Marathi Bible Reading | Tuesday 8th November 2022 | 32 Week in Ordinary Time


सामान्यकाळातील ३ वा सप्ताह  

मंगळवार  ८ नोव्हेंबर  २०२२

आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा."



  संत गॉडफ्री 
महागुरू, वर्तनसाक्षी (१०५०-१११५)

सोईझीन्सनजिकच्या एका श्रीमंत घराण्यामध्ये गॉडफ्रीचा जन्म झाला. त्याच्या आईच्या अकाली निधनानंतर गॉडफ्रीने स्वत:ला ईश्वरकार्यास वाहून घेतले. वयाच्या पाचव्या वर्षी त्याला संत क्विन्टीनच्या मठामध्ये ठेवण्यात आले. त्याचे धर्मबाप पवित्र मठवासी (त्यांचेही नाव अॅबट गॉडफ्री असेच होते.) ह्याने तेथे त्याचे लालनपालन केले.
गॉडफ्री ह्याने आपल्या तारुण्याची महत्त्वाची वर्षे रात्रंदिवस प्रार्थना करण्यात घालविली. वयाच्या २५ व्या वर्षी त्याला धर्मगुरूपदाची दीक्षा देण्यात आली. त्यानंतर लगेच मोडकळीस आलेल्या कॅम्पबेन इथल्या एका मठाचे अधिकारी म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. परंतु त्याने आपल्या चातुर्याने आणि हुशारीने तो मठ पुर्वस्थितीत आणला आणि त्यातील धार्मिक जीवनाचे पुनरुज्जीवन केले.
इ. स. ११०३ साली त्याच्या इच्छेविरुद्ध त्याला एमिएन्सचे महागुरू म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यावेळी तो अनवाणीच, पश्चात्तापाची जाडीभरडी वस्त्रे (गोणताट) पांघरून शहरात शिरला आणि महागुरूंच्या राजमहालात एखाद्या भिक्षूप्रमाणे राहू लागला.
त्याची सहनशीलता, नम्रता आणि गरिबांविषयी त्याला वाटणारी कळकळ अलौकिकच म्हणावी लागेल. ख्रिस्त आणि बारा प्रेषित ह्या नात्याने तो दररोज १३ गरीब लोकांना भोजन देत असे. कुष्ठरोग्यांच्या इस्पितळांना भेटी देणे, त्यांच्या गरजा भागविणे, त्यांना हसतमुख ठेवून त्यांची सेवा करणे ह्यात त्याला परमानंद मिळत असे.
हाईम शहराच्या महापौराशी महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करण्यासाठी जात असताना अचानक गॉडफ्री आजारी पडले. त्यांनी अंतिम संस्कार स्वीकारला आणि मोठ्या आनंदाने ह्या जगाचा निरोप घेतला. संत क्रिस्पीनच्या मठात (सोईझॉन्स) ८ नोव्हेंबर १११५ रोजी त्याच्यावर अंत्यविधी संस्कार करण्यात आला.

✝️   

पहिले वाचन :  तीत   २:१-८.११-१४
वाचन :पौलचे तीतला पत्र यातून घेतलेले वाचन १:१-९ 

"आपला थोर देव आणि तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण भक्तिमय जीवन जगावे."

सुशिक्षणाला जे शोभते ते बोल. वृद्ध पुरुषांनी नेमस्त, गंभीर, मर्यादशील असून विश्वास, प्रीती आणि सहनशीलता, ह्यांमध्ये दृढ राहावे. तसेच वृद्ध स्त्रियांनी चालचलणुकीत आदरणीय असावे. त्या चहाडखोर, मद्यपानासक्त नसाव्या, सुशिक्षण देणाऱ्या असाव्या. त्यांनी तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या पतीवर आणि मुलांबाळांवर प्रेम करावे. त्यांनी मर्यादशील, शुद्धचरणी, घरकामात मग्न, मायाळू, आपआपल्या नवऱ्याच्या अधीन राहणाऱ्या असे असावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. तसेच तरुण पुरुषांनी मर्यादशील असावे म्हणून त्यांना बोध कर. सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता आपणाला दाखव. शुद्धता, गांभीर्य आणि ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण ह्यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे. ह्यासाठी की, विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी.

कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. तो आपल्याला असे शिकवतो की, धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव आणि तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला आणि ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने आणि सुभक्तीने वागावे. त्याने स्वतःला आपल्याकरिता दिले, ह्यासाठी की, त्याने खंडणी भरून आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र : ३७:३-४,१८.२३,२७.२९

प्रतिसाद : नीतिमानाचे तारण परमेश्वरापासून होते 

१) परमेश्वरावर श्रद्धा ठेव आणि सदाचाराने वाग, 
देशात वस्ती करून राहा, इमानाने चाल, 
म्हणजे परमेश्वराच्या ठायी तुला आनंद होईल, 
तो तुझे मनोरथ पूर्ण करील.

२) नीतिमान लोकांच्या दिनचर्येकडे परमेश्वराचे लक्ष असते, 
त्यांचे वतन सर्वकाळ टिकेल. 
परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो 
आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे.

३.) वाईटापासून दूर राहा, बरे ते कर, 
म्हणजे तुझी वस्ती कायम राहील. 
नीतिमान पृथ्वीचे वतन पावतील 
तिच्यात ते सदैव निवास करतील.


जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
हे परमेश्वरा, तुझी वचने हृदयाला आनंदित करतात, 
ती नेत्रांना प्रकाश देतात
आलेलुया!

शुभवर्तमान लूक १७:७-१०
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

  "आम्ही केवळ नोकर आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे.”

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, तुम्हापैकी असा कोण आहे की, त्याचा नांगरणारा किंवा मेंढरे राखणारा नोकर शेतातून आल्यावर तो त्याला म्हणेल काय, “आताच येऊन जेवायला बस ? उलट माझे जेवण तयार कर, माझे खाणेपिणे येईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खा आणि पी, असे तो त्याला म्हणणार नाही काय ? सांगितलेली कामे नोकराने केली म्हणून तो त्याचे उपकार मानतो काय ? त्याप्रमाणे तुम्हांला सांगितलेली सर्व कामे केल्यावर, आम्ही सांगितलेल्या कामाचे नोकर आहोत, आम्ही आमचे कर्तव्य केले आहे, असे म्हणा."

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन : आजच्या पहिल्या वाचनात संत पौल तीताला आग्रह करतो की, परमेश्वराच्या कृपेची जाणीव लोकांना कर की प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराने आपल्यावर भरपूर कृपा दर्शवली आहे. तो आपला उपकारकर्ता आहे, म्हणूनच त्या उपकार कर्त्याला योग्य असे जीवन जगण्यासाठी लोकांनी कसे वागावे ह्याचे मार्गदर्शन तीताने लोकांना करावे म्हणून संत पौल त्याला सुचवत आहे. आजच्या शुभवर्तमानात देखील प्रभू येशू ख्रिस्त आपणांस दाखल्याद्वारे सांगत आहे की, आपण कशारीतीने आपल्या जबाबदारीशी विश्वासू असले पाहिजे. आपल्या उपकारकर्त्या परमेश्वराने आपल्यावर काही जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी नीतिमान वृत्तीने पार पाडण्यास आपण आपल्या उपकारकर्त्यांची कृपा मागूया. आमेन.

प्रार्थना : हे प्रभू येशू, सदाचाराने जीवन आचरण करण्यास व निष्ठेने आमच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यास आम्हास कृपा दे, आमेन..


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या