सामान्यकाळातील ३२ वा सप्ताह
शुक्रवार ११ नोव्हेंबर २०२२
जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.
टुअर्सचे संत मार्टिन
महागुरू, वर्तनसाक्षी (३१६-३९७)
हंगेरीमधील पलोनिया नामक प्रांतात सुरक्षादलामध्ये मोठ्या हुद्यावर कार्य करीत असलेल्या एका अधिकाऱ्याच्या घरी मार्टिनचा जन्म झाला. हा अधिकारी अख्रिस्ती होता. पुढे त्याची बदली बोम्बार्डीतील पेव्हीया ह्या ठिकाणी झाली. इथे मार्टिनला गॉल शहरातील एमियन्स ह्या ठिकाणी राजकीय दरबारात भरती करण्यात आले. त्यावेळी तो केवळ १५ वर्षांचा होता.
एकदा आपल्या घोड्यावरून प्रवास करीत असताना रस्त्याच्या कडेला त्याला एक भिकारी थंडीने कुडकुडत असताना दिसला. त्याच्या अंगावर लाज झाकण्यापुरती लक्तरे होती. ते पाहून मार्टिनला त्याची दया आली. दरम्यानच्या काळात ख्रिस्ती धर्माची दीक्षा घेण्यासाठी आवश्यक असलेले धर्मशिक्षण तो घेत होता. त्याचा जबरदस्त पगडा त्याच्यावर बसला होता. मार्टिनने मागचा पुढचा विचार न करता स्वतःच्या अंगावरील अत्यंत उंची झगा आपल्या हातातील तरवारीने कापून टाकला व त्या भिकाऱ्याच्या अंगाभोवती लपेटला. त्या भिकाऱ्याच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मार्टिन सुखावला. एका आगळ्या वेगळ्या आनंदात समाधानाने तो घरी परतला. रस्त्यावर त्याला पाहणारे सर्व लोक मार्टिनला हसत होते. रात्री स्वप्नात त्याला प्रभू येशू त्या झग्यामध्ये दिसला. त्याच्या अंगावर उरलेल्या झग्याचा तुकडा होता. पुढे मार्टिनच्या अंगावरील फाटका झगा तो फ्रँकीश किंग्सच्या नावाने उभारलेल्या चॅपलमध्ये बरीच वर्षे जपुन ठेवण्यात आला.ह्या घटनेनंतर आपल्याला लवकरच ख्रिस्ती धर्मात बाप्तिस्मा मिळावा म्हणून मार्टिन धडपडू लागला. लवकरच त्याची ही इच्छा पूर्ण झाली. त्यानंतर त्याने मिलिटरीमधून स्वत:ची सुटका करून घेतली आणि तो संत हिलरीच्या (सण १३ जाने.) संस्थेत दाखल झाला. पेव्हिया येथे कुटुंबांना भेटी देत असताना त्याला त्याची आई भेटली. तिचे मनपरिवर्तन करून त्याने तिला ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. मात्र त्याच्या वडिलांनी ख्रिस्ती धर्म नाकारला.
दरम्यानच्या काळात एरियस नावाचा एक पाखंडी धर्मगुरू ख्रिस्तसभेमध्ये उदयास आलेला होता. त्याच्या मते पवित्र त्रैक्यातील तीन व्यक्ती समस्वरुपाच्या नसून एक दुसऱ्यापेक्षा कनिष्ठ आहेत. हा विचार गॉल शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात स्वीकारला गेला की संत हिलरी ह्यांनाच गॉल शहरातून हद्दपार करण्यात आले. आता त्यांची जागा मार्टिनने घेतली आणि तो भूमध्य समुद्राच्या किनारी एक साधू व मठवासी बनून जीवन जगू लागला.
इ. स. ३६१ मध्ये पुन्हा एकदा संत हिलरी ह्यांना बोलावण्यात आले आणि मार्टिन पुन्हा पोईटिएर्स येथे परतला. तेथे बरेचसे अनुयायी त्याला मिळाले. त्यांच्या सहाय्याने त्याने गॉलमधील पहिला बेनेडिक्टाईन मठ स्थापन केला. जिथे जिथे मूर्तिपूजेला स्थान आहे तिथे तिथे खऱ्या देवाची पूजा सुरू व्हावी ही मार्टिनची तीव्र इच्छा होती. म्हणून अधूनमधून तो आपला मठ सोडून प्रेषित कार्यासाठी संपूर्ण गॉल शहरात हिंडत असे.
