सामान्यकाळातील ३३ वा सप्ताह
शुक्रवार १८ नोव्हेंबर २०२२
“आपण खरोखर देवाचे पुत्र आहा. "
रोममध्ये व्हॅटिकन हिलच्या पायथ्याशी संत पीटरचे थडगे आहे. त्या थडग्यावर पोप संत अॅनाक्लेटस (इ. स. ८३) ह्यांनी पहिल्या पोपच्या स्मरणार्थ एक इमारत उभी केली. इथेच पेत्राचे अवशेष पुरण्यात आलेले आहेत. मात्र इ.स. २५८ साली काही काळाकरता व्हेलेरियन ह्या क्रूर सम्राटाच्या छळाच्या कारकीर्दीत सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने ते अवशेष संत सेबेस्टीयनच्या ख्रिस्तमंदिरात ठेवण्यात आलेले होते. पुन्हा ते मूळ जागी आणण्यात आले..
कॉन्स्टन्टाईन राजाच्या काळात मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती धर्मप्रसारास सुरूवात झाली. त्याने पेत्रच्या थडग्यावर एक भव्य महामंदिर उभारले. ब्रामान्ते आणि मायकल आंजेलो ह्यांनी आखलेल्या रचनेनुसार आज अस्तित्वात असलेले महामंदिर १६ व्या शतकात उभारण्यात आले.
संत पीटरचे महामंदिर हे जगातील सर्वात मोठे आणि ऐश्वर्यसंपन्न महामंदिर मानले जाते. एकाच वेळी या महामंदिरामध्ये ५०,००० भाविक उपासना व आराधनेसाठी एकत्र जमू शकतात. पोप अर्बन सातवे ह्यांनी १८ नोव्हेंबर १६२६ रोजी या महामंदिराचे मोठ्या थाटामाटात उद्घाटन व समर्पण केले.
पोप अनाक्लेटस ह्यांनी संत पॉलच्या नावानेही एक इमारत उभारलेली होती. ते एक छोटेखानी प्रार्थनामंदिर होते. रोमन कारकीर्दीत अशा प्रार्थनामंदिरांना अतिशय सन्मानपूर्वक हाताळले जाई. कॉन्स्टन्टाईनने संत पौलच्या थडग्यावर एक महामंदिर उभारले. इ.स. ३९५ साली ४०० फूट लांबीचे एक महामंदिर त्याच ठिकाणी उभारण्यात आले. ते १८२३ पर्यंत अस्तित्वात होते. त्याला थिओडोशियन बॅसिलिका असे नाव होते. परंतु १८२३ मध्ये ते आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.
पुढे नव्याने उभारण्यात आलेल्या संत पौलच्या महामंदिराची रचना प्राचीन महामंदिराप्रमाणेच आहे. हे महामंदिर आकर्षकता आणि भक्तीच्या दृष्टीने संत पीटर महामंदिरापेक्षाही अधिक प्रभावी आहे. ते पोप पायस नववे ह्यांनी १८५४ साली आशीर्वादित केले. त्याच्या दोन दिवस आधीच पोपमहाशयांनी पवित्र मरियेच्या निष्कलंक गर्भसंभवाविषयीच्या शिकवणुकीवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब केले होते.
देवाचे वसतीस्थान असणाऱ्या आपल्या धर्मग्रामातील मंदिराचे पावित्र्य राखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. देवाचे घर हे खरोखरच प्रार्थनेचे घर बनावे म्हणून आपण प्रयत्नशील बनू या..
✝️
पहिले वाचन : प्रेषितांची कृत्ये २८ : ११-१६. ३०-३१
वाचन : प्रेषितांची कृत्ये ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
“अशा रीतीने आम्ही रोम शहरात आलो.”
तीन महिन्यानंतर आलेक्सांद्रियाचे दयस्कुरे ह्या निशाणीचे एक तारू हिवाळा घालवण्याकरिता त्या बेटाजवळ राहिले होते, त्यात बसून आम्ही निघालो मग सुराकूस येथे मुक्काम करून आम्ही तीन दिवस राहिलो. तेथून वळसा घेऊन आम्ही रेगियोनास आलो आणि एक दिवसानंतर दक्षिणेचा वारा सुटल्यावर दुसऱ्या दिवशी आम्ही प्रत्युलास पोहचलो. तेथे आम्हांला बंधुजन भेटले. त्यांनी आपल्या येथे सात दिवस राहण्याची आम्हांला विनंती केली. अशा रीतीने आम्ही रोम शहरामध्ये आलो. तेथले बंधुजन आम्हांविषयी ऐकून अप्पियाची पेठ आणि तीन उतारशाळा येथपर्यंत आम्हांला सामोरे आले. त्यांना पाहून पौलाने देवाची उपकारस्तुती करून धैर्य धरले. आम्ही रोम शहरात गेल्यावर पौलाला त्याच्यावर पहारा करणाऱ्या शिपायाबरोबर वेगळे राहण्याची परवानगी मिळाली.
