सामान्यकाळातील ३३ वा सप्ताह
शनिवार १९ नोव्हेंबर २०२२
कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत.
संत ग्रेगरीला अद्भूत चमत्कारकर्ता म्हणतात, कारण त्याच्याद्वारे देवाने असंख्य चमत्कार घडवून आणलेले आहेत. निस्साच्या संत ग्रेगरी ह्यांनी त्याचं चरित्र रेखाटले आहे. “श्रद्धेचे महात्म्य" ह्या आपल्या साहित्य निर्मितीमध्ये ग्रेगरी ह्यांनी सार्वकालिक जीवन, अतिपवित्र त्रैक्यामधील समानता व परिपूर्णत्व ह्याचे वर्णन केलेले आहे. पूर आणि संकटकाळी संत ग्रेगरी ह्यांचा धावा केला जातो..
प्रभू येशूने तर म्हटले आहे, 'पुनरुत्थान व जीवन मीच आहे, जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला तरी जगेल.'
पुनरुत्थान हा ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. ख्रिस्ताच्या पुनरुत्थानामुळे सार्वकालिक जीवनाची आशा निर्माण झाली. क्रुसावरील यातना, समर्पण, मरण आणि पुनरुत्थान ह्या मुळे आपले सर्वांचे तारण झाले आहे. प्रभू बरोबर विश्वासणाऱ्यांचेहि पुनरुत्थान आहे. 'आपला परमेश्वर मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे.' मृत्यूनंतर पुनरुत्थान आणि सार्वकालिक स्वर्गीय जीवन आहे अशी आपल्या सर्वांची श्रद्धा आहे.
जीवन केवळ ऐहिक व जागतिक नाही तर अनंतकाळचे आहे, म्हणूनच परमेश्वरावरील विश्वासात दृढराहून आपण ह्या जीवनातील सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रभूकडे धैर्य व शक्ती मागू या...
✝️
पहिले वाचन : प्रकटीकरण ११:४-१२
वाचन : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन
"त्या दोघा, संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांना यातना भोगायला लावले होते."
मी स्वत: योहान ह्याने वाणी ऐकली, ती अशी : “पृथ्वीच्या प्रभूसमोर उभी असणारी जैतुनाची दोन झाडे आणि दोन समया ही ते आहेत. त्यांना कोणी उपद्रव करू पाहिल्यास त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या शत्रूंना खाऊन टाकतो, कोणी त्याला उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास त्याला ह्याचप्रमाणे जिवे मारण्यात यावे. त्याच्या संदेश सांगण्याच्या दिवसात पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करण्याचा त्यांना अधिकार दिलेला आहे, पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्यांना पाण्यावर आहे आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला रोगराईनी पीडित करण्याचाही त्यांना अधिकार आहे. त्यांनी आपली साक्ष देणे समाप्त केल्यावर अथांग डोहातून वर येणारे श्वापद त्यांच्याबरोबर लढाई करील आणि त्यांना जिंकून जिवे मारील आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व इजिप्त म्हटलेले असे जे मोठे नगर आणि ज्यात त्यांच्या प्रभूला क्रुसावर खिळण्यात आले होते त्याच्या रस्त्यावर त्याची प्रेते पडून राहतील. लोक, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्रे ह्यातील लोक ती त्यांची प्रेते साडेतीन दिवस पाहतील आणि ती कबरेत ठेवू देणार नाहीत आणि त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उल्हास करतील आणि एकमेकांना भेटी पाठवतील, कारण त्या दोघा संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणाऱ्यांना यातना भोगायला लावले होते." पुढे साडेतीन दिवसानंतर जीवनाचा आत्मा देवापासून येऊन त्यांच्यामध्ये शिरला, तेव्हा ते आपल्या पायांवर उभे राहिले आणि ज्यांनी त्यांना पाहिले त्यांना मोठे भय वाटले. तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपणांबरोबर बोलताना ऐकली, ती म्हणाली, “इकडे वर या.” मग ते मेघारूढ होऊन त्यांच्या शत्रूंच्या देखत स्वर्गात वर गेले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १४४:१,२,९-१०
प्रतिसाद : माझा दुर्ग परमेश्वर ह्याला धन्यवाद असो.
