उपवासकाळातील पाचवा रविवार
( झावळ्यांचा रविवार)
"हा यहुदयांचा राजा आहे."
✝️
मग ते भोजन करीत असताना येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद देऊन ती मोडली व शिष्यांस देऊन म्हटले, "घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे." आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यांना दिला आणि म्हटले “तुम्ही सर्व ह्यातून प्या; हे माझे (नव्या) कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. मी तुम्हांला सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षरस पिईपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही.'
✝️
ख्रिस्तसभा आज झावळ्यांचा रविवार साजरा करीत आहे. 'हा यहुदयांचा राजा आहे.आपण सुद्धा प्रभू येशूला आपला तारणारा, मुक्तीदाता आणि राजा म्हणून स्वीकारणे गरजेचे आहे.
जगाच्या उद्धारासाठी प्रभू येशूचे मरण अगत्याचे होते. आपल्या सर्वांना| मुक्ती आणि जीवन देणाऱ्या प्रभूचा आपण अनेकदा मुखाने जल्लोष करतो. कधी कधी ख्रिस्ती असल्याचे अभिमानाने मिरवतो, त्याच्या शिकवणुकीशी आपण प्रामाणिक आहोत का ? प्रभू येशू आपल्या सर्वांचा राजा, मेंढपाळ, तारणदाता व जीवनदाता आहे. प्रभूच्या दुःखसहनात आपण सहभागी होऊ या आणि पुनरुत्थानाच्या दिशेने वाटचाल करण्यास प्रभूकडे कृपा मागू या.
✝️
पहिले वाचन यशया ५०:४-७
वाचक : यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“उपमर्द व छिः थू यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही, कारण माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते."
यशया म्हणतो शिणलेल्यांना बोलून धीर कसा द्यावा ते समजावे म्हणून प्रभू परमेश्वराने मला शिष्याची जिव्हा दिली आहे. तो रोज सकाळी मला जागे करतो, शिष्यांप्रमाणे ऐकावे म्हणून माझे कान उघडतो. प्रभू परमेश्वराने माझे कान उघडले आहेत; मी फितूर झालो नाही, मागे फिरलो नाही. मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली, केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले; उपमर्द व छि: थू यांपासून मी आपले तोंड चुकवले नाही. प्रभू परमेश्वर मला साहाय्य करणार म्हणून तोंड चुकवले नाही.
प्रभू परमेश्वर मला साहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही; मी आपले तोंड गारगोटीसारखे केले; माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक होते.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र २२:८-९,१७-२०,२३-२४
प्रतिसाद : माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास?
१) मला पाहणारे सर्व माझा उपहास करतात.
ते वाकुल्या दाखवतात, ते थट्टेने डोके हलवतात.
त्याने परमेश्वरावर आपला हवाला टाकला,
तो त्याला मुक्त करो;तो जर त्याचा आवडता असेल
तर तो त्याला सोडवो.
२) कुत्र्यांनी मला वेढले आहे,
दुर्जनांच्या टोळीने मला घेरले आहे.
त्यांनी माझे हातपाय विंधिले आहेत.
मला आपली सर्व हाडे मोजता येतात..
३) ते माझी वस्त्रे आपसांत वाटून घेतात.
ते माझ्या झग्यावर चिठ्ठ्या टाकतात.
हे परमेश्वरा, तू दूर राहू नको;
हे माझ्या सामर्थ्या, माझ्या सहाय्यासाठी त्वरा कर !
४) मी आपल्या बांधवांजवळ तुझ्या नामाची कीर्ती वर्णीन,
“अहो परमेश्वराचे भय धरणाऱ्यांनो, त्याचे स्तवन करा;
याकोबचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचे गौरव करा.
इस्राएलचे वंशजहो, तुम्ही सर्व त्याचे भय धरा.'
