सामान्यकाळातील ३१ वा सप्ताह
शुक्रवार ४ नोव्हेंबर २०२२
आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहो.
• महागुरू, वर्तनसाक्षी (१५३८-१५८४)
चिंतन : ज्याला देवाच्या सेवेत व मनन-चिंतनात प्रगती करण्याची इच्छा आहे त्यांनी दररोज नव्या दमाने देवाच्या सान्निध्यात राहून देवाची सेवा अखंडीतपणे करीत राहिले पाहिजे. आपल्या सर्व आशा आकांक्षा आणि ध्येय केवळ देवाच्या गौरवासाठी असावे ही तीव्र मनीषा त्याने बाळगली पाहिजे.
- संत चार्ल्स बोरोमियो
आपले नागरीकत्व तर स्वर्गात आहे. "
आपल्याला कारभाऱ्याप्रमाणे परमेश्वराला हिशोब द्यावा लागणार आहे. आपल्यावर सोपविलेली जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडावी म्हणून सतत जागृत राहायला हवे. जगातील माणसे जशी धूर्त आहेत तसे आपण नसावे तर आपली जीवनशैली देवाच्या वचनानुसार असावी.
संत पौल ह्या जगातील माणसाचे सत्य समोर मांडत असतानाच प्रभू येशूचे वैभवाने व पुनरागमन होणार असल्याचे सांगत आहे. म्हणजेच प्रभू सर्वांचा न्यायनिवाडा करण्यास येणार आहे. त्यावेळी तो म्हणेल, 'तू आपल्या कारभाराचा हिशोब दे.
आपण सर्वजण ह्या जगाचे नव्हे तर स्वर्गाचे नागरिक आहोत. मात्र ते | नागरिकत्व कायमस्वरूपी बनावे. म्हणून देवाच्या आज्ञेत राहून त्याच्या | वचनाप्रमाणे जीवन आचरण करण्यासाठी सदैव तयार असावे.
✝️
पहिले वाचन : फिलीप्पैकरांस पत्र ३:१७-४:१
वाचन :पौलचे फिलीप्पैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“आपण तारणाऱ्याची वाट पाहत आहो. तो आमचे दीन शरीर स्वतःच्या गौरवयुक्त शरीरासारखे करील.”
बंधूनो, तुम्ही सर्व जण माझे अनुकरण करा आणि आम्ही तुम्हाला कित्ता घालून दिल्याप्रमाणे जे चालतात त्यांच्याकडे लक्ष द्या. कारण मी तुम्हांला पुष्कळ वेळा सांगितले आणि आताही रडत सांगतो की, पुष्कळ जण असे वागतात की, ते ख्रिस्ताच्या क्रुसाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे. त्यांचे चित्त ऐहिक गोष्टीत असते. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे. तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे, त्याची आपण वाट पाहत आहो. ज्या सामर्थ्याने तो सर्व काही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचे दैनावस्थेतील शरीर स्वतःच्या गौरवावस्थेतील शरीरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील. म्हणून प्रियजनहो, तुम्हांकडे माझे लक्ष लागून राहिले आहे. तुम्ही माझा आनंद आणि मुकुट आहा. माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १२२:१-५
प्रतिसाद :आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ.
१ )आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ,
असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.
हे येरुशलेम, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहेत.
२) हे येरूशलेम, एकत्र जोडलेल्या
नगरीसारखी तू बांधलेली आहेस.
तुझ्याकडे वंश, परमेश्वराचे वंश,
परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण
करण्यासाठी चढून येतात.
३) इस्राएलला लावून दिलेल्या निर्बंधाप्रमाणे
परमेश्वराच्या नावाचे उपकारस्मरण
करण्यासाठी चढून येतात.
कारण तेथे न्यायासने, दावीदच्या घराण्याची
राजासने मांडली आहेत.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
देवाचे वचन सजीव आणि सक्रिय आहे,
ते मनातील विचार आणि हेतू ह्यांचे परीक्षक आहे.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १६:१-८
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन ८
“ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.”
येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “एक श्रीमंत मनुष्य होता आणि त्याचा एक कारभारी होता. त्याच्यावर, “हा तुमचे द्रव्य उडवतो,” असा त्याच्याजवळ आरोप करण्यात आला. तेव्हा त्याने त्याला बोलावून म्हटले, “तुझ्याविषयी मी हे काय ऐकतो? तू आपल्या कारभाराचा हिशेब दे, कारण ह्यापुढे तू कारभार पाहायचा नाही." मग कारभाऱ्याने आपल्या मनात म्हटले, माझा धनी माझ्यापासून कारभार काढून घेणार आहे, तर मी आता काय करावे? कष्ट करण्याची मला शक्ती नाही, भीक मागण्याची लाज वाटते. तर कारभारावरून काढल्यावर लोकांनी मला आपल्याला समजून घ्यावे म्हणून मी काय करावे या बाबत मला एक मार्ग सुचला आहे. मग त्याने आपल्या धन्याच्या प्रत्येक देणेकऱ्यांना बोलावले आणि पहिल्याला म्हटले, माझ्या धन्याचे तुला किती देणे आहे ? तो म्हणाला, शंभर मण तेल. त्याने त्याला म्हटले, हा तुझा रोखा घे आणि लवकर बसून पन्नास मांड. नंतर दुसऱ्याला म्हटले, तुला किती देणे आहे? तो म्हणाला, शंभर खंडी गहू. तो त्याला म्हणाला, हा तुझा रोखा घे आणि ऐंशी मांड. अन्यायी कारभाऱ्याने शहानपण केले, हे पाहून धन्याने त्याची वाहवा केली, कारण ह्या युगाचे लोक आपल्यासारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आजच्या शुभवर्तमानातील दाखला एका कारभाऱ्याविषयी आहे. त्या कारभाऱ्याला जेव्हा त्याच्या जीवनात संकट येण्याची चाहूल लागते तेव्हा तो आपल्या शहाणपणाचा वापर करून त्याच भविष्य काळातील जीवन सुरळीत ठेवतो. म्हणूनच त्याच्या शहाणपणाची वाहवा होताना आपल्याला दिसते. येशू ख्रिस्त ह्या दाखल्यावरून आपणांस संदेश देतो की, आपण जर हे जागतिक जीवन जे नाशवंत आहे. त्यांच्यासाठी आपले शहाणपण वापरून ते सुरळीत चालू ठेवू शकतो. तर जे सार्वकालिक जीवन आहे त्याच्यासाठी आपण किती धडपड आणि आपले शहाणपण वापरले पाहिजे. जेणेकरून आपण सार्वकालिक जीवनाचा अनुभव घेऊ शकू जे कधीही न संपणारे आहे. आजच्या पहिल्या वाचनात संत पौल आपणांस मार्गदर्शन आणि प्रोत्साहन करत आहे की, आपण सार्वकालिक जीवन कशाप्रकारे प्राप्त करू शकतो. संत पौल सांगत आहे की, आपण स्वर्गाचे नागरिक आहोत. आपले नागरिकत्व स्वर्गाचे म्हणून ते मिळविण्यासाठी आणि टिकून ठेवण्यासाठी पौल त्याचे अनुकरण करण्यास बोलावत आहे. म्हणजेच ख्रिस्ताच्या आज्ञा पाळून ख्रिस्तामध्ये जीवन जगण्यास तो आपणांस प्रोत्साहित करीत आहे.
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुला अनुसरण्यास व शेवटी स्वर्गराज्यात प्रवेश मिळवण्यास आम्ही पात्र बनावे म्हणून आमच्या अंतःकरणात तुझा प्रेमाग्नि प्रज्वलित कर, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या