उपवासकाळातील पाचवा सप्ताह
शुक्रवार दि.३१ मार्च २०२३
✝️
माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे."
मुरानोचे संत डॅनियल
साधू (१४११)
✝️
संत डॅनियल हे एक जर्मन व्यापारी होते. व्यापारानिमित्ते ते अधूनमधून व्हेनिस शहराचा दौरा करीत असत. तिथेच ते मुरानो येथल्या भिक्षुकांच्या संपर्कात आले. त्या भिक्षुकांच्या जीवनपद्धतीमुळे आणि विचासरणीने ते इतके प्रभावित झाले की त्यांच्या सहवासात ते अधिक वेळ कसा घालविता येईल त्यासाठी धडपडू लागले आणि शेवटी त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचीच वैराग्याची वस्त्रे धारण करून ते एका साधूप्रमाणे आपल्या घरात राहू लागले.
संत डॅनियल हे आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. बराच वेळ ते प्रार्थनेमध्ये गढून गेलेले दिसत. साधुवृत्तीचा अंगिकार केल्यानंतर त्याने आपली सर्व धनदौलत विकून टाकली आणि व्हेनिस शहरातील कंगाल-गरीब लोकांची दयनीय स्थिती सुधारण्यासाठी त्याने आ पली रक्कम दान करून टाकली; परंतु त्याची ही दानशूरता पाहून १४११ झाली काही दरोडेखोरानी त्यांच्या राहत्या घरावर हल्ला केला व त्यांची निर्घृण हत्या केली.
✝️
✝️
पहिले वाचन : यिर्मया २०:१०-१३
वाचक यिर्मया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“पराक्रमी वीराप्रमाणे प्रभू माझ्याबरोबर आहे."
यिर्मया म्हणतो, “मी पुष्कळांना कुजबुजताना ऐकतो; चोहोकडे दहशत आहे! मला ठेच लागावी म्हणून टपणारे माझे सर्व इष्टमित्र म्हणतात की, “त्याच्यविरुद्ध गिल्ला करा! आपण त्याच्याविरुद्ध गिल्ला करू या !” “कदाचित तो फसेल, म्हणजे त्याच्याहून आपण प्रबळ होऊन त्याचा सूड उगवू," तरी पराक्रमी वीराप्रमाणे प्रभू माझ्याबरोबर आहे; म्हणून माझा छळ करणारे ठोकर खातील, ते प्रबळ होणार नाहीत ते शहाणपणाने वागले नाहीत म्हणून ते अत्यंत फजीत होतील. विसर न पडेल अशी त्यांची कायमची अप्रतिष्ठा होईल. तरी हे धार्मिकांचे सत्त्व पाहणाऱ्या, अंतर्याम व हृदय पारखणाऱ्या, सेनाधीश परमेश्वरा, तू त्याचा सूड घेशील तो मला पाहू दे; कारण मी आपली फिर्याद तुझ्यापुढे सादर केली आहे.
प्रभुपुढे गाणे गा; प्रभूचे स्तवन करा, कारण त्याने दुर्जनांच्या हातून दीनांचा बचाव केला आहे.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १८ : २-७
प्रतिसाद : मी संकटात प्रभूचा धावा केला आणि त्याने माझी वाणी ऐकली.
१) प्रभो, तू मला प्रिय आहेस,
तू माझे सामर्थ्य आहेस; प्रभू माझा दुर्ग,
माझा गड आहे, तू माझा उद्धारकर्ता आहेस.
माझा देव, माझा खडक आहे,
त्याचा आश्रय मी घेतो; तो माझे कवच,
माझ्या रक्षणाचे साधन आहे,
तो माझा उंच बुरुज आहे.
स्तुतिपात्र प्रभूचा मी धावा करतो.
तेव्हा शत्रूंपासून माझा बचाव होतो.
२ )मृत्यूच्या बंधनांनी मला जखडले;
नाशाच्या पुरांनी मला भिवविले;
अधोलोकांच्या बंधनांनी मला जखडले,
मृत्यूचे पाश माझ्यावर आले.
३) मी आपल्या संकटात प्रभूचा धावा केला;
माझ्या देवाला मी हाक मारली.