दुसरे वाचन फिलिपे २:६-११
वाचक: पौलचे फिलिप्पीकरांस पत्र यातून घेतलेले वाचन
“त्याने स्वत:ला लीन केले; ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले. "
ख्रिस्त येशू, तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही; तर त्याने स्वत:ला रिक्त केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाने होऊन दासाचे स्वरूप धारण केले आणि मनुष्यप्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने मरण आणि तेही क्रुसावरचे मरण स्वीकारले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वत:ला लीन केले. त्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले; ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
हा प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
ख्रिस्ताने मरण आणि तेही क्रुसावरचे मरण स्वीकारले,
येथपर्यंत तो आज्ञाधारक झाला. ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावांपेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले
शुभवर्तमान "मत्तय २६:१४- २७: ६६
वाचक : "मत्तयलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
येशू ख्रिस्ताचे दुःखसहन" यहूदा इस्कात नावाच्या बारातील एकाने मुख्य याजकांकडे जाऊन म्हटले, "मी त्याला धरून दिले तर मला काय द्याल?" त्यांनी त्याला तीस नाणी मोजून दिली. तेव्हापासून तो येशूला धरून देण्याची संधी पाहू लागला.
नंतर बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी शिष्य येशूकडे येऊन म्हणाले, “आपणांकरिता वल्हांडणाच्या भोजनाची तयारी आम्ही कोठे करावी म्हणून आपली इच्छा आहे ?" त्याने म्हटले, “नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की, गुरुजी म्हणतात, माझी वेळ आली आहे; मी आपल्या शिष्यासह तुमच्या येथे वल्हांडण सण करतो." मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्यांनी जाऊन वल्हांडणाची तयारी केली.
संध्याकाळ झाल्यावर येशू बारा शिष्यांसह भोजनाला बसला आणि ते भोजन करीत असताना त्याने म्हटले, "मी तुम्हाला खचित सांगतो, तुमच्यातला एकजण मला धरून देईल." तेव्हा ते फार खित्र झाले आणि प्रत्येकजण त्याला विचारू लागला "प्रभूजी, मी तर नाही ना ?" त्याने उत्तर दिले "ज्याने माझ्याबरोवर ताटात हात घातला तोच मला धरून देईल. मनुष्याच्या पुत्राविषयी जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा; परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो, त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार! तो मनुष्य जन्मला नसता तर ते त्याला बरे झाले असते." तेव्हा त्याला धरून देणारा यहुदा ह्याने विचारले, "गुरुजी, मी तर नाही ना ?" तो त्याला म्हणाला, "होय, तूच."
मग ते भोजन करीत असताना येशूने भाकर घेतली आणि आशीर्वाद देऊन ती मोडली व शिष्यांस देऊन म्हटले, "घ्या आणि खा. हे माझे शरीर आहे." आणि त्याने प्याला घेतला व उपकारस्तुती करून तो त्यांना दिला आणि म्हटले “तुम्ही सर्व ह्यातून प्या; हे माझे (नव्या) कराराचे रक्त आहे, हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे. मी तुम्हांला सांगतो की, मी आपल्या पित्याच्या राज्यात तुम्हाबरोबर नवा द्राक्षरस पिईपर्यंत येथून पुढे द्राक्षाचा हा उपज पिणारच नाही.'
नंतर गीत गाऊन ते जैतुनांच्या डोंगरावर निघून गेले. तेव्हा येशू त्यांना म्हणाला, "तुम्ही सर्व ह्याच रात्री माझ्याविषयी अडखळाल; कारण असा शास्त्रलेख आहे की, मी मेंढपाळाला मारीन आणि कळपातल्या मेंढरांची दाणादाण होईल. परंतु मी उठवला गेल्यानंतर तुमच्या आधी गालिलात जाईन." पेजने त्याला उत्तर दिले "आपणांविषयी सर्व अडखळले तरी मी कधीही अडखळणार नाही." येशूने त्याला म्हटले, "मी तुला नक्की सांगतो, ह्याच रात्री कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील. "पेत्र त्याला म्हणाला, "आपणांबरोबर मला मरावे लागले तरी मी आपणांला नाकारणार नाही." सर्व शिष्यांनीही तसेच म्हटले.
