Marathi Bible Reading | Tuesday 24th January 2023| 3rd Week in Ordinary Time

 सामान्यकाळातील तिसरा   सप्ताह

 मंगळवार  दि.२४ जानेवारी  २०२३

(ख्रिस्ती ऐक्य सप्ताह) (१८ ते २५ जानेवारी)

 जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई."

✝️




संत फ्रान्सिस डि सेल्स
• महागुरू, वर्तनसाक्षी, धर्मपंडित (१५६७-१६२२)

जिथे जिथे फ्रान्सिस गेला तिथे तिथे लोकांची कुमसारं ऐकणे, प्रवचन देणे, धार्मिक व्रतस्थ संस्थांच्या कार्यप्रणालीत सुधारणा घडवून आणणे, साध्यासोप्या भाषेत युवक आणि प्रौढ ह्यांना धर्मशिक्षण देणे, धर्मगुरूंसाठी वार्षिक तपसाधना आणि धर्मपरिषदा भरविणे अशा प्रकारचे कार्यक्रम ते राबवित असत. पुढे पुढे ते छोटीछोटी प्रवचने द्यायला लागले. त्यांच्या मते 'तुम्ही जितके अधिक बोलता तितके लोकांना कमी आठवते. त्यामुळे प्रवचन देताना आपण प्रत्यक्ष जीवनात देखील किती प्रेमळ व मायाळू आहोत त्यावर प्रवचनाचा परिणाम अवलंबून असतो. '
हे सर्व करीत असताना संत फ्रान्सिस लिखाणासाठी व पत्रव्यवहारासाठी वेळ काढीत असे. त्याच्या पत्रव्यवहाराचे अनेक खंड उपलब्ध आहेत. तसेच “भक्तीमान जीवनाची (समर्पित जीवनाची) तोंडओळख, देवाचे प्रेम, आध्यात्मिक परिषदा” अशा अनेक ग्रंथांचे लेखनही करण्यास ते सवड काढीत असत.
इ. स. १६०७ साली संत जेन डी चॅटेल (सण १२ डिसेंबर) ह्यांच्यासह त्यांनी सिस्टरांसाठी 'विझीटेशन ऑर्डर' नावाची एक संस्था सुरू केली होती. ह्या संस्थेच्या आध्यात्मिक विकासासाठीदेखील त्यांनी साहित्यनिर्मिती केली. “समर्पित जीवनाची तोंडओळख" हा ग्रंथ त्यांनी खास प्रापंचिकांसाठी लिहिला होता. आजही त्या ग्रंथाचे महत्त्व कमी झालेले नाही.
पावित्र्याशी चुरस करू शकेल असे कोणतेही जीवन श्रेष्ठ आहे, हे मत निश्चितच ख्रिस्ती धर्मतत्वप्रणालीविरुद्ध आहे, असे संत फ्रान्सिस ह्याचे मत होते.
मरणोत्तर इ. स. १६६२ साली त्यांना धन्यवादित ही पदवी देण्यात आली व १६६५ मध्ये अवघ्या तीन वर्षांनी त्यांना संत म्हणून घोषित करण्यात आले. १८७७ साली त्यांना धर्मपंडित हा बहुमानाचा किताब बहाल करण्यात आला. पोप पायस अकरावे ह्यांनी त्यांना लेखकांचा आश्रयदाता म्हणून संबोधिलेले आहे.
चिंतन : प्रेमाविना बोललेल्या शब्दापेक्षा सौजन्यपूर्ण धारण केलेले मौन कितीतरी पटीने श्रेष्ठ असते. - संत फ्रान्सिस डि सेल्स

 
✝️

पहिले वाचन :  इब्री - १०:१-१०

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन १०:१-१०

पुढे होणाऱ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे. वास्तविक स्वरूप नाही; म्हणून ते नियमशास्त्र प्रतिवर्षी नित्य अर्पिल्या जाणाऱ्या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना  पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही. ते समर्थ असते तर एकदा शुद्ध झालेल्या उपासकांना त्यानंतर पापाची भावना नसल्याने ते यज्ञ करणे बंद झाले नसते काय ? बैलाचे आणि बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून त्या यज्ञांमुळे वर्षानुवर्षे पापांची आठवण होत आहे.  

म्हणून ख्रिस्त जगात येतेवेळेस म्हणाला, "यज्ञ आणि अन्नार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हती. तू माझ्यासाठी शरीर तयार केले; होमांनी आणि पापाबद्दलच्या अर्पण आणि तुला संतोष नव्हता." ह्यावरून मी म्हणालो, 'पाहा, हे देवा', ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, 'तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.' 

