Marathi Bible Reading | Monday of the Holy Week 03rd April 2023

पवित्र आठवडा  

सोमवार दि. ०३ एप्रिल  २०२३

 कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत; परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही."

✝️ 

संत रिचर्ड
महागुरू, वर्तनसाक्षी (११९७-१२५३)
रिचर्ड व्हीच हा इंग्लंड मधील विंचेस्टरशायर येथला रहिवासी होता. ख्रिस्तसभेच्या धर्मकायदा (कॅनन लॉ) विभागात तो तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होता. त्याची बुद्धीमत्ता पाहून त्याला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीत कुलगरूपदावर नियुक्त करण्यात आलेले होते. बुद्धीमत्तेबरोबरच त्याला पावित्र्याची विशेष देणगी लाभलेली होती. त्यामुळे त्याला कॅन्टरबरी ह्या सरधर्मप्रांताचे चॅन्सेलर म्हणूनही नेमण्यात आले होते. तिथे असतानाच तो संत एडमंड ह्यांचा जीवश्च कंठश्च मित्र बनला. पुढे आर्चबिशपांना हद्दपार करण्यात आले, तेव्हा तो त्यांच्या समवेत फ्रान्स येथे गेला. राजा हेन्री तिसरा ह्याच्या काळात राज्यव्यवस्थेने महागुरूंच्या नेमणुकामध्ये केलेल्या हस्तक्षेपाच्या निषेधार्थ आर्चबिशपांनी हद्दपारीचा निर्णय स्विकारलेला होता. त्याला संत रिचर्ड ह्याच्याकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

धर्मगुरूपदानंतर लगेच इ. स. १२४४ साली राजाने नेमलेल्या व्यक्तीला पर्याय म्हणून विंचेस्टर धर्मप्रांताचे महागुरू म्हणून फा. रिचर्ड ह्यांना महागुरूदीक्षा देण्यात आली. पोप इनोसेंट चौथे ह्यांनी त्यांच्या मस्तकावर महागुरूपदाचे शिरस्त्राण चढविले.
संत रिचर्ड ह्यांची राहणी अतिशय साधी होती. आपल्या हाती येणारा पैसा ते गोरगरिबांना वाटून टाकीत. दोन वर्षाकरिता राज्यव्यवस्थेने त्यांचे मानधन राखून ठेवलेले असले तरी आपल्या मिळकतीची रक्कम ते पददलितांकरिताच खर्च करीत.
आपल्या धर्मगुरूंच्या जीवनाचा दर्जा (आध्यात्मिक व धार्मिक दृष्ट्या) उंचवावा म्हणून त्यांच्या जीवन व कार्यावर आधारित एक नियमावली त्यांनी तयार केली होती. प्रत्येक परिषदेच्या वेळी धर्मगुरूंनी ती सोबत आणावी असा संत रिचर्ड ह्यांचा आग्रह असे. ३ एप्रिल १२५३ साली आपल्या स्वर्गीय निजधामी गेलेल्या बिशप रिचर्ड ह्यांना पोप अर्बन चौथे ह्यानी १२६२ साली संतांच्या मालिकेत गणले.

चिंतन : “देव विश्वासू आहे. आपण जर त्याच्याशी प्रामाणिक राहिलो तर तो आपल्या गरजा पुरवितो.” संत रिचर्ड
 
✝️ 


 मरियेने आपले सर्वस्व येशूठायी समर्पित करुन ती येशूला शरण गेली  मरियेने परिवर्तीत जीवन जगण्यास सुरुवात केली व  मरिया एकनिष्ठ व आपल्या जीवनाशी प्रामाणिक राहिली . मरियेसारखे उदार मन व समर्पित जीवन जगण्याची इच्छा आपल्यामध्ये असेल तर ख्रिस्त प्रभू आपल्या सर्व पापांची क्षमा करणारा परमेश्वर आहे
आपण प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाशी एकरूप होण्यासाठी आणि  त्याला शरण जाण्यासाठी ह्या पवित्र आठवड्यामध्ये विशेष प्रयत्न करणार आहोत. . प्रभूच्या दु:खसहनात सहभागी होत असताना त्याच्या पुनरुत्थानाचे  सहभागिदार बनण्यास कृपा मागू या.
 
✝️   
पहिले वाचन  यशया ४२:१-७
वाचक  यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“तो गवगवा करणार नाही, तो रस्त्यातून पुकारा करणार नाही. "

परमेश्वर म्हणतो, पाहा, हा माझा सेवक, याला मी आधार आहे; पाहा, हा माझा निवडलेला, याच्याविषयी माझा जीव संतुष्ट आहे; याच्याठायी मी आपला आत्मा घातला आहे, तो राष्ट्रांना न्याय प्राप्त करून देईल. तो गवगवा करणार नाही, तो आपला स्वर उच्च करणार नाही, तो रस्त्यातून पुकारा करणार नाही; चेपलेला बोरू तो मोडणार नाही, मिणमिणती वात तो विझवणार नाही; तो सत्याने न्यायाची प्रवृत्ती करील. पृथ्वीवर न्याय स्थापीपर्यंत तो मंदावणार नाही व भंगणार नाही; द्वीपे त्याच्या धर्मशास्त्राची प्रतीक्षा करतात. आकाश निर्माण करून विस्तारणारा, पृथ्वीचा आणि तिच्या उपजाचा फैलाव करणारा, तिच्यावरील लोकांत प्राण घालणारा आणि तिच्यावर संचार करणाऱ्यांना जीवित देणारा देव परमेश्वर असे म्हणतो, “मी परमेश्वराने न्यायानुसार तुला बोलावले आहे, मी तुझा हात धरला आहे; तुला राखले आहे तू लोकांना करार आणि राष्ट्रांना प्रकाश देणारा असे मी तुला करीन; आंधळ्यांचे डोळे उघडावे, बंदिशाळेतून बंदिवानांना आणि अंधारात बसलेल्यांना कारागृहांतून बाहेर काढावे म्हणून मी असे करीन.”
 प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  २७:१-३,१३-१४
प्रतिसाद : परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे.

