Marathi Bible Reading | 3rd Sunday in Ordinary Time | 22th January 2023 | Sunday of the word of God


 सामान्यकाळातील तिसरा 

  रविवार  दि.२२ जानेवारी  २०२३


' “माझ्यामागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.”'

✝️



 प्रभू येशू ख्रिस्तांने प्रेषितांची निवड केली. संत पौल सारख्या महान सुवार्तिकांनी ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली. आज ख्रिस्तसभा पाचारण रविवार साजरा करीत आहे. ख्रिस्तठायी बाप्तिस्मा स्वीकारलेल्या प्रत्येकाला ख्रिस्ताची सुवार्ता  पसरविण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. मी इतरांसाठी प्रकाश बनावे. मी  इतरांना ख्रिस्ताची सुवार्ता सांगावी. मी इतरांना ख्रिस्ताची ओळख करुन द्यावी. म्ह्णून   प्रभूच्या तारणदायी कृपेचे साधन बनू या .


पहिले वाचन यशया  :१-४

वाचक :  यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन

"गालील येथे अंधारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला."

देवाने मागील काळी जबुलून प्रांत आणि नफताली प्रांत यांची अप्रतिष्ठा केली तरी पुढील काळी समुद्रतीरीचा प्रदेश, यार्देनच्या पलीकडील प्रांत, गालील यांची तो प्रतिष्ठा करील.

अंधकारात चालणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला आहे. मृत्यूच्छायेच्या प्रदेशात बसणाऱ्यांवर प्रकाश पडला आहे. तू राष्ट्राची वृद्धी केली आहे. त्याला महानंदप्राप्ती करून दिली आहे. हंगामाच्या उत्सवसमयी करावयाच्या आनंदाप्रमाणे, लूट वाटून घेणाऱ्या लोकांच्या आनंदाप्रमाणे, ते तुझ्यासमोर आनंद करतात. कारण मिद्यानाच्या दिवसाप्रमाणे तू त्याच्या भाराचे जू, त्याच्या खांद्यावरची काठी, त्याच्यावर जुलूम करणाऱ्याचा सोटा मोडला आहे.

हा प्रभूचा शब्द 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र २६:१,४,१३-१४

प्रतिसाद : परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे.


१) परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे, 

मी कोणाची भीती बाळगू ?

परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे, 

मी कोणाचे भय धरू ?


२) परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले,

 त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, 

आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी, 

म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन 

आणि त्याच्या मंदिरात ध्यान करीन.


३ ह्या जीवनातच परमेश्वर खात्रीने माझे कल्याण करील.  

परमेश्वराची प्रतीक्षा कर,खंबीर हो, हिम्मत धर. 

परमेश्वराचीच प्रतीक्षा कर.


४) महामंडळात मी नीतिमत्त्वाचे सुवृत्त सांगितले. 

हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद ठेवले नाही हे तू जाणतोस.


दुसरे वाचन :  १ करिंथ १:१०-१३,१७

वाचक :  पौलचे करिंथकरास पहिले पत्र यातून घेतलेले वाचन 

"तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असो आणि तुमच्यामध्ये फूट न पडो. " 

बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फूट पडू नये; तुम्ही एकचित्ताने आणि एकमताने जोडलेले व्हावे, माझ्या बंधूनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला ख्लोवेच्या माणसांकडून कळले आहे. माझे म्हणणे असे आहे की, तुमच्यापैकी प्रत्येक जण "मी पौलाचा”, “मी अपुल्लोचा”, “मी केफाचा”, आणि “मी ख्रिस्ताचा" आहे असे म्हणतो. ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलला तुम्हासाठी क्रुसावर खिळले होते काय? पौलच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय ? कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करावयास नव्हे तर सुवार्ता सांगावयास पाठवले, पण ख्रिस्ताचा क्रूस व्यर्थ होऊ नये म्हणून मला सुवार्ता वाक्चातुर्याने सांगण्यास पाठवले नाही.

हा प्रभूचा शब्द 

सर्व : देवाला धन्यवाद.

जयघोष

आलेलूया,आलेलूया !

येशूने देवराज्याची सुवार्ता जाहीर केली आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग बरे केले.

आलेलूया !

शुभवर्तमान मत्तय  ४:१२९-२३

वाचक : मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे प्रकट केले होते ते पूर्ण व्हावे म्हणून येशू कर्पणहूमास आला.” 

(योहानला अटक झाली आहे हे ऐकून येशू गालिलात निघून गेला आणि नाझरेथ सोडून जबुलून आणि नफताली ह्यांच्या हद्दीत असलेल्या समुद्रकिनाऱ्यावरील कफर्णहूमास जाऊन राहिला; ते अशासाठी की, यशया संदेष्ट्याच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की:

'जबुलून प्रांत आणि नफताली प्रांत, समुद्रकिनाऱ्यावरचा, यार्देनच्या पलीकडचा, परराष्ट्रीयांचा गालील - अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात आणि छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे.' तेव्हापासून येशू घोषणा करीत सांगू लागला, “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.")

