Marathi Bible Reading |Monday 27th March 2023 | 5th Week of Lent

 

उपवासकाळातील पाचवा  सप्ताह 

सोमवार दि. २७ मार्च २०२३

✝️ 

"तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा." 



इजिप्तचे संत जॉन  
(मठवासी ) ३००-३९४
वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत संत जॉन ह्यांनी आपल्या वडिलांबरोरबर सुतारकीचा व्यवसाय केला. पवित्र जीवन जगण्यासाठी तो अरण्यात एकांतवासात निघून गेला.  आता आपला आत्मा आणि परमेश्वर असा एकच ध्यास त्याला लागलेला होता. त्यामुळे उर्वरित ५० वर्षांच्या आयुष्यात त्याने एकाही स्त्रीचे तोंड पाहिले नाही. क्वचितच तो एखाद्या माणसाची भेट घेई. त्याच्या ह्या कर्तव्य व जागृत मनोवृत्तीमुळे देवाने त्याला तीन दानांची देणगी दिली, १) जे कोणी त्याच्या सहवासात असत त्यांना निरामय आनंद आणि प्रसन्नता ह्याचा जवळून अनुभव येई. २) आपल्या धर्माधिकाऱ्यांशी तो अत्यंत आदराने व आज्ञाधारकपणे वागत असे. ३) निर्मात्याच्या ध्यासानेही त्याने त्याज्य मानलेल्या निर्मित वस्तूंवर त्याला विशेष अधिकार देण्यात आलेला होता. सैतान सतत जॉनला मोहात पाडण्याचा प्रयत्न करी परंतु जॉन आणखी मोठ्या प्रमाणात प्रार्थना करीत राही. देवाशी दीर्घकाळ संवाद साधल्यामुळे त्याला रोग बरे करण्याची आणि संदेश देण्याची अद्भुत शक्ती लाभलेली होती. जे त्याच्याकडे सल्ला मागण्यासाठी येत असत त्यांच्याशी ते आठवड्यातून दोन वेळा एका खिडकीतून बोलत असत.  आजारी लोकांसाठी तेलाला आशीर्वाद देत असत व येणाऱ्या भावी गोष्टींची पूर्वसूचना लोकांना देत असत.  राजा थिओडोसियस ह्यांना तर संत जॉन ह्यांनी त्याच्या भावी विजयाविषयी आणि मरणाच्या वेळेविषयी पूर्वकल्पना दिली होती. आपल्या जीवनातील अखेरचे तीन दिवस जॉन संपूर्णपणे देवाच्या सहवासात होते. तिसऱ्या दिवशी ते गुडघे टेकून प्रार्थना करीत असतानाच देवाच्या अधीन झाले. इ. स. ३९४ साली वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांना सुखाचे मरण आले.
✝️
 

पहिले वाचन : दानियेल  १३:१-९,१५-१७, १९-३०,३३-६२
वाचक :दानिएल या पुस्तकातून घेतलेले वाचन
 “मी काहीच गैर केले नाही; तरी मला मेले पाहिजे. "