१) परमेश्वर माझा प्रकाश आणि माझे तारण आहे; 
मी कोणाची भीती बाळगू? 
परमेश्वर माझ्या जिवाचा दुर्ग आहे;
 मी कोणाचे भय धरू ?

२) माझे शत्रू माझे द्वेष्टे माझे मांस खाऊन टाकण्यास
 माझ्यावर चढाई करून आले, 
ते दुष्टकर्मी ठेच खाऊन पडले.

३) सैन्याने माझ्यापुढे ठाणे दिले 
तरी माझे हृदय कचरणार नाही. 
माझ्यावर युद्धप्रसंग ओढवला तरीही 
मी हिम्मत धरुन राहीन.

४) ह्या इहलोकीच परमेश्वराची दया
 माझ्यावर होईल अशी माझी श्रद्धा आहे. 
परमेश्वराची प्रतीक्षा कर; खंबीर हो, हिम्मत धर.
 परमेश्वराची प्रतीक्षा कर!

जयघोष  
आपल्या राजाचा जयजयकार असो !
फक्त तूच आम्हावर दयादृष्टी दाखवतोस.

शुभवर्तमा योहान १२:१-११
वाचक : "योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"माझ्या उत्तरकार्याच्या दिवसासाठी हे सुंगधी तेल तिला ठेवू द्या."

येशू वल्हांडणाच्या पूर्वी सहा दिवस बेथानी येथे आला; ज्या लाजरसला येशूने मेलेल्यातून उठवले होते तो तेथे होता. म्हणून त्यांनी तेथे त्याच्यासाठी जेवणावळ केली; तेव्हा मार्था सेवा करीत होती आणि लाजर त्याच्या पंक्तीस बसणाऱ्यांपैकी एक होता. तेव्हा मरियेने अर्धा शेर शुद्ध जटामांसीचे मौलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले; तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. मग त्याच्या शिष्यांतील एकजण यहुदा इस्कार्योत ( जो त्याला धरून देणार होता तो) म्हणाला, “हे सुगंधी तेल तीनशे शेकेलला विकून ते गरिबांना का दिले नाहीत ?” त्याला गरिबांची काळजी होती म्हणून तो हे म्हणाला असे नाही; तर तो लोभी असून त्याच्याजवळ पैशांची थैली होती आणि तिच्यात जे टाकण्यात येई ते तो चोरून घेई, म्हणून तो असे म्हणाला. येशूने म्हटले, “तिला अडवू नका, माझ्या उत्तरकार्याच्या दिवसासाठी ते तिला ठेवू द्या. कारण गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत; परंतु मी तुमच्याजवळ नेहमी आहे असे नाही."तो तेथे आहे असे यहुद्यातील लोकांपैकी पुष्कळांना कळले आणि केवळ येशूकरिता नाही तर ज्या लाजरसला त्याने मेलेल्यातून उठवले होते त्यालाही पाहण्याकरिता ते आले. मुख्य याजकांनी लाजरसलाही जिवे मारण्याचा निश्चय केला, कारण त्याच्यामुळे पुष्कळ यहुदी त्यांना सोडून येशूवर विश्वास ठेवत होते.

प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: जे गरीब ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचं आहे. योहानाच्या आजच्या शुभवर्तमानामध्ये ख्रिस्त सांगत आहे, गरीब लोक सतत तुमच्याजवळ आहेत, परंतु मी सतत तुमच्या जवळ असणार नाही. ह्या वचनाद्वारे ख्रिस्त आपणांस संदेश देत आहे की, तुम्ही जेव्हा गरीब लोकांना मदत करणार तेव्हा ती मदत ख्रिस्ताला मिळणार आहे. ख्रिस्त म्हणतो, “करशील जे गरिबांसाठी होईल ते माझ्यासाठी.” मरीयेप्रमाणे आपण जेव्हा गरीबांना मदत करणार, तेव्हा आपण ख्रिस्ताचे चरण धुणार आहोत. ख्रिस्ताने केलेली मरीयेची स्तुती आणि गरीबांची सेवा हे एकाच मापात ख्रिस्ताने मोजलेले आहे. आपल्या जीवनात जुदास प्रमाणे पैशालाच सर्वस्व न मानता गरिबांची सेवा करून आपल्याला ख्रिस्ताचे चरण धुता यावे म्हणून ख्रिस्ताकडे विशेष प्रार्थना करू या.

प्रार्थना :  हे प्रभू येशू, तुला शरण येण्यास व समर्पित जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा व कृपा दे, आमेन.

सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या