Marathi Bible Reading |Thursday 30th March 2023 | 5th Week of Lent

 

उपवासकाळातील पाचवा  सप्ताह 

गुरुवार  दि.३० मार्च २०२३

✝️ 

“मी तुम्हांला सत्य सांगतो, जर कोणी माझे वचन पाळील त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही."


संत जॉन क्लिमॅकूस
•मठाधिकारी, वर्तनसाक्षी (५२५-६०६)

✝️ 

 जॉन क्लिमॅकूस ह्यांनी लिहिलेल्या साहित्यकृतीत “द लँडर टू पॅराडाईस” (पारादिसकडे जाणारा महामार्ग) हे पुस्तक अजरामर ठरलेले आहे. संत जॉन क्लिमॅकूस ह्यांच्या आडनावावरून ह्या पुस्तकाला आध्यात्मिकतेचा उच्चांक (क्लायमॅक्स) असे संबोधिले जाते. ही त्यांची साहित्यनिर्मिती अनेक भाषांमधून भाषांतरीत करण्यात आलेली आहे. संपूर्ण जगभरच्या ख्रिस्तसभेत प्रसिद्ध असलेला हा आध्यात्मिक वास्तूपाठ प्रभू येशूख्रिस्ताच्या जीवनावर आधारित ३० प्रकरणे भाविकांपुढे सादर करतो. दुर्गुणांचा परित्याग कसा करावा व सद्गुणांचा अंगिकार कसा करावा ह्याविषयी तो मार्गदर्शक ठरलेला आहे. हे सद्गुण - दुर्गुण समजून सांगताना दैनंदिन जीवनातील व ख्रिस्तसभेच्या इतिहासातील प्रेरणादायी प्रसंग व दाखले लेखकाने रंगवून वर्णन केलेले आहेत.
जॉन क्लिमॅकूस हे ३० मार्च ६०५ रोजी वयाच्या ८० व्या वर्षी मरण पावले. 

चिंतन : आपल्या प्रार्थनेसाठी मोठमोठ्या शब्दांची जंत्री जमविण्याचा प्रयत्न करू नका. एखाद्या बालकाचे बोबडे बोलही परमेश्वर पित्याला स्पष्टपणे समजू शकतात. संत जॉन क्लिमिकूस

✝️


✝️
 

पहिले वाचन : उत्पत्ती १७:३-९
वाचक   उत्पत्ती या पुस्तकातून घेतलेले वाचन
"तू राष्ट्रसमुहाचा जनक होशील."

अब्राम उपडा पडला आणि देव त्याच्याशी बोलला; तो म्हणाला, “पाहा, तुझ्याशी माझा करार हा आहे- तू राष्ट्रसमुहाचा जनक होशील. यापुढे तुला अब्राम म्हणणार नाहीत, तुला आब्राहाम असे म्हणतील; कारण मी तुला राष्ट्रसमुहाचा जनक केले आहे. मी तुला अती फलसंपन्न करीन; तुझ्यापसून मी राष्ट्र निर्माण करीन, तुझ्यापासून राजे उत्पन्न होतील. मी तुझा व तुझ्यामागे तुझ्या संतानाचा देव राहीन, असा निरंतरचा करार मी तुझ्याशी आणि तुझ्या पश्चात तुझ्या संतानाशी पिढ्यान्पिढ्या करीन. ह्या ज्या कनान देशात तू उपरा आहेस, तो सगळा देश मी तुला व तुझ्या पश्चात तुझ्या संतानाला कायमचा वतन म्हणून देईन आणि मी त्यांचा देव राहीन."
देव आब्राहामला आणखी म्हणाला, "आता तू आणि तुझ्या पश्चात तुझ्या संततीने पिढ्यान्पिढ्या माझा करार पाळावा."
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १०५ : ४-९
प्रतिसाद :  प्रभू आपला करार सदा आठवतो

१) प्रभूचा व त्याच्या सामर्थ्याचा शोध करा; 
त्याच्या दर्शनासाठी सतत आतुर असा 
त्याची अद्भुत कृत्ये, 
त्याचे चमत्कार त्याच्या तोंडचे निर्णय आठवा.

