सामान्यकाळातील ३२ वा सप्ताह
सोमवार ७ नोव्हेंबर २०२२
तुम्हाला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही.
✝️
पहिले वाचन : तीत १:१-९
वाचन :पौलचे तीतला पत्र यातून घेतलेले वाचन १:१-९
"मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू वडील नेमावे.”
विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे बालक तीत ह्यास, जे युगानुयुगाचे जीवन सत्यप्रतिज्ञ देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले आणि त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले. त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या, देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तिदायक सत्याच्या ज्ञानासाठी येशू ख्रिस्ताचा प्रेषित, देवाचा दास पौल, ह्याच्याकडूनः
देवपित्यापासून आणि ख्रिस्त येशू आपला तारणारा ह्याच्यापासून कृपा व शांती असो.
तू अपुऱ्या राहिलेल्या गोष्टींची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील नेमावे. यासाठी तुला मी क्रेतात ठेवून आलो. ज्याला नेमावयाचे तो निर्दोष, एकाच स्त्रीचा पती असावा. त्याची मुले विश्वास ठेवणारी असावी, त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी. धर्माध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असला पाहिजे. तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, अत्याचारी, अनीतीने पैसे मिळवणारा नसावा, तर अतिथीप्रिय, चांगुलपणाची निवड धरणारा, मर्यादेशील, नीतिमान, पवित्र, संयमी आणि दिलेल्या शिक्षणानुसार जे विश्वसनीय वचन त्याला धरून राहणारा असा असावा. ह्यासाठी की, त्याने सुज्ञपणाने बोध करण्यास आणि उलट बोलणाऱ्यांना कुंठित करण्यासाठी समर्थ व्हावे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : २४:१-६
प्रतिसाद : हे देवा, तुझ्या दर्शनासाठी आतुर असलेले हेच लोक होत.
१) पृथ्वी आणि तीवरील सर्वकाही परमेश्वराचे आहे,
जग आणि त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत.
कारण त्यानेच सागरावर तिचा पाया घातला,
त्यानेच जलप्रवाहांवर तिला स्थिर केले.
२) परमेश्वराच्या पर्वतावर कोण चढेल ?
त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील ?
ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे,
जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही तो.
३ )त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल,
आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल.
त्याला शरण जाणारे हेच लोक होत.
हे याकोबच्या देवा, तुझ्या दर्शनासाठी
आतुर असलेले हेच लोक होत.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे,
सार्वकालिक जीवनाची वचने आपणांजवळ आहेत.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १७:१-६
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“जर तुझा भाऊ दिवसातून सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, मला पश्चात्ताप झाला आहे. असे म्हणाला, तरी त्याला क्षमा कर."
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, "अडखळणे येऊ नये हे अशक्य आहे, परंतु ज्याच्यामुळे ती येतात त्याची केवढी दुर्दशा होणार! त्याने ह्या लहानातील एकाला अडखळवावे ह्यापेक्षा त्याच्या गळ्यात मोठ्या जात्याची तळी बाधून त्याला समुद्रात टाकावे ह्यात हित आहे. तुम्ही स्वतः सांभाळा. तुझ्या भावाने अपराध केला तर त्याचा दोष त्याला दाखव आणि त्याने पश्चात्ताप केला तर त्याला क्षमा कर, त्याने दिवसातून सात वेळा तुझा अपराध केला आणि सात वेळा तुझ्याकडे परत येऊन, मला पश्चात्ताप झाला आहे, असे म्हटले, तरी त्याला क्षमा कर." मग प्रेषित प्रभूला म्हणाले, “आमचा विश्वास वाढवा,” प्रभू म्हणाला, “तुम्हामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर ह्या तुतीच्या झाडाला, तू मुळासकट उपटून समुद्रात लावली जा, असे तुम्ही सांगताच ती तुमचे ऐकेल.”
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आजचे शुभवर्तमान आपणास आपल्या | जीवनात डोकावून पाहण्यास सांगत आहे की, | आपण आपल्या चुकीच्या वागणूकीद्वारे दुसऱ्यांवर वाईट परिणाम तर पाडत नाही ना? दुसऱ्यांना | आपल्या वाईट वर्तणुकीतून चुकीचा मार्ग तर दाखवत नाही ना? हे प्रश्न विचारण्याची आपणास गरज आहे आणि आपली जर वागणूक चुकीची असेल तर ती बदलण्याची गरज आहे. कारण आजच्या शुभवर्तमानात प्रभु येशू सांगतो की, जे लोक दुसऱ्यांच्या जीवनात अडथळा बनतात त्यांची किती दुर्दशा होणार. जे लोक आपल्या कृत्यांद्वारे दुसऱ्यांसाठी त्यांच्या आध्यात्मिक जीवनात अडथळा बनतात किंवा चुकीचे उदाहरण आपल्या जीवनाद्वारे देतात त्यांचा तिरस्कार केला आहे. चांगले जीवन जगू इतरांना प्रभू येशूच्या मार्गाने चालण्यास मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य आपणांस लाभावे म्हणून प्रार्थना करू या.
प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या प्रेमात वाढता यावे म्हणून बंधु-भगिनींना क्षमा करण्यास आम्हाला प्रेरणा लाभो, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या