सामान्यकाळातील ३२ वा रविवार
६नोव्हेंबर २०२२
कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत.
तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंताचा आहे, कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.”आजच्या पहिल्या वाचनात एक माता व तिचे सात पुत्र ह्यांना त्यांची देवावरील श्रद्धा व एकनिष्ठा ह्यामुळे क्रूर राजाच्या मरण दंडाला समोरे जावे लागले ह्याचा वृत्तांत आहे. 'विश्वाचा राजा सार्वकालिक जीवनाकरिता आम्हाला उठविल. ' | हा त्यांचा पुनरुत्थानावरील विश्वास होता म्हणून त्यांना मरणाची भिती नव्हती.
मृत्यूनंतर पुनरूत्थान आहे अशी शिकवण पवित्र शास्त्रात असल्याचा हा मोठा पुरावा आहे.
पुनरुत्थानंतर सर्वजण देवपुत्र समान असतील व ते मरणार नाहीत. पुनरुत्थानानंतर पति-पत्नी किंवा विवाह वगैरे काही नसून सर्वजण देवाची मुले असतील. प्रभू येशूने पुढे म्हटले, 'तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंतांचा देव आहे कारण त्याला सर्वच जिंवत आहेत'. पुनरुत्थाना नंतर भूतलावरील सर्व व्यवहार व नातेसंबंध संपुष्टात आलेले असतील.
आपण ह्या मानवी जीवनात पृथ्वीवरील प्रवासी आहोत. मृत्यू सर्वाना आहे. मात्र त्या मृत्यूला न घाबरता आपण पुनरुत्थानाची आशा बाळगून ख्रिस्ताच्या शिकवणुकीशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. पुनरुत्थावरील आपला विश्वास बळकट करू या, प्रभूला आपण आपले सर्वस्व समर्पित करू या, कारण त्याला सर्वच जिंवत आहेत.
✝️
पहिले वाचन :२मक्काबीच्या ७:१-२.९-१४
वाचक : मक्काबीच्या दुसऱ्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"विश्वाचा राजा सार्वकालिक नव्या जीवनाकरिताआम्हांला उठवील."
सात भाऊ आणि त्यांची आई यांना पकडण्यात आले. त्यांना चाबकांनी आणि आसुडांनी मारून नियमाविरुद्ध असलेले डुकराचे मांस खाण्यास राजाकडून बळजबरी केली जात होती. त्यांच्या वतीने एकाने म्हटले, "आपण आम्हांला काय विचारू इच्छिता आणि आमच्याकडून काय जाणू इच्छिता? आम्ही आमच्या वाडवडिलांचे विधीनियम मोडण्याऐवजी मरायला तयार आहोत. "
दुसरा आपला शेवटचा श्वास घेताना म्हणाला, “अरे शापित आणि नीच माणसा, तू आम्हांला ह्या जीवनातून काढून टाकलेस तरी विश्वाचा राजा सार्वकालिक नव्या जीवनाकरिता आम्हांला उठवील. कारण आम्ही त्यांच्या नियमाकरिता प्राण दिला आहे.”
त्यानंतर तिसरा त्यांच्या करमणुकीचा बळी झाला. त्याबाबत त्याला आज्ञा केली असता, त्याने तत्काळ जीभ बाहेर काढली आणि धैर्याने हात पुढे करून मोठ्या अभिमानाने म्हणाला, "हे मला स्वर्गातून मिळालेले आहेत आणि त्याच्या नियमाकरिता मी हे तुच्छ मानतो, त्याच्याकडूनच मला परत मिळण्याची आशाही आहे.” त्या तरुण इसमाच्या धैर्याचा राजावर आणि त्याच्याबरोबर असलेल्यांवर आश्चर्यकारक परिणाम झाला. त्या तरुणाने त्याच्या यातनांना काहीच जुमानले नाही. त्यालाही ठार केल्यावर त्यांनी चौथ्याला त्याच प्रकारची वाईट वागणूक दिली आणि छळले. तो मृत्यूच्या दाढेत असताना म्हणाला, “देवाकडूनच पुन्हा उठवले जाईल, ह्या दिलेल्या आशेला अंत:करणात बाळगत मनुष्य मानवांकडून आलेल्या मरणाला अवश्य कवटाळतो. परंतु हे राजा, तुला पुनरुत्थानाचे जीवन लाभणार नाही."
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १७:१,५-६, ८ब. १५
प्रतिसाद :हे परमेश्वरा, तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो.
१) हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे.
माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे.
२) माझी पावले तुझ्याच मार्गाला धरून आहेत,
माझे पाय घसरले नाहीत. मी तुझा धावा करतो,
कारण हे देवा, तू माझे ऐकतोस. माझ्याकडे कान दे,
माझे म्हणणे ऐक.
३ )मला आपल्या पंखाच्या छायेत लपव,
मी तर नीतिमान ठरून मला तुझे दर्शन घडो,
मी जागा होईन तेव्हा तुझ्या दर्शनाने माझी तृप्ती होवो.