जोकीम नावाचा एक मनुष्य बाबिलोनमध्ये राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव सुसन्ना होते. ती हिलकियाची मुलगी होती. ती अत्यंत सुंदर व प्रभूभक्त होती. तिचे आईवडील सज्जन होते. त्यांनी मोशेच्या आज्ञांप्रमाणे तिला शिक्षण दिले होते. जोकीम फार श्रीमंत होता. त्याच्या घराला लागूनच त्याचा भव्य असा बगीचा होता. यहुदी लोक त्याच्याकडे भेटीला येत असत. तो त्याच्यातला अधिक प्रतिष्ठित असा होता. त्या वर्षी लोकांमधून दोन वडीलजन न्यायाधीश म्हणून नेमले होते. त्यांच्याविषयी प्रभूने असे म्हटले होती, “बाबिलोनमध्ये या नेत्यांपासून अधर्म सुरू झाला. ते न्यायाधीश होते परंतु जनतेचे राज्य सांभाळण्याचे ढोंग करीत होते." ही माणसे पुष्कळ वेळा जोकीमच्या घरी असत व ज्यांच्या फिर्यादी होत्या. ते तेथे त्याच्याकडे येत..
जेव्हा लोक दुपारी निघून जात तेव्हा सुसन्ना आपल्या पतीच्या बागेत फिरायला जात असे. ते दोघे वडीलजन तिला रोज बागेत इकडे तिकडे फिरताना पाहात असत. त्यांना तिच्या सहवासाची इच्छा होऊ झाली. त्याचे मन इतके विकृत झाले की, त्यांनी स्वर्गाकडील आपली दृष्टी फिरवून नैतिकतेचे सर्व नियम झुगारून दिले. ते योग्य संधीची वाटच पाहत होते; तोच असे झाले की, सुसन्ना दोन नोकराणींबरोबर आपल्या सवयीप्रमाणे बागेत गेली त्या दिवशी फार गरम होत होते. म्हणून तिला आंघोळ घ्यावीशी वाटली. त्या दोन वडीलजनांशिवाय तिकडे कोणीही नव्हते. ते लपून तिच्याकडे पाहात होते. तिने आपल्या नोकराणींना सांगितले, "माझ्यासाठी तेल आणि सुगंधी द्रव्ये आणा आणि बागेचे फाटक बंद करा म्हणजे मला आंघोळ करता येईल."
नोकराणी बाहेर जाताच ते दोघे वडीलजन उठून सुसन्नाच्या जवळ धावत गेले आणि तिला म्हणाले, "पहा, फाटकाचा दरवाजा बंद आहे; कोणीही आपल्याला पाहत नाही; आम्ही तुझ्यावर आसक्त झालो आहोत; आमच्याबरोबर प्रणय कर. नाहीतर तुझ्या विरुद्ध आम्ही अशी साक्ष देऊ की, कोणी युवक तुझ्याबरोबर होता आणि म्हणून तू आपल्या नोकराणींना बाहेर पाठवलेस."
सुसनाने उसासा टाकून म्हटले, "मला कोणताच मार्ग दिसत नाही. जर मी तुमच्या म्हणण्याप्रमाणे केले तर मी प्राणदंडास योग्य ठरेन; तर मी नकार दिला तर तुमच्या तावडीतून सुटणार नाही. तरी देखील परमेश्वरासमोर पाप करण्यापेक्षा तुमच्या तावडीत निर्दोषी सापडणे मी पसंत करीन."
त्यानंतर सुमन्ना मोठ्या आवाजात ओरडू लागली, परंतु ते दोघे वडीलजन तिच्या विरुद्ध ओरडू लागले. त्यांच्यापैकी एकाने धावत जावून बागेचे फाटक उघडले. त्यावेळी घरातल्या नोकरवर्गाने बागेत ओरडण्याचा आवाज ऐकला, आणि सुसनाला काय झाले हे पाहण्यासाठी ते धावत आले व बाजूच्या दरवाजाने बागेत गेले. जेव्हा वडीलजनांनी आपली हकिकत सांगितली, तेव्हा नोकरांना मोठा धक्का बसला; कारण सुसत्रावर अशा प्रकारचा आरोप कधीच कुणी केला नव्हता.
दुसऱ्या दिवशी जेव्हा सर्व लोक तिचा पती जोकीम याचेकडे एकत्र जमले तेव्हा ज्या दोन दुष्ट वडोलजनांनी सुसनाला प्राणदंड देण्याचे कुभांड रचले होते, ते तेथे आले आणि त्यांनी लोकांसमोर सांगितले, "हिलकियाची मुलगी, जोकीमची पत्नी सुसन्नाला बोलावून आणा." लोकांनी तिला बोलावून आणले. ती आपले आई-वडील, आपली मुले तसेच आपले सर्व आप्तजन यांच्या समवेत तेथे आली. तिचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार व जेवढयांनी तिला पाहिले होते ते सर्वच्या सर्व रडत होते. त्या दोन वडीलजनांनी सभेमध्ये उभे राहून तिच्या डोक्यावर आपले हात ठेवले. ती रडत स्वर्गाकडे पाहत राहिली. तिने परमेश्वरावर विश्वास ठेवला होता. वडीलजनांनी सांगितले, “जेव्हा आम्ही एकटेच बागेत फिरत होतो, तेव्हा ही दोन नोकराणींबरोबर बागेत आली; हिने बागेचे फाटक बंद केले आणि नोकराणींना बाहेर पाठवले. तेव्हा लपून राहिलेला एक तरुण जवळ येऊन तिच्याबरोबर झोपला. आम्ही बागेच्या एका कोपऱ्यातून हे पाप पाहून धावत त्याच्याजवळ गेलो आणि आम्ही दोघांना प्रणय करताना पाहिले. आम्ही त्या तरुणाला पकडू शकलो नाही, कारण तो आमच्याहून बलवान होता; बागेचे फाटक उघडून तो पळून गेला. आम्ही हिला पकडले व विचारले की, तो युवक कोण आहे? परंतु तिने त्याचे नाव सांगायचे नाकारले. आम्ही या गोष्टींना साक्षी आहोत." सभेने त्यांच्यावर विश्वास ठेवला, कारण ते लोकांचे नेते आणि न्यायाधीश होते.