१ )माझा दुर्ग परमेश्वर ह्याला धन्यवाद असो,
तो माझ्या हातांना लढायला शिकवतो,
माझ्या बोटांना युद्ध करायला शिकवतो.
२) तो माझा दयानिधी, माझा दुर्ग, माझा गड,
माझा मुक्तिदाता, माझी ढाल आहे,
मी त्याचा आश्रय घेतो.
तो माझ्या प्रजाजनांना माझ्या अंकित करतो.
३) हे देवा, मी तुला नवे गीत गाईन,
दशतंतू वीणेवर मी तुझे गुणगान गाईन
तूच राजांना विजय देणारा आहेस,
तूच आपला सेवक दावीद ह्याला, मुक्त करणारा आहेस.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुझे वचन माझ्या पावलांकरिता दिव्यासारखे आणि
माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक २०:२७-४०
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंताचा देव आहे."
पुनरुत्थान नाही असे म्हणणाऱ्या सदुक्यातून काही जणांनी जवळ येऊन येशूला विचारले, "गुरुजी, मोशेने आम्हांसाठी असे लिहून ठेवले आहे की, एखाद्याचा भाऊ आपली बायको जिवंत असता निःसंतान असा मेला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. बरे, सात भाऊ होते. त्यांच्यातील पहिल्या भावाने बायको केली आणि तो निःसंतान असा मेला. मग दुसऱ्याने ती केली आणि तिसऱ्यानेही, ह्याप्रमाणे ते सातही निःसंतान असे मेले. शेवटी ती स्त्रीही मेली, तर पुनरुत्थानसमयी ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल ? कारण ती त्या सातांचीही बायको झाली होती. येशूने त्यांना म्हटले, “ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात. परंतु ते युग आणि मेलेल्यातून पुनरुत्थान ही प्राप्त करुन घ्यावयास जे योग्य ठरतील ते लग्न करून देणारही नाहीत आणि पुढे मरणारही नाहीत, कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत. मोशेनेही झुडुपाच्या वृत्तान्तात, परमेश्वराला आब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव असे म्हणून मेलेले उठवले जातात हे दर्शविले आहे. तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंताचा आहे, कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.” तेव्हा शास्त्र्यातील काही जणांनी म्हटले, "गुरुजी, ठीक बोलतात," मग ते त्याला आणखी काहीही विचारण्यास धजले नाहीत.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :सदुक्यांनी येशूला पेचात पाडणारा प्रश्न विचारला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थानाची आशा देत आहे. परमेश्वर अनादिकाळापासून आहे आणि अनंतकाळापर्यंत असणार आहे. त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येकाला परमेश्वर अनंतकाळाचे जीवन देण्याचे आश्वासन देतो. परमेश्वर पित्याच्या योजनेप्रमाणे तारणमुक्तीचा मार्ग जगाला दाखवून प्रभूने क्रुसावर आपले समर्पण केले. पुनरुत्थित होऊन ख्रिस्ताने मृत्यूवर विजय मिळवला. त्याच्या पुनरुत्थानाचे आपण सर्वजण सहभागिदार आहोत, योहान लिखित शुभवर्तमानात प्रभू येशू म्हणतो, 'पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे, जो | माझ्यावर विश्वास ठेरतो तो मेला तरी जगेल. (योहान ११:२५). प्रभू येशू ख्रिस्त ख्रिस्तशरीर / मिस्साद्वारे तो आपल्यात उपस्थित राहतो. त्याद्वारे जीवनाची भाकर तो आपल्याला देत असतो. तो म्हणतो, “जो माझा देह खातो आणि रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि मीच त्याला शेवटच्या दिवशी | उठवीन” (योहान ६:५४). आपला ख्रिस्ती विश्वास आपणास शिकवतो की, मृत्यू म्हणजे जीवनाचा शेवट नाही तर फक्त बदल आहे. पुनरुत्थानाविषयी आपली श्रद्धा अधिकाधिक बळकट व्हावी म्हणून प्रार्थना करूया.
प्रार्थना : हे प्रभू येशू, पुनरुत्थानाचे रहस्य जाणण्यास व श्रद्धेत वाढण्यास मला कृपा दे, आमेन...
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या