सामान्यकाळातील चौथा सप्ताह
मंगळवार दि.३१जानेवारी २०२३
"मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो."
प्रतिसाद : अहो, परमेश्वराची आशा धरणारे तुम्ही सर्व हिंमत धरा.
परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करतील.
१ ) त्याच्या भक्तासमक्ष मी आपले नवस फेडीन.
दीनजन अन्न सेवन करून तृप्त होतील.
परमेश्वराला शरण जाणारे त्याची स्तुती करतील.
तुम्ही चिरंजीव व्हा.
२ दिगंतरीचे सर्व लोक परमेश्वराला स्मरून
त्याच्याकडे वळतील,
सगळी राष्ट्रकुले तुला दंडवत घालतील.
पृथ्वीवरील सर्व थोर लोक त्याला भजतील,
धुळीस मिळणारे सर्व त्याला नमन करतील.
३ त्यांचे वंशजही त्याची सेवा करतील.
पुढल्या पिढीच्या लोकांना प्रभूविषयी कथन करतील;
तेही येऊन भावी पिढीला त्याचे
न्याय्यत्व कळवतील;
“त्यानेच हे सिद्धीस नेले" असे म्हणतील.
जयघोष
आलेलूया, आलेलूया !
हे परमेश्वरा, तुझे मार्ग मला दाखव,
तुझ्या सत्याला अनुसरून वागायला मला शिकव.
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"मुली, मी तुला सांगतो ऊठ. "
येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याच्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला. तो समुद्राजवळ होता. तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी आला आणि त्याला पाहून त्याच्या पाया पडला. त्याने आग्रहाने त्याला विनवणी केली, “माझी लहान मुलगी मरावयास टेकली आहे. तिने बरे होऊन जगावे म्हणून आपण येऊन तिच्यावर हात ठेवा.” मग तो त्याच्याबरोबर गेला.
तेव्हा पुष्कळ लोक त्याच्यामागून चालले होते व त्याच्याभोवती गर्दी करीत होते तेथे रक्तस्त्रावाने बारा वर्षे पीडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून व पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते; तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या कपड्याला शिवली. "केवळ ह्याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन." असे ती म्हणत होती, तेव्हा लागलीच तिचा रक्तस्त्राव बंद झाला आणि आपण त्या पीडेपासून बरे झालो आहो, असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्या ठायी लागलेच ओळखले आणि गर्दीमध्ये वळून म्हटले, “माझ्या कपड्यांना कोण शिवले ?" त्याचे शिष्य त्याला म्हणाले, “लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहता, तरी आपण म्हणता, 'मला कोण शिवले ?' "मग जिने हे केले होते तिला पाहायला त्याने सभोवार बघितले. तेव्हा ती स्त्री, आपल्या बाबतीत जे काही घडले ते जाणून भीत भीत आणि कापत कापत त्याच्याकडे आली आणि त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व खराखुरा वृत्तांत सांगितला. तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो."
तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, “आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता ?” परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नको, मात्र विश्वास धर,” त्याने पेत्र, याकोब आणि याकोबचा भाऊ योहान ह्यांच्याशिवाय कोणालाही आपणाबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या. अधिकाऱ्याच्या घराजवळ आल्यावर ओक्साबोक्सी रडणारे आणि आकांत करणारे ह्यांचा गोधळ चाललेला त्याने पाहिला. तो आत जाऊन त्यांना म्हणाला, “तुम्ही का गोंधळ करता आणि रडता? मुलगी मेली नाही, झोपेत आहे." तेव्हा ते त्याला हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर घालवून दिले आणि मुलीचे आईबाप आणि आपल्याबरोबरची माणसे ह्यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हाताला धरून तो म्हणाला, “तलीथा कुम्;” ह्याचा अर्थ, “मुली, मी तुला सांगतो, ऊठ” आणि लागलीच ती मुलगी ऊठून चालू लागली; कारण ती बारा वर्षाची होती. तेव्हा ते लागलेच आश्वर्यचकीत झाले. हे कोणाला कळता कामा नये, अशी त्याने त्यांना निक्षून आज्ञा केली आणि तिला खावयाला देण्यास सांगितले.
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.
✝️
0 टिप्पण्या