नंतर येशू शिष्यांबरोबर मेयसेमनी नावाच्या ठिकाणी आला आणि त्यांना म्हणाला, "मी पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथे बसा." मग त्याने पेत्र व जब्दीचे दोघे मुलगे ह्यांस बरोबर घेतले आणि तो खिन व अतिकष्टी होऊ लागला. तेव्हा त्याने त्यांना म्हटले, "माझा जीव मरणप्राय, अतिखित्र झाला आहे; तुम्ही येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा." मग तो थोडासा पुढे जाऊन पालथा पडला आणि त्याने अशी प्रार्थना केली, "हे माझ्या बापा, शक्य होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावो; तथापि माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो." मग तो शिष्यांकडे आला आणि ते झोपी गेले आहेत असे पाहून पेत्राला म्हणाला, "काय तुमच्याने घटकाभरही माझ्याबरोबर जागवत नाही ? तुम्ही मोहात पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे." आणखी त्याने दुसऱ्यांदा जाऊन अशी प्रार्थना केली, "हे माझ्या बापा, हे मी प्याल्याशिवाय टळून जात नसेल तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो." मग त्याने पुनः येऊन ते झोपी गेले आहेत असे पाहिले, कारण त्यांचे डोळे जड झाले होते. नंतर त्यांना सोडून त्याने पुनः जाऊन तिसऱ्यांदा पुन्हा तेच शब्द बोलून प्रार्थना केली आणि तो आपल्या शिष्यांकडे येऊन त्यांस म्हणाला "तुम्ही अद्यापि झोप व विसावा घेता काय? पाहा, घटका जवळ आली आहे आणि मनुष्याचा पुत्र पापी लोकांच्या हाती धरून दिला जात आहे. उठा, आपण जाऊ पाहा, मला धरून देणारा जवळ आला आहे."
तो बोलत आहे इतक्यात पाहा, बारातील एक जो यहुदा तो आला आणि त्याच्याबरोबर मुख्य याजक व वडीलजन ह्यांच्याकडून तरवारी आणि मोटे घेऊन आलेला मोठा समुदाय होता. त्याला धरून देणाऱ्याने त्यांस अशी खूण सांगून ठेवली होती की, "मी ज्याचे चुंबन घेईन तो तोच आहे; त्याला धरा.' मग त्याने लागलेच येशूजवळ येऊन, "गुरुजी, नमस्कार!" असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. येशूने त्याला म्हटले, "मित्र तू येथे कशासाठी आलास ?” तेव्हा त्यांनी जवळ येऊन येशूवर हात टाकून त्याला अटक केली. मग पाहा, येशूबरोबर जे होते त्यांच्यातील एकाने हात लांब करून आपली तरवार उपसली आणि प्रमुख याजकाच्या दासावर प्रहार करून त्याचा कान छाटून टाकला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, “तुझी तरवार परत म्यानात घाल; कारण तरवार धरणारे सर्वजण तरवारीने नाश पावतील. तुला असे वाटते काय की, मला माझ्या पित्याजवळ मागता येत नाही, आणि आताच्या 'आता तो मला देवदूतांच्या बारा सैन्यांपेक्षा अधिक पाठवून देणार नाही? पण असे झाले तर ह्याप्रमाणे घडले पाहिजे, हे म्हणणारे शास्त्रलेख कसे पूर्ण होतील ?" त्याच वेळेस येशू लोकसमुदायाला म्हणाला, “एखाद्या लुटारूला धरावे तसे मला धरायला तुम्ही तरवारी व सोटे घेऊन बाहेर आला आहा काय ? मी दररोज मंदिरात बसून शिक्षण देत असे, तेव्हा तुम्ही मला धरले नाही. पण संदेष्ट्यांचे लेख पूर्ण व्हावे म्हणून हे सर्व झाले आहे.” तेव्हा सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले.
