सामान्यकाळातील ३३ वा रविवार
१३ नोव्हेंबर २०२२
तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने खरे जीवन मिळवाल.
✝️
पहिले वाचन :मलाखी ४:१-२अ
वाचक : मलाखीच्या या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तुम्हांवर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल.”
पाहा, भट्टीसारखा तप्त दिवस येत आहे, त्या भट्टीत गर्विष्ठ आणि सर्व दुराचारी धसकट बनतील, तो येणारा दिवस त्यांना जाळून टाकील, त्यांचे मूळ, फांदी वगैरे काहीच राहू देणार नाही, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. पण तुम्ही जे माझ्या नामाचे भय धरणारे त्या तुम्हांवर न्याय्यत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखात आरोग्य असेल.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ९८:५-६, ७- ८, ९
प्रतिसाद : परमेश्वर लोकांचा सरळपणे न्याय करायला आला आहे.
१) परमेश्वराची स्तोत्रे वीणेवर गा,
संगीत स्वराने गा. कर्णा आणि
शिंग वाजवून परमेश्वर राजा ह्याचा जयघोष करा.
२) समुद्र आणि त्यातील सर्व काही, जग
आणि त्यात राहणारे हर्षनाद करतो.
नद्या टाळ्या वाजवोत, पर्वत एकवटून परमेश्वरासमोर आनंदाने गावोत.
३) कारण परमेश्वर पृथ्वीचा न्याय करायला आला आहे.
तो जगाचा न्याय यथार्थतेने करील
आणि लोकांचा न्याय सरळपणे करील.
दुसरे वाचन २ थेस्सलनी ३:७-१२
वाचक: पौलचे थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
"कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. "
आमचे अनुकरण कोणत्या रीतीने केले पाहिजे हे तुम्हां स्वत:ला ठाऊक आहे. कारण आम्ही तुम्हांमध्ये असताना अव्यवस्थितपणे वागलो नाही आणि आम्ही कोणाचे अन्न फुकट खाल्ले नाही, परंतु तुम्हांपैकी कोणावरही भार घालू नये म्हणून आम्ही रात्रंदिवस श्रम आणि कष्ट करून काम केले. तसा आम्हांला अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हांला कित्ता घालून द्यावा म्हणून असे केले. आम्ही तुमच्याबरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हांला अशी आज्ञा केली होती की, कोणाला काम करण्याची इच्छा नसेल तर त्याने खाऊही नये. तरी तुमच्यामध्ये कित्येक अव्यवस्थितपणाने वागणारे असून ते काहीएक काम न करता लुडबूड करतात असे ऐकतो. अशा लोकांना आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नामाने आज्ञा आणि बोध करतो की, त्यांनी स्वस्थपणे काम करून स्वतःचेच अन्न खावे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुम्ही मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहण्यास समर्थ व्हावे म्हणून
सर्व प्रसंगी प्रार्थना करत जागृत राहा.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक २१:५-१९
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तुम्ही आपल्या धीराने खरे जीवन मिळवाल.”
