उपवासकाळातील चौथा सप्ताह
शनिवार दि. २५ मार्च २०२३
✝️
“हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार,
प्रभू तुझ्याबरोबर असो.”
दुताचा मरियेला संदेश सोहळा
ख्रिस्तसभा आज, देवपुत्राच्या आगमनाचा दुताने मरियेला दिलेला संदेश हा सण साजरा करीत आहे. मानवाच्या तारणाची योजना अमलात आणण्यासाठी देवाने पापाचा कलंक नसलेल्या पवित्र मरियेची निवड केली. मरिया देवाला शरण गेली. आपल्या जीवनांचे समर्पण करुन मरियेने होकार दिला . देवाच्या सामर्थ्याचा अविष्कार पवित्र मरियेच्या जीवनात घडला आणि ज्याच्या राज्याचा अंत होणार नाही, असा राजा प्रभू येशू ख्रिस्त जगात आला.
पवित्र मरियेद्वारे इम्मानुएल (आमच्या सान्निध्य देव) ह्या भूतलावर
आला. प्रभू येशूने देवाचे प्रेम, देवाची शांती, देवाची दया, देवाची कृपा व देवाचा सहवास आम्हाला घडविला आहे. पवित्र मरिया मातेसारखे देवाच्या हाकेला प्रतिसाद देऊन समर्पित जीवन जगण्यासाठी प्रेरणा मागू या..
✝️
पहिले वाचन यशया ७:१०-१४
वाचक :यशयाच्या पुस्तकातून घेतलेले वाचन
"पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल."
परमेश्वर आहाजला म्हणाला, "तुझा देव परमेश्वर याच्याजवळ तू आपणासाठी चिन्ह माग, ते खाली अधोलोकात असो किंवा उर्ध्वलोकात असो.” आहाज म्हणाला, "मी मागणार नाही, मी परमेश्वराची परीक्षा पाहाणार नाही." तेव्हा तो म्हणाला, "हे दावीदच्या घराण्या, मी सांगतो ते ऐक: तुम्ही मनुष्यांना कंटाळा आणता हे थोडे झाले म्हणून माझ्या देवालाही कंटाळविता काय? म्हणून प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे. पाहा, कुमारी गर्भवती होऊन पुत्र प्रसवेल आणि त्याचे नाव इम्मानुएल म्हणजे, "आम्हासह देव', असे ठेवील."
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ४०: ७-११
प्रतिसाद : हे प्रभो, तुझ्या इच्छेप्रमाणे वागण्यास मी तयार आहे.
१.) यज्ञ आणि अर्पणे ही तुला हवीशी नसतात,
पण ऐकायला तू माझे कान उघडे ठेवले आहेत.
होमबली आणि पापबली तुला नकोत.
ह्यावरून मी म्हणालो पाहा, मी तयार आहे !
२.) ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे की,
तुझ्या इच्छेप्रमाणे मी वागावे,
माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद
वाटतो, तुझे वचन माझ्या अंतर्यामी आहे.
३. )हे प्रभो महासभेत मी तुझ्या नीतिमत्वाचा पुरस्कार
केला. मी आपले तोंड बंद ठेवले नाही,
हे तुला माहीत आहे.
४.) तुझे नीतिमत्व मी माझ्या हृदयात लपवून ठेवले नाही.
तुझी विश्वसनीयता व मुक्तीची योजना मी जाहीर केली.
तुझी दया आणि तुझे सत्य मी महासभेपासून गुप्त ठेवले नाही.
दुसरे वाचन इब्री १०:४-१०
वाचक : इब्री लोकांस पत्र यातून घेतलेले वाचन
पाहा, हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे.
बैलांचे आणि बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे. म्हणून ख्रिस्त जगात येण्याच्या वेळेस म्हणाला, "यज्ञ आणि अनार्पण ह्यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले. होमांनी आणि पापाबद्दलच्या अर्पणांनी तुला संतोष नव्हता. ह्यावरून मी म्हणालो, 'पाहा, हे देवा', ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, "तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यासाठी मी आलो आहे."
