आगमनकाळातील दुसरा रविवार
४ डिसेंबर २०२२
माझ्यानंतर येणारा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याची पादत्राणे वाहून न्यायची माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील.
तो स्वर्गीय शांती घेऊन प्रभू येशू येत आहे
आगमन काळांतील आज दुसरा रविवार आहे. त्याच्या राज्यात सर्वांना शांति, सुख व समाधान लाभेल. धार्मिकता, सत्यता, न्यायपरायणता, सात्विकता व परिपूर्णता ह्यांनी भरलेला समाज तो निर्माण करील..' अशी आनंददायी भविष्यावाणी आज यशया संदेष्टा करीत आहे.
योहान बाप्तिस्ता सुद्धा आपल्या सर्वांना आवाहन करीत आहे की, 'परमेश्वराचा मार्ग सिद्ध करा.' आपल्यातील पापवासना, अहंकार, स्वार्थ, आणि अशुद्धता दूर सारुन प्रभूला अपेक्षित नम्रता, प्रेम, क्षमाशिलता, परोपकार व सेवा वाढीस लावण्यासाठी आपण प्रयत्नशील बनायला हवे. आपल्या जीवनात सरलता व शुद्धता आणण्यासाठी आपण सिद्ध व्हायचे आहे. येशूच्या स्वागताची तयारी करीत असताना त्याला स्वीकारण्यासाठी जे अडथळे व उंचसखल भाग आपल्या जीवनात आहेत ते सरळ करणे आवश्यक आहे.
प्रभू येशू येईल तेव्हा सहजपणे आपण त्याला आपल्या कुटुंबात, समाजात व प्रत्येकाच्या जीवनात प्रवेश करता यावा म्हणून ख्रिस्तसभा आपल्याला आवाहन करीत आहे. प्रार्थना, उपवास, दानधर्म आणि सतकृत्ये करुन आपण प्रभूचे स्वागत करण्यासाठी सज्ज बनू या.
✝️
पहिले वाचन : यशया ११ : १-१०
वाचन : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तो दुबळ्यांचा न्याय योग्य प्रकारे करील."
इशायाच्या खोडाला धुमारा फुटेल. त्याच्या मुळातून फुटलेली शाखा फळ देईल. परमेश्वराचा आत्मा, सुज्ञानाचा आणि समंजसपणाचा आत्मा, सुसंकल्पाचा आणि सामर्थ्याचा आत्मा, परमेश्वराच्या ज्ञानाचा आणि भयाचा आत्मा त्याच्यावर राहील. परमेश्वराचे भय धरण्यात त्याला आनंद वाटेल. तो डोळ्यांनी पाहील तेवढ्यावरूनच न्याय करणार नाही. कानांनी ऐकेल तेवढ्यावरून तो निर्णय देणार नाही. तर तो दुबळ्यांचा न्याय यथार्थतेने करील. पृथ्वीवरील दीनांच्या वादाचा यथार्थ निर्णय देईल. तो आपल्या मुखरूप वेताने पृथ्वीचे तारण करील. आपल्या मुखाच्या फुंकराने दुर्जनांचा संहार करील. धार्मिकता त्याचे वेष्टन आणि सत्यता त्याचा कमरबंद होईल.
लांडगा कोकराजवळ राहील, चित्ता करडाजवळ बसेल. वासरू तरुण सिंह आणि पुष्ट बैल एकत्र राहतील. लहान मूल त्यांना हाकील. गाय आणि अस्वल मित्र बनतील. त्यांचे बच्चे एकत्र बसतील. सिंह बैलाप्रमाणे कडबा खाईल. तान्हे बाळ नागाच्या बिळाजवळ खेळेल. छोटे मूल फुरशाच्या बुबुळाला हात लावील. माझ्या पवित्र डोंगरावर ती कुठेही उपद्रव देणार नाहीत किंवा नासधूस करणार नाहीत. कारण सागर जसा जलपूर्ण आहे तशी पृथ्वी परमेश्वराच्या ज्ञानाने परिपूर्ण होईल.
त्याचे निवासस्थान गौरवयुक्त होईल, त्या समयी राष्ट्रांकरिता ध्वजवत उभारलेल्या इशायाच्या धुमाऱ्याला राष्ट्रे शरण येतील.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र : ७२:१- २,७-८,१२-१३,१७
प्रतिसाद : त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल.
