Marathi Bible Reading | Thursday 19th January 2023| 2nd Week in Ordinary Time

<


 सामान्यकाळातील दुसरा  सप्ताह

 गुरुवार    दि.१९ जानेवारी  २०२३

(ख्रिस्ती ऐक्य सप्ताह) (१८ ते २५ जानेवारी)

त्याने अनेकांना बरे केले होते, 


✝️



संत केनेथ

(- राजा, रक्तसाक्षी (१०८६) )


राजा केनेथ ह्याने ख्रिस्तसभेसाठी ऐश्वर्यसंपन्न आणि देखण्या अशा कॅथिड्रल वास्तूशिल्पांची उभारणी केली. रॉस्कील्ड येथील कॅथिड्रल हे पूर्णपणे दगडांनीबांधलेले असून आजही डेन्मार्कच्या राजघराण्यातील लोकांची ती दफनभूमी म्हणून वापरली जात आहे.

त्याच्या कारकीर्दीच्या सहाव्या वर्षी डेन्मार्कमध्ये मोठी बंडाळी माजली. बंडखोरांनी राजा केनेथ, त्याचा भाऊ बेनेडिक्ट आणि इतर १७ जणांना संत आल्बनच्या ख्रिस्तमंदिरात पवित्र मिस्सा सुरू असताना घेराव घातला आणि त्यांच्यावर क्रूर हल्ला चढविला व त्यांची अमानुष हत्या केली. महाराजा केनेथला वेदीच्या पायथ्याशी कापून टाकण्यात येत होते. त्यावेळी त्याने आपले हात उंचावले आणि देवाने आपल्या शत्रूंना क्षमा करावी म्हणून तो प्रार्थना पुटपुटू लागला आणि त्यातच त्याचा अंत झाला.

त्याच्या खाचेवर घडलेल्या अनेक चमत्कारांमुळे त्याचे पावित्र्य सिद्ध झाले आणि एक प्रापंचिक, राजकीय व्यक्ती असूनही ख्रिस्ती श्रद्धेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या राजा केनेथ ह्याला देऊळमातेने संतपदाचा नजराणा बहाल केला.


पहिले वाचन  इब्री  :२५-८:१-६

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन

        येशूद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास तो समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सर्वदा जिवंत आहे.

असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते: तो पवित्र, निर्दोष, निर्मळ असून पापी जनांपासून वेगळा आणि आकाशाहून उंच करण्यात आलेला आहे. त्याला त्या प्रमुख याजकाप्रमाणे पहिल्याने स्वत:च्या पापांसाठी, मग लोकांच्या पापांसाठी प्रतिदिवशी यज्ञ करण्याचे अगत्य नाही, कारण त्याने स्वत:ला अर्पिल्याने ते अर्पण एकदाच करून ठेवले आहे. खरोखर नियमशास्त्र दुर्बळ अशा माणसांना प्रमुख याजक नेमते, पण नियमशास्त्रानंतरचे शपथ वाहून उच्चारलेले वचन युगानुयुग परिपूर्ण केलेल्या पुत्राला नेमते.

    सांगण्याचा मुख्य मुद्दा हा आहे की, स्वर्गामध्ये राजवैभवाच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसलेला असा प्रमुख याजक आपल्याला आहे. तो पवित्रस्थानाचा म्हणजे माणसाने नव्हे तर प्रभुने घातलेल्या खऱ्या मंडपाचा सेवक आहे. प्रत्येक प्रमुख याजक दाने आणि यज्ञ अपवयास नेमलेला असतो. म्हणून ह्याच्याजवळही अर्पिण्यास काहीतरी असणे अगत्याचे आहे. तो पृथ्वीवर असता तर तो याजकच नसता, कारण नियमशास्त्राप्रमाणे दाने अर्पण करणारे याजक आहेत. "पर्वतावर तुला दाखविलेल्या नमुन्याप्रमाणे सर्व वस्तू बनविण्याची सावधगिरी  ठेव," मोशे मंडप करणार होता तेव्हा त्याला जशी ही आज्ञा मिळाली, तसे तेही जे स्वर्गीय वस्तूचे प्रतिरूप आणि छाया आहे त्याची सेवा करतात. तर आता ज्या कराराचा मध्यस्थ येशू आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा येशूला मिळाली आहे.