(लोकांनी सुसन्नाला प्राणदंडाची शिक्षा फर्मावली. यावर सुसन्नाने मोठ्या आवाजात ओरडून म्हटले, “हे शाश्वत परमेश्वरा, तू सर्व रहस्ये आणि भविष्यात होणाऱ्या गोष्टी जाणून असतोस; तू जाणतोस की, यांनी माझ्याविरुद्ध खोटी साक्ष दिली आहे. यांनी ज्या वाईट गोष्टींचा माझ्यावर आरोप केला आहे. त्यातली एकदेखील खरी नाही! तरीही मला मरणे भाग आहे."
परमेश्वराने तिचा आक्रोश ऐकला. जेव्हा लोक तिला प्राणदंडासाठी नेत होते, तेव्हा परमेश्वराने दानिएल नावाच्या तरुणात एक दिव्य प्रेरणा उत्पन्न केली. तो ओरडून सांगू लागला, मी हिच्या रक्ताबद्दल दोषी नाही."
यावर सर्व लोक त्याच्याकडे पाहू लागले आणि म्हणाले, "तुझ्या बोलण्याचा अर्थ काय आहे ?" त्याने त्यांच्याकडे उभे राहून म्हटले "हे इस्राएली लोकांनो, तुमची बुद्धी कोठे आहे ? तुम्ही चौकशी न करता आणि संपूर्ण माहिती न मिळवता इस्राएलच्या मुलीचा वध का करत आहात? तुम्ही सर्व न्यायालयात परत जा. कारण ह्यांनी हिच्याविरुद्ध खोटी साक्ष दिली आहे."
यावर लोक लगेच माघारी फिरले आणि वडीलजनांनी दानिएलला सांगितले, "या, आमच्यामध्ये बसा आणि आपली माहिती द्या, कारण परमेश्वराने आपल्याला अधिकार प्रदान केला. आहे." दानिएलने त्यांना उत्तर दिले, "या दोघांना एकदुसऱ्यापासून अलग करा आणि मग मी यांची चौकशी करीन." दोघांना वेगळे केले गेले, तेव्हा दानिएलने एकाला बोलावून म्हटले, "अधर्म करून तुझे केस पिकले, आता तुला जुन्या पापांचा दंड मिळणार आहे. तू निर्दोषी लोकांना दंडपात्र ठरवून व दोषी लोकांना निर्दोष सोडून खोटा न्याय देत होतास; प्रभूने तर म्हटले आहे, तुम्ही निर्दोष आणि धार्मिकांना प्राणदंड देऊ नका. जर तू तिला पाहिले, तर मला सांग की, कोणत्या झाडाखाली दोघांना तू एकत्र प्रणय करताना पाहिलेस?" त्याने उत्तर दिले, "बाभुळाच्या झाडाखाली." दानिएल म्हणाला, "ठीक आहे! एवढे मोठे खोटे सांगून तू आपले प्राण गमावून बसला आहेस, कारण परमेश्वराच्या दुताला परमेश्वराकडून असा आदेश मिळाला आहे की, त्याने त्वरित तुझे दोन तुकडे करावेत. "
नंतर दानिएलने त्याला घेऊन जाण्याची आज्ञा केली व दुसऱ्याला बोलवायला सांगितले आणि त्याला म्हटले, "तू यहुदाचा नव्हे तर कनानची संतती आहेस. सौंदर्याने तुला पतभ्रष्ट केले आणि वासनेने तुझे हृदय दूषित झाले आहे. तुम्ही लोक इस्राएलच्या मुलींबरोबर अशा प्रकारचे व्यवहार करीत होते आणि त्या भीतीने तुमची इच्छा मान्य करीत होत्या; परंतु ही यहुदाची मुलगी आहे, तिने अधर्माच्या समोर आपली मान वाकवली नाही. तर मला सांग तू कुठल्या वृक्षाखाली दोघांना एकत्र प्रणय करताना पाहिलेस?" त्याने उत्तर दिले, "ओकच्या झाडाखाली" यावर दानिएल म्हणाला, "ठीक आहे! तू पण एवढे मोठे खोटे बोलून आपला जीव गमावला आहेस, परमेश्वराचा दूत हातात तरवार घेऊन तुझी वाट पहात आहे; तो तुझे दोन तुकडे करील आणि तुम्हा दोघांचा सर्वनाश करील."
तेव्हा सर्व लोक मोठ्या आवाजात जयजयकार करून परमेश्वराला धन्यवाद देऊ लागले की, जो परमेश्वरावर विश्वास ठेवतो त्याचे तो संरक्षण करतो, दानिएलने त्याच्या मुखातून निघालेल्या शब्दांतूनच त्या दोन वडीलजनांची साक्ष खोटी ठरवून दाखवली. लोक त्यांच्यावर तुटून पडले आणि त्यांनी मोशेच्या आज्ञेप्रमाणे त्या दोन दुष्टांना दंड केला, तो दंड ते आपल्या शेजाऱ्याला देऊ इच्छित होते. लोकांनी दोघांना मृत्युदंड दिला. अशाप्रकारे त्या दिवशी निर्दोषी सुसन्नाचा बचाव झाला.
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  २३:१-६
प्रतिसाद : प्रभो, तू माझा सांगाती आहेस.

