Marathi Bible Reading | Saturday 1st April 2023 | 5th Week of Lent

 

उपवासकाळातील पाचवा  सप्ताह 

शनिवार दि. १एप्रिल २०२३

✝️ 

 येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे आणि केवळ त्या राष्ट्राकरिता असे नाही, तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांनाही जमवून एकत्र करावे ह्याकरिता.

संत ह्यू 

•महागुरू, वर्तनसाक्षी (१०५०-११३२)

संत ब्रुनो ह्यांनी त्यांचे आध्यात्मिक मार्गदर्शक या नात्याने संत ह्यू ना खास सल्ला देऊन त्यांच्या उपासतापासावर नियंत्रण आणले. परंतु भयंकर आत्मक्लेशाची सवय असलेल्या संत यू ह्यांनी अनवाणी चालण्याचे सोडून दिले नाही.

गरिबांविषयी त्यांच्या मनात इतकी जबरदस्त कळकळ भरलेली होती की त्यांच्या कल्याणासाठी संत यू ह्यांनी आपला सोनेरी प्याला (द्राक्षरसासाठी वापरला जाणारा) आणि महागुरूपदाची सोनेरी अंगठी विकून त्याचे पैसे दीनदलितांना वाटून टाकले. भांडणतंटा सोडविण्यात आणि दोन्ही पक्षांना समाधानपूर्वक न्याय देण्यात त्यांचा हातखंडा होता. दोन्ही पक्ष शांतीने आपापल्या घरी परत जात असत.

४० वर्षांच्या शारीरिक व मानसिक यातनांमध्ये होरपळत असलेला देऊळमातेचा हा राजपुत्र १ एप्रिल १९३२ रोजी आपल्या स्वर्गधामी निघून गेला. अवघ्या दोनच वर्षांनी त्यांना संतपदामध्ये समाविष्ट करण्यात आले.


“प्रार्थनेमुळे मला सतत ताजे टवटवीत व शक्तिशाली वाटते. निरर्थकता • आणि चुकीच्या मोहपाशांना बळी पडणारा आत्मा सहज सैतानाच्या जबड्यात अडकतो." - ग्रेनोबलचे संत ह्यू


✝️
 

पहिले वाचन :  यहेज्केल ३७:२१-२८
वाचक  यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन 
"मी त्यांचे एक राष्ट्र बनवीन"

प्रभू परमेश्वर म्हणतो, “पाहा, इस्राएलचे वंशज ज्या राष्ट्रात गेले आहेत त्यातून मी त्यांना काढून व चोहोकडून गोळा करून स्वदेशी नेईन मी या देशात, इस्राएलच्या पर्वतांवर त्याचे एक राष्ट्र वनवीन; त्या सर्वांवर एकच राजा राज्य करील; ती यापुढे दोन निराळी राष्ट्र राहणार नाहीत, यापुढे तो विभक्त होऊन त्यांची दोन राज्ये होणार नाहीत. ते आपल्या मूर्तीनी, आपल्या तिरस्कारणीय वस्तूंनी व आपल्या कोणत्याही पातकांनी आपणाला विटाळणार नाहीत, त्यांनी आपल्या ज्या सर्व निवासस्थानी पाप केले त्या सर्वांतून त्यांना सोडवून मी शुद्ध करीन; म्हणजे ते माझे लोक व मी त्यांचा देव असे होईल. माझा सेवक दावीद त्यांच्यावर राजा होईल; त्या सर्वाचा एकच मेंढपाळ होईल. ते माझ्या निर्णयांप्रमाणे चालतील आणि माझे नियम पाळून त्याप्रमाणे वर्ततील. जो देश माझा सेवक याकोब याला मी दिला व ज्यात तुमचे पूर्वज राहत असत त्यात ते वस्ती करतील; तेथे ते व त्याचे पुत्रपौत्र सर्वकाळ वस्ती करतील; माझा सेवक दावीद त्याच्यावर सर्वकाळचा अधिपती होईल. आणखी मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन; तो करार सर्वकाळचा होईल; मी त्यांना वसवीन, त्याची संख्या वाढवीन आणि सर्वकाळ राहील असे माझे पवित्रस्थान त्याच्यामध्ये स्थापीन. माझा निवासमंडप त्याच्यावर राहील; मी त्यांचा देव व ते माझे लोक असे होईल. माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये सर्वकाळ राहील. तेव्हा राष्ट्रांना समजेल की इस्राएलला पवित्र करणारा मी परमेश्वर आहे."

 प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  यिर्मया ३१:१०- १३
प्रतिसाद :  परमेश्वर आपली निगा राखील.

१) अहो राष्ट्रांनो, परमेश्वराचे वचन ऐका; 
दूरच्या द्वीपांत हे प्रसिद्ध करा व म्हणा,
"ज्याने इस्राएलला विखुरले तो त्यांना जमा करील
मेंढपाळ आपल्या कळपाची निगा राखतो 
तशी तो त्यांची निगा राखील."

