पुनरुत्थान पहिला सप्ताह
मंगळवार ११ एप्रिल २०२३
तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो."
संत स्टॅनिस्लॉस
महागुरु, रक्तसाक्षी (१०३०-१००५)
✝️
एक आदर्श महागुरू या नात्याने त्यांनी सत्य आणि न्याय्य हक्काविषयी जाहिरपणे ख्रिस्तसभेची भूमिका मांडली. त्यावेळी पोलंडचा राजा बोलेस्लॉस दुसरा आपल्या स्वैराचारी जीवनाद्वारे आणि आपल्या नोकरचाकरांना तुच्छतेने वागवून एक वाईट उदाहरण घालून देत होता. त्याचे परिवर्तन व्हावे म्हणून बिशप स्टॅनिस्लॉस ह्यांनी उपवास, प्रार्थना आणि अश्रुपूर्ण नयनांनी व गुडघे टेकून देवाकडे. आणि राजाकडे विनंती केली. परंतु राजाच्या दगडी हृदयाला अजिबात पाझर फुटला नाही. त्यामुळे बिशपांनी त्याला धर्मबहिष्कृत केले व कॅथिड्रलमधील सार्वजनिक उपासनाविधी राजालाही निर्भिडपणे बंद करून टाकल्या व शेवटी आपण स्वतः क्रॅकोव्हच्या एका छोट्याशा उपनगरातील लहानशा प्रार्थनागृहात जाऊन राहिले.
बिशपांचे हे धैर्य पाहून राजा खवळला. त्याने आपले हस्तक पाठवून बिशपांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्ष हे दूत बिशपांच्या समोर येऊन ठेपले तेव्हा या साधुपुरूषाला हात घालण्याचा त्यांना धीर होईना. शेवटी एके दिवशी बिशप महोदय मिस्साबली अर्पण करत असताना चवताळलेला राजा त्या प्रार्थना मंदिरात घुसला आणि आपल्या हाती असलेल्या धारदार तरवारीने त्याने त्यांच्यावर सपासप वार केले व शेवटी त्यांचा शिरच्छेद केला. परिणामत: पोप ग्रेगरी सातवें ह्यांनी संपूर्ण पोलंड देशाला धारेवर धरले व त्यांना कुठलीही आध्यात्मिक सेवा मिळण्यापासून परावृत्त केले.
ह्याचा परिणाम जनमाणसावर व्हायचा तोच झाला. लोकांनी बंड केले व राजा बोलेस्लॉस दुसरा ह्याला सन १०८१ साली गादीवरून पदच्यूत करून हद्दपार केले. दोनच वर्षांनी तो हंगेरी येथे मरण पावला.
पुढे पोप इनोसेंट चौथे ह्यांनी १२५३ साली बिशप स्टॅनिस्लॉस ह्यांना संतपद देऊन त्यांचा गौरव केला.
✝️
आपण सर्वजण प्रभू येशूच्या पुनरुत्थानात देखिल सहभागी झालो आहोत. पेत्राप्रमाणे आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. आपणसुद्धा ख्रिस्ताची साक्ष जगाला द्यायची आहे. त्यासाठी पवित्र आत्म्याची आराधना करुन त्याच्याद्वारे आपल्याला कोणते दान मिळाले आहे त्याची जाणीव करुन घ्यायला हवी. आपण पवित्र आत्म्याठायी नवजीवन मिळणाऱ्या प्रार्थना संघात जाऊन त्याचा अनुभव घेतल्याशिवाय पवित्र आत्म्याची दाने, सामर्थ्य व कार्ये कळणार नाहीत.
शुभवर्तमानात आपण पाहतो की मरिया माग्दालियाने ख्रिस्त पुनरुत्थित झाल्याची सुवार्ता शिष्यांपर्यंत पोहोचविली. पेत्राने आणि शिष्यांनी ती घोषविली आणि जीवनभर ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची आणि तारणाची साक्ष दिली. आज आपल्या सर्वांसमोर ते आव्हान आहे.
✝️
पहिले वाचन प्रेषितांची कृत्ये २:३६-४०
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या."
पेत्र यहुद्यांना म्हणाला, "ह्यास्तव इस्राएलच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही क्रुसावर खिळून मारले त्याला देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे."
हे ऐकून त्यांच्या अंतःकरणास चुटपुट लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित ह्यांना म्हणाले, "बंधुजनहो, आम्ही काय करावे?" पेत्र त्यांना म्हणाला, "पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हांला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल. कारण हे वचन तुम्हांला, तुमच्या मुलांबाळांना व जे दूर आहेत त्या सर्वांना दिले आहे." आणखी त्याने दुसन्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यांना साक्ष दिली आणि बोध करून म्हटले, "ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या." तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे तीन हजार माणसांची भर पडली
हा प्रभूचा शब्द आहे
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ३३:४-५,१८-२०,२२
प्रतिसाद : प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते.
