Marathi Bible Reading | 1St Week of Easter Monday 10th April 2023

 पुनरुत्थान पहिला सप्ताह 

सोमवार १० एप्रिल २०२३ 

"भिऊ नका, जा, माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन."


संत फूल्बर्ट

महागुरू वर्तनसाक्षी (९५७-१०२९)
✝️

आपण सर्वजण ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षीदार बनलो आहोत. 
स्नानसंस्काराद्वारे पुनरुत्थित ख्रिस्ताची कृपा आपल्याला मिळाली आहे. त्याच्यासुवार्तेचे साक्षीदार बनण्यास ख्रिस्तसभा आज आपल्याला पाचारण करीत आहे. प्रभू येशूने आपल्या प्रत्येकाला आवाहन केले आहे की, "सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा” (मार्क १६ : १५). आपल्या प्रत्येकामध्ये पुनरुत्थित ख्रिस्ताचे चैतन्य संचारावे, आपल्या शब्दाद्वारे व कृतीद्वारे ख्रिस्त आपल्या जीवनातून प्रतिबिंबीत व्हावा म्हणून आपण प्रयत्नशील बनू या
✝️

पहिले वाचन  प्रेषितांची कृत्ये २:१४,२२-३२
वाचक : प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन
“ह्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहो."

पेत्र अकरा प्रेषितांबरोबर उभा राहून त्यांना मोठ्याने म्हणाला, "अहो इस्राएल लोकांनो, ह्या गोष्टी ऐका. नाझरेथकर येशूच्याद्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भुते आणि चिन्हे तुम्हांला दाखवली त्यांची तुम्हाला माहिती आहे, त्यावरून देवाने तुम्हांकरिता पाठवलेला असा तो मनुष्य होता. तो येशू  देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्याच्या हातांनी क्रुसावर खिळून मारले. त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते. दावीद त्याच्याविषयी असे म्हणतो, "मी परमेश्वराला आपणांपुढे नित्य पाहिले आहे, मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे, ह्यास्तव माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्हासित झाली, आणखी माझा देहही आशेवर राहील. कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाहीस. जीवनाचे मार्ग तू मला कळवले आहेत. 'तू तू आपल्या समक्षतेने मला हर्षभरित करशील."
बंधुजनहो, कुलाधिपती दावीद ह्याच्याविषयी मी तुम्हांबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मरण पावला, पुरला गेला आणि त्याची कबर आजपर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की, देव शपथ वाहून त्याला म्हणाला होता की, तुझ्या संतानातील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन. ह्यांचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाविषयी असे बोलला की, "त्याला अधोलोकांत सोडून दिले नाही व त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. ह्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहो."
प्रभूचा शब्द आहे 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १६:१-२,५,७-११
प्रतिसाद :   देवा, मला सांभाळ, मी तुझ्या आश्रयाला आलो आहे.

१ देवा मला सांभाळ,
मी तुझ्या आश्रयाला आलो आहे.
मी प्रभूला म्हणालो, तूच माझा स्वामी आहेस.
 माझा बहुमान तूच आहेस.
हे प्रभो, तू माझ्या वतनाचा व पेल्याचा वाटा आहेस.

२ परमेश्वराने मला बोध केला आहे,
 त्याला मी धन्यवाद देतो, 
माझे अंतर्यामही मला रात्री मार्गदर्शन करते.
 मी आपल्यापुढे परमेश्वराला नित्य ठेवले आहे,
 तो माझ्या उजवीकडे आहे, म्हणून मी ढळणार नाही.

३ आणि म्हणून माझे हृदय आनंदित होते, 
माझा आत्मा उल्हासतो,
 माझा देहही सुरक्षित राहतो.
 कारण तू माझा आत्मा अधोलोकांत राहू देणार नाहीस, 
तू आपल्या भक्ताला नाशाचा अनुभव  येऊ देणार नाहीस.

४ जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, 
तुझ्या सान्निध्यात पूर्णानंद आहे, 
तुझ्या उजव्या हातात सर्व सुखाचा खजिना आहे.

जयघोष
आलेलुया, आलेलुया !
प्रभूचा हा दिवस आहे,
ह्या दिवशी आपण उल्हास व आनंद करुया.
आलेलुया !


शुभवर्तमान मत्तय २८:८-१
वाचक :मत्तयलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"जा व माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन."

त्या स्त्रिया भीतीने व हर्षातिशयाने कबरीपासून लवकर निघून त्याच्या शिष्यांना हे वर्तमान सांगायला धावत गेल्या. मग पाहा, येशू त्यांना भेटून म्हणाला, "कल्याण असो!" त्यांनी जवळ जाऊन त्याचे चरण धरून त्याला नमन केले. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, "भिऊ नका, जा, माझ्या भावांना सांगा की, त्यांनी गालिलात जावे, तेथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन."
त्या जात असता, पाहा, पहारेकऱ्यातील कित्येकांनी नगरात जाऊन झालेले सर्व वर्तमान मुख्य याजकांना सांगितले. तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केली आणि शिपायांना पुष्कळ पैसे देऊन सांगितले की, "आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले, असे म्हणा आणि ही गोष्ट सुभेदाराच्या कानावर गेली तर आम्ही त्याची समजूत घालून तुम्हांला निर्धास्त करु" मग त्यांनी पैसे घेऊन शिकवल्याप्रमाणे केले आणि ही जी गोष्ट यहुदी लोकांमध्ये पसरविण्यात आली, ती आजपर्यंत चालू आहे.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो. 

चिंतन:ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे पहिले साक्षीदार कोण? हा प्रश्न जर मी तुम्हाला केला तर तुम्ही म्हणाल, संत मेरी माग्दालेना. परंतु ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे पहिले साक्षीदार पहारेकरी, जे ख्रिस्ताच्या थडग्याला पहारा देत होते. परंतु हा मान ते गमावून बसले. कारण थोड्याशा पैशासाठी ख्रिस्ताचे शरीर शिष्यांनी चोरून नेले असे खोटे बोलले. पहारेकऱ्याप्रमाणे आपणही ख्रिस्ताच्या शिकवणुकी विरुद्ध जातो. खोटे बोलणे, चोरी करणे, दुसऱ्यांना दोष देणे, म्हणजेच त्या पहारेकऱ्यांप्रमाणे बनने होय. जेव्हा आपण ख्रिस्ताच्या शिकवणुकीप्रमाणे वागणार तेव्हाच मरीया माग्दालेन प्रमाणे आपण देखील ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाची साक्ष देणार आहोत. या पवित्र पुनरुत्थानाच्या आठवड्यात आपण सगळेच निर्धार करू या. पहारेकऱ्यांप्रमाणे चुकीच्या मार्गावर न चालता आपण सतत चांगले वागून पुनरुत्थित ख्रिस्ताचे साक्षीदार बनण्याचा निर्धार करू या.
    
प्रार्थना :हे प्रभू, तुझी वचने आत्मसात करण्यास व तुझ्या सुवार्तेचे साक्षीदार  बनण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या