अशा प्रकारे दहा वर्षे गेली. त्यानंतर मार्टिनला फ्रान्समधील टुअर्स नावाच्या शहरातून बोलावणे आले आणि त्याच्या लोकप्रियतेमुळे त्यांच्या इच्छेविरुद्ध त्याला महागुरूपदाची दीक्षा देण्यात आली. महागुरू म्हणून तो अत्यंत साधे आणि क्लेशमय जीवन जगत असे. इतर साधूसंतांना आपला त्रास होऊ नये म्हणून त्याने स्वतःसाठी एक वेगळी खोली बांधून घेतली होती, परंतु तिथेही त्याच्या खोलीभोवती इतर मठवाशांनी आपापले मठ उभारले. आजपर्यंत हा मठांचा समूह मारमोटूर इथे अस्तित्वात आहे.
आपल्या धर्मप्रांताचे प्रशासन कार्य तो अत्यंत सचोटीने कणखरपणे आणि न्यायभावनेने करीत असे. पाखंडी मतवाद्यांच्या कचाट्यापासून ख्रिस्तसभेला दूर ठेवण्यासाठी तो सतत झटत असे. त्यासाठी त्याने बरेच प्रेषितीय दौरे काढले. त्या दौऱ्यात तो खरीखुरी ख्रिस्ती शिकवण लोकांना पटवून देण्यात वेळ घालवीत असे. ट्रेवस (ट्रायर) नावाच्या शहरात तर त्याला राजाश्रय मिळाला होता. त्याचा त्याने पुरेपूर फायदा उठविला.
रक्तसाक्षी नसूनही एक संत म्हणून गौरविला गेलेला मार्टिन हा पाश्चात्य देशातील एक पहिला संत मानला जातो. मध्ययुगात तर त्याची कीर्ती दिगंतापर्यंत जाऊन पोहोचली. त्याच्यामुळे पाश्चात्य देशातील वरीचशी ख्रिस्तमंदिरे त्याच्याच नावाने उभारली गेलेली आहेत. शिवाय काही शहरांनाही त्याचे नाव देण्यात आले आहे.
मार्टिन ११ नोव्हेंबर ३९७ साली मरण पावला.
चिंतन : हे प्रभो जर तुझ्या लोकांना माझी गरज असेल तर कष्ट करण्यात मी कधीही हयगय करणार नाही. तुझ्या पवित्र इच्छेप्रमाणे होवो.
- संत मार्टिन
✝️
पहिले वाचन : योहानचे दुसरे पत्र १:४-९
वाचन :योहानचे दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“जो शिकवणीला धरून राहतो त्याला पिता आणि पुत्र ह्या दोघांची प्राप्ती झाली आहे.”
आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्याप्रमाणे तुझी काही मुले सत्याने चालत असलेली मला आढळली आहेत, ह्यावरून मला अतिशय आनंद झाला. बाई, आता मी तुला विनंती करतो की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. ही मी नवी आज्ञा तुला लिहितो असे नव्हे, तर जी आपल्याला प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो. प्रीती हीच आहे की, आपण त्याच्या आज्ञांप्रमाणे चालावे, ती आज्ञा ही आहे की, जसे तुम्ही प्रांरभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे. कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा आणि ख्रिस्तविरोधक असलाच आहे. आम्ही केलेले कार्य तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हांला मिळावे, म्हणून खबरदारी घ्या. ख्रिस्ताच्या शिकवणीला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्याला देव प्राप्त झाला नाही, जो शिकवणीला धरून राहतो त्याला पिता आणि पुत्र ह्या दोघांची प्राप्ती झाली आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ११९:१- २,१०-११,१७-१८
प्रतिसाद : परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य.
१ )जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या
नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य.
जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून
त्याचा शोध करतात ते धन्य.
२) अगदी मनापासून मी तुझा शोध केला आहे,
तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस,
मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून
मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे.
