सामान्यकाळातील तिसरा सप्ताह
शनिवार दि.२८ जानेवारी २०२३
"तुम्ही इतके भित्रे कसे ? तुम्हाला विश्वास कसा नाही?"
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयी भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आली होती. आब्राहामला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे निघून जाण्यास तो विश्वासाने तयार झाला आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही तो निघून गेला. परदेशात राहावे त्याप्रमाणे तो वचनदत्त देशात विश्वासाने जाऊन राहिला, त्याच वचनाचे सहभागी वारस इसहाक आणि याकोब ह्यांच्याबरोबर डेऱ्यात त्याची वस्ती होती. कारण पाया असलेल्या आणि देवाने योजलेल्या आणि बांधलेल्या नगराची तो वाट पाहत होता. वयोमर्यादेपलीकडे असताही सारेला देखील विश्वासाने गर्भधारणेची शक्ती मिळाली, कारण तिने वचन देणाऱ्याला विश्वसनीय मानले. त्यामुळे एकापासून आणि त्याही निर्जीव झालेल्यापासून, संख्येने आकाशातल्या ताऱ्यांइतकी आणि समुद्रावरील वाळूइतकी अगणित संतती निर्माण झाली.
हे सर्व जण विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनानुसार फलप्राप्ती झाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली आणि तिला वंदन केले आणि आपण पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहो असे पत्करले. असे म्हणणारे आपण स्वत:च्या देशाचा शोध करीत असल्याचे दाखवतात. ज्या देशातून ते निघाले होते त्या देशाला उद्देशून हे म्हणणे असते तर त्यांना परत जाण्याची संधी होती. पण आता ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची उत्कंठा धरतात. ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणवून घ्यावयास देवाला त्यांची लाज वाटत नाही, कारण त्याने त्यांच्यासाठी नगर तयार केले आहे. आब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसहाकचे अर्पण केले. ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एक पुत्राचे अर्पण करीत होता; त्याला असे सांगितले होते, “इसहाकच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील." तेव्हा मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे, हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला.
प्रतिसाद : इस्राएलचा देव प्रभू धन्यवादित असो !
१) आपल्यासाठी त्याने आपला दास दावीद ह्याच्या घराण्यात बलवान उद्धारक प्रस्थापित केला आहे. हे त्याने युगाच्या प्रारंभापासून आपल्या पवित्र संदेष्ट्यांच्या मुखाद्वारे सांगितले होते.
२) म्हणजे आपल्या शत्रूच्या आणि आपला द्वेष करणाऱ्या सर्वांच्या हातून सुटका करावी; अशासाठी की, आपल्या पूर्वजांवर त्याने दया करावी आणि त्याने आपला पवित्र करार स्मरावा.
३) म्हणजे जी शपथ आपला पूर्वज आब्राहाम ह्याच्याशी त्याने वाहिली, ती स्मरावी; ती अशी की, तुम्ही आपल्या शत्रूच्या हातून सुटून माझ्यासमोर पवित्रतेने आणि नीतीने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन.
जयघोष
आलेलूया, आलेलूया !
देवाचे वचन सजीव आणि सक्रीय असून मनातील विचार
आणि हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे.
शुभवर्तमान मार्क ४:३५-४१
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
संध्याकाळ झाल्यावर येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, "आपण पलीकडे जाऊ या," तेव्हा लोक समुदायाला सोडल्यावर, येशू मचव्यात होता ते तसाच त्याला घेऊन गेले. दुसरेही मचवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ सुटले आणि लाटा मचव्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. येशू तर होडीच्या मागच्या बाजूला उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, "गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही ?" तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, "उगा राहा! शांत हो!" मग वारा थांबला आणि अगदी निवांत झाले. नंतर येशू त्यांना म्हणाला, "तुम्ही इतके भित्रे कसे ? तुम्हाला विश्वास कसा नाही?" तेव्हा ते अतिशय घाबरले आणि एकमेकांना म्हणू लागले, "हा आहे तरी कोण? वारा आणि समुद्र हे देखील ह्याचे ऐकतात."
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.
✝️

0 टिप्पण्या