सामान्यकाळातील ३३ वा सप्ताह
सोमवार १४ नोव्हेंबर २०२२
"प्रभो, मला पुन्हा दृष्टी यावी.” येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”
संत लॉरेन्स ओ' तुले
डब्लीनचे आर्चबिशप (११२५-११८०)
लॉरेन्सचा जन्म इ. स. ११२५ साली झाला. तो कोवळ्या (१० वर्षे) वयाचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला लेईन्क्टरचा राजा डमड मॅक मुर्काड ह्याच्या हाती सुपूर्द केले. त्या राजाने बाळकाची काळजी घेण्याऐवजी त्याचा अमानुष छळ आरंभिला. शेवटी वात्सल्यमय कळकळीने बापाने राजाला विनंती केली आणि आपल्या मुलाला सोडवून विक्लोव्ह देशाच्या ग्लेन्डालॉफा धर्मप्रांतातील महागुरूंकडे पाठवून दिले.
लॉरेन्स हा मूलतः स्वभावाने नम्र, पवित्र आणि सद्गुणी होता.. त्याच्यामधून दैवी तेज पाझरत असल्याचा भास होई. महागुरूंच्या मृत्यूनंतर मठाच्या अधिकाऱ्याची जागा रिकामी झाली. कारण ते महागुरू स्वत: मठाधिकारी होते. लॉरेन्सचे वय २५ वर्षाहून कमी असता देखील त्याला मठाधिकारी म्हणून निवडण्यात आले.
त्यावेळी त्याचा धर्मप्रांत खूप श्रीमंत व ऐश्वर्यसंपन्न होता. परंतु लॉरेन्सने आपल्या वाट्याला येणारे सर्व सुख व समृद्धी गोरगरिबांना वाटून टाकली आणि तो अंत्यत गरिबीत राहू लागला. आपल्या संघाचे त्याने अतिशय चांगल्या प्रकारे आणि समर्थपणे नेतृत्व केले. आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी त्याने आपला बहुतांश वेळ दिला.
इ.स. १९६१ साली डब्लीन सरधर्मप्रांताचे आर्चबिशप म्हणून लॉरेन्सची बिनविरोध निवड झाली. त्याद्वारे ११६१ साली त्याला आपल्या धर्मप्रांताचे प्रश्न घेऊन इंग्लंडचा राजा हेन्री दुसरा ह्याला भेटण्याचा प्रसंग आला. त्यावेळी हा आंग्ल सम्राट कँटरबरी येथे होता. क्राईस्ट्सचर्च येथील बेनेडिक्टाईन मठवाशांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले.
दुसऱ्या दिवशी मिस्सा अर्पण करण्यासाठी वेदीवर जात असताना, आर्चबिशप लॉरेन्स ह्यांच्या पावित्र्याविषयी ऐकलेल्या एका वेडसर मनुष्याने भावनेच्या भरात आर्चबिशपांच्या डोक्यावर मुष्टीप्रहार केला. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले. उपस्थितांना वाटले की, त्यांना शारीरिकदृष्ट्या खूप इजा झालेली असावी. परंतु आर्चबिशपांनी थोडेसे पाणी मागितले व ते आशीर्वादित केले आणि इजा झालेल्या भागाला ते पाणी लावले. तत्काळ रक्त थांवले आणि आर्चबिशपांनी सहजगत्या पवित्र मिस्सा मोठ्या उत्साहाने साजरी केली.
इ. स. ११७५ साली आयर्लंडचा राजा रोडेरीक आणि इंग्लंडचा सम्राट हेन्री दुसरा ह्यांच्यात संघर्षमय परिस्थिती निर्माण झालेली असताना संत लॉरेन्स पुन्हा एकदा इंग्लंडला गेले आणि त्यांनी ती परिस्थिती नियंत्रणाखाली आणली व उभयतांमध्ये समेट घडवून आणला.
ह्या समेटाच्या काळात सम्राट हेन्री दुसरा ह्याच्यावर संत लॉरेन्सच्या दयापूर्ण, शुद्ध आणि विवेकी जीवनाचा इतका विलक्षण प्रभाव पडला की त्याने संत लॉरेन्सचे म्हणणे ताबडतोब मान्य केले.
शेवटी १४ नोव्हेंबर १९८० साली लॉरेन्सची इहलोकीची यात्रा संपुष्टात आली. त्याला नॉर्मंर्डीच्या परिसरातील एका मठाच्या चर्चमध्ये पुरण्यात आले.
