उपवासकाळातील पाचवा रविवार
दि.२६ मार्च २०२३
✝️
येशूने तिला म्हटले, “तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते का ?"
"पुनरुत्थान व जीवन मीच आहे; माझ्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक जिवंत मनुष्य कधीही मरणार नाही.
✝️
पवित्र आत्मा कार्यरत असून आपल्या दररोजच्या जीवनात आपण पुनरुत्थानाचा म्हणजेच नवजीवनाचा अनुभव लहान सहान घटनांद्वारे घेत असतो. संत पौल आजच्या दुसऱ्या वचनात म्हणत आहे, ‘ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठविले तो तुम्हांमध्ये वसती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरे ही जिवंत करील. ' प्रभूवरील विश्वासात दिवसेंदिवस वाढत राहण्यासाठी आपण प्रभूकडे दयेची याचना करु या.
✝️
पहिले वाचन यहेज्केल ३७:१२-१४
वाचक :यहेज्केल या पुस्तकातून घेतलेले वाचन ३७:१२-१४
"मी तुम्हांला माझा आत्मा देईन आणि तुम्ही सजीव व्हाल"
प्रभू परमेश्वर म्हणतो, “माझ्या लोकांनो, पाहा, मी तुमच्या कबरा उघडीन, तुम्हांला तुमच्या कबरातून बाहेर काढून इस्राएल देशात आणीन. माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरा उघडून तुम्हांला बाहेर काढीन तेव्हा तुम्हांला समजेल की मी परमेश्वर आहे. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन, तुम्ही सजीव व्हाल व मी तुम्हांला तुमच्या देशात वसवीन; तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हांला समजेल, असे परमेश्वर म्हणतो.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र १३०:१-८
प्रतिसाद :परमेश्वर दयानिधी आहे.
१ )हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे.
हे प्रभो, माझी वाणी ऐक;
माझ्या विनवणीकडे कान लाव.
२ )हे परमेश्वरा, तू पापे जमेस धरली,
तर तुझ्यापुढे कोणाचा टिकाव लागेल ?
तरी पण आता तुझे भय धरावे याकरिता तुझ्या ठायी क्षमा आहे.
३ )माझा आत्मा परमेश्वराची अपेक्षा करतो
आणि मी त्याचा वचनाची आशा धरतो.
पहाटेचा वाट पाहणाऱ्या पहारेकऱ्यापेक्षा,
माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
(पहारेकऱ्याने पहाटेची आणि इस्राएलने परमेश्वराची आशा धरावी.)
४) हे इस्राएल, परमेश्वरावर श्रद्धा ठेव,
कारण परमेश्वर दयानिधी आहे;
त्याच्याजवळ उद्धारदाने विपुल आहेत
तो इस्राएलला त्याच्या सर्व पापांपासून मुक्त करील.
दुसरे वाचन रोम ८:८-११
वाचक : पौलचे रोमकरांस पत्र यातून घेतलेले वाचन ८:८-११
" ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले त्याचा आत्मा तुम्हांमध्ये आहे."
जो देहाच्या अधीन आहेत त्यांना देवाला प्रसन्न करता येत नाही. परंतु तुम्हांमध्ये देवाचा आत्मा जर वस्ती करीत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहा. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. पण ख्रिस्त तुम्हांमध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे, तरी आत्मा नीतिमत्त्वामुळे जिवंत आहे. ज्याने येशूला मेलेल्यातून उठवले, त्याचा आत्मा जर तुम्हामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेलेल्यातून उठवले तो तुम्हांमध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरेही जिवंत करील.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष
प्रभू म्हणतो, पुनरुत्थान व जीवन मीच आहे; जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीच मरणार नाही.
शुभवर्तमान योहान ११ : १-४५
वाचक : योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पुनरुत्थान व जीवन मीच आहे."
बेथानी येथील लाजरस नावाचा एक मनुष्य आजारी होता; मरिया व तिची बहीण मार्था या त्याच गावच्या होत्या. ज्या मरियेने प्रभूला सुगंधी तेल लावले व त्याचे चरण आपल्या केसांनी पुसले, तिचा हा आजारी पडलेला लाजरस, भाऊ होता. (त्या बहिणींनी येशूला कळवले की, “प्रभूजी, ज्याच्यावर तुमचे प्रेम आहे, तो आजारी आहे.” ते ऐकून येशू म्हणाला, “हा आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवार्थ, म्हणजे त्याच्यायोगे देवाच्या पुत्राचा गौरव व्हावा यासाठी आहे.”
