Marathi Bible Reading | Wednesday 25th January 2023| 3rd Week in Ordinary Time

 सामान्यकाळातील तिसरा   सप्ताह

 बुधवार   दि.२५ जानेवारी  २०२३

(ख्रिस्ती ऐक्य सप्ताह) (१८ ते २५ जानेवारी)

 “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा”


तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि 'शौल, शौल, माझा छळ का करतोस ?" अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना मी ऐकली. मी विचारले, 'प्रभुजी, तू कोण आहेस ?"

✝️



संत पौलाचे परिवर्तन - प्रेषित (सण)

  ख्रिस्तसभेतील सुवार्तिकांचा छळ करणारा, पुरुष व स्त्रियांना बांधून तुरुंगात टाकणारा, अनेकांना देहांताची शिक्षा फर्माविणारा शौल यरुशलेमेस चालला असताना दिमिष्काजवळ भर दुपारी जमिनीवर कोसळला. दिव्य प्रकाशाने त्याला अंध बनवले. शौलाला साक्षात्कार झाला आणि त्याचे परिवर्तन झाले. 
संत पौलाने आद्य ख्रिस्तसभेतील तेरा मंडळीना लिहिलेल्या पत्राद्वारे प्रभावी ख्रिस्ताची शिकवण दिली आहे. ख्रिस्त प्रेमाने प्रेरित झालेल्या पौलाने ख्रिस्तमंडळीचे जणू पालन पोषण केले. 
    परमेश्वर  जगाच्या दृष्टीने पापी, भ्रष्ट किंवा देवाला न मानणाऱ्यांना सुद्धा देव त्याच्या कार्यासाठी निवडतो. ख्रिस्तसभेच्या इतिहासात अशा अनेक माणसांचे जीवन परिवर्तन होऊन त्यांनी आपल्या शब्दाने व आचरणाने सुवार्तेची साक्ष जगाला दिली आहे.
आपल्या प्रेषितकार्यासाठी त्याने रोम, करिथ, इफिस, गलती आणि आशिया मानयर मधील लुस्त्र, त्राओस, मिलेत अशा अनेक ठिकाणचा दौरा केला. ह्या दौऱ्याच्या दरम्यान त्याला पीटर, मार्क, बर्णबा, प्रिस्का, अक्वीला, फिलेमोन, तिमथी, टायटस, लूक अशा प्रभृती भेटल्या. त्या सर्वांना त्याने आपल्या जीवन- उदाहरणाने ख्रिस्ताकडे आणले. तो जिथे जिथे गेला तिथे तिथे त्याने ख्रिस्ती मंडळ्या स्थापन केल्या आणि ह्या मंडळ्यांची काळजी घेण्यासाठी प्रेस्बुतर आणि धाकोन तसेच एपिस्कोपाय म्हणजेच विशप, धर्मगुरू आणि डिकन अशांची नियुक्ती केली.
संत पौलने अनेक पत्रे लिहून आपल्या ख्रिस्तमंडळ्यांना मार्गदर्शन केले. ख्रिस्तासाठी त्याला अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. उपासमार, दगडमार, छळ, अपमान, तुरूंगवास, अशा अनेक अपेष्टांना त्याला सामोरे जावे लागले. आजारी अवस्थेत त्याला लूक हा परराष्ट्रीय वैद्य भेटला. त्याचेही त्याने मनपरिवर्तन केले. अनेसिम नावाच्या गुलामाची भेट तुरूंगातच झाली. त्याच्या सुटकेसाठी त्याने अनेसिमचा मालक फिलेमोन ह्या ख्रिस्ती व्यक्तीला तुरूंगातून पत्र लिहिले. पौलचा इ. स. ६७ साली निरो राजांच्या कारकीर्दीत शिरच्छेद करण्यात आला.

आज ख्रिस्त येशू आपल्या सर्वांना त्याची देवराज्याची सुवार्ता  इतरांपर्यंत पोहोचविण्यासाठी आवाहन करीत आहे. 

✝️   

पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये २२:३-१६
वाचक :प्रेषितांची कृत्ये  पुस्तकातून घेतलेले वाचन

"ऊठ, येशूच्या नावाचा धावा करून स्नानसंस्कार घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर."

