Marathi Bible Reading | Tuesday 17th January 2023| 2nd Week in Ordinary Time


 सामान्यकाळातील दुसरा  सप्ताह

 मंगळवार   दि.१७ जानेवारी  २०२३

"शब्बाथ मनुष्यासाठी केलेला आहे, मनुष्य शब्बाथसाठी केलेला नाही. म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथचाही प्रभू आहे."


✝️

संत अँथनी महान
- मठाधिकारी, वर्तनसाक्षी (२५१-३५६)

मठाधिकारी अँथनी १०५ वर्षांच्या प्रदीर्घ जीवनमानानंतर ख्रिस्तवासी झाले. त्यांना हॉस्पिटलमधील कर्मचारी, खाच खणणारे, खाटिक, ब्रश आणि टोपल्या तयार करणारे, ह्यांचा आश्रयदाता संत म्हणून गौरविण्यात आले आहे. अपस्मार, फिट्स येणे, मरी, त्वचा रोग इ. आजारांतून मुक्ती मिळावी म्हणून संत अँथनी ह्यांची मध्यस्थी केली जाते.

चिंतन : हजारो फुलांमधून मकरंद गोळा करणाऱ्या मधमाशीप्रमाणे ख्रिस्ती व्यक्तीने आपल्या मित्रांकडून चांगले तेच घ्यावे. कोणाकडून सौजन्य, कोणाकडून साधेपणा आणि मौन, तर कोणाकडून सहनशीलता शिकून घ्यावी. - संत अँथनी महान.




पहिले वाचन   इब्री ६:१०-२०

वाचक :  इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन 

    तुमचे कार्य आणि तुम्ही पवित्र जनांची केलेली आणि करीत असलेली सेवा आणि तुम्ही देवावर दाखवलेली प्रीती, ही विसरून जाण्यास देव अन्यायी नाही. तुम्हांपैकी प्रत्येकाने आशेविषयीची पूर्ण खात्री करून घेण्याच्या हेतूने तशीच आस्था शेवटपर्यंत व्यक्त करावी; म्हणजे तुम्ही आळशी होऊ नये, तर विश्वासाच्या आणि धीराच्या योगे जे अभिवचनांचा वारसा उपभोगणारे होतात त्यांचे तुम्ही अनुकारी व्हावे अशी आमची इच्छा आहे.

देवाने आब्राहामला वचन दिले तेव्हा त्याला शपथ वाहण्यास स्वत:पेक्षा कोणी मोठा नसल्यामुळे त्याने आपलीच शपथ वाहून म्हटले, "मी तुला आशीर्वाद देईनच देईन आणि तुला बहुगुणित करीनच करीन. " त्याने धीर धरला म्हणून त्याला अभिवचनानुसार लाभ झाला. माणसे आपणापेक्षा मोठ्याची शपथ वाहतात आणि आपल्या म्हणण्याचे समर्थन करण्यासाठी त्यांच्यामध्ये शपथ सर्व वादाचा शेवट आहे. म्हणून आपल्या संकल्पाची अचलता अभिवचनाच्या वतनदारांना विशेष दाखवावी ह्या इच्छेने देव शपथेच्याद्वारे मध्ये पडला. जे आपण स्वत:पुढे ठेवण्यात आलेली आशा हस्तगत करण्याकरिता आश्रयाला धावलो, त्या आपणाला ज्याविषयी खोटे बोलणे देवाला अशक्य आहे अशा दोन अचल गोष्टींच्याद्वारे चांगले उत्तेजन मिळावे. ती आशा आपल्याला जिवाचा नांगर असून स्थिर आणि अढळ पडद्याच्या आतल्या भागी पोहचणारी आहे. तेथे मलकीसदेकच्या संप्रदायाप्रमाणे युगानुयुगीचा प्रमुख याजक झालेला येशू अग्रगामी असा आपल्याकरिता आधीच गेला आहे.

हा प्रभूचा शब्द 

सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र १११:१-२,४-५,९-१०क

प्रतिसाद :परमेश्वर आपला करार सदा स्मरतो.

१ परमेश्वराचे स्तवन करा! सरळ जनांच्या सभेत आणि मंडळीत मी अगदी मनापासून परमेश्वराचे उपकारस्मरण करीन. परमेश्वराची कृत्ये थोर आहेत, ज्यांना ती आवडतात ते सर्व त्यांचा शोध करतात.

२ आपल्या अद्भुतकृत्यांचे स्मरण राहावे असे त्याने केले आहे. परमेश्वर दयाळू आणि कनवाळू आहे. त्याने आपले भय धरणाऱ्यांना अन्न दिले आहे; तो आपला करार सदा स्मरतो.

३ त्याने आपल्या लोकांना मुक्तिदान पाठवून दिले आहे, त्याने आपला करार सर्वकाळासाठी स्थापित केला आहे. त्याचे नाव पवित्र आणि भययोग्य आहे. त्याचे स्तवन सर्वकाळ चालते!


जयघोष

आलेलूया, आलेलूया !

प्रभू आपल्या वचनाला जागतो, त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते.

आलेलूया !

शुभवर्तमान मार्क २:२३-२८

वाचक :  मार्कलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

       येशू एके शब्बाथ दिवशी शेतांमधून जात असताना त्याचे शिष्य वाटेने कणसे मोडू लागले. तेव्हा परुशी त्याला म्हणाले, “पाहा, शब्बाथ दिवशी करू नये ते हे का करतात?" तो त्यांना म्हणाला, “दावीदला गरज पडली, म्हणजे त्याला आणि त्याच्याबरोबर असलेल्यांना भूक लागली तेव्हा त्याने काय केले? अब्याथार प्रमुख याजक असता तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि याजकांशिवाय कोणीही खाऊ नयेत त्या समर्पित भाकऱ्या त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्याबरोबर असलेल्यांनाही कशा खावयास दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय ?" आणखी तो त्यांना म्हणाला, "शब्बाथ मनुष्यासाठी केलेला आहे, मनुष्य शब्बाथसाठी केलेला नाही. म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाथचाही प्रभू आहे."

वाचक : प्रभूचे हे शुभवर्तमान . 

सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता,  तुझी स्तुती असो.   



चिंतन : आजच्या शुभवर्तमानात आपल्याला विसर पडलेल्या मुलभूत सत्याची जाणीव करुन देण्यात आली आहे आणि त्याचा सामना करण्यास आव्हान करण्यात येत आहे. धर्म म्हणजे फक्त नियम आणि कायदे नाहीत. रविवार पवित्र पाळ हा धार्मिक नियम आहे, पण त्या नियमांचे पालन करणे हे परिस्थितीवर सारे आहे. मानवाची अत्यावश्यक योग्य गरज ही नियमाच्या पलीकडे आणि आवश्यक असते हे प्रभू येशू शिकवितो. ज्या वेळेला मनुष्य प्रेम आणि क्षमा, सेवा आणि दया ह्या धर्माच्या मुख्य तत्वांच्या पेक्षा नियम आणि कायदा ह्याला अधिक महत्त्व देतो तेव्हा धर्माची अधोगती होते. विधीपेक्षा माणूस अधिक महत्वाचा आहे. इतर लोकांना मदत करणे ही देवाची खरी आराधना करण्याचा एक मार्ग आहे. 'जे तुम्ही गरिबांसाठी कराल ते तुम्ही माझ्यासाठी कराल.' (मत्तय २५:४०)

प्रार्थना : निर्माणकर्त्या प्रभू परमेश्वरा, तुझा पवित्र दिवस खऱ्या अर्थाने पवित्रतेने व परोपकाराने पाळण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.





सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 

आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️ 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या