मार्था, तिची बहीण व लाजरस यांच्यावर येशूचे प्रेम होते. तो आजारी आहे हे त्याने ऐकले तरी तो होता त्या ठिकाणीच आणखी दोन दिवस राहिला. त्यानंतर त्याने शिष्यांना म्हटले, “आपण पुन्हा यहुदियात जाऊ या.") शिष्य त्याला म्हणाले, “गुरुजी, यहूदी नुकतेच तुम्हांला दगडमार करावयास पाहत होते, तरी तुम्ही पुन्हा तेथे जाता का ?" येशूने उत्तर दिले “दिवसाचे बारा तास आहेत ना ? दिवसा चालणाऱ्याला ठेच लागत नाही. कारण त्याला पृथ्वीवरील उजेड दिसतो; परंतु रात्री चालणाऱ्याला ठेच लागते कारण त्याच्याजवळ उजेड नसतो." हे बोलल्यावर तो त्यांना म्हणाला, "आपला मित्र लाजरस झोपला आहे; पण मी त्याला झोपेतून उठवायला जातो." यावरून शिष्य त्याला म्हणाले, “प्रभूजी, त्याला झोप लागली असली तर तो बरा होईल.” येशू त्याच्या मरणाविषयी बोलला होता; परंतु तो झोपेपासून मिळणाऱ्या विश्रांतीविषयी बोलतो असे त्यांना वाटले. यास्तव येशूने त्यांना उघड सांगितले की, लाजरस मेला आहे आणि मी तेथे नव्हतो. तुम्हासाठी मला आनंद वाटतो, कारण माझी अशी इच्छा आहे की तुम्ही विश्वास ठेवावा. तरी आपण त्याच्याकडे जाऊ." तेव्हा दिदुम म्हटलेले थोमा आपल्या सोबत्यांना म्हणाला "आपणही त्याच्याबरोबर मरायला जाऊ या."
(येशू आला तेव्हा त्याला कळले की, त्याला कवरेत ठेवून चार दिवस झाले आहेत.) बेथानी येरुशलेमजवळ, म्हणजे तेथून पाऊण मैलावर होती; तेथे यहुद्यांपैकी पुष्कळ लोक मार्था व मरिया यांचे त्यांच्या भावाबद्दल सांत्वन करण्यास आले होते. (येशू येत आहे हे ऐकताच मार्था त्याला जाऊन भेटली; पण मरिया घरात बसून राहिली. मार्था येशूला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता. तरी आताही आपण देवाजवळ काही मागाल ते देव आपणाला देईल, हे मला ठाऊक आहे." येशूने तिला म्हटले, “तुझा भाऊ पुन्हा उठेल." मार्था त्याला म्हणाली, “तो शेवटच्या दिवशी पुनरुत्थानसमयी पुन्हा उठेल हे मला ठाऊक आहे." येशूने तिला म्हटले, "पुनरुत्थान व जीवन मीच आहे; माझ्यावर विश्वास ठेवणारा प्रत्येक जिवंत मनुष्य कधीही मरणार नाही. हे तू खरे मानतेस काय ?" ती तू त्याला म्हणाली, “होय, प्रभूजी, जगात येणारा देवाचा पुत्र ख्रिस्त आपणच आहात असा मी विश्वास धरला आहे.")
असे बोलून ती निघून गेली आणि आपली बहीण मरिया हिला एकांती बोलावून म्हणाली " गुरुजी, आले आहेत व ते तुला बोलावत आहेत.” हे ऐकताच ती त्वरेने उठून त्याच्याकडे गेली. येशू अद्याप गावात आला नव्हता, पण मार्था त्याला भेटली त्या ठिकाणीच तो होता. जे यहुदी मरियेजवळ घरात होते व तिचे सांत्वन करत होते त्यांनी तिला चटकन उठून बाहेर जाताना पाहिल्यावर, ती कबरीकडे रडायला जात आहे असे समजून ते तिच्यामागे गेले. मग येशू होता तेथे मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, “प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.” येशू तिला व तिच्याबरोबर आलेल्या यहुद्यांना रडताना पाहून आत्म्यात खवळला व विव्हळ झाला आणि म्हणाला, “तुम्ही त्याला कोठे ठेवले आहे.” ते त्याला म्हणाले, "प्रभूजी, येऊन पाहा." (येशू रडला. ह्यावरून यहुदी म्हणाले, “पाहा, ह्याचे त्याच्यावर कितीतरी प्रेम होते!" परंतु त्याच्यातील कित्येक म्हणाले, "ज्याने आंधळ्याचे डोळे उघडले त्याला ह्याचे मरण टाळण्यचीही शक्ती नव्हती काय ?"
