सामान्यकाळातील ३३ वा सप्ताह
गुरुवार १७ नोव्हेंबर २०२२
“रडू नकोस, पाहा, यहुदा वंशाचा सिंह, दावीदचा अंकुर ह्याने जय मिळवला, म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे."
विधवा (१२०७-१२३१)
हंगेरीचा राजा अॅन्ड्रयू दुसरा ह्याची मुलगी एलिझाबेथ ही संत हेडविग (सण १६ ऑक्टो.) हिची पुतणी होती. वयाच्या चौथ्या वर्षी धुरिंजियन राजमहालात शिक्षण घेण्यासाठी तिला वॉट्र्सबर्ग येथे आणण्यात आले. त्यावेळी हे ठिकाण जर्मनीतील अतिशय सुसंस्कृत आणि ऐश्वर्यसंपन्न म्हणून प्रसिद्धीस आलेले होते. तिथेच ती ११ वर्षीय लुईस नावाच्या कुमाराशी वाग्दत्त झाली.
बालपणापासून पावित्र्यात वाढत असलेल्या एलिझाबेथने आपले भक्तिमय जीवन पुढे सुरू ठेवले. ह्या जीवनाचे प्रतीक म्हणजे तिने सोन्या- मोत्याचे दागिने वापरण्यास नकार दिला. ती म्हणत असे की, माझ्या प्रभूला तर काट्यांचा मुकूट प्रदान करण्यात आलेला ह ता मग मी सोन्या-चांदीचे दागिने कशी काय वापरू ?
संत एलिझाबेथ हिचे आध्यात्मिक मार्गदर्शक मार्बर्गचे फा. कोनार्ड म्हणतात, जेव्हा मी तिला विचारले की, तुझ्या मालमत्तेचे व संपत्तीचे मी काय करावे? तेव्हा तिने उत्तर दिले की, जे माझं आहे ते सर्व गोरगरिबांच्या मालकीचे आहे. तिने सर्व काही गोरगरीब व दीनदलितांना वाटून टाकण्यासाठी माझ्या स्वाधीन केले. ज्या कपड्यात आपल्याला पुरण्यात यावे अशी तिची इच्छा होती असा एक जुना फाटका अंगरखा मात्र तिने स्वत:कडेच ठेवला
आपण देवाला शरण जावे, सन्मार्गाने जीवन जगावे आणि देवराज्याचे वारसदार बनावे ही प्रभूची इच्छा आहे. प्रभू परमेश्वर वेळोवेळी जीवन परिवर्तनासाठी आपल्याला बोलावित असतो. ख्रिस्तसभेने पवित्र कृपा संस्काराद्वारे आपल्या प्रत्येकाला परिवर्तनाची आणि कृपादानाची संधी उपलब्ध करुन दिलेली आहे. अनेकदा आपले त्याकडे दुर्लक्ष होत असते म्हणूनच प्रभू म्हणतो, 'तुझ्यावर कृपादृष्टि केल्याचा समय तू ओळखला नाहीस'.
काळाची लक्षणे ओळखून प्रभूकडे वळण्यांस व पश्चात्तापी अंतः करणाने प्रभूला शरण जाण्यासाठी आपण आपली पाऊले देवाकडे वळवू या.
✝️
पहिले वाचन : प्रकटीकरण ५:१-१०
वाचन : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन
"कोकरू वधले गेले आणि त्याच्या रक्ताने लोकांना देवासाठी विकत घेण्यात आले. "
जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात पाठपोट लिहिलेली आणि सात शिक्के मारून बंद केलेली पुस्तकाची एक गुंडाळी मी स्वतः योहानने पाहिली आणि “गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडायला कोण योग्य आहे, " असे मोठ्याने पुकारणारा एक बलवान देवदूत मी पाहिला. तेव्हा स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडायला किंवा तिच्यात पाहायला समर्थ नव्हता. ही गुंडाळी उघडायला किंवा तिच्यात पाहायला योग्य असा कोणी आढळला नाही, म्हणून मला फार रडू आले. तेव्हा वडील मंडळीपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस, पाहा, यहुदा वंशाचा सिंह, दावीदचा अंकुर ह्याने जय मिळवला, म्हणून तो तिचे सात शिक्के फोडून ती उघडण्यास योग्य ठरला आहे."
