Marathi Bible Reading | 4th Sunday in Ordinary Time | 29th January 2023 |


 सामान्यकाळातील चौथा 

  रविवार  दि.२९ जानेवारी  २०२३


 "जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.”

✝️


जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.”


आपण सर्वजण प्रभूच्या स्वर्गराज्याचे वारसदार आहोत, मात्र प्रभूच्या  धन्योद्गारांवर सकारात्मकतेने चिंतन करून त्याप्रमाणे आचरण करण्याचा आपण सतत प्रयत्न करायचा आहे . आपल्या कुटुंबात, गाव- परिसरात, समाजात व सर्वत्र शांति प्रस्थापित करण्यासाठी व स्वर्गराज्याच्या दीशेने वाटचाल करण्यासाठी आपल्याला प्रेरणा लाभावी म्हणून नम्रतेने प्रभू  समोर नतमस्तक बनू या.


पहिले वाचन सफन्या  २:३;३:१२-१३

वाचक :  सफन्या या पुस्तकातून घेतलेले वाचन 

"मी तुझ्यामध्ये नम्र आणि गरीब लोक राहू देईन."

देशातील सर्व नम्र जनांनो, परमेश्वराच्या न्यायानुसार चालणाऱ्यांनो, त्याचा आश्रय घ्या, धार्मिकता आणि नम्रता याचे अवलंबन करा म्हणजे परमेश्वराच्या क्रोधदिनी तुम्ही दृष्टिआड व्हाल. "मी तुम्हामध्ये नम्र आणि गरीब लोक राहू देईन. ते परमेश्वराच्या नावावर श्रद्धा ठेवतील, इस्राएलचे अवशिष्ट जन काही अनिष्ट करणार नाहीत; लबाडी करणार नाहीत, त्यांच्या मुखात कपटी जिव्हा आढळणार नाही. कारण ते चरतील आणि विश्रांती मिळवतील, कोणी त्यांस भिववणार नाही.

हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १४६: ६- १०

प्रतिसाद :   जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.

१ ) तो सदा आपले सत्यवचन पाळतो, 

छळलेल्यांचा न्यायनिवाडा करतो, 

भुकेल्यांना अन्न देतो. 

परमेश्वर बंदिवानांना मोकळे करतो.


२) परमेश्वर आंधळ्यांना दृष्टी देतो, 

परमेश्वर वाकलेल्यांना ताठ करतो. 

परमेश्वर उपऱ्यांचे रक्षण करतो, 

अनाथ आणि विधवा ह्यांची दाद घेतो.


३) परमेश्वर नीतिमानांवर प्रेम करतो, 

परंतु दुर्जनांचा मार्ग वेडावाकडा करतो. 

परमेश्वर सर्वकाळ राज्य करतो, हे सियोने,

तुझा देव पिढ्यान्पिढ्या राज्य करतो.


दुसरे वाचन :  १ करिंथ १:२६-३१

वाचक :  पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 

"जगातील जे कनिष्ठ ते देवाने निवडले."

बंधुजनहो, तुम्हांस झालेले पाचारणच घ्या; तुमच्यामध्ये जगाच्या दृष्टीने ज्ञानी, समर्थ, कुलीन, असे पुष्कळ जण नाहीत; तरी शहाण्यांना लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्ख ते निवडले आणि जे बलवान ते लाजवावे म्हणून जगातील जे दुर्बल ते निवडले आणि जगातूल जे कनिष्ठ, जे धिक्कारलेले आणि जे शून्यवत अशांना देवाने ह्याकरिता निवडले जे आहे ते त्याने रद्द करावे, म्हणजे देवासमोर कोणीही मनुष्याने अभिमान बाळगू नये. त्याच्याकडून तुम्ही ख्रिस्त येशूकडे आहा. तो देवापासून आपल्याला ज्ञान म्हणजे नीतिमत्त्व आणि पवित्रीकरण आणि खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती असा झाला आहे; 'जो अभिमान बाळगतो, त्याने परमेश्वराविषयी तो बाळगावा' ह्या शास्त्रलेखाप्रमाणे व्हावे.

हा प्रभूचा शब्द 

सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष

आलेलूया,आलेलूया !

शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली. 

जितक्यांनी त्याचा स्वीकार केला 

तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला.

आलेलूया !

