Marathi Bible Reading | Friday 20th January 2023| 2nd Week in Ordinary Time

 सामान्यकाळातील दुसरा  सप्ताह

 शुक्रवार दि.२० जानेवारी  २०२३

(ख्रिस्ती ऐक्य सप्ताह) (१८ ते २५ जानेवारी)

"ज्यांनी आपले साथीदार व्हावे अशी येशूची इच्छा होती त्यांना येशूने आपल्याकडे बोलावले."


✝️



संत  फेबियन
संत सेबेस्टीयन
(रक्तसाक्षी)

"जो आत्मा ख्रिस्ताच्या जवळ जाण्यास धडपडत असतात त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सैतान आपली संपूर्ण शक्ती पणाला लावीत असतो. अशा आत्म्यांना पुन्हा देवाकडे आणण्यासाठी कराव्या लागणाऱ्या परिश्रमाबद्दल आपण मुळीच कुरकूर करू नये. "- संत सेबेस्टीयन

पाचारण ही देवी हाक असते. येशूच्या सहवासात राहून त्याची कृपा व  अनुकंपा अनुभवल्यावरच आरोग्यदानाचा (Healigs) व इतर देणग्यांचा,  आशीर्वाद प्राप्त होत असतो. सखोल ज्ञान व अनुभव प्राप्त झाल्यावरच देवाचा, शब्द घोषित करता येतो. आज प्रभू येशू आपल्या सर्वांना त्याची सुवार्ता घोषित करण्यासाठी पाचारण करीत आहे.


 
✝️

पहिले वाचन : इब्री ८:६-१३

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन  

        तो पहिला करार निर्दोष असता, तर दुसरा शोधण्याचा प्रसंग आला नसता. आता ज्या कराराचा मध्यस्थ येशु आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे. 

लोकांना दोष लावून तो म्हणतो: "परमेश्वर म्हणतो, पाहा, असे दिवस येत आहेत की, त्यात इस्राएलचे घराणे आणि यहुदाचे घराणे ह्यांच्याबरोबर मी नवा करार करीन;

मी त्यांच्या पूर्वजांचा हात धरून त्यांना मिसर देशातून बाहेर आणले, त्या दिवशी मी त्यांच्याशी केलेल्या करारासारखा हा करार असणार नाही; कारण माझ्या कराराप्रमाणे ते वागले नाहीत आणि मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे प्रभू म्हणतो.

परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्राएलच्या घराण्याशी जो करार मी करीन तो हा: "मी आपले नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन आणि मी त्यांना देव असा होईन आणि ते मला माझे लोक असे होतील. तेव्हा 'परमेश्वराला ओळखा,' असे प्रत्येकजण आपल्या सहनागरिकाला आणि प्रत्येकजण आपल्या बंधूला शिकवणार नाही; कारण त्यातील लहानांपासून थोरांपर्यंत, ते सर्व मला ओळखतील.

कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी क्षमाशील होईन आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही. त्याने नवा असे म्हटल्याने पहिल्या कराराला जुना असे ठरवले आहे आणि ते जुने आणि जीर्ण होत आहे, ते नाहीसे होण्याच्या बेतात आले आहे.

हा प्रभूचा शब्द 

सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ८५:८,१०-१४

प्रतिसाद : दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत.

१) हे परमेश्वरा, तुझ्या दयेचा आम्हांला अनुभव येऊ दे 

आणि आम्हाला मुक्तिदान दे 

त्याचे भय धरणाऱ्यांना तारण समीप असते 

आणि आमच्या देशात त्याचे वैभव नांदेल.


२) दया आणि सत्य ही एकत्र झाली आहेत, 

नीती आणि शांती ह्यांनी एकमेकींना आलिंगन दिले आहे. 

पृथ्वीतून सत्य बाहेर पडत आहे, 

स्वर्गातून नीतिमत्त्व अवलोकन करीत आहे.


३) परमेश्वर आमची भरभराट करील 

आणि आमची भूमी आपले फळ देईल. 

त्याच्यापुढे नीतिमत्त्व चालेल 

आणि शांती त्याच्या पावलांचे अनुकरण करील.


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

प्रभू म्हणतो, मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.

आलेलूया !


शुभवर्तमान मार्क ३:१३-१९

वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

येशू डोंगर चढून गेला आणि त्याला जे हवे होते त्यांना त्याने बोलावले आणि ते त्याच्याकडे आले. त्यांनी आपणाबरोबर असावे आणि भुते काढण्याचा अधिकार देऊन, उपदेश करावयास त्यांस पाठवावे, यासाठी त्याने ह्या बारा जणांची नेमणूक केली; शिमोन याला त्याने पेत्र हे उपनाव दिले; जब्दीचा मुलगा याकोब आणि याकोबचा भाऊ योहान ह्यांस बोआनेर्गेस म्हणजे गर्जनेचे पुत्र हेही नाव दिले; आंद्रेया, फिलीप, बार्थोलोम्यू, मत्तय, थोमा, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन कनानी आणि त्याला धरून देणारा यहुदा इस्कार्योत.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो.   


चिंतन : दैवी कार्य घडून आणण्यासाठी, ईश्वरी महती  सर्वत्र पसरविण्यासाठी येशूने मानवी परिवार निर्माण केला. या परिवाराला त्याने प्रेषित असे नाव दिले. येशूचे ते शिष्य असून येशूचे कार्य करण्यासाठी ते पाठवण्यात आले होते. जर परिवाराला दूरदृष्टी नसेल तर तो परिवार  वाढणार नाही किंवा त्याचा विस्तार होणार नाही. जर  परिवाराला योग्य शिक्षण नसेल तर त्या परिवारामध्ये योग्य संस्कार घडणार नाही. तरी देखील त्याला अपवाद असतात.. हे प्रभु येशू आपणासमोर या मानवी  परिवारातून दाखवून देतो. येशूने बारा जणांची नेमणूक करून त्यांना अधिकार दिला. सातत्याने ते येशूच्या प्रेमात, विश्वासात व ज्ञानात वाढावे म्हणून जीवनात परीक्षेचे धडे घेत होते. त्यांची परिपूर्णता पवित्र आत्म्याच्या सानिध्यात लाभली व खऱ्या अर्थाने त्यांना परमेश्वराची ओळख झाली. खऱ्या अर्थाने देवाचे झाले व देवाच्या कार्यासाठी ते संपूर्णपणे रुजू झाले. जूने व जीर्ण संपुष्टात आले व नवे पर्व पवित्र आत्म्यामध्ये संतुष्ट झाले. ख्रिस्ताने समाजातील वेगवेगळ्या स्तरातील व्यक्तींना एकत्र आणून त्याद्वारे महान इतिहास घडवला. समाजातील पक्षपात आणि भेदभाव दूर सारून, खऱ्या मानवी परिवाराचा इतिहास घडवण्यासाठी आपणांस पाचारण आहे. मानवी परिवाराकडे पाहण्याची माझी दूरदृष्टी काय आहे?

प्रार्थना :हे प्रभू येशू, तुझी दैवी हाक ऐकून तुला अनुसरण्यास व तुझी सुवार्ता  पसरविण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.






सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या