मग येशूला अटक करणाऱ्यांनी त्याला प्रमुख याजक कयफा ह्याच्याकडे शास्त्री व वडीलजण जमले होते तेथे नेले. पण पेत्र प्रमुख याजकाच्या वाड्यापर्यंत दुरून त्याच्या मागे मागे चालत गेला व आत जाऊन, शेवट काय होतो हे पाहण्यासाठी कामदारांमध्ये बसला. मुख्य याजक व संपूर्ण न्यायसभा हे येशूला जिवे मारण्याचा हेतूने त्याच्याविरूद्ध खोटा पुरावा शोधत होते आणि बरेच खोटे साक्षीदार आले असतानाही तो आधार त्यांना मिळाला नाही. मग शेवटी दोघेजण येऊन म्हणाले की, “देवाचे मंदिर मोडायला व तीन दिवसात ते बांधायला मी समर्थ आहे, असे ह्याने म्हटले." तेव्हा प्रमुख याजक उठून त्याला म्हणाला, “तू काहीच उत्तर देत नाहीस काय ? हे तुझ्याविरूद्ध साक्ष देतात हे काय?” तथापि येशू उगाच राहिला. ह्यावरून प्रमुख याजकाने त्याला म्हटले, "मी तुला जिवंत देवाची शपथ घालतो, तू देवाचा पुत्र ख्रिस्त असलास तर आम्हांला सांग."येशू त्याला म्हणाला, “होय, आपण म्हटले तसेच. आणखी मी. तुम्हांला सांगतो, ह्यापुढे तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थाच्या उजवीकडे बसलेले आणि आकाशाच्या मेघांवर आरूढ होऊन येताना पाहाल.” तेव्हा प्रमुख याजकाने आपली वस्त्रे फाडून म्हटले, “ह्याने दुर्भाषण केले आहे. आम्हांला साक्षीदारांची आणखी काय गरज? पाहा, आता तुम्ही हे दुर्भाषण ऐकले आहे. तुम्हांला काय वाटते?" त्यांनी उत्तर दिले की, "हा मरणदंडास पात्र आहे.” तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या. आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटले, “अरे ख्रिस्ता! आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, तुला कोणी मारले?"
इकडे पेत्र वाड्यात बाहेर बसला होता. तेव्हा एक दासी त्याच्याकडे येऊन म्हणाली, "तूही गालिली येशूबरोबर होतास." तो सर्वांच्या समोर नाकारून म्हणाला, “तू काय म्हणतेस ते मला ठाऊक नाही.” मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथल्या लोकांना म्हटले, “हा नाझरेथकर येशूबरोबर होता.” पुन्हा तो शपथ वाहून नाकारून म्हणाला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” नंतर काही वेळाने तेथे उभे राहणारे जवळ येऊन पेत्राला म्हणाले, “खरोखर तूही त्यातला आहेस. कारण तुझ्या बोलीवरून तू कोण आहेस हे दिसून येते.” तेव्हा तो शापोच्चारण करून आणि शपथा वाहून म्हणू लागला, "मी त्या मनुष्याला ओळखत नाही." इतक्यात कोंबडा आरवला. तेव्हा कोंबडा आरवण्यापूर्वी तीन वेळा तू मला नाकारशील असे जे येशूने पेत्राला सांगितले होते ते त्याला आठवले आणि तो बाहेर जाऊन मोठ्या दुःखाने रडला.
प्रात:काळ झाल्यावर सर्व मुख्य याजक व लोकांचे वडील ह्यांनी येशूला जिवे मारण्यासाठी त्याच्याविरुद्ध मसलत केली आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात ह्याच्या स्वाधीन केले.