त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी एकेली;
माझी हाक त्याच्या कानी गेली.
जयघोष
बी हे देवाचा शब्द आहे, पेरणारा ख्रिस्त आहे. ज्याला ते सापडेल त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल
शुभवर्तमान योहान १०:३१-४२
वाचक : योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
पुन्हा यहुद्यांनी येशूला पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो त्याच्या हातातून निसटला "
यहुद्यांनी त्याला दगडमार करायला पुन्हा दगड उचलले. येशू त्यांना म्हणाला, “मी पित्याकडची पुष्कळशी चांगली कृत्ये तुम्हांला दाखवली आहेत; त्यातून कोणत्या कृत्यामुळे तुम्ही मला दगडमार करता ?” यहुद्यांनी त्याला उत्तर दिले “चांगल्या कृत्यासाठी आम्ही तुम्हांला दगडमार करत नाही, तर दुर्भाषणासाठी; कारण तुम्ही मानव असून स्वतःला देव म्हणवता." येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही देव आहा असे मी म्हणालो " हे तुमच्या शास्त्रात लिहिले नाही का? ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हटले (आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही), तर ज्याला पित्याने पवित्र कार्यास्तव नेमून जगात पाठवले त्या मला, “मी देवाचा पुत्र आहे" असे म्हटल्यावरून तुम्ही दुर्भाषण करता असे तुम्ही म्हणता काय? मी आपल्या पित्याची कृत्ये करीत नसल्यास माझ्यावर विश्वास ठेवू नका; परंतु जर मी ती करतो तर माझ्यावर विश्वास न ठेवला तरी त्या कृत्यांवर विश्वास ठेवा; अशासाठी की, माझ्यामध्ये पिता व पित्यामध्ये मी आहे हे तुम्ही ओळखून समजून घ्यावे." ते त्याला पुन्हा धरायला पाहू लागले; परंतु तो त्याच्या हाती न लागता निघून गेला. मग तो पुन्हा यार्देनच्य पलीकडे, योहान पहिल्याने बाप्तिस्मा करीत असे त्या ठिकाणी गेला व तेथे राहिला. तेव्हा त्याच्याकडे पुष्कळ लोक आले; ते म्हणाले, “योहानने काही चिन्ह केले नाही खरे, तरी योहानने ह्याच्याविषयी जे काही सांगितले ते सर्व खरे आहे" तेथे पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आपण पवित्र आठवड्याच्या जवळ येत आहोत, त्यामुळे दररोजची वाचने येशूला होत असलेल्या वाढत्या विरोधावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करीत आहेत. आजचे शुभवर्तमान येशूला मारण्यासाठी यहुदी दगड उचलतात या अत्यंत दुःखद नोंदीसह सुरू होते. तुमची हत्या करणार असलेल्या बेफाम जमावाला तुम्ही कसे तोंड देऊ शकता ? तथापि, येशू जमावाला संभाषणात गुंतवून घेतो आणि तो सुरक्षित जागी जातो. धार्मिक कट्टरता आपल्याला पूर्णपणे आंधळे आणि बहिरे बनवू शकते. यहुदी नेतृत्वाला त्यांच्या स्वतःच्या देवाच्या कल्पनेवर इतका विश्वास बसला होता की ते येशूने आणलेल्या प्रकटीकरणाची नवीनता ऐकण्यास तयार नव्हते. पुष्कळदा आपण सत्याकडे आंधळे आणि बहिरे बनतो आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी स्वतःला बंद करतो. ज्या देवाला आपल्यासमोर प्रकट करायच्या आहेत. सिनडॅलिटीवरील सिनडद्वारे, पोप फ्रान्सिस आपल्याला गैरसोयीची आणि अस्वस्थ सत्ये ऐकण्यासाठी आणि आपले मार्ग सुधारण्यासाठी आमंत्रित करीत आहेत. आपण तयार आहात का ?
प्रार्थना: - हे प्रभू येशू, तुला तारणारा मशीहा म्हणून स्वीकारण्यास व तुझी वचने आचरणात आणण्यास मला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या