वर उल्लेखिल्याप्रमाणे तो म्हणाला, "यज्ञ, अन्नार्पणे, होम आणि पापाबद्दलची अर्पणे, ह्यांची इच्छा तुला नव्हती आणि त्यात तुला संतोष नव्हता" (ही नियमशास्त्राप्रमाणे अर्पिण्यास येतात ) आणि मग तो म्हणाला, "पाहा, मी तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास आलो आहे.” ह्यात दुसरे स्थापण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो. त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहार्पणाद्वारे पवित्र केलेले आहो.
प्रभूचा शब्द आहे.
सर्व : देवाला धन्यवाद.
जयघोष योहान १ : १४
आलेलुया, आलेलुया!
शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली
आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला.
आलेलुया!
शुभवर्तमान लूक १:२६-३८
वाचक : लूक लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल."
देवाने गालीलातील नाझरेथ नावाच्या गावी एका कुमारीकडे गॅब्रिएल देवदूताला पाठवले. ती दावीदच्या घराण्यातील योसेफ नावाच्या पुरुषाला दिलेली होती आणि त्या कुमारीचे नाव मरिया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, “हे कृपापूर्ण स्त्रिये, नमस्कार, प्रभू तुझ्याबरोबर असो.” ह्या बोलण्याने तिच्या मनात खळबळ उडाली आणि हे अभिवादन काय असेल ह्याचा ती विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, "मरिये, भिऊ नकोस, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. पाहा, तू गर्भवती होशील आणि तुला पुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो थोर होईल व त्याला परमेश्वराचा पुत्र म्हणतील. आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद ह्याचे राजासन देईल.आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुगे राज्य करील. व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही."
मरियेने देवदूताला म्हटले, "हे कसे होईल ? कारण मला पुरुष ठाऊक नाही.” देवदूताने उत्तर दिले, “पवित्र आत्मा तुझ्यावर येईल.आणि परमेश्वराचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करील ह्या कारणाने ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र, देवाचा पुत्र असे म्हणतील. ,पाहा, तुझ्या नात्यातली अलीशिबा हिलाही म्हातारपणी पुत्रगर्भ राहिला आहे आणि जिला वांझ म्हणत तिला हा सहावा महिना आहे. कारण देवाला काहीच अशक्य होणार नाही.” तेव्हा मरिया म्हणाली, “पाहा, मी प्रभूची दासी आहे. आपण सांगितल्याप्रमाणे माझ्याबाबतीत घडो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: जुन्या करारातील अब्राहम हे एक प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व. अब्राहम १०० वर्षांचे होते तेव्हा परमेश्वराने त्याला वचन दिले की, त्या वृद्धापकाळात त्याला मूल होईल. उत्पत्ति १५:६ मध्ये, आपण वाचतो : “अब्राहामने परमेश्वरावर विश्वास ठेविला, आणि परमेश्वराने त्याचे नीतिमत्त्व मानले.” म्हणूनच त्याला “विश्वासाचा पिता” अशी उच्च पदवी देण्यात आली आहे. जर अब्राहमला त्याच्या दृढ विश्वासामुळे विश्वासाचा पिता म्हणता येईल, तर पवित्र मरियेला “विश्वासाची आई” म्हणता येईल. तिला देवदूताने. सांगितले की तू कुमारी असली तरी तुला गर्भधारणा होईल आणि मुलगा होईल. हे तिच्या आकलना पलीकडे होते, पण तिचा विश्वास मात्र दृढ होता. आजच्या शुभवर्तमानात आपण ऐकतो की, मरीया तिच्याठायी असलेल्या देवाच्या योजनेस विश्वासाने होकार देते. अब्राहम आणि पवित्र मरीयेप्रमाणे आपण आपल्या जीवनात परमेश्वराच्या योजनेवर विश्वास ठेवण्यास तयार आहोत का ?
प्रार्थना : हे पवित्र मरिये, तुझे अनुकरण करण्यास आम्हाला धैर्य व प्रेरणा दे,आमेन,
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️

0 टिप्पण्या