Marathi Bible Reading | Wednesday 9th November 2022 | 32 Week in Ordinary Time


सामान्यकाळातील ३ वा सप्ताह  

बुधवार  ९ नोव्हेंबर  २०२२

येशूने त्यांना उत्तर दिले, "तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसात ते उभारीन."





  संत जॉन महामंदिराचे समर्पण 

लॅटरन बॅसिलिका

रोम शहरात उभारलेल्या आपल्या प्रभू आणि तारणकर्त्या येशू ख्रिस्ताच्या महामंदिराच्या समर्पणाचा सोहळा आज देऊळमाता साजरा करते. रोम शहरातील आणि जगभरातील सर्व ख्रिस्तमंदिरांची माता आणि सम्राज्ञी म्हणून ह्या महामंदिराकडे पाहिले जाते, कारण हे महामंदिर खुद्द पोपमहाशयांचे कॅथिड्रल आहे. त्यामुळे त्याला संत पीटर महामंदिरापेक्षा वरचे स्थान आहे.

इ. स. ३१३ साली कॉन्स्टन्टाईन राजाच्या फाऊस्टा ह्या धर्मपत्नीने पोप संत मिल्ट्यिाडेस ह्यांना आपला राजमहाल बक्षीसादाखल दिला. नोव्हेंबर ३२४ रोजी संत सिल्व्हेस्टर (पोप) ह्यांनी त्या राजवाड्याचा काही भाग आपल्या अतिपवित्र तारणाऱ्याच्या नावाने आशीर्वादित केला. एखाद्या ख्रिस्तमंदिराचे जाहीर समर्पण करण्याची जगातील ही पहिलीच घटना होय. तसा हा सोहळा खूप साधेपणाने साजरा झाला. परंतु आज नवीन ख्रिस्तमंदिराचे समर्पण सोहळे करण्याचा जो धार्मिक विधी आहे तो अगदी चौथ्या शतकातही अस्तित्वात होता हेच यावरून दिसून येते.

हा राजवाडा पुढील हजारो वर्षे पोपमहाशयांचे निवासस्थान म्हणून वापरला गेला. चौथ्या आणि सोळाव्या शतकाच्या दरम्यान ह्याच ठिकाणी पाच सर्वपंथीय परिषद आणि महागुरूंच्या वीस परिषदा भरविण्यात आल्या होत्या. बाराव्या शतकात संत योहान बाप्तिस्ता ह्याच्या नावाने ह्या राजवाड्याला संत जॉन लॅटरन (महामंदिर) असे नामाभिधान प्राप्त झाले.

ख्रिस्तसभेतील ह्या महान, गौरवशाली व राजेशाही महामंदिरामध्ये संत पेत्र व पौलच्या कवटीचे अवशेष चांदीच्या पेटीमध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेले आहेत. युदेनच्या घरी संत पेत्राने प्रभुभोजनासाठी वापरलेली वेदी आणि अखेरच्या भोजनावेळी पवित्र मिस्साच्या स्थापनेसाठी आपल्या प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताने वापरलेले पवित्र मेज ह्याही ऐतिहासिक वस्तू ह्या महामंदिरात पाहायला मिळतात.

✝️   

पहिले वाचन : यहेज्केल ४७:१-९.१२

वाचक :  यहेज्केल यातून घेतलेले वाचन.

देवदूताने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले, तो पाहा, मंदिराच्या उंबरठ्याखालून पाण्याचा झरा निघून पूर्वेकडे वाहत होता; मंदिराच्या उजव्या बाजूने वेदीच्या दक्षिणेस खालून वाहत होता. त्याने मला उत्तरद्वाराच्या वाटेने बाहेर नेले व बाहेरच्या रस्त्याने सभोवार फिरवून बाहेरल्या द्वाराकडे म्हणजे पूर्वाभिमूख असलेल्या द्वाराकडे नेले, तो पाहा, द्वाराच्या उजव्या बाजूस पाणी वाहत होते. मग तो पुरुष सर्व दिशेस चालला व त्याच्या हाती मापनसूत्र होते; त्याने एक हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालावयास सांगितले, तो तेथे पाणी घोट्यापर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापून मला पाण्यातून चालाव्यास सांगितले, तो तेथे पाणी कमरेपर्यंत होते. त्याने आणखी हजार हात अंतर मापले, तो त्या नदीतून माझ्याने चालवेना, कारण पाणी फार झाले; मला त्यातून पोहून जाता आहे असते; उतरून जाता आले नसते, एवढी ती नदी झाली. तो मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू हे पाहिले ना?" मग त्याने मला नदीतीराने माधारी नेले. परत येत असता नदीच्या दोन्ही तीरांवर बहुत झाडे असलेली मी पाहिली. तो मला म्हणाला, "हे पाणी पूर्वप्रदेशांकडे वाहत जाते आणि तेथून अराबात उतरून समुद्राकडे जाते; ही नदी समुद्रास मिळून त्याचे पाणी निर्दोष होते. ही महानदी जाईल तेथेतेथे तीत जे जीवजंतू भरलेले असतील ते जगतील व तीत मासे विपुले होतील; कारण जेथेजेथे हे पाणी जाईल तेथेतेथे सर्व काही निरोगी होईल; जेथेजेथे ही नदी जाईल तेथेतेथे सर्व प्राणी जिवंत राहतील. नदीच्या उभय तीरांनी खाण्याजोगी फळे देणारी हरत-हेची झाडे वाढतील. त्यांची पाने वाळणार नाहीत; त्यांच्या फळांचा बहर खुंटणार नाही; प्रतिमासी ती पक्क फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्रस्थानातून निघाले आहे. त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होतील."