१ )हे प्रभो, राजाला आपल्या न्यायनीतीचे वरदान दे.
या राजपुत्राला आपली न्यायपरायणता दे.
म्हणजे तो तुझ्या प्रजेचा योग्य रीतीने न्यायनिवाडा करील,
तुझ्या गरीब प्रजेला न्याय देईल.
२) त्याच्या कारकिर्दीत न्यायीपणाला बहर येईल
आणि चंद्र लोप पावेपर्यंत सर्व शांती नांदेल
एका समुद्रापासून दुसऱ्या समुद्रापर्यंत,
युफ्राटीस नदीपासून पृथ्वीच्या सीमेपर्यंत
त्याचे साम्राज्य पसरेल.
३) त्याचा धावा करणाऱ्या गरिबाला तसेच गरजवंत
आणि असहाय्य लोकांनादेखील तो सोडवील.
गरीब आणि गरजवंत ह्यांच्यावर तो दया करील.
गरजवंतांच्या जिवांचे रक्षण करील.
४) त्याचे नाव चिरंजीव होवो.
सूर्यासारखे अनंत टिको त्याच्या नावाने लोक
आपणांला धन्य म्हणोत.
सर्व राष्ट्रे त्याच्या नावाला धन्यवाद देवोत.
दुसरे वाचन :पौलचे रोम १५:४-९
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
येशू सर्व मानवांचे तारण करतो.
बंधुजनहो, शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या आणि धीराच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले. आता तुम्ही एकमताने आणि एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जो पिता आणि देव त्याचा गौरव करावा म्हणून धीर धरा आणि उत्तेजन देणारा देव असे करो की, ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे.
देवाच्या गौरवाकरिता ख्रिस्ताने तुमचा आमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा स्वीकार करा, मी म्हणतो देवाच्या सत्याकरिता ख्रिस्त सुंता झालेल्या लोकांचा सेवक झाला; अशासाठी की, पूर्वजांना दिलेली अभिवचने त्याने निश्चित करावी आणि परराष्ट्रीयांनी त्याच्या दयेमुळे देवाचा गौरव करावा. परराष्ट्रीयांमध्ये मी तुझे स्तवन करीन आणि तुझ्या नावाचे स्तोत्र गाईन असे शास्त्रात लिहिले आहे.
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. सर्व माणसे देवाने केलेले तारण पाहतील.
आलेलुया!
शुभवर्तमान मत्तय ३:१-१२
वाचक : मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पापांबद्दल पश्चात्ताप करा, कारण स्वर्गराज्य जवळ आले आहे."
बाप्तिस्मा करणारा योहान उदयास आला आणि यहुदियांच्या रानावनात उपदेश करू लागला, पापाबद्दल पश्चात्ताप करा, कारण स्वर्गराज्य जवळ आले आहे. ज्याच्याविषयी संदेष्टा यशया बोलला होता तो हाच. तो म्हणाला होता,
रानावनात कुणीतरी घोषणा करीत आहे :
"प्रभूचा मार्ग सिद्ध करा, त्याच्यासाठी सरळ मार्ग तयार करा. "
योहान उंटाच्या केसाचे कपडे घाली. त्याच्या कमरेला चामड्याचा पट्टा असे. रानमध आणि टोळ यांवर तो निर्वाह करी. येरुशलेम, सारा यहुदिया आणि यार्देन नदीच्या आसपासचा प्रदेश यातले लोक त्याच्याकडे लोटू लागले. ते आपली पापे पदरी घेत आणि त्यांच्याकरवी यादेंन नदीत बाप्तिस्मा घेत.