शुभवर्तमान मत्तय  ५:१-१२

वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

  "जे आत्म्याने दीन ते धन्य."

लोकसमुदायांना पाहून येशू डोंगरावर चढला आणि तो खाली बसल्यावर त्याचे शिष्य त्याच्याजवळ आले. मग तो तोंड उघडून त्यांना शिकवू लागलाः

“जे आत्म्याने दीन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.” “जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल.” “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” “जे नीतिमत्त्वाचे भुकेले आणि तान्हेले ते धन्य,कारण ते तृप्त होतील.” “जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल." "जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.” “जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील."

“नीतिमत्त्वाकरिता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे."

“माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा आणि छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य ! आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे."

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  लादलेले दारिद्र्य आणि हेतु पुरस्सर घेतलेले दारिद्र्याचे व्रत यांमध्ये एक मूलभूत फरक असा आहे की, माणूस लादलेल्या दारिद्र्याबद्दल कुरकूर करीत त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो. प्रसंगी तो क्रांतीची ज्योत हाती घेऊन बंड, आंदोलन, हिंसाचार या मार्गाने जाऊ शकतो. याउलट अंगिकारलेले दारिद्र्य उदात्त हेतूसाठी असल्याने माणूस गरीब राहणे पसंत करतो, त्यात समाधान मानतो. त्याच्या गरजा मर्यादित असतात, त्याच्या मुखात कुरकूर नसून कृतज्ञतेची भावना असते. अशा व्यक्ती पैशावर नव्हे तर परमेश्वरावर विसंबून असतात. अशा व्यक्तीठायी दिसून येणाऱ्या सद्गुणांपैकी आजच्या वाचनात तीन सद्गुण नमूद करण्यात आलेले आहेत. १. नम्रताः “महापुरे वृक्ष जाती तिथे लव्हाळे उरती" ह्या उक्तीनुसार परमेश्वराच्या क्रोधाच्या दिवशी अहंकारी व घमेंडी लोक जमीनदोस्त होतील तर नम्र जन वाचतील असे पहिले वाचन आपल्याला सुचविते.. इस्राएलवर जेव्हा असिरियाचा व त्यानंतर बाबिलोनचा हल्ला होईल त्यावेळी परमेश्वर नम्र व गरीब लोकांचे संरक्षण करील असा भाकितवजा इशारा संदेष्टा सफन्या देतो. 
२. साधेपणा : करिंथ येथील लोक स्वाभिमानी वृत्तीचे होते. आपल्या ज्ञानाबद्दल त्यांना गर्वाची बाधा झालेली होती. आपल्या ज्ञानाच्या बळावर आपण स्वर्गीय संपत्ती प्राप्त करू शकतो. असा फाजील आत्मविश्वास ते आपणाठायी बाळगून होते. संत पौल त्यांना आव्हान देत केवळ ख्रिस्ताच्या क्रुसाचा अभिमान बाळगण्याचा म्हणजेच देवाच्या आज्ञांचे पालन करून साधेपणाचे जीवन जगण्याचा सल्ला देतो. 
३. आंतरिक जीवन : संत मत्तयच्या शुभवर्तमानातील आठही धन्योद्गार आपल्याला आंतरिक जीवन जगण्यास पाचारण करतात. त्यामध्ये आत्म्याने दीन असणे, पापांबद्दल शोक करणे, मनाने सौम्य असणे, नीतिमत्वासाठी भुकेले असणे, दयाळू असणे, अंतःकरणाचे शुद्ध असणे, शांतीसाठी झटणे आणि चांगल्या गोष्टींसाठी छळ सहन करणे ह्या आठ गुणांचा समावेश होतो. ह्या सद्गुणांचा अभाव असताना वरवर दारिद्र्याचे व्रत धारण करणे हे परस्परविरोधी असते.

आत्मपरीक्षण : दारिद्र्य, गरीब लोक आणि गरिबीचे व्रत घेऊन जीवन जगणारे व्रतस्थ ह्यांच्या जीवनाकडे पाहून मला कोणती प्रेरणा मिळते. आंतरिक जीवन फुलवत ठेवून नम्रता व साधेपणा अंगिकारण्यासाठी मला काय काय करता येईल ?

प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या असंख्य दानाबद्दल तुला धन्यवाद देतो. मला तुझ्या शांतिचा दूत बनव, आमेन.



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या