवाचे राज्य हे सार्वकालिक स्वरूपाचे आहे : शौल हा इस्राएलचा पहिला राजा होता. मत्सरापोटी त्याला आपले राज्य गमवावे लागले. पुढे त्याच्या जागी दावीद राजा राज्य करू लागला. आजचे पहिले वाचन दावीदच्या राज्यपदी झालेल्या नेमणुकीचे वर्णन करते. त्याआधी शमुवेलने दावीदाचा अभिषेक केलेला होता. ह्याच दावीदच्या राज्याचा अंत होणार नाही असे भाकित जुन्या करारात करण्यात आले आणि दावीद पुत्र येशू ह्याच्याठायी ते पूर्णत्वास गेले.
ब. एक राजा म्हणून परमेश्वर सर्वव्यापी, सर्व समर्थ व सर्वज्ञानी आहे : आजच्या दुसऱ्या वाचनात प्रभू येशू ख्रिस्ताच्या पृथ्वीवरील जीवनाआधी तो युगाच्या प्रारंभापासून अस्तित्वात होता हे सत्य अधोरेखित करण्यात आलेले आहे.
क. देवाचे राज्य पृथ्वीवरील दुःखे आणि स्वर्गातील सुखे अशा दोन्हीवर नियंत्रण ठेवणारे आहे: आजच्या शुभवर्तमानात पृथ्वीवरील दुःखे भोगणारा येशू उजव्या हाताकडील चोराला स्वर्गाचे सुख प्रदान करतो.
आत्मपरीक्षण : परमेश्वर कोणकोणत्या रूपाने माझ्या जीवनात राज्य करतो ? मी त्याचा राजाधिकार पूर्ण मनाने स्वीकारलेला आहे का
प्रार्थना : विश्वाच्या राजा, प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या स्वर्गीय वैभवात सहभागी होण्यास आम्ही पात्र बनावेत म्हणून आम्हावर दया कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

0 टिप्पण्या