तो आपल्या भाड्याच्या घरात पुरी दोन वर्षे राहिला आणि जे त्याच्याकडे येत असत त्या सर्वांचे तो स्वागत करत असे. कोणापासून अडथळा न होता तो पूर्ण धैर्याने देवाच्या राज्याची घोषणा करत असे आणि प्रभू येशू ख्रिस्ताविषयीच्या गोष्टी शिकवत असे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ९८ : १,२-३अ, ३ब-४, ५-६
प्रतिसाद : परमेश्वराने राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे.
१ परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,
कारण त्याने अद्भुतकृत्ये केली आहेत.
त्याच्या उजव्या हाताने,
आपल्या पवित्र बाहूने तारण साधले आहे.
२ परमेश्वराने स्वतः सिध्द केलेले तारण प्रकट केले आहे.
इस्राएलच्या घराण्यावरील आपली दया
आणि सत्यता यांचे त्याने स्मरण केले आहे.
३ पृथ्वीच्या सर्व दिशांनी आमच्या देवाचे तारण पाहिले आहे.
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, उच्च स्वराने, आनंदाने गा.
४ परमेश्वराचे गुणगान वीणेवर करा,
वीणेवर सुस्वर स्तोत्र वाजवा.
कर्णा व शिंग वाजवून परमेश्वर राजासमोर जयघोष करा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे देवा, आम्ही तुझी स्तुती करतो,
तू प्रभू आहेस हे आम्ही मान्य करतो.
हे प्रभो, प्रेषितांच्या गौरवमय सहवासाबद्दल
आम्ही तुझी स्तुती करतो.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय १४:२२-३३
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा."
मी लोकसमुदायांना निरोप देत आहे तो तुम्ही तारवात बसून माझ्यापुढे पलीकडे जा, असे म्हणून येशूने शिष्यांना पाठवून दिले. मग लोकसमुदायांना निरोप दिल्यावर तो प्रार्थना करण्यास डोंगरावर एकान्ती गेला आणि रात्र झाल्यावरही तो तेथे एकटा होता. इकडे वारा तोंडचा असल्यामुळे किनाऱ्यापासून बऱ्याच अंतरावर तारू लाटांनी हैराण झालेले होते. तेव्हा रात्रीच्या चवथ्या प्रहरी तो समुद्रावरून चालत त्यांच्याकडे आला. शिष्य त्याला समुद्रावरून चालताना पाहून घाबरून गेले आणि म्हणाले, “भूत आहे” आणि ते भिऊन ओरडले. परंतु येशू त्यांना लगेच म्हणाला, “धीर धरा, मी आहे, भिऊ नका."
तेव्हा पेत्रने उत्तर दिले, “प्रभुजी, आपण असाल तर पाण्यावरून आपणाकडे येण्यास मला सांगा." त्याने म्हटले, “ये.” तेव्हा पेत्र येशूकडे जाण्यासाठी तारवातून उतरून पाण्यावरून चालू लागला, परंतु वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला, “प्रभुजी, मला वाचवा.” येशूने तत्क्षणी हात पुढे करून त्याला धरले आणि म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास ?" मग ते तारवात चढल्यावर वारा पडला. तेव्हा जे तारवात होते ते त्याच्या पाया पडून म्हणाले, “आपण खरोखर देवाचे पुत्र आहा. "
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :आज आपण संत पेत्र आणि पौल ह्यांचा महामंदिराचे समर्पण हा सोहळा साजरा करीत आहोत. हा सोहळा १२व्या शतकापासून साजरा केला जातो. ह्या सोहळ्याचे ऐतिहासिक महत्व असे की, ही महामंदिरे कॉनस्टानटाईन ह्या राज्याने संत पेत्र आणि पौल ह्यांच्या थडग्यांवर ४थ्या शतकात बांधली होती. ही महामंदिरे बांधण्याचा हेतू हा की, ख्रिस्तसभेच्या प्रसाराला वाव मिळावा. संत पेत्र ह्या महामंदिराची पुनर्स्थापना १७व्या शतकात करण्यात आली आणि संत पौल ह्या महामंदिराची पुनर्स्थापना १९व्या शतकात करण्यात आली. संत पेत्र आणि पौल ह्यांना सुरूवातीच्या ख्रिस्तीसमुहात महत्वाचे स्थान होते. ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर सुवार्ता प्रचाराचे कामात ह्या दोन्ही संताचा सिंहाचा वाटा आहे. सुवार्ताप्रचाराचे काम करत असताना ह्या दोन्ही संतांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. संत पेत्र हे अखिल ख्रिस्तसभेचे पहिले पोप ठरले आणि संत पौल हे परराष्ट्रीयासाठी प्रभूचे प्रेषित बनले.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या मंदिरातील तुझे अस्तित्व जाणून त्याचे पावित्र्य अबाधित ठेवण्यास मला प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या