पौल लोकांना म्हणाला, "मी यहुदी आहे. माझा जन्म किलिकियातील तार्स नगरात झाला आणि मी ह्या शहरात गमलिएलाच्या चरणांजवळ लहानचा मोठा होऊन मला वाडवडिलांच्या नियमशास्त्राचे शिक्षण कडकडीत रीतीने मिळालं आणि जसे तुम्ही सर्व आज देवाविषयी आवेशी आहा तसा मीही होतो. पुरुष आणि स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालून देहान्तशिक्षा देऊनसुध्दा मी ह्या पंथाचा पाठलाग केला, त्याविषयी प्रमुख याजक आणि सगळा वडीलवर्गही माझा साक्षी आहे. मी त्यांच्यापासून बंधुजनांना पत्रे घेऊन दिमिष्क येथे चाललो होतो, ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून येरुशलेममध्ये शासन करण्यास आणावे.
“जाता जाता मी दिमिष्कजवळ पोहचलो, तेव्हा सुमारे दुपारच्या वेळेस आकाशातून माझ्याभोवती एकाएकी मोठा प्रकाश चमकला. तेव्हा मी जमिनीवर पडलो आणि 'शौल, शौल, माझा छळ का करतोस ?" अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना मी ऐकली. मी विचारले, 'प्रभुजी, तू कोण आहेस ?" त्याने मला म्हटले, 'ज्या नाझरेथकर येशूचा तू छळ करतोस तोच मी आहे. तेव्हा माझ्याबरोबर जे होते त्यांना प्रकाश दिसला खरा, परंतु माझ्याबरोबर बोलणाऱ्याची वाणी त्यांनी ऐकली नाही. मग मी म्हणालो, 'प्रभुजी, मी काय करावे ?' प्रभूने मला म्हटले, 'उठून दिमिष्कात जा, मग तू जे काही करावे म्हणून ठरवण्यात आले आहे, त्या सर्वाविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.' त्या प्रकाशाच्या तेजामुळे मला दिसेनासे झाले, म्हणून माझ्या सोबत्यांनी माझा हात धरून मला दिमिष्कात नेले.
"मग हनन्या नावाचा कोणीएक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता आणि तेथे राहणारे सर्व यहुदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत. तो माझ्याकडे आला आणि जवळ उभा राहून मला म्हणाला, 'शीलभाऊ, इकडे पाहा.' तत्क्षणीच मी त्याच्याकडे वर पाहिले. मग तो म्हणाला, 'आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबंधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे आणि त्या नीतिमान पुरुषाला पाहावे व त्याच्या तोंडची वाणी ऐकावी, कारण जे तू पाहिले आहे आणि ऐकले आहे त्याविषयी तू सर्व लोकांपुढे त्याचा साक्षी होशील. तर आता उशीर का करतोस ? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून स्नानसंस्कार घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर' "
हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  १७:१, २
प्रतिसाद :   सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.

१) आलेलुया ! अहो सर्व राष्ट्रांनो, 
परमेश्वराचे स्तवन करा, 
साऱ्या मानवांनो, 
त्याचे गुणगान गा.

२) त्याचे आमच्यावर अलोट प्रेम आहे, 
प्रभूची सत्यता अनंतकाळ टिकते.


जयघोष 
आलेलुया, आलेलुया ! 
प्रभू म्हणतो,
मी तुम्हांला निवडले व तुम्हांला नेमले आहे, ह्यात हेतू हा की, तुम्ही जाऊन फळ द्यावे आणि तुमचे फळ टिकावे.
 आलेलुया!

शुभवर्तमान मार्क   १६ : १५-१८

वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 "सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा."

येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो आणि स्नानसंस्कार घेतो त्याचे तारण होईल, जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असतील ते माझ्या नावाने भुते : काढतील, नव्यानव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील आणि कोणताही प्राणघातक पदार्थ प्याले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही, त्यांनी दुखणाईतांवर हात ठेवले म्हणजे ते बरे होतील.”

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो.   


चिंतन : आज आपण प्रेषित संत पौलाचे परिवर्तन हा सोहळा साजरा करत आहोत. ख्रिस्ती लोकांचा छळ करण्याचा कट त्यांनी रचला होता. ख्रिस्ती लोकांना शासन करण्याचे त्यांनी ठरवले होते. त्याने आपल्या अविचाराने दृष्टकृत्ये अमलात आणण्याचा प्रयत्न केला होता. या कामात तो बराच यशस्वी देखील झाला. परंतु परमेश्वराने योग्य वेळी योग्य कारणासाठी त्याला नवीन दिशा दिली. त्याने जुना मार्ग सोडला. त्याला नवीन दिशा दिली. त्याने जुना मार्ग सोडला. त्याला नवीन दृष्टी लाभली आणि तो खरा सुवार्तेचा साक्षीदार बनला. संत पौल एक छळ करणारा परंतु देवाच्या स्पर्शाने तो छळ सोसणारा झाला. संत पौल जो अहंकारी व शत्रुत्व पाळणारा होता, तो प्रभूच्या वाणीने सौम्य व संपूर्ण जीवन मित्रत्व जोपासणारा झाला. पवित्र आत्म्याच्या स्पर्शाने अनेकांच्या जीवनाचा कायापालट झालेला आहे. ख्रिस्त विरोधक हे ख्रिस्ताबरोबर चालत आहे. ख्रिस्त दुर्भाषिक आता ख्रिस्ताचे सुवार्तिक बनले आहेत. जेव्हा मनुष्याचे परिवर्तन घडते तेव्हा अद्भुत,अलौकिक व अवर्णनीय कार्य घडत असते. तो आपल्या जीवाची तमा न बाळगता, ख्रिस्ताच्या कार्याचा खरा आनंद साजरा करत असतो. ख्रिस्ताच्या कार्यात मी अडथळा आहे की आरंभ आहे ? ख्रिस्ताच्या कार्यात मी विघ्न आहे की नवचिन्ह आहे.

प्रार्थना : प्रभू येशू, तुझी तारणदायी कृपा अनुभवून तुझी सुवार्ता पसरविण्यासाठी आम्हाला प्रेरणा व योग्य ती कृपा दे, आमेन.





सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या