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


स्तोत्र ४६: २- ३, ५- ६

प्रतिसाद : नदीचे पाणी देवाच्या पवित्र निवासस्थानाला आनंदमय करते.

१)देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे.तो संकटसमयी साहाय्य करण्यास सदा सिद्ध असतो . म्हणून पृथ्वी उलथीपालथी झाली, पर्वत कोसळून सागरतळी बुडाले, सागराच्या लाटा गर्जून उसळल्या, त्यांच्या उचंबळ्याने पर्वत हालले, तरी आम्ही भिणार नाही.

२)त्या नगराच्या ठायी देव आहे ते ढळावयाचे नाही. प्रभात होताच देव त्याला साहाय्य करील. राष्ट्रे खवळली, राज्य डळमळली, त्याने गर्जना केली तो पृथ्वी विरघळून गेली.

३)या परमेश्वराची कृत्ये पाहा. त्याने पृथ्वीची कशी नासधूस केली आहे. तो दिगंतापर्यंत लढाया बंद करतो, तो धनुष्य मोडतो, भाला तोडून टाकतो, रथ अग्नीत जाळून टाकतो.


जयगोष                                                                         

आलेलूया,आलेलूया !

प्रभू म्हणतो, माझे नाव त्या मंदिरात कायम राहावे म्हणून मी त्याची निवड केली आहे व ते समर्पित केले आहे.

आलेलूया !


दुसरे वाचन : १करिंथकरांस पत्र ३:९-११,१६-१७

वाचक :   पौलचे करिंथकरांस  पहिले पत्र यातून घेतलेले वाचन :

तुम्ही देवाची इमारत आहा. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिरीच्या पद्धतीप्रमाणे पायी घातला आणि दुसरा त्याच्यावर इमारत बांधत आहे तर त्याच्यावरचे बांधकाम आपण कसे करत आहो ह्याविषयी प्रत्येकाने जपावे. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्यावाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. ह्या पायावर कोणी सोने, रुपे. मोलवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा ह्यांनी बांधतो. तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल, तो दिवस ते उघडकीस आणील. कारण तो अग्नीसह प्रकट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा ह्या अग्नीनेच होईल. तुम्ही देवाचे मंदिर आहा आणि तुम्हामध्ये आत्मा निवास करतो हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करील. कारण देवाचे मंदिर पवित्र आहे, तेच तुम्ही आहा.

हा प्रभूचा शब्द आहे.

सर्व : देवाला धन्यवाद.


शुभवर्तमान 

योहान २:१३-२२

वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन .

यहूद्यांचा वल्हांडण सण जवळ आला व येशू यरुशलेमास गेला आणि मंदिरात गुरे, मेंढरे व कबुतरे विकणारे आणि सराफ हे बसलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने दोन्यांचा एक कोरडा करून मेंढरे आणि गुरे ह्या सर्वांस मंदिरातून घालवून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकला व चौरंग पालथे केले आणि तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, "ही येथून काढून घ्या, माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका." तेव्हा तुझ्या मंदिराविषयींचा आवेश मला ग्रासून टाकील,” असा शास्त्रलेख असल्याचे त्याच्या शिष्यांना आठवले. त्यावरून यहूदी त्याला म्हणाले, "तुम्ही हे करता तर आम्हाला तुमच्या अधिकाराचे काय चिन्ह दाखवता?" येशूने त्यांना उत्तर दिले, "तुम्ही हे मंदिर मोडून टाका आणि मी तीन दिवसात ते उभारीन." ह्यावरून यहूदी म्हणाले, हे मंदिर बांधण्यास शेचाळीस वर्षे लागली आणि तुम्ही हे तीन दिवसात उभारणार काय?" तो तर आपल्या शरीररुपी मंदिराविषयी बोलला होता. म्हणून तो असे म्हणत असे हे तो मेलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रावर व येशूने जे वचन सांगितले होते त्यावर विश्वास ठेवला.

प्रभूचे हे शुभवर्तमान... 

चिंतन : आज ख्रिस्तसभा ह्या लॅटरन महामंदिराच्या | समर्पणाचा सोहळा साजरा करीत आहे. त्याची दोन वैशिष्ट्ये: 
१) हा सोहळा फक्त एका ऐतिहासिक मंदिराची आठवण म्हणून साजरा केला जात नाही तर संपूर्ण ख्रिस्तसभेची एकनिष्ठता आणि पोप महाशयांच्या अधिकाराची मान्यता तसेच पोप महाशयांविषयी आपला  असलेला आदर दर्शविण्यासाठी हा सोहळा  साजरा केला जातो. 
२) दुसरा उद्देश म्हणजे आपण धर्मस्थळांचा आदर केला पाहिजे. धर्मस्थळे ही पवित्र असतात आणि परमेश्वराच्या उपस्थितीची जाणीव आपल्याला तिथे होत असते.  धर्मस्थळे ही एक प्रार्थनेची जागा आहे. त्यांची पावित्र्यता पाळण्याची नितांत गरज आहे. हा  सोहळा आपल्याला असेही दर्शवते की, आपण प्रत्येक जण परमेश्वराची निर्मिती आहोत. आपण  देखील पवित्र आहोत म्हणून आपण एकमेकांचा  सन्मान केला पाहिजे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, पवित्र मंदिरात मला तुझ्या आस्तित्वाचा अनुभव घेण्यास व माझे जीवन समृद्ध बनविण्यास कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या