सामान्यकाळातील ३३ वा सप्ताह
बुधवार १६ नोव्हेंबर २०२२
ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल.
स्कॉटलंडची संत मार्गारेट
राणी (१०४६-१०९३)
संत मागरिट तासन् तास प्रार्थनेमध्ये दंग असे. भोजनानंतर तिने रचलेली प्रार्थना कितीतरी शतके " संत मागरिटचा आशीर्वाद" ह्या नावाने प्रसिद्ध होती. गरिबांची ती व्यक्तिशः सेवा करीत असे. स्कॉटलंडचा राजा आणि राणी मागरिट दिवसाला ३०० भिकाऱ्यांना व गरिबांना अन्न पुरवीत. तेही आपल्या राजवाड्यातील भव्य सभागृहामध्ये !
तिच्या आठ मुलांपैकी दोघे व्रतस्थ जीवन जगणारे भिक्षूक बनले तर इतरांनी आपल्या देशाचे समर्थपणे नेतृत्व केले. तिची मुलगी संत मॅटिल्डा हिचा इंग्लंडचा राजा हेन्री पहिला ह्याच्याशी विवाह झाला. पुढे ती उत्तम राणी मॉड या नावाने इतिहासप्रसिद्ध झाली.
संत मागरिट १६ नोव्हेंबर १०९३ साली मरण पावली. पोप इनोसेंट चौथे ह्यांनी तिला संतपद दिले. ती स्कॉटलंडची आश्रयदाती संत मानली जाते.
चिंतन : हे सर्वसमर्थ परमेश्वरा, माझ्या आयुष्यातील अखेरच्या क्षणी माझ्यावर मोठा कठीण प्रसंग व यातना पाठवून तू आपल्या दयेने मला माझ्या पापांपासून शुद्ध केलेस त्याबद्दल मी तुझे आभार मानते. - स्कॉटलंडची संत मार्गारेट
परमेश्वराने प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे आणि दानाप्रमाणे कार्य करण्याची जबाबदारी सोपविलेली आहे. जबाबदारी विश्वासाने व प्रमाणिकपणे पार पाडावी ही देवाची योजना व इच्छा आहे. परमेश्वराने मोठ्या विश्वासाने आपल्याला जबाबदारी पार पाडण्यासाठी व जीवन फलदायी बनविण्यासाठी देणग्या व कृपादाने दिलेली आहेत. जीवनाच्या अंतिम समयी प्रभू वैभवाने परतणार असून आपल्या जीवनकार्याचा हिशोब घेणार आहे, म्हणूनच प्रभू म्हणत आहे, 'ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल. ' आपण विश्वासाने आणि प्रामाणिकपणे आपले जीवन फलद्रूप बनविण्यासाठी व देवाचा गौरव करण्यासाठी कार्यरत बनू .
✝️
पहिले वाचन : प्रकटीकरण ४:१-११
वाचन : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन
"पवित्र, जो होता, जो आहे आणि जो येणार तो सर्वसमर्थ प्रभू देव."
मी, स्वतः योहानने पाहिले तो, स्वर्गात दार उघडलेले मला दिसले आणि जी वाणी मी प्रथम ऐकली होती, ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या कर्ण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी ह्यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन, लागलीच मी आत्म्याने संचरित झालो. तो पाहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणीएक बसलेला होता. जो बसलेला होता तो दिसण्यात यास्फे आणि सार्दी ह्या रत्नांसारखा होता. राजासनाभोवती दिसण्यात पाचूसारखे मेघधनुष्य होते. राजासनाभोवती चोवीस आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले आणि डोक्यावर सोन्याचे मुकूट घातलेले चोवीस वडीलजन बसलेले होते. राजासनाच्या आतून विजा, वाणी आणि मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या सात मशाली राजासनापुढे जळत होत्या, त्या देवाचे सात आत्मे आहेत. राजासनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता.
राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या चार बाजूला, पुढे आणि मागे अंगभर डोळे असलेले चार प्राणी होते. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा बैलासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा आणि चौथा प्राणी उडत्या गरूडासारखा होता. त्या चारही प्राण्यांना प्रत्येकी सहा सहा पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते आणि
"पवित्र, पवित्र, पवित्र
जो होता, जो आहे आणि जो येणार
तो सर्वप्रथम प्रभू देव."
असे ते रात्रंदिवस म्हणतात, ते कधीच थांबत नाहीत.
राजासनावर बसलेला जो युगानुयुगे जिवंत आहे त्याचा जेव्हा जेव्हा ते प्राणी गौरव, सन्मान आणि उपकारस्तुती करतात, तेव्हा तेव्हा ते चोवीस वडीलजन राजासनावर जो बसलेला आहे त्याच्या पाया पडतात, जो युगानुयुगे जिवंत त्याला नमन करतात आणि मुकूट राजासनापुढे ठेवून म्हणतात.
"हे प्रभो, आमच्या देवा, गौरव, सन्मान आणि सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करण्यास तू योग्य आहेस. कारण तू सर्व काही निर्माण केलेस, तुझ्या इच्छेने ते झाले आणि अस्तित्वात आले.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १५१:१- ६
प्रतिसाद : पवित्र, पवित्र, पवित्र, प्रभू सर्वसमर्थ परमेश्वर आहे.
१) परमेश्वराचे स्तवन करा,
देवाचे त्याच्या पवित्र स्थानी स्तवन करा,
त्याच्या सामर्थ्याच्या अंतराळात त्याचे स्तवन करा,
त्याच्या थोरवीबद्दल त्याची स्तुती करा.