२) कारण परश्वराने इस्राएलचा उद्धार केला आहे 
आणि त्याच्याहून जो बलवान त्याच्या हातून 
त्यालामुक्त केले आहे. ते येऊन सियोनच्या 
माथ्यावर आनंदाने गातील; 
परमेश्वराच्या उपयुक्त वरदानांनी 
ते प्रफुल्लित होतील.

३) त्या समयी कुमारी आनंदाने नृत्य करतील. 
वृद्ध व तरुण एकत्र आनंद करतील. 
मी त्याचा शोक पालटून तेथे आनंद करीन,
 मी त्यांचे सांत्वन करोन, त्यांच्या दुःखानंतर 
त्यांनी आनंद करावा असे मी करीन.


जयघोष  
आताच समय अनुकूल आहे. आजच तारणाचा दिवस आहे.


शुभवर्तमा योहान ११:४५-५७

वाचक : योहान  लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

'देवाच्या पांगलेल्या मुलांनाही जमवून एकत्र करावे ह्याकरिता येशू मरणार आहे. 

मरियेकडे आलेल्या यहुद्यांनी, त्याने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला; पण कित्येकांनी परुश्याकडे जाऊन येशूने काय केले ते त्यांना सांगितले. ह्यावरून मुख्य याजकांनी व परुश्यांनी सभा भरवून म्हटले "आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य पुष्कळ चिन्हे करतो. आपण त्याला असेच सोडले तर सर्व लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील आणि रोमी लोक येऊन आपले स्थान व राष्ट्रही हिरावून घेतील," तेव्हा त्यांच्यापैकी कयफा नावाचा कोणीएक मनुष्य जो त्या वर्षी प्रमुख याजक होता, तो त्यांस म्हणाला, "तुम्हांला काहीच कळत नाही; प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि संबंध राष्ट्राचा नाश होऊ नये हे तुम्हांला हितावह आहे. हेहो तुम्ही लक्षात आणीत नाही." हे तर तो आपल्या मनचे बोलला नाही, तर त्या वर्षी तो प्रमुख याजक होता म्हणून त्याने संदेश दिला की, येशू त्या राष्ट्राकरिता मरणार आहे आणि केवळ त्या राष्ट्राकरिता असे नाही, तर त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांनाही जमवून एकत्र करावे ह्याकरिता. ह्यावरून त्या दिवसापासून त्यांनी त्याला जिवे मारण्याचा आपसांत निश्चय केला. ह्यामुळे येशू तेव्हापासून यहुदी लोकांमध्ये उघडपणे फिरला नाही, तर तेथून रानाजवळच्या प्रांतातील एफ्राईम नावाच्या नगराला गेला आणि तेथे आपल्या शिष्यांसह राहिला. तेव्ह यहुद्यांचा वल्हांडण सण जवळ आला होता आणि पुष्कळ लोक वल्हांडणाच्या अगोदर आपणांला शुद्ध करून घ्यायला बाहेरगावांहून वर येरुशलेमला गेले. ते येशूला शोधत होते आणि मंदिरात उभे राहून एकमेकांना म्हणत होते, “तुम्हांला काय वाटते? तो सणाला मुळीच येणार नाही का ?" मुख्य याजकांनी व परुश्यांनी तर त्याला धरण्याच्या हेतूने असा हुकूम सोडला होता की, तो कोठे आहे हे कोणाला कळले तर त्याने खबर द्यावी.

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: मरावे परी कीर्तीरूपे उरावे. ही म्हण आपण एकलेलीच आहे. या जगात कायमचे राहण्यासाठी कोणीच आलेले नाही. एक दिवस सर्वांनाच या जगाचा निरोप घ्यायचा आहे. मरणाआधी आपण कसे जगावे ह्याचा संदेश आजचे शुभवर्तमान आपल्याला देत आहे. ख्रिस्ताच्या मरणाने जगाचे तारण झाले. ख्रिस्ताने मरणातून हा संदेश दिलेला आहे की, समाज्याच्या हितासाठी आपल्याला मरावे लागले तरी आपण तयार असावे. मी माझ्या कुटुंबाकरीता मर्यादीत न राहाता मला माझ्या समाज्याचे हित कसे साधता येईल ह्याचा विचार प्रत्येकाने करावा. ख्रिस्ताने जगासाठी मरून जगाला संदेश दिलेला आहे. स्वर्गीय जीवन मिळविण्यासाठी वेळप्रसंगी इतरांसाठी आपला प्राण देणे देखील अगत्याचे आहे. आजच्या शुभवर्तमानातून आपण प्रेरणा घेऊया. ख्रिस्त माझा प्रभू जसा माझ्या तारणासाठी मरण पावला तसेच मलाही इतरांच्या हितासाठी जगायचे आहे.

प्रार्थना: -हे प्रभू येशू, तुझ्यावरील श्रद्धेत आणि तुझ्या वचनात वाढत राहण्यास व तुझी सुवार्ता पसरविण्यास आम्हाला प्रेरणा व बळ दे, आमेन. 


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या