सामान्यकाळातील दुसरा सप्ताह
शनिवार दि.२१ जानेवारी २०२३
(ख्रिस्ती ऐक्य सप्ताह) (१८ ते २५ जानेवारी)
पहिले वाचन : इब्री ९:२-३.११-१४
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
पहिला मंडप तयार केलेला होता त्यात दीपवृक्ष, मेज आणि समर्पित भाकरी होत्या; त्याला पवित्रस्थान म्हटले आहे आणि दुसऱ्या पडद्याच्या पलीकडे परमपवित्रस्थान म्हटलेला मंडप होता. ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टीसंबंधी प्रमुख याजक होऊन आला आणि जो हातांनी केलेला नाही, म्हणजे ह्या सृष्टीतला नाही असा अधिक श्रेष्ठ आणि पूर्ण मंडपातून आणि बकरे आणि वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्रस्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. बकऱ्यांचे आणि बैलांचे रक्त कालवडीची राख ही अशुद्ध झालेल्यांवर शिंपडल्याने जर देहाची शुद्धी होईल इतके पवित्र करतात, तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वत:ला देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सद्सद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषकरून शुद्ध करील?
हा प्रभूचा शब्द
प्रतिसाद : आनंद जयघोष होत असता देव वर गेला आहे.
१) अहो सर्व लोकहो, टाळ्या वाजवा,
उत्साहशब्दांनी देवाचा जयजयकार करा.
कारण परमेश्वर परात्पर आणि भयप्रद आहे,
तो अखिल पृथ्वीचा महान सार्वभौम राजा आहे.
२) आनंद जयघोष होत असता देव वर गेला आहे.
त्याचा आवाज होत असता परमेश्वर वर गेला आहे.
देवाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा,
आमच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गा, स्तुतिस्तोत्रे गा.
३) देव सर्व पृथ्वीचा राजा आहे.
तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुतिस्तोत्रे गा,
देव राष्ट्रांवर राज्य करीत आहे;
देव आपल्या पवित्र राजासनावर बसला आहे.
जयघोष
आलेलूया, आलेलूया !
मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे;
माझ्याद्वारे आल्यावाचून पित्याकडे कोणी येत नाही.
शुभवर्तमान मार्क ३:२०-२१
वाचक : मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू घरी आला. तेव्हा पुन्हा इतके लोक जमले की, त्यांना जेवायलाही सवड होईना. हे पाहून त्याचे आप्त त्याला धरायला निघाले, कारण "त्याला वेड लागले आहे "असे त्याचे म्हणणे होते.
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.
✝️

0 टिप्पण्या