Marathi Bible Reading | Wednesday 2nd November 2022 | 31 Week in Ordinary Time


सामान्यकाळातील ३१ वा सप्ताह  

बुधवार २ नोव्हेंबर  २०२२

"त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन.
 




सर्व मृत भाविकांचा स्मृतिदिन

 ✝️  

स्वर्गातील सर्व संतांचा सन्मान केल्यानंतर विश्वव्यापी ख्रिस्तसभा शुद्धीस्थानातील आत्म्यांना शांती लाभावी म्हणून प्रार्थना करते, ह्यावरून देऊळमाता केवळ संतांचा परस्पर संबंधच नव्हे तर पृथ्वीतलावरील मानवाशी व मृत बंधुभगिनींशी असलेले आपले अतूट नाते व्यक्त करते. १५४८ साली ट्रेंट येथे भरलेल्या जागतिक ख्रिस्तसभेच्या धर्मपरिषदेमध्ये शुद्धीस्थानातील आत्म्यांना आपल्या प्रार्थना व दानधर्माद्वारे आपण सहाय्य करावे म्हणून प्रार्थना करण्यात आली. विशेषत: अशा आत्म्यांसाठी मिस्सा अर्पण केल्याने त्यांचे आत्मे प्रभूठायी विसावा पावतात अशी ख्रिस्तसभेची शिकवण आहे. 

शुद्धीस्थानातील आत्मे परस्परांना मदत करण्यास असमर्थ असतात. त्यामुळे ते सर्वस्वी संतांच्या मध्यस्थीवर आणि आपल्या विश्वासू जनतेच्या प्रार्थना दानधर्मावर विशेषतः पवित्र मिस्साच्या कृपेवर अवलंबून असतात. परिपूर्ण पश्चात्ताप माणसाला परिवर्तनाकडे नेतो. अपूर्ण पश्चात्ताप त्याला अपराधी भावनेपासून तात्पुरती मुक्ती देतो. ह्या पृथ्वीतलावर वावरताना माणसाने पुरेसा पश्चात्ताप केलेला नसेल तर त्याची परिपूर्ती शुद्धीस्थानात केली जाते.

मृत भाविकांच्या आत्म्यासाठी मिस्सा अर्पण करण्याची परंपरा पाचव्या शतकापासून चालत आलेली आहे. क्लुनीचे संत ओडिलो ह्यांनी मात्र ही परंपरा विश्वव्यापी ख्रिस्तसभेला लागू केली व सर्वत्र २ नोव्हेंबर ह्या दिवशी सर्व मृत भाविकांसाठी मिस्साबली अर्पण करण्यात येऊ लागला.

पहिल्या महायुद्धाच्या वेळी असंख्य माणसे मरण पावली. त्या परिस्थितीत पोप बेनेडिक्ट पंधरावे ह्यांनी १९१५ साली धर्मगुरूंना एक विशेष अधिकार दिला. ह्या अधिकारानुसार धर्मगुरू ह्या दिवशी तीन मिस्सा अर्पण करू शकतात.पहिली मिस्सा शुद्धीस्थानातील आत्म्यांसाठी, दुसरी पोपमहोदयांच्या हेतूंसाठी आणि तिसरी धर्मगुरूंच्या हेतूंसाठी.

कॅथलिक पंथामध्ये ह्या दिवशी मृतांच्या खाचेवर प्रार्थना केली जाते. मेणबत्त्या पेटविल्या जातात. चर्चच्या घंटा वाजविल्या जातात. 

चिंतन : मृत माणसे पापांपासून मुक्त व्हावीत म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करणे हा एक पवित्र आणि परिपूर्ण विचार आहे.-२ मक्काबी १२:४६

आजच्या दिवशी दफनभूमीत जाऊन पवित्र मिस्साबलिदानात सहभागी होणे व मृत भाविकांना श्रद्धांजली वाहून प्रार्थना करणे सर्वांसाठी बंधनकारक आहे. संत पौलाने म्हटले आहे, “आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपला विश्वास आहे” (रोमकरांस ६:८). 

✝️

पहिले वाचन : ज्ञानग्रंथ ३:१-९
वाचक : ज्ञानग्रंथ ह्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"होमार्पणाप्रमाणे त्याने त्यांचा स्वीकार केला."

(नीतिमानांचे आत्मे देवाच्या हाती आहेत आणि कोणतीही पीडा त्यांना स्पर्श करणार नाही. मूर्खाच्या दृष्टीने आत्मे मरण पावले, त्यांचे जाणे पीडा म्हणून समजले गेले. आमच्यापासून त्यांचे जाणे म्हणजे त्यांचा संपूर्ण विनाश असे मानले गेले पण ते मात्र शांतीमध्ये आहेत. कारण जरी माणसांच्या दृष्टीने त्यांना शिक्षा झाली, तरी त्यांना शाश्वत जीवनाची पूर्ण आशा आहे. थोडीशी शिस्त अंगी बाणल्यामुळे त्यांचा मोठा लाभ होईल. देवाने त्यांची कसोटी घेतली आणि त्याच्या दृष्टीने ते त्याच्या सहवासाला पात्र ठरले. सोन्याची पारख भट्टीत करावी तशी त्यांची त्याने केली. होमार्पणाप्रमाणे त्याने त्यांचा स्वीकार केला.) न्यायाच्या दिवशी ते चकाकतील. संकटातून ठिणग्या उडाव्या तसे चमकतील. ते राष्ट्रांचा कारभार पाहतील आणि लोकांवर राज्य करतील. प्रभू त्यांच्यावर सर्वकाळ राज्य करील. (त्याच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्यांना सत्याची जाणीव होईल. श्रद्धावंत जन त्याच्याबरोबर प्रेमामध्ये राहातील. कारण कृपा आणि दया त्याच्या निवडलेल्या लोकांवर आहे.)
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र २३ १-६
प्रतिसाद :   परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; मला कांहीं उणें पडणार नाहीं

१) परमेश्वर माझा मेंढपाळ आहे; 
मला कांहीं उणें पडणार नाहीं.
 तो मला हिरव्यागार कुरणांत बसवितो; 
तो मला संथ पाण्यावर नेतो.
तो माझा जीव ताजातवाना करितो; 
तो आपल्या नांवासाठी मला नीतिमार्गांनी चालवितो.