गालील समुद्राजवळून तो चालला असताना त्याने पेत्र म्हटलेला शिमोन आणि त्याचा भाऊ आंद्रेया ह्या दोघा भावांना समुद्रांत जाळे टाकताना पाहिले, कारण ते मासे धरणारे होते. त्याने त्यांना म्हटले, “माझ्यामागे चला म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन.” लागलेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे जब्दीचा मुलगा याकोब आणि त्याचा भाऊ योहान ह्यांना आपला बाप जब्दी ह्याच्याबरोबर तारवात आपली जाळी नीट करताना पाहिले आणि त्याने त्यांना बोलावले. मग लागलेच ते तारू आणि आपला बाप ह्यांना मागे सोडून त्याला अनुसरले. नंतर येशू यहुदी लोकांच्या सभास्थानात शिक्षण देत, देवराज्याची शुभवार्ता चहूकडे सांगत आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग आणि सर्व प्रकारची दुखणी बरी करीत गालीलभर फिरला.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो. 


चिंतन :  सामान्यकाळातील तिसरा रविवार हा देवशब्द रविवार म्हणून साजरा केला जातो. आजची वाचने पाचारण ह्या विषयावर आपल्यासमोर तीन चिंतने सादर करतात : 
१. परिपूर्ण आनंद अनुभवण्याच्या हेतूने परमेश्वराच्या प्रकाशात चालत राहणे : आजचे पहिले वाचन (यशया ९: १-४) इस्राएली लोकांच्या जीवनातील अंधारी बाजू सादर करते. ह्या अंधारात बसलेले लोक लवकरच मोठा प्रकाश पाहणार आहेत असा आशावाद यशया व्यक्त करतो. त्यानंतर मात्र त्यांच्या वाट्याला जो परिपूर्ण आनंद येणार आहे, त्याची तुलना हंगाम, शत्रूंवर विजय, गुलामगिरीतून मुक्तता ह्या सर्व प्रसंगी होणाऱ्या आनंदाशी करण्यात आलेली आहे. असा आनंद खाजगी स्वरूपाचा नसतो. तो इतरांबरोबर राहूनच मिळविता येतो. परमेश्वर मानवाला अशा सामुदायिक आनंदासाठी पाचारण करतो. 
२. सुवार्ता घोषविण्याच्या हेतूने आपापसांत ऐक्य साधणे :आजचे दुसरे वाचन (१ करिंथ १:१०-१३) करिंथ येथल्या ख्रिस्ती लोकांमध्ये पडलेली फूट सादर करते. संत पॉलने त्यांना येशूची सुवार्ता सांगितल्यानंतर तेथे अपुल्लो नावाचा प्रभावी वक्ता अवतरला. त्यानंतर जेरूसलेममधून संत पीटरच्या अधिकाराचा बडेजाव मिरविणारी मंडळी आली. पॉल, पेत्र, अपुल्लो ह्यांना मानणारे तीन गट पडले. चौथ्या गटाने ख्रिस्ताच्या झेंड्याखाली राहणे पसंत केले. ह्या सर्वांना सुवार्ता प्रसाराच्या यशासाठी एकत्र यावे असे आवाहन पॉलने केलेले आहे. 
३. इतरांचे नेतृत्व करण्याच्या हेतूने येशूचे शिष्यत्व पत्करणेः आजच्या शुभवर्तमानाचे (मत्तय ४:१२-१३) दोन भाग पडतात. पहिल्या भागात येशू सर्वांना (यहुदी व बिगरयहुदी) पश्चात्तापाच्या मार्गाने स्वर्गाकडे येण्याचे आवाहन करतो. दुसऱ्या भागात तो चार प्रेषितांना पाचारण करतो. इतरांचे नेतृत्त्व करण्यासाठी (माणसे धरणारे) त्यांना स्वतःचा व्यवसाय (मासे धरणे) सोडून देण्यास सांगण्यात आलेले आहे. 
आत्मपरीक्षण : आत्मकेंद्रितपणाकडून निःस्वार्थी सेवेकडे जाण्यासाठी परमेश्वराची आपल्याला जी हाक आहे तिला प्रतिसाद देण्यासाठी मला माझ्या जीवनात कोणकोणत्या प्रकारचा बदल करावा लागेल ?

प्रार्थना : हे प्रभू, जगाचा प्रकाश व विश्वाचा तारणदाता, तुझी सुवार्ता पसरविण्यास मला प्रेरणा व कृपा दे, आमेन,



सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या