३) आपल्या दासाला औदार्य दाखव,
म्हणजे मी जिवंत राहून तुझे वचन पाळीन,
तू माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या
नियमशास्त्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
तुम्ही आपली मने आज कठोर करू नका, तर परमेश्वराच्या वाणीकडे लक्ष द्या.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १७:२६-३७
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी.”
येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, “नोहाच्या दिवसांत झाले तसे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांतही होईल. नोहा तारवात गेला आणि जलप्रलयाने येऊन सर्वांचा नाश केला त्या दिवसांपर्यंत लोक खातपीत होते, लग्न करत होते आणि लग्न करून देत होते. तसेच ज्याप्रमाणे लोटच्या दिवसांत झाले, त्याप्रमाणे होईल म्हणजे ते लोक खातपीत होते, विकत घेत होते, विकत होते, लागवड करत होते, घरे बांधत होते, परंतु ज्या दिवशी लोट सदोमातून निघाला त्याच दिवशी आकाशातून अग्नी आणि गंधक ह्यांची वृष्टी होऊन सर्वांचा नाश झाला. मनुष्याचा पुत्र प्रकट होईल त्या दिवशी असेच होईल, त्या दिवशी जो धाब्यावर असेल त्याने आपले घरात असलेले सामान नेण्याकरिता खाली येऊ नये आणि तसेच जो शेतात असेल त्याने आपल्या सामानासाठी मागे फिरू नये. लोटच्या बायकोची आठवण करा. जो कोणी आपला जीव सांभाळण्याचा प्रयत्न करील तो आपल्या जिवाला मुकेल आणि जो कोणी आपल्या जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. मी तुम्हांला सांगतो, त्या रात्री एका बिछान्यावर दोघे असतील, एक घेतला जाईल आणि दुसरा तेथेच ठेवला जाईल. दोघी मिळून दळत असतील, एक घेतली जाईल आणि दुसरी तेथेच ठेवली जाईल.” त्यांनी त्याला म्हटले, "प्रभो, कोठे ?” त्याने त्यांना म्हटले, "जेथे प्रेत आहे तेथे गिधाडे जमतील.”
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : परमेश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीला पाहून आपण भारावून जातो. विज्ञानाच्या सामर्थ्याने आणि मानवाच्या कष्टामुळे ह्या सृष्टीतील अनेक अशा सुख-सोयींच्या, वस्तूचा शोध लागलेला आहे. जिवाला पाहिजे ते सुख देण्यासाठी अनेकजण धडपडत असतात. काहीजण पैसा, वैभव, संपत्ती अशा गोष्टींनाच देव मानून त्यांची पूजा करत असतात. ही एक मानवी वृत्ती आपली कमजोरी देखील आहे की, ह्या जगात आपले क्षणभंगूर जीवन जगताना आपण विसरून जातो की, आपण ह्या जगात प्रवासी आहोत, निवासी नाहीत. आजच शुभवर्तमान आपल्याला जाणीव करून देत आहे की, तो दिवस केव्हा येईल ते आपणांस ठाऊक नाही. म्हणून आपण त्या दिवसासाठी तयारीत असणे गरजेचे आहे. कोरोना ह्या महामारीने आपणांस दाखवून दिले आहे की, आपली जीवन ज्योत कधीही मावळू शकते. भौतिक संपत्तीत, वैभवात आणि सुखात अडकून न जाता आपण ह्या जीवनापलीकडे असलेल्या अनंतकाळचे जीवन मिळवण्यासाठी झटले पाहिजे. आपण त्याची तयारी जीवन जगत असतानाच केली पाहिजे आणि ती तयारी आपण कशी करावी ते संत पौल आपणांस सांगताना म्हणतो की, आपण सत्याने चालले पाहिजे, देवाची आज्ञा प्रमाण मानून त्याच्या इच्छेप्रमाणे वागून एकमेकांवर प्रीती केली पाहिजे आणि जेव्हा आपण असे वागू तेव्हा पिता आणि पुत्र ह्या दोघांची प्राप्ती होऊन आपण स्वर्गाचे वारसदार होऊ शकू.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, जिवाला सूख मिळावे व स्वच्छंदी जीवन जगता यावे ह्या प्रयत्नात आम्ही अनेकदा तुला विसरतो. आम्हाला पश्चात्तापी अंत:करण दे,आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या