Marathi Bible Reading | Wednesday 18th January 2023| 2nd Week in Ordinary Time


 सामान्यकाळातील दुसरा  सप्ताह

 बुधवार   दि.१८ जानेवारी  २०२३

(ख्रिस्ती ऐक्य सप्ताह) (१८ ते २५ जानेवारी)

"त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. "


✝️



संत एमिली डी वियालार

कुमारिका (१७९७-१८५६)


एकोपाः

आजपासून आपण ख्रिस्ती ऐक्य सप्ताह सुरू करत आहोत. परमेश्वर हा पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांचा समूह आहे व तो संघटित आहे. त्याने निर्माण केलेली रचना, सृष्टीचा केलेला उद्धार व समाज परिवर्तनासाठी दिलेला आशीर्वाद हा एकसूत्रीपणा जाहीर करतो. एकात्मता वाढावी म्हणून प्रभू येशूने आपल्या शिष्यांसाठी प्रार्थना केली. 


पहिले वाचन   इब्री ७:१-३,१५-१७

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन 

      मलकीसदेक, शालेमचा राजा आणि परात्पर देवाचा याजक होता. आब्राहाम जेव्हा राजास ठार मारून परत आला तेव्हा ह्याने त्याला सामोरे जाऊन आशीर्वाद दिला आणि आब्राहामने त्याला सर्व लुटीचा दशांश दिला. तो आपल्या नावाच्या अर्थाप्रमाणे एक तर नीतिमत्त्वाचा राजा आणि दुसरे शालेमचा राजा म्हणजे शांतीचा राजा होता. त्याची मातापितरे, वंशावळ, जन्मदिवस अथवा त्याच्या आयुष्याचा शेवट (ह्यांचा उल्लेख कोठेही सापडत) नाही. तरी त्याला देवाच्या पुत्रासारखे करण्यात आल्यामुळे तो नित्य याजक राहतो आणि दैहिक आज्ञेच्या नियमाने नव्हे तर अक्षय जीवनाच्या सामर्थ्यने झालेला असा मलकीसदेकसारखा निराळा याजक जर उद्भवला आहे, तर ह्यावरून आम्ही सांगितलेले ते अधिकच स्पष्ट होते. कारण त्याच्याविषयी अशी साक्ष आहे, "तू मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुग याजक आहेस."

हा प्रभूचा शब्द 

सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र ११०:१-४

प्रतिसाद :मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे तू युगानुयुग याजक आहेस.

१) माझ्या प्रभूला परमेश्वर म्हणतो : 

"मी तुझे वैरी तुझे पदासन करीपर्यंत 

तू माझ्या उजवीकडे बैस."


२) परमेश्वर तुझा राजदंड सियोनातून पुढे नेईल; 

तो म्हणतो, तू आपल्या शत्रूंवर प्रभुत्व कर.


३) तुझ्या पराक्रमाच्या दिवशी तुझे लोक 

संतोषाने पुढे होतात, पावित्र्याने मंडित झालेले 

तुझे तरुण तुला पहाटेच्या दंहिवरासारखे आहेत.


४) परमेश्वराने शपथ वाहिली आहे 

आणि ती तो बदलणार नाही. 

"मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे 

तू युगानुयुग याजक आहेस."


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, 

तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या 

प्रत्येक वचनाने जगेल..

आलेलूया !


शुभवर्तमान मार्क :१-६

वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

          येशु सभास्थानात गेला. तेथे वाळलेल्या हाताचा एक माणूस होता आणि त्याच्यावर दोष ठेवावा म्हणून शब्बाथ दिवशी तो त्याला बरे करतो की काय हे पाहावयास ते टपून बसले होते. तेव्हा त्याने हात वाळलेल्या माणसाला म्हटले, "असा पुढे ये.' मग तो त्यांना म्हणाला, "शब्बाथ दिवशी बरे करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीव घेणे, ह्यातून कोणते सशास्त्र आहे?" पण ते उगेच राहिले. मग त्याने त्यांच्या अंत:करणाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले आणि त्या माणसाला म्हटले, "हात लांब कर." त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला. मग परुशी बाहेर जाऊन येशूचा घात कसा करावा ह्याविषयी लागलीच हेरोदियांबरोबर त्याच्याविरुद्ध मसलत करीत बसले.

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो.   




चिंतन : वाळलेल्या हाताच्या माणसाला येशूने बरे करून देव व मनुष्य यातील नवे नाते स्थापित केले. त्या व्यक्तीला पुढे करून येशूने त्याला जवळ केले. चांगले करण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी, मानवी असहिष्णुता दूर करण्यासाठी व धर्माचा खरा चेहरा उघडा करण्यासाठी येशूने धार्मिक नेत्यांना आव्हान केले. जेव्हा वैचारिक पातळी मध्ये फुट निर्माण होते तेव्हा मनुष्य हा वेगवेगळ्या पातळीवर त्याचे निर्बंध लावत असतो. त्यामुळे वैयक्तिक व सामाजिक नुकसान करून बसतो. म्हणून देवाच्या बुद्धीने चाललेला मनुष्य हा विखुरलेला नाही तर एकजूट झालेला आपणास दिसला पाहिजे. धार्मिक वादामुळे मी फूट निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे का ? माझ्या इतर धर्मिय बंधू-भगिनींना मी कोणत्या नजरेतून पाहतो ?

प्रार्थना :हे दयावंत प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या दयेवर विसंबून राहण्यास व तुला अनुसरण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.





सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या