येशू पुन्हा मनात कळवळून कबरीकडे आला; ती गुहा होती आणि तिच्या तोंडावर धोंड ठेवलेली होती. येशूने म्हटले, "धोंड काढा.” त्या मृताची बहीण मार्था त्याला म्हणाली, “प्रभूजी आता त्याला दुर्गंधी येत असेल; कारण त्याला मरून चार दिवस झाले आहेत.” येशूने तिला म्हटले, “तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते का ?" ह्यावरून त्यांनी धोंड काढली. .. येशून दृष्टी वर करून म्हटले, " हे बापा, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे आभार मानतो. मला माहीत आहे की, तू सर्वदा माझे ऐकतोस, तरी जो लोकसमुदाय सभोवती उभा आहे त्याच्याकरिता मी बोललो; कारण तू मला पाठवले आहे असा • त्यांनी विश्वास धरावा.” असे बोलून त्याने मोठ्याने हाक मारून म्हटले. “लाजर, बाहेर ये." तेव्हा जो मेलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने वेष्टिलेले होते. येशूने त्यांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.' "
मरियेकडे आलेल्या यहुद्यांनी त्याने जे केले ते पाहिले आणि त्यांच्यापैकी पुष्कळजणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: गेल्या रविवारच्या वाचनाद्वारे ख्रिस्तसभेने आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले. आजची वाचने आपल्याला मृत्यूकडून जीवनाकडे जाण्यास प्रवृत्त करतात. पहिल्या वाचनात (यहेज्केल ३७ : १२-१४) बाबिलोनच्या हद्दपारीत खितपत पडलेल्या इस्राएली लोकांमध्ये नवजीवनाची आशा उत्पन्न करण्यासाठी संदेष्टा “परमेश्वर त्यांची थडगी उघडून त्यांना नवजीवन देईल” असे भाकित करतो. दुसऱ्या वाचनात (रोम ८:८-११) संत पॉल रोमकरांनी केवळ शारीरिक पातळीवर जीवन न जगता त्यांनी आध्यात्मिक नवजीवनाची वाट चोखाळावी असे आवाहन करतो. शुभवर्तमानामध्ये (योहान ११:१-४५) हा प्रवास चार टप्प्यांमध्ये सादर करण्यात आलेला आहे.
अ. सांत्वनाचा टप्पा : लाझरसच्या मृत्यूमुळे दुःखी झालेल्या बहिणींचे सांत्वन करण्यासाठी येशू बेथानी येथे येतो. त्याच्या थडग्याजवळ येशूने सांडलेले अश्रू दुःखी बहिणींना दिलासा देणारे होते.
ब. आश्वासनाचा टप्पा “प्रभुजी, आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता" ह्या शब्दांत मार्था व मरिया ह्यांची येशूवरील गाढ श्रद्धा दिसून येते. येशू त्यांना आश्वासन देतो, लाझरस फक्त शेवटच्या दिवशी नव्हे तर आत्ताच पुन्हा उठणार आहे. हे आश्वासन येशूचे आत्मप्रकटीकरण करणारे आहे : “पुनरुत्थान व जीवन मीच आहे."
क. मुक्तीचा टप्पा : "धोंड बाजूला सारा" ह्या येशूच्या आदेशामुळे क्षणभर उपस्थितांमध्ये चुळबुळ सुरू झाली. लाझरसच्या बहिणींना भावनावेग आवरेनासा झाला. येशू मात्र लाझरसला अंधारातून प्रकाशाकडे, मरणातून जीवनाकडे आणि बंधनातून मुक्तीकडे घेऊन जाण्याच्या हेतूने त्याला साद घालतो, “लाझरस, बाहेर ये."
ड. नवजीवनाचा टप्पा : येशू उपस्थितांनालाझरसच्या स्वातंत्र्याची, प्रकाशाची व नवजीवनाची वाटचाल सुरू करण्याची आज्ञा होती. लाझरस मात्र निःशब्दपणे आपल्या पुनरुज्जीवनाची घोषणा करीत राहतो.
आत्मपरीक्षण : माझ्या जीवनातील कोणकोणत्या क्षेत्रात मला मृत्यूकडून नवजीवनाकडे वाटचाल करण्याची गरज आहे ?
प्रार्थना : हे पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ता, आमचे संपूर्ण जीवन परिवर्तित कर आणि तुझ्या पुनरुत्थानाचे वाटकरी होण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या