परंतु अनेक परुशी आणि सदुकी बाप्तिस्मा घेण्याकरिता आपल्याकडे येत असलेले पाहून योहान त्यांना म्हणाला, "अहो सापाच्या पिल्लांनो, देवाचा कोप होणार तेव्हा त्यातून तुमची सुटका होईल असे तुम्हांला कुणी सांगितले ? तुम्ही आपल्या पातकांचा त्याग केला आहे असे आपल्या करणीने सिद्ध करा. आब्राहाम आमचा पूर्वज आहे, असे म्हणायचा विचार करू नका. मी सांगतो की, आब्राहामसाठी देव या दगडातून संतती निर्माण करू शकेल. वृक्षाच्या मुळावर आता कुन्हाड रोखलेली आहे. चांगले फळ न देणारे एकूण एक झाड तोडून अग्नीत टाकले जाईल. तुम्ही पश्चात्ताप केला आहे हे दर्शविण्यासाठी मी तुमचा बाप्तिस्मा पाण्याने करतो. पण माझ्यानंतर येणारा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. त्याची पादत्राणे वाहून न्यायची माझी लायकी नाही. तो पवित्र आत्म्याने आणि अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील. खळ्यावरले धान्य पाखडून गहू आपल्या कोठारात साठविण्याकरिता तो सूप घेऊन तयार आहे. पण भुसा मात्र तो न विझणाऱ्या अग्नीत जाळून टाकील."
वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान .
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन :आगमनकाळाच्या पहिल्या भागात (पहिला रविवार ते १६ डिसेंबर) ख्रिस्तसभा आपल्याला प्रभूच्या पुन्हा येण्याची तयारी करण्याविषयी मार्गदर्शन करीत आहे. आजची वाचने त्यासंदर्भात | आपल्याला तीन विचार देतात.
अ. गतवैभवाकडे परतणे : संत ग्रेगरी द ग्रेट म्हणतात, "हे ख्रिस्ती मनुष्या, तू पाप करतोस तेव्हा केवढ्या मोठ्या उंचीवरून खाली पडतोस त्याची जाणीव ठेव.”आजच्या पहिल्या वाचनात यशया संदेष्टा कापलेल्या झाडाच्या बुंध्याची उपमा वापरतो. इस्राएली लोकांवर परकियांनी हल्ला केला होता. बारा वंशांपैकी केवळ यहुदाचा वंश उरला होता. तो दाविदाचा वंश होता. इशाय हा दाविदाचा बाप होता. त्या इशायाच्या बुंधाला धुमार फुटेल म्हणजे त्याचे गेलेले वैभव परत येईल. आगमन काळात आपणही अशीच आशा बाळगत जीवन जगायचे असते : “वो सुबह फिर आएगी!”
ब. इतरांचा स्वीकार करणे ख्रिस्तसभा ही यात्रेकरू ख्रिस्तसभा आहे. तिच्यात सतत नवनवीन सभासदांची भर पडतच जाणार आहे. प्रारंभीच्या ख्रिस्तसभेत यहुद्यांमधून पुष्कळ लोक ख्रिस्ती झालेले होते. परराष्ट्रीय जेव्हा ख्रिस्ती होऊ लागले तेव्हा यहुदी ख्रिस्तती लोकांनी त्यांना सुंता करण्यास भाग पाडले. मात्र जेरूसलेम येथे झालेल्या धर्मसभेत ठरविल्याप्रमाणे त्यांना सुंता न करताही ख्रिस्तावरील श्रद्धेद्वारे ख्रिस्ती धर्म स्वीकारता येऊ शकतो. संत पॉल त्यासाठीच रोमच्या लोकांना आवाहन करतो की, त्यांनी इतरांचा प्रेमाने स्वीकार करावा.
क. न्यायाच्या दिवसाची जाणीव ठेवणे : आजच्या शुभवर्तमानात संत योहान बाप्तिस्ता दैवी न्यायाच्या दिवसासाठी दोन प्रतिमा वापरतो : झाडाच्या मुळाशी ठेवण्यात आलेली कुऱ्हाड आणि धान्य साफ करण्यासाठी वापरण्यात येणारे सूप. निष्फळ झाड व भूस अग्नीत टाकण्यात येईल. म्हणजे दुर्जनांना नरकाग्नीची शिक्षा होईल. सज्जन मात्र पवित्र आत्म्याच्या अग्नीने शुद्ध होऊन तेजाने तळपू लागतील.
आत्मपरीक्षण : अंतिम न्यायाच्या दिवसाची आठवण ठेवून मी माझ्या मूळ प्रतिमेकडे वळतो का? त्यासाठी इतरांचा न्याय न करता मी त्यांचा प्रेमाने स्वीकार करतो का ?
प्रार्थना :हे प्रभू येशू, तुला स्वीकारण्यास आम्ही सर्वदा सिद्ध असावे म्हणून आमचे नुतनीकरण करण्यास आम्हांला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या