Marathi Bible Reading |Tuesday 28 th March 2023 | 5th Week of Lent

 

उपवासकाळातील पाचवा  सप्ताह 

मंगळवार दि. २८ मार्च २०२३

✝️ 

जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हांला समजेल की, तो मी आहे



संत सिक्स्ट्स तिसरे

परमगुरू (४४०)

✝️
 

पहिले वाचन : गणना २१:४-९
वाचक   गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले तर तो जगेल."

होर डोंगरापासून कूच करून अदोम देशाला वळसा घालून जाण्यासाठी त्यांनी तांबड्या समुद्राकडचा मार्ग धरला; त्या वाटेत लोकांचे मन अधीर झाले. ते परमेश्वराविरुद्ध व मोशेविरुद्ध बोलू लागले “तुम्ही आम्हांला इजिप्त देशातून काढून ह्या रानात मरायला कशाला आणले? येथे तर अन्न नाही व पाणीही नाही आणि ह्या हलक्या अन्नाला आम्ही कंटाळलो आहो." तेव्हा परमेश्वराने लोकांमध्ये आग्ये साप पाठवले; त्याच्या दंशाने इस्राएलतील बरेच लोक मेले. हे पाहून लोक मोशेकडे येऊन म्हणाले, “परमेश्वराविरुद्ध व तुझ्याविरुद्ध बोलण्याचे पाप आम्ही केले आहे; तेव्हा हे साप आमच्यामधून काढून टाकण्यासाठी परमेश्वराची प्रार्थना कर." तेव्हा मोशेने लोकांसाठी प्रार्थना केली. परमेश्वर मोशेला म्हणाला, “आग्या सापाची एक प्रतिमा करून झेंड्याच्या खांबावर टांग म्हणजे सर्पदंश झालेल्या कोणा माणसाने त्याच्याकडे पाहिले तर तो जगेल. मग मोशेने पितळेचा एक साप बनवून टांगला; तेव्हा सर्पदंश झालेल्या कोणी त्या पितळेच्या सापाकडे पाहिले म्हणजे तो जगत असे.”
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १०२:२-३,१६-२१
प्रतिसाद : प्रभो, माझी प्रार्थना ऐक

१) प्रभो, माझी प्रार्थना ऐक 
संकटकाळी तुझा चेहरा माझ्या नजरेआड होऊ देऊ नकोस.
माझी हाक तुला ऐकू येवो. 
माझ्याकडे लक्ष दे; मी तुझा धावा करीन
 त्या दिवशी मला लवकर उत्तर दे.

२) राष्ट्रांना प्रभू नावाचा धाक वाटेल. 
भूतलावरील राजांना तुझ्या ऐश्वर्याची धास्ती बसेल;
 प्रभू सियोन पुन्हा उभारील,
 तेव्हा तो आपल्या ऐश्वर्यासह प्रकट होईल. 
निराश्रितांच्या प्रार्थनेकडे तो लक्ष देतो;
 त्याची याचना तो धुडकावून लावीत नाही.

३ )पुढच्या पिढीसाठी हे लिहून ठेवले जाईल,
म्हणजे पुढे जन्माला येणारे प्रभूचे स्तवन करतील; 
कारण उंचावरील आपल्या पवित्रस्थळावरून 
प्रभूने डोकावले.त्याने स्वर्गातून पृथ्वीकडे नजर टाकली; 
बंदीजनांचे कण्हणे ऐकून त्याला मरणाच्या दाढेत
पडलेल्यांची सुटका करायची होती.


जयघोष  

प्रभू म्हणतो, "मीच जगाचा प्रकाश आहे. 
जो मला अनुसरतो त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील"



शुभवर्तमा योहान ८:२१-३०

वाचक : योहान  लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हाला समजेल की, तो मी आहे. "

येशू परुशी लोकांना म्हणाला, “मी निघून जातो आणि तुम्ही माझा शोध कराल व तुम्ही आपल्या पापात मराल; मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही." ह्यावर यहुदी म्हणाले, “मी जेथे जातो तेथे तुम्ही येऊ शकत नाही." असे हा म्हणतो, ह्यावरून हा आत्महत्या तर करणार नाही ना? तो त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहे, मी वरचा आहे; तुम्ही ह्या जगाचे आहात, मी ह्या जगाचा नाही. ह्यामुळे मी तुम्हांस सांगितले की, तुम्ही आपल्या पापात मराल; कारण मी तो आहे असा विश्वास तुम्ही न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल. ह्यावरून ते त्याला म्हणाले. तुम्ही कोण आहा?" येशू त्यांना म्हणाला, “पहिल्यापासून तुम्हांला मी जे सांगत आहे ते हेच नाही का ? मला तुम्हांविषयी पुष्कळ बोलायचे आहे व न्यायनिवाडा करायचा आहे; परंतु ज्याने मला पाठवले तो खरा आहे आणि ज्या गोष्टी मी त्याच्यापासून ऐकल्या त्या मी जगाला सांगतो." तो आपल्याबरोबर पित्याविषयी बोलत आहे हे त्याला समजले नाही. ह्यास्तव येशूने त्यांना म्हटले “जेव्हा तुम्ही मनुष्याच्या पुत्राला उंच कराल तेव्हा तुम्हांला समजेल की, तो मी आहे आणि मी आपण होऊन काही करीत नाही तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो. ज्याने मला पाठवले तो माझ्याबरोबर आहे; त्याने मला एकटे सोडले नाही, कारण जे त्याला आवडले ते मी सर्वदा करतो." तो ह्या गोष्टी बोलत असता पुष्कळ लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: दूरवरच्या प्रवासामुळे इस्राएली लोकांचे मन अधीर झाले आणि त्यांनी परमेश्वर व मोशेविरुद्ध कुरकुर आणि बडबड सुरू केली. तेव्हा परमेश्वराने त्यांच्यामध्ये विषारी साप पाठवून त्यांना शिक्षा केली. इस्राएली लोकांना त्यांची चूक कळली आणि त्यांनी मोशेला त्यांच्या वतीने मध्यस्थी करण्यास सांगितले. जरी मोशे पूर्वी इस्राएली लोकांच्या टीकेचा विषय होता, तरी खऱ्या नेत्याप्रमाणे त्याने लोकांप्रती काळजी व्यक्त केली आणि त्यांच्यासाठी मध्यस्थी केली. परमेश्वराने त्याला सापाची एक प्रतिमा करून खांबावर टांगविण्याचे निर्देश दिले. जुन्या करारातील खांबावरील साप व नवीन करारातील वधस्तंभावरील येशूख्रिस्त तारणाचे प्रतीक आहेत. मृत्यूचे प्रतीक साप ज्याप्रमाणे इस्त्रायल जनतेसाठी जीवनाचे प्रतीक बनले त्याचप्रमाणे क्रूस हे अत्याचार, अमानुषपणा व मृत्यूचे प्रतीक ख्रिस्ताच्या क्रुसावरील मरणाने आपणासाठी विजय आणि जीवनाचे प्रतीक बनले. जेव्हा आपण पश्चात्ताप करतो आणि परमेश्वराकडे वळतो, तेव्हा तो आपल्यातील नकारात्मक भावनांना व विचारांना सकारात्मकतेत बदलतो.

प्रार्थना:प्रभू येशू, आमच्या जीवन पथावरील मार्गदर्शका, आमच्या प्रभो, तुझ्या सहवासाचा अनुभव घेऊन तो इतरांना देण्यास आम्हाला प्रेरणा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या