मंदिर उत्तम पाषाणांनी आणि अर्पणांनी कसे सुशोभित केलेले आहे, ह्याविषयी काही जण बोलत असता येशूने म्हटले, "असे दिवस येतील की, जे तुम्ही पाहत आहा त्यातला पाडला जाणार नाही असा एकही चिरा राहणार नाही," तेव्हा त्यांनी त्याला विचारले, “गुरुजी, ह्या गोष्टी केव्हा होतील ? आणि ज्या काळी ह्या गोष्टी घडून येतील त्या काळाचे चिन्ह काय ?" तो म्हणाला, “तुम्हांला कोणी बहकवू नये म्हणून सावध राहा. कारण माझ्या नामाने पुष्कळ लोक येऊन, मीच तो आहे असे म्हणतील. त्याच्या नादी लागू नका, जेव्हा तुम्ही लढाया आणि दंगे ह्याविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका, कारण ह्या गोष्टी प्रथम होणे अवश्य आहे, तरी एवढ्यात शेवट होत नाही." मग त्याने म्हटले, "राष्ट्रांवर राष्ट्र आणि राज्यावर राज्य उठेल, मोठेमोठे भूमिकंप होतील, जागोजाग रोगराई येईल व दुष्काळ पडतील आणि भयंकर उत्पात व आकाशात मोठी चिन्हे घडून येतील. परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील, तुम्हाला सभास्थाने आणि तुरुंग ह्यांच्या स्वाधीन करतील आणि राजे व अधिकारी ह्यांच्यापुढे माझ्या नामासाठी नेतील. ह्यामुळे तुम्हांला साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे ह्याविषयी आधीच विचार करायचा नाही असा मनाचा निर्धार करा, कारण मी तुम्हांला अशी वाचा आणि बुद्धी देईन की तिला अडवण्यास किंवा तिच्याविरुद्ध बोलण्यास तुमचे कोणीही विरोधक समर्थ होणार नाहीत. आईबाप, भाऊबंद, नातलग व मित्र हे देखील तुम्हांला धरून देतील आणि तुमच्यातील काही जणांना ठार मारण्यात येईल आणि माझ्या नामामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. तरी तुमच्या डोक्याच्या एका केसाचाही नाश होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने खरे जीवन मिळवाल.
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : 'प्रभूचा दिवस हा संकल्पना जुन्या तसेच नव्या करारातील पुस्तकात एक जिव्हाळ्याचा विषय बनलेली होती. आजची तिन्ही वाचने त्या विषयावर तीन वेगवेगळी चिंतने सादर करतातः
अ. प्रभूदिनाविषयी उचित समजूत असणे गरजेचे आहे : खरे पाहता, 'प्रभूचा हा दिस करा जयघोष' अशी आनंद जल्लोषाची भावना या संकल्पनेमागे होती. मात्र कालांतराने लोक प्रभूपासून जसे दूर जाऊ लागले तसतशी ही संकल्पना 'भीती आणि थरकाप उत्पन्न करू लागली. तशातच संदेष्ट्यांनी प्रभूचा दिवस कसा त्याच्या क्रोधाचा, भीतीचा, तप्त भट्टीचा आणि अग्नीपरीक्षेचा असणार आहे त्याचे सूतोवाच केले. आजच्या पहिल्या वाचनात त्याचे प्रतिबिंब पडलेले आहे.
ब. दैनंदिन जीवनाविषयी योग्य समजूत असणे : आपला भविष्यकाळ वर्तमानातील आपल्या हर एक कृतीवर अवलंबून असतो. आजच्या दुसऱ्या वाचनात आपल्यावर ऐतखाऊपणाचा आरोप करणाऱ्यांच्या डोळ्यांत संत पॉलने कडक ताशेरे ओढलेले आहेत. कष्ट व परिश्रम करून त्याने प्रभूशब्दाची घोषणा केलेली होती. त्यामुळे आपले दैनंदिन जीवन प्रभूदिनाच्या प्रकाशात घालविण्याचे आवाहन तो थेस्सलनीका येथील लोकांना करतो.
क. प्रभूदिनाची उचित तयारी करीत राहणे : आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू येरुशलेम मंदिराचा नाश आणि युगाची समाप्ती ह्याविषयीचे भाकीत करतो. येथे प्रभूदिनाचे भयावह वर्णन करण्यात आलेले असले तरी प्रभूशिष्याने मात्र त्या दिनाची उचित तयारी करीत जीवन जगायला हवे. त्यांच्यासाठी तो दिन 'देवाचे सामर्थ्य प्रकट करणारा ठरेल. म्हणून त्यांनी भिऊ नये, काय बोलावे ह्याविषयी चिंता करू नये तर देवावर पूर्ण भरवसा ठेवून निर्धास्तपणे शांतीचे जीवन रहावे असे येशू सुचवितो.
आत्मपरीक्षण : प्रभूच्या दिवसाची मी माझ्या दररोजच्या जीवनात कशाप्रकारे तयारी करीत आहे ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझे नाव महान आहे, तुझ्या नावात व तुझ्यावरील विश्वासात आमचे तारण आहे, तुझा धावा करण्यास आम्हाला सदबुद्धी दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
.jpg)
0 टिप्पण्या