तेव्हा तो शिक्षापात्र ठरवण्यात आला असे पाहून, त्याला धरून देणारा यहुदा पस्तावला आणि ते तीस शेकेल मुख्य याजक व वडीलमंडळी ह्यांच्याकडे परत आणून म्हणाला, “मी निर्दोष जिवाला धरून देऊन पाप केले आहे." ते म्हणाले "त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहून घे." मग त्याने ते शेकेल मंदिरात फेकून दिले आणि बाहेर जाऊन गळफास घेतला. मुख्य याजकांनी ते शेकेल गोळा करून म्हटले, “हे दानकोशात टाकणे सशास्त्र नाही, कारण हे रक्ताचे मोल आहे.” मग त्यांनी आपसांत विचार करून त्या शेकेलांचे परक्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले. ह्यामुळे त्या शेताला रक्ताचे शेत असे आजपर्यंत म्हणतात. तेव्हा जे वचन यिर्मया संदेष्ट्याच्या द्वारे सांगितले होते ते पूर्ण झाले; ते असे, “आणि ज्याचे मोल इस्राएलच्या वंशजांपैकी काहींनी ठरवले, त्याचे मोल, म्हणजे ते तीस शेकेल, त्यांनी घेतले आणि परमेश्वराने मला आज्ञा केल्याप्रमाणे कुंभाराचे शेत घेण्यासाठी त्यांनी दिले."
मग येशूला सुभेदाराच्या पुढे उभे केले असता सुभेदाराने त्याला विचारले, “तू यहुद्यांचा राजा आहेस काय ?” येशूने त्याला म्हटले, “आपण म्हणता तसेच." मुख्य याजक व वडीलमंडळी हे त्याच्यावर दोषारोप करीत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, "हे तुझ्याविरुद्ध किती गोष्टींबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकू येत नाही काय ?" परंतु त्याने एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही; ह्याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटले. त्या सणात लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती आणि त्या वेळेस तेथे बरब्बा नावाचा एक प्रसिद्ध बंदिवान होता. मग ते जमल्यावर पिलाताने त्यांना म्हटले, "मी तुम्हांकरिता कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे ? बरब्बाला की ख्रिस्त म्हटलेल्या येशूला ?" कारण त्यांनी येशूला हेव्याने धरून दिले हे त्याला ठाऊक होते. तो न्यायासनावर बसला असता त्याच्या पत्नीने त्यास निरोप पाठवला की, “त्या नीतिमान मनुष्याच्या बाबतीत आपण पडू नये, कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या." इकडे मुख्य याजक व वडीलमंडळी ह्यांनी बरब्बाला मागून घ्यावे आणि येशूचा नाश करावा, म्हणून लोकसमुदायांचे मन वळवले. सुभेदाराने त्यांना विचारले "तुम्हांकरिता ह्या दोघांतून कोणाला सोडून द्यावे अशी तुमची इच्छा आहे ?" ते म्हणाले, "बरब्बाला." पिलाताने त्यांना म्हटले, “तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे ?" सर्व म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळून टाका." तो म्हणाला, “का बरे ? त्याने काय वाईट केले आहे ?" नंतर ते फारच आरडाओरड करीत म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळून टाका.' ह्यावरून आपले काहीच चालत नाही, उलट अधिकच गडबड होत आहे असे पाहून पिलातने पाणी घेऊन लोकसमुदायासमोर हात धुऊन म्हटले, "मी ह्या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे; तुमचे तुम्हीच पाहा." सर्व लोकांनी उत्तर दिले की, "त्याचे रक्त आम्हांवर आणि आमच्या मुलांबाळांवर असो!" तेव्हा त्याने त्यांच्याकरिता बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारून क्रुसावर खिळण्याकरिता शिपायांच्या स्वाधीन केले.
नंतर सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळी तुकडी त्याच्याविरुद्ध जमवली. त्यांनी त्याची वस्त्रे काढून त्याच्या अंगात किरमिजी रंगाचा झगा घातला; काट्यांचा मुकूट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला, त्याच्या उजव्या हातात वेत दिला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून, "हे यहुद्यांच्या राजा, तुला नमस्कार!" असे म्हणून त्यांनी त्याची थट्टा सुरु केली. ते त्याच्यावर थुंकले व तोच वेत घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. मग त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याच्या अंगातून तो झगा काढून त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि ते त्याला क्रुसावर खिळण्याकरिता घेऊन गेले..
