Marathi Bible Reading | Thursday 10th November 2022 | 32 Week in Ordinary Time


सामान्यकाळातील ३ वा सप्ताह  

गुरुवार १० नोव्हेंबर  २०२२

“देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही, पाहा, ते येथे आहे! किंवा तेथे आहे! असे म्हणणार नाहीत, कारण देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”



  संत लिओ पहिले महान

परमगुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (- ४६१) 

चिंतन : हे प्रभो, तुझा क्रूस हा सर्व आशीर्वादांचा उगम व सर्व कृपादानांचा झरा आहे. त्यामध्ये श्रद्धावंतांना दुर्बळतेत शक्ती, अपमानात गौरव व सन्मान आणि मृत्यूमध्ये जीवन लाभते. - संत लिओ महान

ज्याच्या अंतःकरणात प्रेम, दया, परोपकार व समेट करण्याची प्रेरणा जागृत झाली आहे त्याच्यामध्ये देवराज्य अदृष्य रुपाने हळूहळू कार्यरत बनू लागते. अशी माणसे नीतिमुल्यांचा विकास साधून प्रार्थना व सत्कृत्यांद्वारे स्वत:बरोबर इतरांच्या जीवनात देवराज्य प्रस्थपित करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. आपण आपल्या अंतःकरणात देवराज्य शोधण्यासाठी
 प्रेरणा मागू या...

✝️   

पहिले वाचन :   फिलेमोन ७-२०
वाचन :पौलचे फिलेमोनला पत्र यातून घेतलेले वाचन

 "त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर प्रिय बंधू, असे व्हावे. "

तुझ्या प्रीतीने मला फार आनंद झाला आणि माझे सांत्वन झाले. कारण, हे बंधू, तुझ्याकडून पवित्र जनांच्या जिवाला विश्रांती मिळाली आहे.
ह्याकरिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताच्या वतीने पूर्ण धैर्य आहे, तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूचा बंदिवान, मी बंधनात असता ज्याला आध्यात्मिक जन्म दिला ते माझे बाळ अनेसिम ह्याच्याविषयी तुला विनंती करतो. तो पूर्वी तुला निरुपयोगी होता, तरी आता तुला आण मलाही उपयोगी आहे. त्याला म्हणजे खुद्द माझ्या प्राणालाच मी तुझ्याकडे परत पाठवले आहे. सुवार्तेमुळे मी बंधनात पडलो असता तुझ्याऐवजी माझी सेवा त्याने करावी म्हणून त्याला जवळ ठेवण्याचे माझ्या मनात होते, तरी तुझ्या संमतीशिवाय काही करणे मला बरे वाटले नाही, तुझा उपकार जुलमाने झाल्यासारखा नसावा तर खुशीने केलेला असावा.
कदाचित तो तुझ्यापासून ह्यामुळेच काही वेळ वेगळा झाला असेल, त्याने युगानुयुगे तुझे व्हावे, त्याने आजपासून केवळ दासच नव्हे तर दासापेक्षा श्रेष्ठ म्हणजे प्रिय बंधू, असे व्हावे. मला तो विशेष प्रिय आहे आणि तुला तर देहदृष्ट्या आणि प्रभूच्या ठायी ह्याहून किती तरी अधिक तो प्रिय असावा. म्हणून जर तू मला आपला भागीदार समजतोस, तर तो मीच आहे असे मानून त्याचा अंगीकार कर. त्याने तुझे काही नुकसान केले असले किंवा तो तुझे काही देणे लागत असेल तर ते माझ्या खाती मांड. हा माझा पौलचा स्वदस्तुरचा लेख आहे, ते मी फेडीन. शिवाय तू स्वत:च माझे ऋण आहेस, पण हे मी तुला म्हणत नाही. हे बंधू, प्रभूच्या ठायी माझ्यावर एवढा उपकार कर. माझ्या जिवाला ख्रिस्ताच्या ठायी विश्रांती दे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र : १४६:६- १०
प्रतिसाद : याकोबचा देव ज्याच्या सहाय्याकरिता आहे तो धन्य.
१) परमेश्वर सदा आपले सत्यवचन पाळतो, 
छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, 
भुकेल्यांना अन्न देतो. परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.

२) परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो, 
परमेश्वर वाकलेल्यांना उभे करतो, 
परमेश्वर नीतिमांनावर प्रेम करतो, 
परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो.

३ )तो अनाथ व विधवा ह्यांची दाद घेतो, 
परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो. 
परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो. 
हे सियोने, तुझा देव पिढ्यान्पिढ्या राज्य करतो. 
परमेश्वराचे स्तवन करा.



जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
हे परमेश्वरा, आपला मार्ग मला दाखव, मला सरळ मार्गाने ने.

आलेलुया!

शुभवर्तमान लूक १७:२०-२५
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

 “देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”

देवाचे राज्य केव्हा येईल असे परुश्यांनी विचारले असता येशूने त्यांना उत्तर दिले, “देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही, पाहा, ते येथे आहे! किंवा तेथे आहे! असे म्हणणार नाहीत, कारण देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे.”
त्यावर त्याने शिष्यांना म्हटले, “असे दिवस येणार आहेत की, मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा कराल पण तो तुम्हांला दिसणार नाही. ते तुम्हांला म्हणतील, पाहा, तो तेथे आहे ! तर तुम्ही जाऊ नका आणि त्यांच्यामागे लागू नका. कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूला चमकून दुसऱ्या बाजूपर्यंत प्रकाशते, तसेच मनुष्याच्या पुत्राचेही त्याच्या आगमनाच्या दिवशी होईल. तथापि त्याने प्रथम फार दुःख भोगावे आणि ह्या पिढीकडून नाकारले जावे ह्याचे अगत्य आहे.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : देवाचे राज्य कधी येणार ? हा प्रश्न जेव्हा परूशी येशूला विचारतात तेव्हा येशू त्याच्या निदर्शनास आणतो की, परमेश्वराच्या राज्याला काळ नाही, ते मोजता येत नाही, सांगता येत नाही, त्याचा काळ निश्चित करता येत नाही आणि ते दृश्य रूपात येत नाही तर ते अनुभवावे लागते. ज्याप्रमाणे आपण जेव्हा प्रेमाबद्दल बोलतो ते प्रेम आपणांस दिसत नाही, त्याचा अनुभव घ्यावा लागतो आणि आपल्या जीवनाद्वारे त्या खऱ्या प्रेमाचा अनुभव दुसऱ्यांना द्यावा लागतो, त्याच पद्धतीने देवाच्या राज्यांचे देखील आहे. प्रभू येशू ख्रिस्त निश्चित करतो की, देवाचे राज्य हे काही प्रमाणात आपल्याला उपस्थित आहे. हे परमेश्वराचे राज्य अशा लोकांमध्ये उपस्थित आहे. ज्यांनी शुभवर्तमानाचा स्वीकार करून त्याप्रमाणे आचरण करण्यास सुरूवात केली आहे. खऱ्या देवाला पहायचे असेल आणि त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण संपूर्ण तन-मन लावून आपला आध्यात्मिक किंवा आंतरिक प्रवास केला पाहिजे. जो देव आपल्यामध्ये उपस्थित आहे। त्याच्या मार्गदर्शनानुसार आपले जीवन आपण जगले पाहिजे. प्रभू येशूख्रिस्त शेवटी असे देखील सांगतो की, लोकांची दिशाभूल करण्यासाठी अनेक असे खोटे ख्रिस्त आणि संदेष्टे येतील आणि त्यांच्या खोट्या शिकवणुकीने लोकांना देवापासून दूर नेतील. अशा खोट्या खोट्या संदेष्ट्यापासून सावधान राहाण्याचा इशारा प्रभू येशू देतो.

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझी वचने पाळण्यास व देवराज्याच्या दिशेने वाटचाल करण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या