२) कर्णा वाजवून त्याचे स्तवन करा,
सतार आणि वीणा वाजवून त्याचे स्तवन करा
तंतूवाद्ये आणि बासरी वाजवून त्याचे स्तवन करा
३) खणखणणारे टाळ वाजवून त्याचे स्तवन करा
झणझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करा
प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो
परमेश्वराचे स्तवन करा.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, तुझे नियमशास्त्र आचरण्यास
आणि ते मी मनापासून पाळावयास मला शिकव.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १९:११-२८
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस ?”
येशूने त्यांस एक दाखला सांगण्यास सुरुवात केली. तो येरुशलेमजवळ होता आणि देवाचे राज्य आता लगेच प्रकट होणार आहे असे त्यांना वाटत होते, म्हणून तो म्हणाला, "कोणी एक उमराव, आपण राज्य मिळवून परत यावे ह्या उद्देशाने दूर देशी गेला. त्याने आपल्या दहा नोकरांना बोलावले आणि त्यांना दहा मोहरा देऊन सांगितले, मी येईपर्यंत त्यांवर व्यापार करा. त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ह्याने आम्हांवर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही. मग असे झाले की, तो राज्य मिळवून परत आल्यावर ज्या नोकरांना त्याने पैसा दिला होता त्यांनी व्यापारात काय काय मिळवले हे पाहावे म्हणून त्याने त्यांस आपणांकडे बोलावायला सांगितले. मग पहिला त्याच्यासमोर येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी दहा मोहरा मिळवल्या आहेत.” त्याने त्याला म्हटले, शाबास, भल्या नोकरा, तू लहानशा गोष्टीत विश्वासू राहिलास म्हणून दहा नगरांवर तुला अधिकार दिला आहे. नंतर दुसरा येऊन म्हणाला, महाराज, आपल्या मोहरेवर मी पाच मोहरा कमावल्या आहेत. त्यालाही त्याने म्हटले, तुलाही पाच नगरांवर अधिकार दिला आहे. मग आणखी एक येऊन म्हणाला, “महाराज, ही पाहा आपली मोहर. ही मी रुमालात बांधून ठेवली होती. कारण आपण करडे असल्यामुळे मला आपली भीती वाटली. जे आपण ठेवले नाही ते उचलून घेता आणि जे आपण पेरले नाही त्याची कापणी करता.ह्ण तो त्याला म्हणाला, "अरे दुष्ट नोकरा, मी तुझ्याच तोंडाने तुझा न्याय करतो. मी करडा माणूस आहे, जे मी ठेवले नाही ते उचलून घेतो आणि जे पेरले नाही त्याची कापणी करतो, हे तुला ठाऊक होते काय? मग तू माझा पैसा पेढीवर का ठेवला नाहीस? ठेवला असता तर मी येऊन तो व्याजासह वसूल केला असता. मग त्याने जवळ उभे राहणाऱ्यांस सांगितले, ह्याच्यापासून ती मोहर घ्या आणि ज्याच्याजवळ दहा मोहरा आहेत त्याला द्या. ते त्याला म्हणाले, महाराज, त्याच्याजवळ दहा मोहरा आहेत. मी तुम्हांला सांगतो, ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याचे जे आहे ते देखील त्याच्यापासून घेतले जाईल. आता ज्या माझ्या शत्रूंच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांस येथे आणा आणि माझ्यादेखत ठार मारा. ह्या गोष्टी सांगून तो वर येरुशलेमकडे जात असताना स्वतःपुढे चालत होता.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :आपले जीवन ही परमेश्वराने दिलेली एक मोठी देणगी आहे. ह्या जीवनाच्या देणगी बरोबरच आपणांस दुसऱ्या अनेक अशा देणग्या परमेश्वराकडून मिळालेल्या आहेत. आपल्याकडे असलेले कला-गुण, संपत्ती, कुटुंब, नातेवाईक, मित्र, चांगले सुदृढ शरीर, विचार करण्याची शक्ती इत्यादी हे सर्वकाही आपणांस परमेश्वराकडून मिळालेले दान आहे. परमेश्वराने दिलेले सर्वकाही त्याच्या राज्यांसाठी वापरण्याची गरज आहे. त्याचे प्रीतीचे, दयेचे, क्षमेचे आणि उदारतेचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी जेव्हा आपल्याला दिलेले कलाकौशल्य आपण जास्तीत जास्त इतरांच्या सेवेसाठी वापरतो तेव्हा ते आपल्याकडे वाढत जाते. पण जेव्हा आपण त्याचा वापर करत नाही तेव्हा आपण त्या कला-कौशल्यात कमकुवत होतो आणि आपले कला-गुण त्या शेवटल्या दासाप्रमाणे गमावून बसतो. आपणास दिलेले कला-गुण आणि कौशल्य इतरांच्या सेवेसाठी वापरण्याचे धैर्य आणि साहस आपणांमध्ये असण्याची गरज आहे. आपण जेवढ्या जोमात आणि सृजनशीलतेने परमेश्वराच्या देणग्या दुसऱ्यांच्या भल्यासाठी आणि सेवेसाठी वापरतो तेवढे आपणही सृजनशील बनत असतो. कारण परमेश्वराच्या देणग्या ह्या कधीही न संपणाऱ्या आहेत.
प्रार्थना : हे प्रभू येशू, मला लाभलेल्या कलागुणांचा व कृपादानांचा योग्य तो स्वतःच आपला न्याय करणार आहोत.वापर करण्यास व तुझा गौरव करण्यास प्रेरणा व शक्ती दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या