ते बाहेर जात असता शिमोन नावाचा कोणीएक सिरेनेकर मनुष्य त्यांना आढळला; त्याला त्यांनी येशूचा क्रूस वाहण्याकरिता वेठीस धरले. मग गुलगुथा (म्हणजे कवटीची जागा) नावाची जागी येथे येऊन पोहोचल्यावर त्यांनी त्याला पित्तमिश्रित द्राक्षरस प्यायला दिला; परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना. त्याला क्रुसावर खिळल्यावर त्यांनी चिट्ट्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली; नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करीत राहिले. त्यांनी त्याच्यावरील दोषारोपाचा लेख त्याच्या डोक्याच्या वर लावला तो असा "हा यहुद्यांचा राजा येशू आहे. त्यावेळी त्यांनी त्याच्याबरोबर दोन लुटारू, एक उजवीकडे आणि एक डावीकडे, असे क्रुसावर खिळले आणि जवळून जाणारे येणारे डोके हलवीत त्याची अशी निंदा करीत होते, "अरे, मंदिर, मोडून तीन दिवसांत बांधणाऱ्या, स्वतःचा बचाव कर! तू देवाचा पुत्र असलास तर वरून खाली उतर" तसेच मुख्य यानकी, शास्त्री आणि वडीलमंडळी ह्यांच्यासमवेत थट्टा करीत म्हणाले, "ज्याने दुसऱ्यांना वाचवले, त्याला स्वतःला वाचवता येत नाही. तो इस्राएलचा राजा आहे; त्याने आता क्रुसावरून खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू. तो देवावर भरवसा ठेवतो; तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला आता सोडवावे कारण मी देवाचा पुत्र आहे, असे तो म्हणत असे." जे लुटारू त्याच्याबरोबर कुसावर खिळलेले होते त्यांनीही त्याची तशीच निंदा केली.
मग दुपारी सहाव्या तासापासून नवव्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे नवव्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, "एलोई, एलोई, लमा सनी ?" म्हणजे "माझ्या देवा, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास ?" येथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, "तो एलियाला हाक मारतो." मग त्यांच्यातून एकाने लागलेच भावत जाऊन स्पंज घेतला आणि तो आंबेने भरून वेताच्या टोकावर ठेवून त्याला खायला दिला. इतर म्हणाले, "असू दे. एलिया त्याचा बचाव करायला येतो की काय हे आपण पाहू" लवकरच येशूने पुनः मोठयाने ओरडून प्राण सोडला.
तेव्हा पाहा, पवित्रस्थानातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुर्भाांगला; भूमी कापली, खडक फुटले; थडगी उघडली आणि मरण पावलेल्या पवित्र जनांतील पुष्कळ जणांची शरीरे उठवली गेली ते त्याच्या पुनरुत्थानानंतर बडग्यांतून निघून पवित्र नगरात गेले आणि अनेकांना दिसले. शताधिपती व त्याच्याबरोबर येशूवर पहारा करणारे, हा भूमिकंप आणि पडलेल्या गोष्टी पाहून, अत्यंत भयभीत झाले आणि म्हणाले. "खरोखर हा देवाचा पुत्र होता".
