Marathi Bible Reading |Wednesday 29th March 2023 | 5th Week of Lent

 

उपवासकाळातील पाचवा  सप्ताह 

बुधवार  दि. २९ मार्च २०२३

✝️ 

तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील." 


✝️

शद्रख, मेशख आणि अबेदनगो हे परमेश्वराचे खरे भक्त त्यांना जळत्या भट्टीत  टाकण्यात आले परंतु देवाच्या दुताने त्यास सुरक्षितपणे वाचविले. सत्य कधीच नष्ट होत नाही. परमेश्वर सत्य आहे आणि ह्याच सत्यावर विश्वास ठेवून अब्राहम वतन भूमिच्या शोधात प्रवासाला निघाला होता. सत्याच्या मार्गावरून जात असताना तो स्थिर होता कारण परमेश्वर त्याच्या सोबत होता.  त्याने सत्य स्वीकारुन श्रद्धेचा प्रवास केला. यहुद्यांनी येशूला देवपुत्र म्हणून स्वीकारावयास व त्याची शिकवण देवपित्यापासून आहे हे सुद्धा स्वीकारण्यास नकार दिला होता. तसेच यहुदी येशूचा घात करावयास पाहत होते. अशावेळी प्रभूने त्यांना सांगितले की, 'सत्य तुम्हाला समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील.  खरे ख्रिस्तीपण देवाची वचने आत्मसात करुन त्याप्रमाणे आचरण करण्यात आहे. ख्रिस्त प्रभू तारणारा आहे हे शाश्वत सत्य आहे व तो सर्व प्रकारच्या बंधनातून आम्हाला मुक्ती देणारा प्रभू आहे. प्रभू येशू स्वत: म्हणाला आहे की, 'मार्ग, सत्य व जीवन मीच आहे.'
✝️
 

पहिले वाचन : दानिएल ३:१४-२०, २४-२५.२८
वाचक   दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन

“देवाने आपला दिव्य दूत पाठवून आपल्या सेवकांना सोडवले. "

नबुखद्नेस्सर म्हणाला, “अरे शद्रखा, मेशखा अबेद्नगो, तुम्ही माझ्या देवांची उपासना करत नाही व मी स्थापलेल्या सुवर्णमूर्तीची पूजा करत नाही, असे तुम्ही मुद्दाम करता काय? आता शिंग, बासरी, सतार, सारंगी, वीणा, पुंगी वगैरे वाद्यांचा ध्वनी ऐकताच मी केलेल्या मूर्तीपुढे तुम्ही साष्टांग दंडवत घातले तर बरे; नाही घातले तर तुम्हांला धगधगीत अग्नीच्या भट्टीत ताबडतोब टाकण्यात येईल; माझ्या हातातून तुम्हांला सोडवील असा कोणता देव आहे ?” शद्र्ख, मेशख् व अबेनगो यांनी राजाला उत्तर दिले “महाराज, या बाबतीत आपणाला उत्तर देण्याचे आम्हांला प्रयोजन दिसत नाही. ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हांला धगधगीत भट्टीतून सोडवावयाला समर्थ आहे; महाराज, तो आम्हांला आपल्या हातातून सोपवील. ते कसेही असो, पण महाराज, हे आपण पक्के समजा आम्ही आपल्या -दैवतांची उपासना करणार नाही आणि आपण स्थापलेल्या सुवर्णमूर्तीला दंडवत घालणार नाही." हे ऐकून नबुखद्नेस्सर संतापला; शद्रख, मेशख व अबेनगो यांच्या संबंधाने त्याची मुद्रा पालटली आणि त्याने आज्ञा केली की, भट्टी नेहमी पेक्षा सातपट तप्त करा. मग त्याने आपल्या सैन्यातील काही बलिष्ट पुरुषांना आज्ञा केली की शद्रख, मेशख व अबेनगो यांच्या मुसक्या बांधून त्यांना त्या तप्त अग्नीच्या भट्टीत टाका. नंतर नबुखद्नेस्सर राजा चकित होऊन पटकन उठला तो आपल्या मंत्र्यांस म्हणाला “आपण अग्नीत तिघा जणांना बांधून टाकले ना?" त्यांनी राजाला उत्तर केले, “होय सरकार, खरे आहे" तो म्हणाला, “पाहा, चार इसम अग्नीत मोकळे फिरत आहेत असे मला दिसते, त्यांस काहीएक इजा पोहोचली नाही; चौथ्याचे स्वरूप तर एखाद्या देवपुत्रासारखे आहे. 
तेव्हा नबुखद्नेस्सर म्हणाला, “शद्रख, मेशख व अबेनगो यांनी आपल्या देवावर भाव ठेवला, राजाचा शब्द मोडला, आपल्या देवाखेरीज अन्य देवाची सेवा व उपासना करायची नाही म्हणून त्यानी आपले देह अर्पिले; त्यांना त्याच्या देवाने आपला दिव्यदूत पाठवून सोडवले आहे; त्याला धन्यवाद !”
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.

