Marathi Bible Reading | Tuesday 15th November 2022 | 33 Week in Ordinary Time


सामान्यकाळातील ३ वा सप्ताह 

मंगळवार १५ नोव्हेंबर  २०२२

“प्रभो, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य गरिबांना देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर तर चौपट परत करतो.”




संत आल्बर्ट महान  

•महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१२०६-१२८०)

आज जणू प्रभू येशू आपल्या दाराशी उभा राहून आपले दार ठोठावित  आहे व सांगत आहे, 'मला तुझ्या जीवनात यायचे आहे, तुला शुद्ध करायचे आहे'. आजच पश्चात्ताप करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. आपण तयार आहेत का प्रभू येशूला आपल्या जीवनात स्वीकारण्यासाठी ? 

✝️   

पहिले वाचन :  प्रकटीकरण ३:१-६,१४-२२
वाचन : प्रकटीकरण या पुस्तकातून घेतलेले वाचन
"जर कोणी दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत  जाईन आणि त्याच्याबरोबर जेवीन."

मी, स्वतः योहान ह्याने, प्रभूने मला सांगताना ऐकले, : “सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही: ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे आहेत आणि सात तारे आहेत तो असे म्हणतो:

तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू जिवंत आहेस असे तुझ्याविषयी म्हणतात, पण तू मेलेला आहेस. जागृत हो, आणि जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर. कारण तुझी कृत्ये माझ्या देवाच्या दृष्टीने पूर्ण अशी माझ्या पाहण्यात आली नाहीत. म्हणून तू कसे स्वीकारले आणि ऐकले ह्याची आठवण कर, ते जतन करून ठेव आणि पश्चात्ताप कर. कारण तू जागृत झाला नाहीस तर मी चोरासारखा येईन, मी कोणत्या घटकेस तुझ्यावर चालून येईन हे तुला मुळीच कळणार नाही. तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळवली नाहीत, अशी थोडी नावे सार्दीस येथे , तुझ्याजवळ आहेत. ते शुभ्र वस्त्रे परिधान करून माझ्याबरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर मी त्यांचे नाव पत्करीन. आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको."
“लावदिकीया येथील मंडळींच्या दुताला लिही: जो आमेन, जो विश्वसनीय आणि खरा साक्षी, जो देवाच्या सृष्टीचे आदिकरण तो असे म्हणतो:
तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत, तू शीत नाहीस आणि उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते. पण तू तसा नाहीस, कोमट आहेस. म्हणजे उष्ण नाहीस, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. मी श्रीमंत आहे, मी धन मिळवले आहे आणि मला काही उणे नाही असे तू म्हणतोस, पण तू कष्टी, दीन, दरिद्री, तू आंधळा आणि वस्त्रहीन आहेस हे तुला कळत नाही. म्हणून मी तुला सल्ला देतो की, श्रीमंत होण्यासाठी तू अग्नीने शुद्ध केलेले सोने माझ्यापासून विकत घे, तुझी लज्जास्पद नम्रता दिसण्यात येऊ नये म्हणून नेसायला शुभ्र वस्त्रे विकत घे आणि तुला दृष्टी यावी म्हणून डोळ्यात घालायला अंजन विकत घे. जितक्यांवर मी प्रेम करतो तितक्यांचा निषेध करून त्यांना शिक्षा करतो, म्हणून आस्था बाळग आणि पश्चात्ताप कर. पाहा, मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी त्याच्याजवळ आत जाईन आणि त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन. आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत ते ऐको.”
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र : १५:१- ५
प्रतिसाद : विजयीजनांना मी आपल्या राजासनावर आपल्याबरोबर बसू देईन

१ हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील ? 
तो सात्त्विकतेने चालतो आणि नीतीने वागतो तो, 
जो मनापासून सत्य बोलतो तो,
जो आपल्या जिभेने चुगली करत नाही तो. 

२ तो आपल्या बंधूंचे वाईट करत नाही,
शेजाऱ्यांची निंदा करत नाही, अधर्माला तुच्छ लेखतो, 
पण परमेश्वराचे भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो

३ तो आपला पैसा व्याजी लावत नाही, 
तो निरपराध्यांची हानी करण्याकरिता लाच घेत नाही, 
जो असा वागतो तो कधी ढळणार नाही.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
तुझे नियम मला समजावून दे, 
म्हणजे मी तुझ्या अद्भुत कृत्यांचे मनन करीन.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक १९:१-१०
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधावयास आणि तारावयास आला आहे."

येशूने यरिहोत प्रवेश केला आणि तो पुढे जात होता. तेव्हा पाहा, जक्कय नावाचा कोणी एक मनुष्य होता, तो मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना, कारण तो ठेंगणा होता. तेव्हा तो पुढे धावत जाऊन त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला, कारण येशूला त्या वाटेने जायचे होते. मग येशू त्या ठिकाणी येताच दृष्टी वर करून त्याला म्हणाला, “जक्कय त्वरा वरून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे.” तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगतस्वागत केले. हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले की, "हा पापी मनुष्याच्या घरी उतरायला गेला आहे."
तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभो, पाहा, मी आपले अर्धे द्रव्य गरिबांना देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असेल तर तर चौपट परत करतो.” येशूने त्याला म्हटले, “आज ह्या घराला तारण प्राप्त झाले आहे, कारण हाही आब्राहामचा पुत्र आहे. कारण मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायला आणि तारायला आला आहे.”
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :परमेश्वर आपली वर्तणूक पाहतो आणि हृदयात असलेल्या इच्छा आकांक्षा तो जाणून घेतो. हे जक्कयाच्या उदाहरणावरून आपण शिकतो. जक्कय ह्याला शारीरिक दुर्बळता, त्याचे ठेंगणेपण आणि त्याच्याप्रती समाजाचा असलेला हेवा ह्या समस्या असूनही त्याच्यात प्रभू येशूला भेटण्याची तीव्र इच्छा होती. त्याची ती इच्छा पूर्ण करण्यासाठी तो ह्या समस्यावर तोडगा म्हणून झाडावर चढतो. झाडावर चढून येशूला पाहण्यासाठी तो थोडाही संकोचला नाही, लोक मला पाहून हसतील, वेड्यात काढतील ह्या सर्व गोष्टींना न जुमानता तो झाडावर चढून येशूला पाहतो. तो खूप श्रीमंत होता पण येशूला पाहण्यासाठी नम्र झाला. त्याचे प्रत्युत्तर म्हणून येशूने त्याला निरखून पाहिले आणि त्याला त्याच्या नावाने हाक मारली. एवढेच नाही तर येशू जेवणासाठी त्याच्या घरी थांबतो. येशू ख्रिस्ताने जाणले की, जक्कय हा परमेश्वराच्या कृपेचा भूकेला आहे. दैवी कृपा मिळावी म्हणून जक्कयने त्याचे हृदय आणि मन उघडे ठेवले आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे जक्कयला दैवी दयेचा आणि कृपेचा अनुभव येतो.त्याचे परिवर्तन होते. त्याच्या परिवर्तनाचे चिन्ह म्हणजे जक्कयने जमा केलेली सर्व संपत्ती तो दीन-दुबळ्यांना दान करतो. जक्कयप्रमाणे परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घेण्यासाठी आपण आपले हृदय आणि मन उघडे ठेवले आहे का ?

प्रार्थना :   हे प्रभू येशू, माझ्या जीवनात ये आणि माझे मलीन हृदय स्वच्छ कर व मला तुझ्या तारण दायी प्रकाशात आण, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या