✝️
पहिले वाचन : प्रकटीकरण १:१-४; २:१-५
वाचन : "तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर आणि पश्चात्ताप कर.'
देवाकडून येशू ख्रिस्ताला झालेले हे प्रकटीकरण आहे. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत त्या आपल्या सेवकांना दर्शविण्याकरिता हे झाले आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला सेवक योहान ह्याला कळवले. त्याने देवाच्या वचनाविषयी आणि येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारे, ते ऐकणारे आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे धन्य होत, कारण समय जवळ आला आहे.
आशियातील सात मंडळ्यांना योहानकडूनः
जो आहे, जो होता आणि जो येणार त्याच्यापासून, त्याच्या राजासनासमोर जे सात आत्मे आहेत त्यांच्यापसून.
इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही: 'जो आपल्या उजव्या हातात सात तारे धारण करतो, सोन्याच्या सात समयांमधून चालतो,' तो असे म्हणतो:
"तुझी कृत्ये, तुझे श्रम आणि तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाहीत, जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहो असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे, माझ्या नामामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाहीस तरी तू आपली पहिली प्रीती सोडली ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर आणि पश्चात्ताप करून आपली पहिली कृत्ये कर.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १:१- ६
प्रतिसाद : विजयीजनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खायला देईन.
१ )जो 'मनुष्य दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही.
पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही
आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही,
तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो
त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य.
२) जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते,
जे आपल्या हंगामी फळ देते,
ज्याची पाने कोमेजत नाहीत,
अशा झाडासारखा तो आहे.
आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते.
३) दुर्जन तसे नाहीत. ते वाऱ्याने उडून जाणाऱ्या
भुशासारखे आहेत. कारण नीतिमांनाचा मार्ग
परमेश्वराला अवगत असतो,
पण दुर्जनांचा मार्ग विनाशाकडे जातो.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १८:३५-४३
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे ? प्रभो, मला पुन्हा दृष्टी यावी. "
येशू यरीहोजवळ आला तेव्हा एक आंधळा भीक मागत वाटेवर बसला होता. त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, "हे काय आहे?" त्यांनी त्याला सांगितले, “येशू नाझरेथकर जवळून जात आहे." तेव्हा तो ओरडून म्हणाला, “अहो येशू, दावीदच्या पुत्रा, माझ्यावर दया करा!” तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्यांनी त्याला दटावले, तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, “अहो दावीदच्या पुत्रा, माझ्यावर दया करा!” तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली. तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे ?" तो म्हणाला, "प्रभो, मला पुन्हा दृष्टी यावी.” येशू त्याला म्हणाला, “तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णीत त्याच्यामागे चालू लागला. तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : "प्रयत्नांती परमेश्वर" अशी एक मराठीत म्हण आहे. आजच्या शुभवर्तमानातील आंधळा माणूस आपणांस हेच शिकवतो की कितीही अडथळे आले तरी माणसांनी सतत प्रयत्न करीत राहावे. एकवेळ त्याला येशूपासून दूर जाण्यासाठी काही लोक त्याच्यासाठी अडथळा बनतात, त्यांच्यावर ओरडतात, गप्प राहायला सांगतात तरीदेखील आपल्यासमोरील अडथल्याना न जुमानता केवळ विश्वासाने तो येशूकडे विनवणी करतो. शारीरिकरित्या तो अंध जरी असला तरी त्याच्या हृदयाच्या डोळ्यांनी तो येशूला पाहू शकला की, तो परमेश्वराकडून आलेला आहे. लोकांनी आणलेल्या अडथळ्याला प्रत्युत्तर म्हणून तो आणखी जोराने प्रार्थना करतो. प्रभू येशू इतर लोकांप्रमाणे त्याला ओरडत नाही, गप्प राहायला सांगत नाही. तर त्याच्या जवळ येऊन येशू त्याला विचारतो की, “मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे." प्रभू येशूला माहित आहे त्या आंधळ्याला काय पाहिजे तरीदेखील प्रभू येशू त्याला तसा प्रश्न विचारून त्याची गरज ठामपणे व्यक्त करण्याची संधी त्या आंधळ्याला देतो. त्या आंधळ्याच्या प्रार्थनेत किंवा विनंतीत असलेल्या चिकाटीमुळे प्रभू येशू त्याला बरे करतो व त्याला दृष्टी प्राप्त होते.
प्रार्थना : हे प्रभू येशू, आमचा विश्वास दृढ बनण्यास आवश्यक ती कृपा प्रभू आम्हाला दे, आमेन..
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या