Marathi Bible Reading | Saturday 5th November 2022 | 31 Week in Ordinary Time


सामान्यकाळातील ३१ वा सप्ताह  

शनिवार ५ नोव्हेंबर  २०२२

तुम्हाला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही.
 


 संत एलिझाबेथ  

 संत  पौलला जागतिक संपत्ती व सुखाची लालसा नव्हती, तर स्वर्गीय सुखासाठीच त्याने ख्रिस्ताची सुवार्ता गाजवली.

 प्रभू येशू आपल्याला योग्य ती निवड करण्यासाठी पाचारण करीत आहे. धनदौलत व जागतिक सुख हे माणसासाठी परमेश्वराने आशिर्वादित केलेले दान आहे. मात्र अनेकजणांना जागतिक सुख आणि संपत्तीची आसक्ती असते. आपले अर्धे अधिक आयुष्य केवळ धनाची  सेवा चाकरी करण्यात काहीजण मग्न असतात. अशावेळी देवाला दुय्यम स्थान दिले जाते. म्हणूनच प्रभू येशू म्हणत आहे, 'तुम्हाला देवाची व धनाची  सेवाचाकरी करिता येत नाही'. आपण क्षणभर नव्हे तर सार्वकालिक सुख  मिळवण्यासाठी प्रयत्नशील असावे. जागतिक सुखाचे मोहक आकर्षण आपल्याला भूलवित असते. प्रभू येशू मात्र म्हणत आहे, 'माणसांना जे उच्च  वाटते ते देवाच्या दृष्टीने ओंगळ आहे. ' 
संत पौला सारखे स्वावलंबी, सेवाभावी आणि देवाला अपेक्षित असे  अनुकरणीय जीवन आपल्या प्रत्येकाला जगता यावे म्हणून आपण आपल्या जीवनशैलीवर चिंतन करू या.

✝️   

पहिले वाचन : फिलीप्पैकरांस पत्र ४:१०-१९
वाचन :पौलचे फिलीप्पैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन 

"मला जो सामर्थ्य देतो त्यांच्याकडून मी सर्व काही करावयास समर्थ आहे."

मला प्रभूच्या ठायी मोठा आनंद झाला की, आता तरी तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हाला संधी नव्हती. मला काही कमी पडल्यामुळे मी बोलतो असे नाही, कारण ज्या स्थितीत मी आहे तिच्यात मी स्वावलंबी राहण्यास शिकलो आहे. दैन्यावस्थेत राहणे मला समजते, संपन्नतेतही राहणे समजते, हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न आणि विपन्न असणे ह्याचे रहस्य मला शिकवण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करायला समर्थ आहे.
तथापि माझ्या संकटात तुम्ही माझे सहभागी झाला हे ठीक केले. फिलीप्पैकरांनो, तुम्हांलाही ठाऊक आहे की, सुवार्तेच्या प्रारंभी, मी मासेदोनियाहून निघालो तेव्हा, तुमच्यावाचून दुसऱ्या कोणत्याही मंडळीने माझ्याबरोबर देण्याघेण्याचा व्यवहार केला नाही. मी थेस्सलोनीकात होतो तेव्हादेखील तुम्ही एकदाच नाही दोनदा माझी गरज भागवली. मी दानाची अपेक्षा करतो असे नाही, तर तुमच्या हिशेबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा धरतो, माझ्यापाशी सर्व काही आहे व ते विपुल आहे. एपफ्रदीतच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्यामुळे मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, देवाला मान्य आणि संतोषकारक यज्ञ, असे आहे. माझा देव आपल्या गौरवी संपत्तीतून तुमच्या सर्व गरजा ख्रिस्त येशूच्या ठायी पुरवील.
हा प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.



प्रतिसाद स्तोत्र : ११२:१-२,५-६,८अ - ९
प्रतिसाद : जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो तो धन्य !

१) परमेश्वराचे स्तवन करा, 
जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो 
आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य !
 त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. 
सरळ जनांचा वंश आशीर्वाद युक्त होईल.

२ )जो मनुष्य दया करतो आणि 
उसने देतो त्याचे कल्याण होते,
तो न्यायाने आपला व्यवसाय करील. 
तो कधीही ढळणार नाही, 
नीतिमानाचे स्मरण सर्वकाळ राहील.

