सामान्यकाळातील चौथा सप्ताह
सोमवार दि.३० जानेवारी २०२३
"प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली आणि तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग."
प्रतिसाद : अहो, परमेश्वराची आशा धरणारे तुम्ही सर्व हिंमत धरा.
१) प्रभो, तुझे चांगुलपण किती थोर आहे!
तुझे भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेवले आहे,
तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी मनुष्यमात्रांदेखत तू ते सिद्ध केले आहे.
२) तू आपल्या समक्षतेच्या गुप्त स्थळी
मनुष्यांच्या कारस्थानांपासून त्यांना लपवतोस;
शब्दकलहांपासून त्यांना आपल्या मंडपात सुरक्षित ठेवतोस.
३) परमेश्वर धन्यवादित असो;
कारण वेढा पडलेल्या शहरात सापडल्यासारखा
मी झालो असता त्याने अद्भुत रीतीने
आपले वात्सल्य मला दाखवले.
४) मी तर अधीर होऊन म्हणालो,
"मी तुझ्या दृष्टीपुढून दूर झालो आहे."
तरी मी तुझा धावा केला तेव्हा तू माझ्या विनवणीचा शब्द ऐकला.
५) अहो परमेश्वराचे सर्व भक्तहो,
तुम्ही त्याच्यावर प्रेम करा.
परमेश्वर विश्वास ठेवणाऱ्यांचे रक्षण करतो,
परंतु तो गर्विष्ठांचे पुरेपूर पारिपत्य करतो.
जयघोष
आलेलूया, आलेलूया !
हे परमेश्वरा, बोल, तुझा दास ऐकत आहे;
सार्वकालिक जीवनाची वचने आपणाजवळ आहेत.
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू आणि त्याचे शिष्य समुद्राच्या पलीकडे गरसेकरांच्या देशात आले आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक माणूस कबरस्तानातून निघून त्याला भेटला. तो कबरस्तानात राहत असे आणि त्याला साखळदंडाने बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. कारण त्याला पुष्कळवेळा बेड्यांनी आणि साखळदंडांनी बाधले असताही त्याने साखळदंड तोडून टाकले होते आणि बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते. त्याला वठणीवर आणण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. तो नेहमी, रात्रंदिवस, कबरस्तानामध्ये आणि डोंगरांमध्ये राहून ओरडत असे आणि दगडांधोंड्यांनी आपले अंग ठेचून काढत असे. येशूला दुरून पाहताच तो धावत आला, त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, "हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस." कारण येशू त्याला म्हणत होता, "अरे अशुद्ध आत्म्या, ह्या माणसातून नीघ." येशूने त्याला विचारले "तुझे नाव काय?" त्याने उत्तर दिले, "माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहो" आम्हांला ह्या देशातून घालवू नको अशी तो त्याला आग्रहाने विनंती करीत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा भुतांनी त्याला विनंती केली, "आम्ही त्या डुकरात शिरावे म्हणून त्यांच्याकडे आम्हांला लावून दे." मग त्याने त्यांना परवानगी दिली, तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकरात शिरले, तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून समुद्रात पडला आणि पाण्यात गुदमरून मेला.
डुकरे राखणारे पळाले आणि त्यांनी गावात आणि शेतांमळ्यात हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्याकरिता लोक आले. ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्यात सैन्य होते तो, बसलेला, वस्त्र पांघरलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी, भूतग्रस्ताला काय झाले ते आणि डुकरांविषयीची हकीकत त्यांना सांगितली. तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्याला विनवू लागले. मग तो मचव्यावर जात असता, पूर्वी भूतग्रस्त असलेला माणूस त्याला विनंती करू लागला की, मला आपल्याजवळ राहू द्या. परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही, त्याला म्हटले, "तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा; प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली आणि तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग." तेव्हा तो निघाला आणि येशूने जी मोठी कामे त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस प्रांतात जाहीर करु लागला; तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले.
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.
✝️

0 टिप्पण्या