Marathi Bible Reading | Saturday 12th November 2022 | 32 Week in Ordinary Time


सामान्यकाळातील ३ वा सप्ताह  

शनिवार  १२ नोव्हेंबर  २०२२

देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा न्याय करणार नाही काय ?


संत जोसाफाट कुन्सेविच 

महागुरू, रक्तसाक्षी (१५८०-१६२३)

प्रभू येशू आज म्हणतो की, 'देवाचे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा  धावा करतात'. आपण सर्वजण देवाची निवडलेली मुले आहोत. देव  आपल्यावर प्रेम करतो म्हणूनच रात्रंदिवस त्याचे स्मरण करणे गरजेचे आहे.

✝️   

पहिले वाचन :   योहानचे तिसरे पत्र १: ५-८
वाचन :योहानचे तिसरे पत्र यातून घेतलेले वाचन

“आपण आपल्या भावंडांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ.”

प्रिय गायस, अनोळखी बंधुजनांसाठी तू जे काही करतोस
ते विश्वासूपणाने करतोस. त्यांनी मंडळींसमोर तुझ्या प्रीतीविषयी
साक्ष दिली. देवाला आवडेल अशा रितीने तू त्यांना वाटेस
लावशील तर बरे करशील. कारण ते परराष्ट्रीय लोकांपासून
काहीएक न घेता ख्रिस्ताच्या नामाखाली बाहेर पडले आहेत.
म्हणून आपण अशांचा पाहुणचार करावा, म्हणजे आपण सत्यामध्ये त्यांचे सहकारी होऊ.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र : ११२:१- ६
प्रतिसाद :परमेश्वराचे भय धरतो तो मनुष्य धन्य !

१) परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो. 
आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य ! 
त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. 
सरळ जनांचा वंश आशीर्वादयुक्त होईल.

२) धनसंपदा त्याच्या घरी असते, 
त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ टिकते. 
सरळ जनांना अंधकारात प्रकाश प्राप्त होतो. 
त्याच्या ठायी कृपा, दया आणि न्याय ही आहेत.

३) जो मनुष्य दया करतो आणि 
उसने देतो त्याचे कल्याण होते. 
तो न्यायाने आपले व्यवसाय करील, 
तो कधीही ढळणार नाही,
नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
हे परमेश्वरा, तुझे सर्व नियम विश्वसनीय आहेत
ते सदासर्वकाळ अढळ आहेत.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक १८:१-८
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“देवाचे जे निवडलेले लोक त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करील."
त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी आणि खचू नये, ह्याविषयी येशूने आपल्या शिष्यांना एक दाखला सांगितला, “एका नगरात कोणीएक न्यायाधीश होता, तो देवाला भित नसे आणि माणसाला जुमानत नसे. त्याच नगरात एक विधवा होती, ती त्याच्याकडे वारंवार येऊन सांगत असे की, माझी दाद घ्या व माझ्या प्रतिवाद्याविरुद्ध न्याय करा. पण बराच काळापर्यंत तो ते करीना. परंतु नंतर त्याने मनात म्हटले, जरी मी देवाला भीत नाही आणि माणसाला जुमानत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी रंजीस आणील.” तेव्हा प्रभूने म्हटले, “अन्यायी न्यायाधीश काय म्हणतो ते ऐका. देवाचे जे निवडलेले लोक रात्रंदिवस त्याचा धावा करतात त्यांचा न्याय करणार नाही काय ? आणि त्यांच्याविषयी तो विलंब लावील काय ? मी तुम्हांला सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील. मात्र मनुष्याचा पुत्र येईल तेव्हा त्याला पृथ्वीवर विश्वास आढळेल काय ?"
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : खरी प्रार्थना कशी असावी आणि आपण ती कशी करावी ह्याचे वर्णन आजच्या शुभवर्तमानात पाहावयास मिळते. आजच्या दाखल्यामध्ये आपणांस दोन व्यक्तीचे दर्शन घडते. एक आहे  अन्यायी न्यायाधीश, तो देवाला घाबरत नाही आणि माणसाला जुमानत नाही. दुसरी व्यक्ती आहे ती म्हणजे विधवा बाई. ह्या विधवा बाईच्या वर्तणुकीतून खालील महत्त्वाचे पैलू आढळतात. 
१. पहिल्या प्रथम ही विधवा स्वीकारते की ती एक असहाय्य अबला आहे तिला मदतीची गरज आहे. 
२. तिला पूर्ण भरवसा - विश्वास आहे की ती जे काही मागत आहे ते तिला मिळेल. 
३. तिला न्यायाधिशाच्या अधिकारावर आणि शक्तीवर विश्वास आहे की तिला त्याच्या अधिकाराद्वारे न्याय मिळेल. 
४. ती विधवा जे काही मागत आहे ते योग्य आणि रास्त आहे. तिच्या हक्काचे आणि योग्यतेचे असे ती मागत आहे. 
५. त्या विधवेच्या प्रार्थनेत असलेली चिकाटी. ती हार मानत नाही तर पुन्हा पुन्हा न्यायाधिशाचे दार ठोठावते. ही सर्व वैशिष्ट्ये आपल्या प्रार्थनेत असणे गरजेचे आहे. आपल्या प्रार्थनेत चिकाटी व विश्वास आहे का ?

प्रार्थना :  हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या अस्तित्वाची व प्रेमाची जाणीव सदैव आम्हास  व्हावी व तुझ्या सहवासाचा अनुभव यावा म्हणून आम्हाला कृपा दे, आमेन...


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या