सामान्यकाळातील तिसरा सप्ताह
सोमवार दि.२३ जानेवारी २०२३
(ख्रिस्ती ऐक्य सप्ताह) (१८ ते २५ जानेवारी)
पहिले वाचन : इब्री ९:१५,२४-२८
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
"ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची आतुरतेने वाट पाहतात त्यांना तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल."
पाचारण केलेल्यांना अभिवचन दिलेले सार्वकालिक वतन मिळावे म्हणून ख्रिस्त नव्या कराराचा मध्यस्थ झाला आहे, कारण पहिल्या कराराखाली असताना त्यांनी केलेल्या अपराधांपासून क्षमा मिळवून देण्यासाठी ख्रिस्त मरण पावला.
खऱ्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्रस्थान ह्यात ख्रिस्त गेला नाही, तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला आणि जसा प्रमुख याजक प्रतिवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो, तसे त्याला वारंवार स्वतःचे अर्पण करावयाचे नव्हते; तसे असते तर जगाच्या स्थापनेपासून त्याला वारंवार दुःख सोसावे लागले असते. पण आता तो एकदाच युगाच्या समाप्तीस आत्मयज्ञ करून पापे नाहीशी करण्यासाठी प्रकट झाला आहे. ज्याअर्थी माणसांना एकदाच मरणे आणि त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, त्याअर्थी ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल.
हा प्रभूचा शब्द
प्रतिसाद : परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत.
१ परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा,
कारण त्याने अद्भुत कृत्ये केली आहेत.
त्याने आपल्या उजव्या हाताने,
आपल्या पवित्र बाहूने मुक्तिदान आणले आहे.
२ परमेश्वराने आपले तारणकार्य प्रकट केले आहे,
राष्ट्रांसमक्ष आपले न्यायीपण प्रकट केले आहे.
त्याने इस्राएलच्या घराण्यावरील आपली सत्यता
आणि दया ह्यांचे स्मरण ठेवले आहे.
३ पृथ्वीच्या सर्व सीमांनी आमच्या देवाचे
तारणकार्य पाहिले आहे.
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो,
परमेश्वराचा जयजयकार करा;
उच्च स्वराने आपला आनंद जगजाहीर करा.
४ परमेश्वराची स्तोत्रे वीणेवर गा,
संगीत स्वराने गा. कर्णा आणि
शिंग वाजवून परमेश्वर राजा ह्याचा जयघोष करा.
जयघोष
आलेलूया, आलेलूया !
प्रभू म्हणतो, मी तुम्हाला मित्र म्हटले आहे,
कारण जे काही मी आपल्या पित्यापासून
ऐकून घेतले ते सर्व मी तुम्हाला कळवले आहे
शुभवर्तमान मार्क ३:२२-३०
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"हा सैतानाचा शेवट होय. "
येरुशलेमहून आलेले शास्त्री म्हणत होते, "येशूला बालजबूल लागला आहे आणि तो त्या भुतांच्या अधिकाऱ्याच्या साहाय्याने भुते काढतो.” तेव्हा येशू त्यांना आपणाजवळ बोलावून म्हणू लागला, “सैतान सैतानाला कसा काढील ? आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही. आपसांत फूट पडलेले घरही टिकत नाही. सैतान स्वतःवरच उठला आणि त्याच्यात फूट पडली तर तोही टिकणार नाही, त्याचा शेवट होणार. बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही, त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल.
मी तुम्हांला नक्की सांगतो की, मानवपुत्रांना सर्व प्रकारच्या पापांची आणि त्यांनी केलेल्या दुर्भाषणांची क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याची निंदा करील त्याला क्षमा नाहीच, तर तो सार्वकालिक पापाचा दोषी आहे. त्याला अशुद्ध आत्मा लागला आहे," असे ते म्हणत होते म्हणून तो हे बोलला..
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.
✝️

0 टिप्पण्या