प्रतिसाद स्तोत्र  दानिएल ६:५२-५६
प्रतिसाद :  प्रभो, तुझा सदासर्वदा गौरव असो.

१) हे प्रभो, आमच्या पूर्वजांच्या परमेश्वरा, 
तू धन्य आहेस तुझा सदासर्वदा गौरव असो.
तुझे महिमामय पवित्र नाम धन्य असो.
तुझा सदासर्वदा गौरव असो.

२ ) तू आपल्या वैभवशाली मंदिरात धन्य आहेस. 
तुझा सदासर्वदा गौरव असो.

३ ) तू आपल्या राजसिंहासनावर धन्य आहेस..
तुझा सदासर्वदा गौरव असो.

४ ) खोलवर दृष्टी टाकणाऱ्या प्रभो, तू धन्य आहेस.
तुझा सदासर्वदा गौरव असो. 

५) स्वर्गीय निवासस्थानी तू धन्य आहेस.
तुझा सदासर्वदा गौरव असो.


जयघोष  
प्रभू म्हणतो, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही."


शुभवर्तमा योहान ८:३१-४२

वाचक : योहान  लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

'जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखुरे बंधमुक्त व्हाल "

ज्या यहुद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहा; तुम्हांला सत्य समजेल व सत्य तुम्हांला बंधमुक्त करील." ते त्याला म्हणाले, "आम्ही आब्राहामचे वंशज आहो व कधीही कोणाच्या दास्यात नव्हतो. तर तुम्ही बंधमुक्त व्हाल असे तुम्ही कसे म्हणता ?"

येशूने त्यांना उत्तर दिले, “मी तुम्हांला नक्की सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदासर्वदा राहत नाही; पुत्र सदासर्वदा राहतो. ह्यास्तव जर पुत्र तुम्हांला बंधमुक्त करील तर तुम्ही खरेखरे बंधमुक्त व्हाल. तुम्ही आब्राहामचे वंशज आहा हे मला ठाऊक आहे; तरी तुम्हांमध्ये माझ्या वचनाला जागा नाही, म्हणून तुम्ही मला जिवे मारायला पाहता. मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो. तसेच तुम्ही आपल्या पित्यापासून जे ऐकले ते करता."त्यांनी त्याला उत्तर दिले, “आमचा पिता आब्राहाम आहे." येशू त्यांना म्हणाला, "तुम्ही आब्राहामची मुले आहा तर तुम्ही आब्राहामची कृत्ये करा; परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हांला सांगितले त्या मनुष्याला म्हणजे मला तुम्ही आता जिवे मारायला पाहता; आब्राहामने असे केले नाही. तुम्ही आपल्या पित्याची कृत्ये करता" ते त्याला म्हणाले, "आमचा जन्म व्यभिचारापासून झाला नाही; आम्हांला एकच पिता म्हणजे देव आहे." येशूने त्यांना म्हटले, "देव जर तुमचा पिता असता तर तुम्ही माझ्यावर प्रीती केली असती, कारण मी देवापासून निघालो व आलो आहे; मी आपण होऊन आलो नाही तर त्यानेच मला पाठवले आहे.

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन:  गुलामगिरी कायद्याने संपुष्टात आली असली तरी, अनेक व्यक्ती स्वेच्छेने गुलामगिरीच्या जाचक प्रयेमध्ये प्रवेश करताना आजही दिसतात. गुलामगिरीचे विविध प्रकार आहेत : आर्थिक, राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, भावनिक इत्यादी. आर्थिक, राजकीय व सामाजिक गुलामगिरी पाहिली जाऊ शकते आणि अशा गुलामगिरीविरुद्ध कायद्याच्या न्यायालयात लढा देऊ शकतो. तथापि, आध्यात्मिक, मानसिक आणि भावनिक गुलामगिरी अदृश्य आहे. अशा गुलामगिरीशी आतून लढावे लागते. आध्यात्मिक आणि भावनिक गुलामगिरीशी स्वतःहून लढणे कठीण आहे. म्हणूनच परमेश्वर त्याच्या पुत्राच्या रूपाने आपल्याला मदत करतो. आपल्याला मुक्त करण्यासाठी पुत्राकडे शक्ती आणि संसाधने आहेत. ज्याप्रमाणे एक सल्लागार किंवा मार्गदर्शक आपल्याला आपल्या भावनिक गुलामगिरीतून मुक्त होण्यास मदत करू शकतो, त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताची कृपा आपल्याला पापाच्या आध्यात्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्यास मदत करते. आपल्या जीवनात प्रेम, आनंद, शांती, संयम, दयाळूपणा, सौम्यता, उदारता, विश्वासूपणा आणि आत्मसंयम यांचा अभाव हे पापाच्या आध्यात्मिक गुलामगिरीचे निश्चित लक्षण आहे. या जुलमी गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी आपण येशूची मदत घेऊ या.

प्रार्थना: हे प्रभू येशू, तुझ्या शब्दाप्रमाणे आचरण करण्यास व तुला सर्वस्वी तारणारा म्हणून स्वीकारण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या