तेथे जमलेल्या पुष्कळ स्त्रिया हे पाहत होत्या, त्या येशूची सेवा करीत गालिलाहून त्याच्यामागे आल्या होत्या त्यांच्यामध्ये मग्दालिया मरिया, याकोब व योसेफ ह्यांची आई मरिया आणि जब्दीच्या मुलांची आई ह्या होत्या. मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला, हाही येशूचा शिष्य होता. त्याने पिलातकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलातने ते द्यावयाची आज्ञा केली. योसेफने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुडांळले, ते त्याने खडकात खोदलेल्या आपल्या नव्या कबरेत ठेवले; एक मोठी धोंड लोटून ती कबरीच्या दाराला लावली आणि तो निघून गेला. पण तेथे कबरीसमोर मग्दालिया मरिया व दुसरी मरिया ह्या बसल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी म्हणजे तयारीनंतरच्या दिवशी मुख्य याजक आणि परुशी पिलाताकडे जमून म्हणाले, “महाराज, तो जिवंत असता तीन दिवसानंतर मी उठेन असे म्हणाला होता, ह्याची आम्हांला आठवण आहे. म्हणून तिसऱ्या दिवसापर्यंत कबरीचा बंदोबस्त करायला सांगावे, नाहीतर कदाचित त्याचे शिष्य येऊन त्याला चोरून नेतील आणि तो मेलेल्यातून उठला आहे असे लोकांना सांगतील; मग शेवटली फसगत पहिल्यापेक्षा वाईट होईल.” पिलात त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ पहारा आहे; तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा." मग पहारा बरोबर घेऊन ते गेले आणि त्यांनी धोंडीवर शिक्कामोर्तब करून कबरीचा बंदोबस्त केला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: ह्या पवित्र आठवड्यामध्ये ख्रिस्तसभा प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःखसहन रहस्यामध्ये प्रवेश करीत आहे. आजची वाचने येशूचे दुःखसहन (यशया ५०:४-७), त्याची नम्रवृत्ती (फिलिप्पै २:६-११) आणि मसिहा म्हणून त्याचा अधिकार (लूक २२:१४-१३:५६) ह्या पैलूकडे आपले लक्ष वेधून घेत आहेत. संत मत्तयने येशूचे दुःखसहन चार टप्प्यांमध्ये सादर केलेले आहे. अ. गेयशेमनी बागेतील यातनाः ह्या टप्प्यामध्ये आपल्या दुःखसहनाची जाणीव असणारा येशू शिष्यांना प्रार्थना करण्याचे आवाहन करतो. तो स्वतःदेखील देवपित्याकडे प्रार्थना करतो. त्यामुळे दुःखसहनाला सामोरे जाण्यासाठी त्याला मनोबल प्राप्त होते. याउलट प्रार्थनेपेक्षा झोपेला अग्रक्रम देणारे शिष्य ऐन परीक्षेच्या प्रसंगी अपयशी ठरतात. कारण त्यांनी पुरेशी दीर्घकाळ आणि मनापासून प्रार्थना केली नाही. ब. यहुदी अधिकाऱ्यांसमोर येशूची चौकशी : ह्या चौकशीदरम्यान येशूवर करण्यात आलेले आरोप धार्मिक स्वरूपाचे होते. येशू मात्र आपल्या दैवी सामर्थ्याने ह्या आरोपांना निर्भयपणे सामोरा जातो. क. येशूची पिलातासमोर चौकशी इथे केले जाणारे आरोप है राजकीय स्वरूपाचे होते. यहूदी अधिकाऱ्यांनी येशूला मरणदंड देण्याचा निर्णय दिला होता. मात्र हे मरण क्रुसावरचे असण्यासाठी त्यांना रोमी अधिकाऱ्यांच्या संमतीची गरज होती. इथेही येशू "यहुद्यांचा राजा " म्हणून धैर्याने मरण स्वीकारायला तयार होतो. ड. येशूच्या यातना, मृत्यू आणि दफनः येशूच्या मृत्यूसमयी आकाशात तास अंधकार), पृथ्वीवर (धरणीकंप, खडक फुटले) व पृथ्वीखाली (कित्येक थडगी उघडली गेली. मेलेली माणसे जिवंत झाली) अशा तिन्ही ठिकाणी त्याचे पडसाद उमटले. ही चिन्हे नव्या युगाची दृश्ये प्रतीके होती (यहेज्केल ३७:१२-१३). येशूच्या मृत्यूने परराष्ट्रीयांना सोबत घेणाऱ्या नव्या इस्राएलची प्रस्थापना झाली होती. दुःखभोग सोसणारा मसिहा आता गौरवशाली मसिहा बनलेला होता. शताधिपतीने तशी कबुलीही दिली. आत्मपरीक्षण : येशूच्या दुःखसहन रहस्यातील कोणकोणते घटक मला माझ्या जीवनातील दुःखे व संकटे ह्यांना सामोरे जाण्यास प्रेरणा देतात ?
प्रार्थना : हे पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ता, आमचे संपूर्ण जीवन परिवर्तित कर आणि तुझ्या पुनरुत्थानाचे वाटकरी होण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या