१) प्रभूचा शब्द सत्य आहे त्याचे सारे कार्य टिकाऊ असते.
त्याला सात्त्विकता व न्याय प्रिय आहेत.
प्रभूचे वात्सल्य पृथ्वी व्यापून टाकते.
२) प्रभूचे भय बाळगणारे, त्याच्या प्रेमाचे भुकेले
अशांवर प्रभूची कृपादृष्टी असते.
मृत्यूच्या दाढेतून तो त्यांचे प्राण वाचवतो.
दुष्काळात त्यांना जिवंत ठेवतो.
३)आमच्या जिवाला प्रभूचा ध्यास लागला आहे.
तोच आमचा सहाय्यकर्ता, आमची संरक्षक ढाल आहे.
तुझ्या प्रेमाची पाखर आमच्यावर असू दे,
हे प्रभो, कारण आम्ही तुझ्याच आशेवर आहोत.
जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभूचा हा दिवस आहे ह्या दिवशी आपण उल्हास व आंनद करुया.
आलेलुया !
शुभवर्तमान योहान २०:११-१८
वाचक :योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
“मी प्रभूला पाहिले आहे व त्याने मला ह्या गोष्टी सांगितल्या आहेत."
मरिया बाहेर कबरीजवळ रडत उभी राहिली होती रडता रडता तिने ओणवून कबरीत पाहिले आणि जेथे येशूचे शरीर ठेवले होते तेथे शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत, एक उशाजवळ व एक पायथ्याजवळ, बसलेले तिला दिसले. ते तिला म्हणाले, बाई, का रडतेस? ती त्यांना म्हणाली, "त्यांनी माझ्या प्रभूला नेले व कोठे ठेवले हे मला ठाऊक नाही म्हणून." असे म्हणून ती पाठमोरी फिरली, तो तिला येशू उभा असलेला दिसला परंतु तो येशू आहे हे तिने ओळखले नाही. येशूने तिला म्हटले, “बाई का रडतेस ? कोणाचा शोध करतेस?" तो माळी आहे असे समजून ती त्याला म्हणाली, “दादा, तू त्याला येथून नेले असले तर त्याला कोठे ठेवलेस हे मला सांग म्हणजे मी त्याला घेऊन जाईन." येशूने तिला म्हटले, “मरिये,” ती वळून त्याला इब्री भाषेत म्हणाली, “रब्बूनी!" (म्हणजे गुरुजी). येशूने तिला म्हटले, "मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही, तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की, जो माझा पिता व तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो." मरिया मग्दालिया गेली आणि “आपण प्रभूला पाहिल्याचे व त्याने आपल्याला ह्या गोष्टी सांगितल्याचे तिने शिष्यांना कळवले."
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन:“तू कोणाचा शोध घेत आहेस". शब्द आहेत प्रभू येशू ख्रिस्ताचे. आजच्या शुभवर्तमानात आपण पाहात आहोत, पुनरुत्थित ख्रिस्त मारिया माग्दालेनला प्रश्न करीत आहे. तू कोणाचा शोध घेत आहेस ? हाच प्रश्न ख्रिस्त आज प्रत्येकाला विचारत आहे. जीवनात आपण कोणकोणत्या गोष्टीची आस धरत आहोत. धनदौलत, संपत्ती, पैसा, डिग्री, नातेसंबंध ह्यामध्ये आपण अडकून पडलेलो आहोत. जागतिक ऐहिक गोष्टींचा शोध घेणे हेच आपल्याला अधिक प्राधान्यमय वाटत आहे. अगदी बालपणापासून आपल्या कुटुंबात आपण मुलांना A, B, C, D शिकविण्यासाठी किंवा लिहिता वाचता येण्यासाठी आपण आयुष्याचा कितीवेळ देत असतो. परंतु ख्रिस्तांविषयी व त्याच्या मूल्यांविषयी जोपासना करण्यासाठी आपण किती वेळ देत आहोत. आज ख्रिस्त आपल्याला विचारत आहे. जीवनात आपण कशाचा शोध घ्यावा. ऐहिक गोष्टीपासून दूर राहून ख्रिस्ताचा शोध घेऊन आपले जीवन ख्रिस्ताला सर्वस्वी अर्पण करण्यासाठी परमपित्याची कृपा मागू या.
प्रार्थना :हे पवित्र आत्म्या, ये आणि आमचे नुतनीकरण कर. आम्हाला तुझ्या सामर्थ्याने भरुन टाक, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या