१ ) प्रभू माझा मेंढपाळ आहे; 
मला कशाची कमतरता नाही. 
तो मला हिरव्या कुरणात विसावू देतो. 
तो मला प्रशांत जलाशयाकडे नेतो. 
तो मला नवजीवन देतो.

२)आपल्या गौरवासाठी तो मला सन्मार्ग दाखवतो. 
मृत्यूछायेच्या दरीतून जरी मी जात असलो 
तरी कुठल्याही संकटाला मी भिणार नाही, 
कारण तू माझा सांगाती आहेस. 
तुझा सोटा व तुझी काठी मला धीर देतात.

३) माझ्या शत्रूंच्या देखत तु माझ्यासाठी मेजवानी करतोस.
 तू माझ्या डोक्याला तेल लावून 
आशीर्वादित केले आहेस. माझा पेला ओसंडत आहे.

४ खरेच, आयुष्यभर मला सुखाचे व 
प्रेमाचे दिवस लाभतील आणि 
प्रभूच्या निवासस्थानी मी निरंतर राहीन..


जयघोष  
प्रभो, तुझे शब्द आत्मा व जीवन आहेत.
तुझ्यापाशी शाश्वत जीवनाचे शब्द आहेत.



शुभवर्तमा योहान ८:१-११

वाचक : योहान  लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

“तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड मारावा.

येशू जैतुनाच्या डोंगरावर गेला. नंतर पहाटेस तो पुन्हा मंदिरात आला तेव्हा सर्व लोक त्याच्याकडे आले आणि तो बसून त्यांना शिकवू लागला. त्यावेळी व्यभिचार करीत असताना धरलेल्या एका स्त्रीला शास्त्री व परुशी ह्यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले "गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता ?" त्याला दोष लावावयाला आपणांस काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरिता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओणवून बोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एकसारखे विचारीत असता ते उठून त्यांना म्हणाला, "तुम्हांमध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा." मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून ते थेट शेवटल्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले; नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला; “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही का ?" ती म्हणाली “प्रभो, कोणी नाही." तेव्हा येशू तिला म्हणाला, “मीही तुला दंड ठरवत नाही; जा, ह्यापुढे पाप करूं नको."

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: गुरुजी (ग्रीक भाषेत “didaskalos”) है निदर्शक योहानाच्या शुभवर्तमानात येशूसाठी सात वेळा वापरले आहे. येशूचे शिष्य त्याला रब्बी (१:३८) म्हणतात आणि मरीया मग्दालीया त्याला रब्बूनी (२०:१६) म्हणते. निकदेम (३:१०) आणि मार्था (११ः२ः२८) येशूला शिक्षक म्हणून संबोधतात आणि विशेष म्हणजे पाय धुतल्यावर, येशू स्वतःला गुरू म्हणून संबोधतो (१३:१३-१४). शिक्षकांच्या या सहा सकारात्मक वापराच्या पार्श्वभूमीवर, जेव्हा परूशी येशूला शिक्षक म्हणून संबोधतात तेव्हा ते नक्कीच मोठ्या मनाची / मानाची पदवी होती. परंतु ते त्यांचा महान शिक्षक मोशे याच्या बाजूला नव्हे तर विरुद्ध उभे करण्यासाठी येशूकरिता हे निदर्शक वापरतात. . येशूला त्यांची युक्ती समजली. तो जमिनीवर बोटाने लिहितो. ह्याची तुलना सहसा दानिएल ५ मध्ये भिंतीवर लिहीत असलेल्या परमेश्वराच्या बोटाशी केली जाते. हे दहा आज्ञा लिहिणाऱ्या परमेश्वराच्या बोटाला देखील सूचित करते (निर्गम ३१:१८). अशाप्रकारे येशू हे स्पष्ट करतो की, मोशे नाही तर परमेश्वरच श्रेष्ठ गुरु शिक्षक आहे, जो शिक्षा नव्हे तर दया दाखवतो. जशी व परमेश्वराने आपल्यावर दया केली तशीच आपण देखील इतरांवर दया करू या.

प्रार्थना:प्रभो, माझ्या पापची मला जाणीव होऊन मी माझे चांगले व पवित्र जीवन जगण्यास मला मदत कर, इतरांचा न्याय न करता मी माझे पाप रडावे म्हणून मला पवित्र आत्म्याचे दान दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या