Marathi Bible Reading | Friday 27th January 2023| 3rd Week in Ordinary Time

 सामान्यकाळातील तिसरा   सप्ताह

शुक्रवार   दि.२७ जानेवारी  २०२३

  आपण देवाच्या राज्याला कशाची उपमा द्यावी ? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे




संत आंजेला मेरिसी

- कुमारिका(१४७४-१५४०)
✝️
आंजेला ह्या २७ जानेवारी १५४० रोजी मरण पावल्या. इ. स. १८०७ साली त्यांना संत मालिकेत गणण्यात येऊ लागले.

चिंतन : “जबरदस्तीने काहीही मिळविण्याचा प्रयत्न करू नका. देवाने प्रत्येकाला स्वतंत्र इच्छाशक्ती आणि विवेक स्वातंत्र्य दिलेले आहे. आपली आज्ञा पाळावी म्हणून तो कोणालाही जबरदस्ती करीत नाही.” • संत आंजेला मेरिसी


✝️   

पहिले वाचन इब्री - १०:३२-३९

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन

पूर्वीचे दिवस आठवा. त्यावेळी तुम्हांला प्रकाश मिळाल्यावर तुम्ही दुःखाबरोबर फार धीराने झगडलात. कधी विटंबना आणि संकटे सोसल्याने लोकांत तुमची अवहेलना झाली; तर कधी इतरांना अशी वागणूक मिळाली तेव्हा त्यात तुम्हांलाही सहभागी व्हावे लागले. कारण बंदिवानांबरोबर तुम्ही समदुःखी झाला आणि आपली स्वत:ची अधिक चांगली मालमत्ता आपल्याजवळ आहे आणि ती टिकाऊ आहे, हे समजून तुम्ही आपल्या मालमत्तेची हानी आनंदाने सोसली. ह्यास्तव आपले धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे. तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागून वचनानुसार फलप्राप्ती करुन घ्यावी, म्हणून तुम्हाला सहनशक्तीची गरज आहे.

"कारण अगदी थोडा वेळ राहिला आहे; जो येणार आहे, तो येईल, उशीर करणार नाही; माझा नीतिमान मनुष्य विश्वासाने जगेल; तो जर माघार घेईल, तर त्याच्याविषयी माझ्या जिवाला संतोष वाटणार नाही."

परंतु ज्यांचा नाश होईल अशा माघार घेणाऱ्यांपैकी आपण नाही, तर जिवाच्या तारणासाठी विश्वास ठेवणाऱ्यांपैकी आहोत.

हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  ३७:३-६,२३-२४,३९-४०

प्रतिसाद : नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते.

१) जर तू परमेश्वरावर भाव ठेवशील 

आणि सदाचाराने वागशील, 

तर तू या देशात निवास करशील 

आणि सुरक्षित राहशील. 

जर तू परमेश्वराच्या ठायी आपले 

मन रमवशील, तर तो तुझे मनोरथ पूर्ण करील.


२) आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे, 

त्याच्यावर भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. 

तो तुझे नीतिमत्त्व प्रकाशासारखे, 

तुझे न्यायत्व मध्यान्हाच्या सूर्याप्रमाणे उघड करील.


३) परमेश्वर मनुष्याची गती स्थिर करतो 

आणि त्याचा मार्ग त्याला प्रिय आहे. 

तो पडला तरी सपशेल पडणार नाही, 

कारण परमेश्वर त्याला हात देऊन सावरील.


४) नीतिमानांचे तारण परमेश्वरापासून होते, 

संकटसमयी तोच त्याचा दुर्ग आहे. 

परमेश्वर त्यांना साहाय्य करतो, 

त्यांना मुक्त करतो आणि त्यांचे तारण करतो: 

कारण त्यांनी त्याचा आश्रय घेतला आहे.


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

देवाने आपणांला सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.

आलेलूया !


शुभवर्तमान 

 मार्क ४:२६-३४

वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बी रुजते आणि वाढते पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लागलीच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. परमेश्वराचे राज्य असे आहे." आणखी तो म्हणाला, "आपण देवाच्या राज्याला कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे? ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडाझुडपांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते." असले पुष्कळ दाखले देऊन, त्याच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे आणि दाखल्यावाचून तो त्यांच्यासमोर बोलत नसे, तथापि एकान्ती तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो.   


चिंतन : देवराज्य प्रस्थापित करण्यासाठी परमेश्वराने केवळ आपल्याला पाचारण केले नाही तर सद्गुणांचा साठा आपल्या अंतःकरणात निर्माण केला
आहे. जर या सद्गुणांची जाणीव आपणांस झालीआणि योग्य कारणासाठी त्याची मशागत करण्यात  आली तर नक्कीच जीवनरूपी वृक्षाला स्वर्गीय फळ प्राप्त होईल. एका छोट्या बी मध्ये केवढे मोठे सामर्थ्य दडलेले आहे, याचे सुंदर विश्लेषण प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना समजावून सांगत आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात हृदय रूपी बी परपेश्वराने दिली आहे की, ज्याद्वारे परमेश्वराचा स्वर्गीय अनुभव ती तो इतरांसाठी निर्माण करू शकतो. संत तीमथी व संत तित ख्रिस्ताच्या कार्यामध्ये पुढाकार घेऊन ते सुवार्तेचे साक्षीदार बनले. दुःखाला ते हसतमुखाने सामोरे गेले. कारण परमेश्वराच्या पवित्र आत्म्यामध्ये त्यांना सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमाचा आत्मा लाभलेला होता. जेव्हा परमेश्वराच्या पवित्र आत्मामध्ये आपले जीवन प्रेरीत होते तेव्हा अद्भुत कार्य घडते. देवाचे राज्य हे बाह्य स्वरूपाचे नसून तेआंतरिक स्वरूपाचे आहे. देवाचे राज्य वस्तुंद्वारे मलामिळवला येणार नाही तर माझ्या अंतःकरणाची खरीमशागत करूनच स्वर्गीय दीप प्रज्वलित करू शकतो.देव राज्य कुठे आहे ? मी त्याचा शोध कुठे घेतो ?

प्रार्थना : :हे प्रभू येशू, तुझी वचने व तुझी शिकवण आत्मसात करुन तुला अनुसरण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.





सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या