दुसरे वाचन २ थेस्सलनी २:१६-३,५
वाचक: पौलचे थेस्सलनीकाकरांस दुसरे पत्र यातून घेतलेले वाचन
“परमेश्वर प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुमचे सांत्वन करो. "
आपला प्रभू येशू ख्रिस्त हा आणि ज्याने आपल्यावर प्रीती करून युगानुयुगाचे सांत्वन अणि कृपेने चांगली आशा दिली तो देव आपला पिता, तुमच्या मनाचे सांत्वन करो, आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व उक्तीत तुम्हांला स्थिर करो. बंधुजनहो, आता इतकेच सांगणे आहे की, आम्हांसाठी प्रार्थना करीत जा की, तुमच्यामध्ये झाल्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची त्वरेने प्रगती व्हावी व त्याचा गौरव व्हावा आणि हेकेखोर व दुष्ट माणसांपासून आमचे संरक्षण व्हावे. कारण सर्वांच्या ठायी विश्वास आहे असे नाही. प्रभू विश्वसनीय आहे तो तुम्हांला स्थिर करील आणि त्या दुष्टापासून राखील. तुम्हांविषयी प्रभूमध्ये आमचा असा भरवसा आहे की, आम्ही तुम्हांला जे सांगतो ते तुम्ही करत असता आणि पुढेही करत जाल. प्रभूही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे आणि ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
जागृत आणि सिद्ध राहा, कारण तुम्हांला कल्पना
नाही अशा घटकेस मनुष्याचा पुत्र येईल.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक २०:२७-२८
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंताचा देव आहे."
पुनरुत्थान नाही असे म्हणणाऱ्या सदुक्यातून काही जणांनी जवळ येऊन येशूला विचारले, "गुरुजी, मोशेने आम्हांसाठी असे लिहून ठेवले आहे की, एखाद्याचा भाऊ आपली बायको जिवंत असता निःसंतान असा मेला तर त्याच्या भावाने त्या स्त्रीबरोबर विवाह करून आपल्या भावाचा वंश चालवावा. बरे, सात भाऊ होते. त्यांच्यातील पहिल्या भावाने बायको केली आणि तो निःसंतान असा मेला. मग दुसऱ्याने ती केली आणि तिसऱ्यानेही, ह्याप्रमाणे ते सातही निःसंतान असे मेले. शेवटी ती स्त्रीही मेली, तर पुनरुत्थानसमयी ती त्यांच्यापैकी कोणाची बायको होईल ? कारण ती त्या साताचीही बायको झाली होती. "
येशूने त्यांना म्हटले, “ह्या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात. परंतु ते युग आणि मेलेल्यातून पुनरुत्थान ही प्राप्त करुन घेण्यास जे योग्य ठरतील ते लग्न करून घेणार नाहीत आणि लग्न करून देणारही नाहीत आणि ते पुढे मरणारही नाहीत, कारण ते देवदूतांसमान आहेत आणि पुनरुत्थान पावलेले असल्यामुळे ते देवाचे पुत्र आहेत. मोशेनेही झुडुपाच्या वृत्तांतात, परमेश्वराला आब्राहामचा देव, इसहाकचा देव आणि याकोबचा देव असे म्हणून मेलेले उठवले जातात हे दर्शवले आहे. तो मृतांचा देव नव्हे, तर जिवंताचा आहे, कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.”
लोक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो. .
चिंतन : आजच्या उपासनेतील सर्व वाचने मरणोत्तर नातील मक्काबी घराण्यातले रक्तसाक्षी मरणोत्तर जीवनावरील आपल्या श्रद्धेमुळे धैर्याने व आनंदाने मरणाला मिठी मारू शकले. आजच्या शुभवर्तमानामध्ये येशू मरणोत्तर जीवनाविषयी आपल्यासमोर तीन चिंतने ठेवतो.
अ) सार्वकालिक जीवनाविषयी आपली समजूतः सदूकी पंथियांचा पुनरुत्थानावर आणि देवदूतांवर विश्वास नव्हता. अशी श्रद्धा बाळगणाऱ्यांची ते खिल्ली उडवीत. त्याचाच भाग म्हणून सात भावांबरोबर विवाहबद्ध झालेली स्त्री पुनरुत्थानसमयी कोणाची पत्नी होईल असा खोचक प्रश्न त्यांनी येशूला विचारला. परंतु पुनरुत्थानानंतरचे जीवन आणि पृथ्वीवरील जीवन यामध्ये 'जमीन-अस्माना ने अंतर कसे आहे ते येशू त्यांना पटवून देतो. पृथ्वीवर लग्न करायचे तेच मूळी वंश टिकविण्यासाठी. स्वर्गात त्याची गरज नसते. तेथील जीवन देवदूतांसारखे मुक्त असते.
ब) मृत भाविकांविषयी आपली समजूत : सदूक्यांचा मरणोत्तर जीवनावर विश्वास नसला तरी आब्राहाम, इसहाक आणि याकोब ह्यांचा देवावर व पर्यायाने देवाने त्यांच्याशी केलेल्या करारावर त्यांचा विश्वास होता. त्या देवासाठी सारेच जिवंत असून तो मृतांचा नव्हे तर जिवंतांचा देव आहे असे सांगून येशू मृत भाविकांचे पुनरुत्थान ठळक करतो.
क) परमेश्वराविषयी आपली समजूत : सदूकी पुनरुत्थानावरील अविश्वास दाखवून खुद्द देवाविषयी चुकीची समजूत बाळगून होते असे येशू स्पष्ट करतो. ख्रिस्ती व्यक्ती देहाचे पुनरुत्थान जेव्हा मान्य करते तेव्हा ती सर्व प्रथम येशूचे पुनरुत्थान मान्य करीत असते.
आत्मपरीक्षण : मरणोत्तर जीवन, मृत भाविक आणि परमेश्वर ह्यांच्यावरील विश्वास / अविश्वास माझ्या सध्याच्या जीवनावर कोणत्याप्रकारे परिणाम करतो ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तूच पुनरुत्थान व जीवन आहेस. ही श्रद्धा जोपासण्यास व तुझ्यासह स्वर्ग राज्याचे सह भागीदार बनण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

0 टिप्पण्या