हा प्रभूचा शब्द 

सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र स्तोत्र ४०:७-१०,१७

प्रतिसाद : पाहा, परमेश्वरा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे.

१)  यज्ञपशू आणि अन्नार्पण ह्यांत तुला संतोष नाही, 

पण ऐकायला तू माझे कान उघडले आहेत. 

होम आणि पापांबद्दल अर्पण ही तू मागत नाहीस. 

यावरून मी म्हणालो की, पाहा, मी आलो आहे!


२) प्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की, 

तुझ्या इच्छेप्रमाणे मी वागावे.हे माझ्या देवा, 

तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे. 

तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. 


३) महासभेत मी धार्मिकतेचे सुवृत्त सांगितले. 

हे परमेश्वरा, मी आपले तोंड बंद केले नाही, हे तू जाणतोस.


४) तुला शरण येणारे सर्व तुझ्या ठायी 

आनंद आणि उल्हास पावोत. 

तुझे मुक्तिदान प्रिय मानणारे, 

"प्रभू थोर आहे," असे सदैव म्हणोत.


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

जे वचन ऐकून सालस आणि चांगल्या अंत:करणात 

धरून ठेवतात आणि धीराने फळ देत जातात, ते धन्य होत.

आलेलूया !


शुभवर्तमान मार्क :७-१२

वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन

      येशू आपल्या शिष्यांना घेऊन समुद्राकडे निघून गेला आणि गालिलातून मोठा समुदाय त्याच्या मागोमाग निघाला. जी कामे तो करत होता त्याविषयी ऐकून यहुदिया, येरुशलेम, इदोम, आणि यार्देनच्या पलीकडचा प्रांत आणि सोर आणि सिदोन ह्यांच्या आसपासचा प्रदेश ह्यातून मोठा समुदाय, त्याच्याकडे आला. त्याने अनेकांना बरे केले होते, म्हणून जे रोगाने पीडलेले होते ते सर्व त्याला स्पर्श करावयास त्याच्या अंगावर पडत होते. तेव्हा दाटीमुळे आपण चेंगरुन जाऊ नये म्हणून त्याने शिष्यांना एक होडी तयार ठेवण्यास सांगितले; जेव्हा जेव्हा अशुद्ध आत्मे त्याला पाहात तेव्हा तेव्हा ते  त्याच्या पाया पडून म्हणत, "तू देवाचा पुत्र आहेस." तेव्हा तो त्यांना सारखे निक्षून सांगत असे की, "मला प्रकट करू नका."

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो.   


चिंतन : ख्रिस्ताचा करार हा वैश्विक करार आहे. हा करार केवळ एका धर्माशी एका प्रांताचे किंवा निवडलेल्या लोकांपुर्ता मर्यादित नाही. ख्रिस्ताचा हा करार एक महान बलिदान असून मानवी जीवनाला अधिक प्रबळ आणि प्रगल्भ बनवतो. ख्रिस्ताचा करार मानवाला जोडणारा आहे, तोडणारा नाही. ख्रिस्ताचा करार हा पापी जीवनाला तिलांजली देणारा व पवित्र जीवनासाठी स्वर्गीय उगम आहे. ख्रिस्ताच्या करारामध्ये जेव्हा आपण करारबद्ध होतो त्याच्या कार्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे आपण भागीदार बनतो. ख्रिस्ताचा स्वीकार करण्यासाठी आज चारही दिशांतून लोकसमुदाय धावत आहे. कारण देवाने तो उंच केलेला मानवाचा तारणकर्ता आहे. त्याच्या करारामध्ये अशुद्ध ही शुद्ध होतात. रोगी निरोगी होतात. भरकटलेले वाटसरू मार्गावर येतात. पापात कितपत पडलेले जागृत होतात. तुटलेले, भग्न हृदये, हरलेले व हरवलेले त्याच्या करारामध्ये पुनरुज्जीवीत होतात. ख्रिस्ताच्या महान कराराचा अनुभव मी कसा घेतो? महान कराराची ओळख मला होते का ?

प्रार्थना :हे प्रभू येशू, आमच्या संपूर्ण जीवनाचा ताबा घे आणि आम्हास सर्व  प्रकारच्या आजारांपासून मुक्त कर, आमेन.






सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या