३) त्याचे मन स्थिर असते, तो भिणार नाही 
त्याने सढळ हाताने गरिबांना दानधर्म केला आहे 
त्याचे नीतिमत्त्व सर्वकाळ राहील. 
त्याचा सन्मानपूर्वक उत्कर्ष होईल.

जयघोष         
आलेलुया, आलेलुया !  
आपण त्याच्या सृष्ट वस्तूतील जसे काय प्रथमफळ व्हावे, म्हणून पित्याने स्वतःच्या इच्छेने आपणांला सत्यवचनाने जन्म दिला.
आलेलुया!

शुभवर्तमान लूक १६:९-१५
वाचक :   लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे ते तुम्हांला कोण सोपवून देईल ?"

येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, अनीतिकारक धनाने तुम्ही आपणांसाठी मित्र जोडा, ह्यासाठी की ते नाहीसे होईल तेव्हा त्यांनी तुम्हांस सार्वकालिक वस्तीत घ्यावे,
“जो अगदी थोड्या गोष्टींविषयी विश्वासू तो पुष्कळ गोष्टींविषयीही विश्वासू आहे आणि जो अगदी थोड्या गोष्टींविषयी अन्यायी तो पुष्कळ गोष्टींविषयीही अन्यायी आहे. म्हणून तुम्ही अनीतिकारक धनाविषयी विश्वासू झाला नाही तर जे खरे धन ते तुम्हांला कोण सोपवून देईल? आणि जे दुसऱ्यांचे त्याविषयी तुम्ही विश्वासू झाला नाही ते जे आपले आहे ते तुम्हांला कोण देईल? कोणत्याही चाकराला दोन धन्यांची सेवाचाकरी करता येत नाही, कारण तो एकाचा द्वेष करील आणि दुसऱ्याला प्रीती करील अथवा एकाला धरून राहील आणि दुसऱ्यालातुच्छ मानील. तुम्हाला देवाची आणि धनाची सेवाचाकरी करता येत नाही.
धनलोभी परुशी हे सर्व ऐकत होते आणि त्याला हसत होते. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, तुम्ही स्वतःला लोकांपुढे, नीतिमान म्हणवून घेणारे आहा, परंतु देव तुमची अंत:करणे ओळखतो, कारण माणसांना जे परमश्रेष्ठ वाटते ते देवाच्या दृष्टीने तिरस्करणीय आहे.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  आजच्या शुभवर्तमानातील दाखला एका कारभाऱ्याविषयी आहे. त्या कारभाऱ्याला जेव्हा त्याच्या जीवनात संकट येण्याची चाहूल लागते तेव्हा तो आपल्या शहाणपणाचा वापर करून त्याच भविष्य काळातील जीवन सुरळीत ठेवतो. म्हणूनच त्याच्या शहाणपणाची वाहवा होताना आपल्याला दिसते. येशू ख्रिस्त ह्या दाखल्यावरून आपणांस संदेश देतो की, आपण जर हे जागतिक जीवन जे नाशवंत आहे. त्यांच्यासाठी आपले शहाणपण वापरून ते सुरळीत चालू ठेवू शकतो. तर जे सार्वकालिक जीवन आहे त्याच्यासाठी आपण किती धडपड आणि आपले शहाणपण वापरले पाहिजे. जेणेकरून आपण सार्वकालिक जीवनाचा अनुभव घेऊ शकू जे कधीही न संपणारे आहे. आजच्या पहिल्या वाचनात संत पौल आपणांस मार्गदर्शन आणि प्रोत्साहन करत आहे की, आपण सार्वकालिक जीवन कशाप्रकारे प्राप्त करू शकतो. संत पौल सांगत आहे की, आपण स्वर्गाचे नागरिक आहोत. आपले नागरिकत्व स्वर्गाचे म्हणून ते मिळविण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी पौल त्याचे अनुकरण करण्यास बोलावत आहे. म्हणजेच ख्रिस्ताच्या आज्ञा पाळून ख्रिस्तामध्ये जीवन जगण्यास तो आपणांस प्रोत्साहित करीत आहे.

प्रार्थना : हे प्रभू येशू, जागतिक मायाजाळात न अडकता तुझ्या वचनाप्रमाणे परोपकारी जीवन जगण्यास मला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या