२) मृत्युच्छायेच्या दरीतूनहि मी जात असलों तरी 
कसल्याहि अरिष्टाला भिणार नाहीं, 
कारण तूं माझ्याबरोबर आहेस; 
आंकडी व तुझी काठी मला धीर देतात.

३)तूं माझ्या शत्रूंच्या देखत माझ्यापुढें ताट वाढितोस; 
तूं माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करितोस ;
माझें पात्र कांठोकाठ भरून वाहत आहे. 
 
४)खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला 
कल्याण व दया ही लाभतील; 
आणि परमेश्वराच्या घरांत मी चिरकाल राहीन.

दुसरे वाचन रोम  ६:३-९

वाचक :पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“त्याचप्रमाणे आपण नवजीवन जगावे."

(ख्रिस्त येशूमध्ये स्नानसंस्कार घेतलेल्या आपणा सर्वांनी त्याच्या मरणात स्नानसंस्कार घेतला आहे, ह्याविषयी तुम्ही अजाण आहात काय ? आपण त्या मरणातील स्नानसंस्काराने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ह्यासाठी की,
ज्याप्रमाणे ख्रिस्त पित्याच्या गौरवी सामर्थ्याने मेलेल्यांतूनउठवला गेला त्याचप्रमाणे आपणही नवजीवन जगावे.) कारण जर आपण त्याच्या मरणाच्या प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त झालो आहोत, तर त्याच्या उठण्याच्याही प्रतिरूपाने त्याच्याशी संयुक्त होऊ हे आपल्याला ठाऊक आहे की, हे पापाच्या अधीन असलेले शरीर नष्ट होऊन आपण ह्यापुढे पापाचे दास्य करू नये, म्हणून आपल्यातील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला कारण जो कोणी मेला तो पापाच्या दोषापासून मुक्त होऊन नीतिमान ठरला आहे. (आपण ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असल्यास त्याच्याबरोबर जिवंतही राहू अशी आपली श्रद्धा आहे. आपणास ठाऊक आहे की, मेलेल्यातून उठलेला ख्रिस्त ह्यापुढे मरण पावत नाही, त्याच्यावर यापुढे मरणाची सत्ता चालत नाही.)
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष
आलेलुया, आलेलुया ! 
जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो, 
त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते, 
त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन."
 आलेलुया!


शुभवर्तमान योहान  ६: ३७-४०

वाचक :योहानलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"जो कोणी पुत्रावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते, त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवीन."

पिता जे मला देतो तें सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही.  कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविलें त्याच्या इच्छेप्रमाणे करावें म्हणून स्वर्गातून उतरलो आहे;  आणि ज्याने मला पाठविले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने जे सर्व मला दिले आहे त्यांतून मी काहीहि हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी तें उठवावें.  माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्या वर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, त्याला मीच शेवटल्या दिवशीं उठवीन.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.


चिंतन :  जेव्हा आपण आपल्या श्रद्धेचे प्रकटीकरण करतो तेव्हा आपण मोठ्या विश्वासाने त्यामधील ख्रिस्ती रहस्यांची जोपासना करतो आणि त्याच्यावरील आपला अढळ विश्वास व्यक्त करतो. श्रद्धेच्या प्रकटीकरणातील शेवटचे रहस्य “देहाचे पुनरुत्थान आणि अनंतकाळचे जीवन यावर माझा विश्वास आहे आमेन.” ही श्रद्धा आपल्या जीवनात आशेचा किरण आणते. कारण आपल्या विश्वासाद्वारे आपल्याला जाणीव आहे की मरण हा शेवट नाही. तर आपण पुनरुत्थानाचा आणि अनंतकाळच्या जीवनाचा घटक बनणार आहोत. म्हणजेच आपण ख्रिस्तामध्ये अनंतकाळ जिवंत राहणार आहोत. आज आपण सर्व मृत भाविकांचा स्मृतीदिन साजरा करत आहोत. ह्या स्मृतीदिनाच्या दिवशी सर्व मृत भाविकांसाठी आपण प्रार्थना करावी म्हणून आव्हान करत आहे. पवित्र शास्त्रात (२ मक्काबी १२:४६) मध्ये असे म्हटले आहे, "मृत व्यक्ती पापांपासून मुक्त व्हावीत म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करणे हा एक पवित्र आणि परिपूर्ण विचार आहे. आजच्या पहिल्या वाचनात (प्रज्ञाग्रंथ) आपण ऐकतो की,आपण जर आपले जीवन नीतिमानाने जगलो तर आपल्या मरणानंतर आपला आत्मा परमेश्वराच्या हाती सुरक्षित राहाणार आहे. आपल्या आत्म्याला कोणतीही पीडा होणार नाही. तर तो शांतीमध्ये राहील, देवाच्या सानिध्यात राहील. ह्या आत्म्यांना आपल्या प्रार्थनेची गरज असते.

प्रार्थना : हे प्रभू परमेश्वरा, आमच्या सर्व मृत बंधु भगिनींचा तू दयेने न्याय कर व  त्यांना स्वर्गराज्यात ने, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️     






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या