वर उल्लेखल्याप्रमाणे तो म्हणाला, "यज्ञ, अन्नार्पणे, होम आणि पापाबद्दलची अर्पणे, ह्यांची तुला इच्छा नव्हती आणि त्यात तुला संतोष नव्हता" आणि मग तो म्हणाला, “पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करावयास आलो आहे." ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहे .

हा प्रभूचा शब्द 

सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ४०:२,४,७,८,१०,११

प्रतिसाद : हे माझ्या देवा, पाहा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.

१.  मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. त्याने माझ्या मुखात नवे गीत, आमच्या देवाचे स्तोत्र घातले.

२.  यज्ञपशू आणि अन्नार्पण यात तुला संतोष नाही; तू माझे कान उघडले आहेत. होम आणि पापाबद्दलचे अर्पण ही तू मागत नाहीस. यावरून मी म्हणालो, "पाहा, मी आलो आहे."

३.   महासभेत मी धार्मिकतेचे सुवृत्त सांगितले. हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद केले नाही हे तू जाणतोस. 

४.  मी आपल्या मनात तुझे न्यायीपण लपवून ठेवले नाही, परंतु तुझी दया आणि सत्यता प्रकट केली. महामंडळापासून तुझे वात्सल्य आणि तुझे सत्य मी गुप्त ठेवले नाही.

जयघोष

आलेलूया, आलेलूया !

हे प्रभो, तुझ्या पुत्राची वचने स्वीकारण्यासाठी आमची अंत:करणे उघड.

आलेलूया !


शुभवर्तमान मार्क  ३:३१-३५ 

वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

 येशूची आई आणि त्याचे भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्याला बोलावले. त्याच्याभोवती पुष्कळ लोक बसले होते. ते त्याला म्हणाले, “पाहा, बाहेर आपली आई आणि आपले भाऊ आपले शोध करीत आहेत.' त्याने त्यांना उत्तर दिले "कोण माझी आई आणि माझे भाऊ?" मग जे त्याच्याभोवती बसले होते त्यांच्याकडे पाहून तो म्हणाला, "पाहा, ही माझी आई आणि हे माझे भाऊ ! जो कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि तीच माझी आई."

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो.   


चिंतन : आपल्याला आपले कुटुंब फार प्रिय आहे. आपल्या कुटुंबासाठी आपण काय नाही करत. आपलेसर्वस्व पणाला लावून आपण मुलांना लहानाचे मोठे करतो. त्यांना चांगल्या संस्कारांमध्ये घडवण्याचा प्रयत्न करतो. तरीदेखील आपल्याला कुटुंबांमध्ये असंख्य वाद-विवाद, ताणतणाव, भांडण-तंटे व नातेसंबंधात चढाओढ होत असताना दिसतात. कुटुंब व्यवस्थेमध्ये अनेक समस्या असून एक आव्हान तयार झाले आहे. शिक्षणामुळे कुटुंब व्यवस्था अधिक मजबूत कणखर व तटस्थ होण्याऐवजी खिळखिळी व कमकुवत होत असताना दिसते. कारण आपला जगण्याचा दृष्टीकोन हा खूपच स्वार्थी आहे. जर आपण देवाच्या इच्छा काय आहेत? व त्याप्रमाणे वागलो तर बरेच प्रश्न सुटू शकतात. जीवनात देवाला आपण काय अर्पण करतो त्यापेक्षा आपण कसे अर्पण करतो हे फार महत्वाचे आहे. परमेश्वर आपले जीवन हे वस्तु मध्ये तोलत नाही तर खऱ्या अंतःकरणामध्ये तोलत असतो. मरियेने देवाची इच्छा प्रमाण मानली म्हणून ती देवाची आई झाली. शिष्यांनी येशूचे वचन मान्य केले म्हणून ते प्रेषित झाले. येशूने त्याच्या महान बलिदानामध्ये पित्याची इच्छा प्रमाण मानून आपणा सगळ्यांना आध्यात्मिक वारसा दिला. जेव्हा आपण देवाच्या आज्ञेत नीतीचे जीवन व प्रीतीचे जीवन जगतो तेव्हा आपण येशूच्या कुटुंबाचे सदस्य बनतो. ख्रिस्ताच्या समर्पणात विश्वासाचे नाते मला समजलेले आहे का ?

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझ्याशी एकनिष्ठ राहून आध्यात्मिकतेत वाढण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन.






सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या