सामान्यकाळातील ३१ वा सप्ताह
गुरुवार ३ नोव्हेंबर २०२२
पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल,
संत मार्टिन डी पोरेस
वर्तनसाक्षी (१५६९-१६३९)
मेंढपाळ जसा आपल्या हरवलेल्या मेंढराचा शोध घेतो आणि स्त्री जशी आपल्या हरवलेल्या नाण्याचा शोध घेते, तसेच आपण देवापासून बहकलो असताना देव आपला शोध घेतो. आपण पश्चात्ताप करावा आणि पुन्हा देवाच्या कृपा छत्राखाली यावे म्हणून खुद्द प्रभू येशू आपला शोध करीत असतो. मेंढरू आणि नाणे सापडल्यावर मेंढपाळ आणि ती स्त्री जसा आनंद व्यक्त करतात तसेच, पश्चात्तापी अंतःकरणाने आणि विश्वासाने परमेश्वराच्या प्रेमाच्या सावलीत परत येणाऱ्याबद्दल स्वर्गात आनंद व्यक्त केला जातो.
प्रभू येशू परमेश्वर आपल्या प्रत्येकाचा शोध करून आपल्याला बोलवित आहे. देवाची प्रेमळ व करूणायुक्त अशी वाणी आपण ऐकू या. आपले जीवन परिवर्तन व्हावे आणि अनंतकाळच्या स्वर्गीय आनंदात आपण सहभागी व्हावे म्हणून देवाच्या वचनानुसार जीवन आचरण करण्यास प्रभूकडे प्रेरणा व कृपा मागू या.
✝️
पहिले वाचन : फिलीप्पैकरांस पत्र ३:३-८
वाचन :पौलचे फिलीप्पैकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“ज्या गोष्टी मला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे."
जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे, ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आणि देहांवर विसंबून न राहणारे ते आपण सुंता झालेलेच आहो. तरी देहावरही विसंबून राहण्यास मला जागा आहे. जर दुसऱ्या कोणाला देहावर विसंबून रहावे असे वाटते तर मला अधिक वाटणार. मी तर आठव्या दिवशी सुंता झालेला, इस्राएल लोकांतला, बन्यामीन वंशातला, इब्यांचा इब्री, नियमशास्त्राच्या दृष्टीने परुशी, आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा, नियमशास्त्रातील निर्दोष ठरलेला असा आहे. तरी ज्या गोष्टीमला लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्यांच्याविषयी ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्व काही हानी असे समजतो.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : १०५:२-७
प्रतिसाद : जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित होवो.
१) परमेश्वराचे गुणगान करा, त्याची स्तोत्रे गा,
त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा,
त्याच्यासर्व पवित्र नामाचा अभिमान बाळगा,
जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित होवो.
२) परमेश्वर आणि त्याचे सामर्थ्य ह्यांचा शोध करा,
त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा.
त्याने केलेली अद्भुत कृत्ये,
त्याचे चमत्कार आणि त्याच्या तोंडचे निर्णय आठवा.
३) त्याचा सेवक आब्राहाम ह्याचे वंशजहो,
त्याचे निवडलेले याकोबचे वंशजहो,
तो परमेश्वर आमचा देव आहे:
साऱ्या जगावर त्याचीच सत्ता चालते.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
आपला तारणारा ख्रिस्त येशू ह्याने मरण नाहीसे केले आणि सुवार्तेच्याद्वारे जीवन मिळवून दिले.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १५:१-१०
वाचक : लूकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद करा.”
सर्व जकातदार आणि पापी लोक येशूचे ऐकण्यासाठीत्याच्याजवळ येत होते. तेव्हा परुशी आणि शास्त्रीही अशी कुरकुर करू लागले, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो.”
मग त्याने त्यांना एक दाखला सांगितलाः “तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की, त्याच्याजवळ शंभर मेंढरे असता त्यातून एक हरवले तर नव्याण्णव रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करत नाही ? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रांना आणि शेजाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे म्हणून माझ्याबरोबर आनंद करा, त्याचप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हांला सांगतो.”
तसेच अशी कोण स्त्री आहे की, "तिच्याजवळ रुप्याची दहा नाणी असता त्यातून एक नाणे हरवले तर दिवा पेटवून आणि घर झाडून ते सापडेपर्यंत मन लावून शोध करत राहत नाही? ते सापडल्यावर ती मैत्रिणींना आणि शेजारणींना बोलावून म्हणते, माझे हरवलेले नाणे मला सापडले, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांला सांगतो.
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन : आजच्या शुभवर्तमानाद्वारे प्रभूयेशू आपणास सांगत आहे की, तो आपल्यावर एवढे प्रेम करतो की, जेव्हा आपण हरवतो तेव्हा तो आपला शोध करत असतो. हा खरोखरच सांत्वनदायक आणि हमी देणारा संदेश आहे की, परमेश्वराची प्रेमळ नजर आपल्यावर सतत असते. आपण आपले रोजचे जीवन जगताना आपल्या पापांमुळे आणि आपल्या हृदयाच्या कठोरतेमुळे परमेश्वराशी दूर जात असतो. आपणाला माहित देखील पडत नाही की, आपण परमेश्वरापासून दूर गेलेलो आहोत. अशा वेळेला गरज आहे आपण आपल्या जीवनात डोकावून पाहण्याची की, मी माझ्या वागणुकीमुळे परमेश्वरापासून दूर तर नाही गेलो ना ? मी जर माझ्या पापात हरवून परमेश्वराच्या प्रेमापासून दूर असेन तर परमेश्वराच्या दिशेने आपली नजर फिरवूया. कारण तो देखील आपल्या शोधात आहे.
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्यापासून बहकून न जाता सर्वदा तुझ्या आज्ञेत राहून आचरण करण्यास प्रेरणा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या