तेव्हा राजासन आणि चार प्राणी ह्यांच्यामध्ये आणि वडीलमंडळी ह्यांच्यामध्ये ज्याचा जणू काय वध करण्यात आला होता, असा कोकरा उभा राहिलेला मी पाहिला, त्याला सात शिंगे आणि सात डोळे होते. ते सर्व पृथ्वीवर पाठवलेले देवाचे सात आत्मे आहेत. त्याने जाऊन राजासनावर जो बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. त्याने गुंडाळी घेतली तेव्हा ते चार प्राणी आणि चोवीस वडीलजन कोकराच्या पाया पडले. त्या प्रत्येकाजवळ वीणा आणि धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या, त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत. ते नवे गीत गाऊन म्हणतातः
तू गुंडाळी घ्यावयास आणि तिचे शिक्के फोडावयास योग्य आहेस, कारण तू वधला गेला होतास आणि तू आपल्या रक्ताने सर्व वंश निरनिराळ्या भाषा बोलणारे, लोक आणि राष्ट्रे ह्यांमधून आमच्या देवासाठी विकत घेतले आहेत आणि आमच्या देवासाठी त्यांस राज्य याजक केले आहेस. आणि ते पृथ्वीवर राज्य करतील.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ५०:१- ६,९
प्रतिसाद : आमच्या देवाच्या सेवेसाठी आम्हांला राज्य आणि याजक असे केले आहेस.
१ )परमेश्वराचे स्तवन करा.
नवे गीत गाऊन परमेश्वराचे गुणगान करा,
भक्तांच्या मंडळीत त्याचे स्तोत्र गा.
इस्राएल आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंद करो,
सियोनची मुले आपल्या राजाच्या ठायी उल्हासोत.
२) ती नृत्य करत त्यांच्या नामाचे स्तवन करोत,
डफ आणि वीणा ह्यांवर त्याला स्तोत्रे गावोत,
कारण परमेश्वर आपल्या लोकांवर संतुष्ट आहे,
तो नम्रजनांना तारणाने सुशोभित करतो.
३) भक्त गौरवामुळे उल्हासोत,
ते आपल्या अंथरुणांवरून हर्षघोष करोत.
परमेश्वराची परमश्रेष्ठ स्तुती त्यांच्या कंठी असो
हे त्याच्या सर्व भक्तांना भूषण होईल परमेश्वराचे स्तवन करा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास
माझे अंतःकरण वळव आणि तुझे नियमशास्त्र मला शिकव.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १९:४१-४४
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते!”
मग येशू शहराजवळ आल्यावर येरुशलेमकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, "जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते! परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील आणि तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील, तुला आणि तुझ्या मुलाबाळांना धुळीला मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत. कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :१५ एप्रिल १८६५ मध्ये आब्राहाम लिंकन ह्यांचा खून झाल्यानंतर त्याचे मृत शरीर काही काळ लोकांना अंत्यदर्शनासाठी क्लिवलँड ओहीओ येथे ठेवण्यात आले होते. त्याच्या अंत्यदर्शनासाठी खूप गर्दी होती. त्या गर्दीतील एक कृष्णवर्णीय रंगाची अमेरिकन आपल्या लहान मुलाला आपल्या दोन्ही हातांनी वर उचलते आणि त्या मुलाला सांगते की, आपल्या राष्ट्रपतींना पहा, त्याचा चेहरा चांगला निरखून पहा, हा मनुष्या (राष्ट्रपती) आपणांसाठी मेला, तुझ्या आणि माझ्याकरिता त्याने आपला प्राण दिला. जे त्या गरीब बाईने आपल्या मुलाला सांगितले की, हा मनुष्य आपणांसाठी मेला. तेच प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल देखील आहे. तो आपणासर्वांसाठी, आपले तारण व्हावे म्हणून मेला. क्रुसावर आपले रक्त सांडून त्याने आपल्या पापांची किंमत चुकवली. जेणेकरून आपली मृत्यूपासून आणि पापांपासून सुटका व्हावी आणि त्याच्यात आपणांस नवजीवन प्राप्त व्हावे. “त्याने आपणांस नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले.” येशू ख्रिस्ताने केलेल्या क्रुसावरील बलिदानाच्या रहस्यांवर आपण मनन-चिंतन करण्याची गरज आहे आणि दिलेल्या आज्ञा आपल्या जीवनात आचरणात आणण्याची गरज आहे. ह्यासाठी लागणारी परमेश्वरी कृपा आपण त्याच्याकडे मागूया. आमेन.
प्रार्थना : हे प्रभू, जीवनातील प्रत्येक अनमोल क्षण तुझ्या इच्छेप्रमाणे जगण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या