२) त्याचा सेवक आब्राहाम याचे वंशजहो, 
त्याचे निवडलेले याकोबचे वंशजहो, 
तो प्रभू आमचा देव आहे;
 साऱ्या जगावर त्याचीच न्यायसत्ता चालते.

३) तो आपला करार सदा आठवतो, 
म्हणजे हजारे पिढयांसाठी दिलेले अभिवचन पाळतो; 
तो करार त्याने आब्राहामशी केला, 
तो पाळण्याची इसहाकजवळ शपथ घेतली.


जयघोष  
आताच समय अनुकूल आहे. आजच तारणाचा दिवस आहे.


शुभवर्तमा योहान ८:५१-५९

वाचक : योहान  लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

'तुमचा बाप आब्राहाम माझा दिवस पाहण्यासाठी उल्हासित झाला. "

येशू यहुद्यांना म्हणाला, “मी तुम्हांला सत्य सांगतो, जर कोणी माझे वचन पाळील त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही." यहुदी त्याला म्हणाले, "तुम्हांला भूत लागले आहे हे आता आम्हांला कळले. आब्राहाम मेला संदेष्टेही मेले आणि तुम्ही म्हणता जर कोणी माझे वचन पाळील तर त्याला मरणाचा अनुभव कधीही येणार नाही. आमचा बाप आबाहाम मेला, त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे आहा काय? संदेष्टेही मेले! तुम्ही स्वतःला काय समजता ?" येशूने उत्तर दिले, “मी माझे स्वतः चे गौरव केले तर ते माझे गौरव काहीच नाही; माझे गौरव करणारा माझा पिता आहे, तो आमचा देव आहे असे तुम्ही त्याच्याविषयी म्हणता तरी तुम्ही त्याला ओळखले नाही; मी त्याला ओळखतो आणि मी त्याला ओळखत नाही असे जर मी म्हणेन तर मी तुमच्यासारखा लबाड ठरेन; पण मी त्याला ओळखतो व त्याचे वचन पाळतो. तुमचा बाप आब्राहाम माझा दिवस पाहण्यासाठी उल्हासित झाला; तो त्याने पाहिला आणि त्याला हर्ष झाला." तेव्हा यहुदी त्याला म्हणाले, "तुम्हाला अजून पन्नास वर्षे झाली नाहीत आणि तुम्ही आब्राहामला पाहिले आहे काय ?" येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हांला खरे तेच सांगतो, आब्राहामचा जन्म झाला त्यापूर्वी मी आहे." ह्यावरून त्यांनी त्याला मारण्याकरता दगड उचलले; परंतु येशू मंदिरातून गुप्तपणे निघून गेला.

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:  आजचे वाचन विश्वासाचा पिता अब्राहामाबद्दल आहे. देवाने त्याला नीतिमान मानले कारण त्याचा देवावर पूर्ण विश्वास होता आणि तो देवाच्या इच्छेला अत्यंत आज्ञाधारक होता. आजच्या पहिल्या वाचनात सात वचने आहेत. पहिल्या सहा वचनांत आपण अब्राहामावर देवाने केलेल्या विपुल आशीर्वादांबद्दल ऐकतो. देव त्याला खूप उंच करतो. केवळ शेवटच्या वचनात आपण देवाने अब्राहामावर केलेल्या मागणीबद्दल ऐकतो. अब्राहामाचे हे उदाहरण स्पष्टपणे दर्शवते की, कृपा आपण केलेल्या विनंती अगोदर आहे. प्रथम देव आपल्याला भरपूर भेटवस्तू देतो, नंतर तो आपल्याला कार्ये देतो जेणेकरून आपण आपल्या भेटवस्तूंचा रचनात्मकपणे उपयोग करू शकू. अनेकदा आपण विचार करतो की, देव खूप मागणी करत आहे आणि आपण काही नियम आणि नियमांचे पालन करावे अशी त्याची इच्छा आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे की, देव आपल्याकडून अपेक्षा करतो म्हणून तो आपल्याला भरपूर कृपा आणि भेटवस्तू देतो. परमेश्वराने आपल्यावर केलेल्या कृपादानाचा उपयोग परमेश्वराचे कार्य करण्यासाठी करूया.

प्रार्थना: - हे प्रभू येशू तुझ्या वचनांचे सर्वदा ध्यान करण्यास व तुझी स्तुती गाण्यास मला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या