Marathi Bible Reading | Friday 24th March 2023 | 4th Week of Lent

 

उपवासकाळातील चौथा  सप्ताह 

शुक्रवार  दि. २४ मार्च २०२३

✝️ 

"तुम्ही मला ओळखता व मी कोठला आहे हेही तुम्हांला ठाऊक आहे. तरी पण मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे,



स्वीडनच्या संत कॅथरीन
- कुमारिका (१३३१-१३८१)

स्वीडनचा राजपुत्र गुडमार्सन आणि संत ब्रिजिटा (सण २३ जुलै) 
ह्यांचे चौथे अपत्य कॅथरीन ही राईसबर्ग येथील कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली होती. वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या वडिलांच्या आग्रहाखातर जर्मन सरदारपुत्र हगार्त वॉन कुऐर्नन ह्याच्याशी तिचे लग्न झाले. हा सरदारपुत्र नपुसंक होता. त्यामुळे कॅथरीन हिला वैवाहिक जीवनातील सुखाला पारखे व्हावे लागले. मात्र ही देवेच्छा मानून तिने आमरण कौमार्यपद हृदयाशी कवटाळले.
त्यांच्या लग्नानंतर अवघ्या तीन चार वर्षांनीच इ. स. १३४९ साली कॅथरीन विधवा झाली. त्यानंतर आपल्या आईला (संत ब्रिजिटा) तिच्या दानधर्माच्या व परोपकाराच्या कार्यामध्ये मदत करण्यासाठी कॅथरीन रोम येथे निघून गेली. त्याआधी तिची विधवा आई रोममध्ये विरक्तावस्थेत जीवन जगत होती.
इ. स. १३७२ साली ह्या दोन विधवा पवित्र स्त्रियांनी पवित्र भूमीची तीर्थयात्रा केली. दोनच वर्षांनी ब्रिजीटा रोम येथे मरण पावली. कॅथरीनने आपल्या आईचा मृतदेह स्वीडन येथे आणला आणि वाडस्टेना येथील ब्रिजेटाईन कॉन्व्हेंटमध्ये तिला पुरण्यात आले. आपल्या आईच्या मृत्यूनंतर कॅथरीनने त्या कॉन्व्हेंटची धूरा आपल्या खांदयावर घेतली आणि मोठ्या कौशल्याने व कर्तव्यतत्परतेने ही जबाबदारी पेलली.
त्यानंतर रोममधील प्रदीर्घ अशा भेटीनंतर २४ मार्च १३८१ रोजी कॅथरीनला देवाघरचे बोलावणे आले. तिने लिहिलेल्या "मानवी आत्म्याचा जल्लोष" नामक भक्तीमय पुस्तकाची प्रत दुर्दैवाने काळाच्या ओघात नष्ट झाली.


देवपित्याने सोपविलेली मानवाच्या उद्धाराची जबाबदारी प्रभू येशू  ख्रिस्ताने पूर्णत्वास नेली. पवित्र आत्मा स्वतः येशूविषयी साक्ष देत आहे की,  प्रभू येशू देवपित्याचा परमपुत्र आहे व त्याचे आपण ऐकावे. आपल्या सर्वांना  आतापर्यंत ख्रिस्तसभेतील संतांनी प्रभू येशू जिवंत देवाचा पुत्र असल्याची साक्ष दिली आहे. आजसुद्धा प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना प्रभूच्या प्रेमाचा,  करुणेचा व आरोग्यदानाचा अनुभव मिळत असतो. म्हणूनच निःशकपणे प्रभूला आपला तारणदाता म्हणून आपण स्वीकार करु या.
✝️
 

पहिले वाचन :  ज्ञानग्रंथ २:१ -१२
वाचक :ज्ञानग्रंथ या पुस्तकातून घेतलेले वाचन 
“आपण त्याला लाजिरवाण्या मृत्यूची शिक्षा देऊ या."

विधर्मी कारणमीमांसा करून आपापसांत असे म्हणत होते "आपण सज्जन माणसासाठी सापळा लावू या. कारण तो आपल्याला त्रासदायक आहे आणि आपल्या आचरणाचा विरोध करतो; कायदेभंग केल्यामुळे तो आपल्याला फटकारतो आणि आमच्यावर आमच्या शिक्षणाचे पाप लावून दोषी ठरवतो. तो स्वतःला परमेश्वराचे ज्ञान असल्याचे समजतो. तो आपल्या विचारांचा प्रतिस्पर्धी झाला आहे; त्याचे दर्शन हे ओझ्यासारखे आहे, कारण त्याचे आचरण दुसऱ्यांसारखे नाही, तर त्याचे मार्ग विचित्र आहेत. तो आम्हांला खोटे आणि अपवित्र समजतो व आमच्या सान्निध्यापासून दूर राहतो; तो सज्जनांचा अंतकाळ सौभाग्यशाली समजतो आणि परमेश्वर आपला पिता असल्याची शेखी मिरवतो. आपण त्याचे शब्द खरे आहेत का ते पाहू आणि त्याच्या अंतकालानंतर काय होते ते परीक्षा करून पाहू; कारण सज्जन माणूस जर परमेश्वराचा पुत्र आहे तर तो त्याला मदत करील आणि त्याच्या विरोधकांपासून त्याचे संरक्षण करील. आपण त्याचा अपमान करून त्याचे हाल करून त्याची परीक्षा घेऊ या की त्यामुळे तो किती विनम्र आहे ते पाहता येईल व त्याचे धैर्य किती आहे ते पारखून पाहता येईल. आपण त्याला लाजिरवाण्या मृत्यूची शिक्षा देऊ या, कारण त्याचा दावा असा आहे की, त्याचे संरक्षण केले जाईल."
“ते अशाप्रकारे विचार करीत होते. परंतु ती त्यांची चूक होती; कारण त्यांच्या दुष्टपणाने त्यांना अंध बनवले आहे; त्यांना परमेश्वराची रहस्ये माहीत नाहीत, तसेच ते धार्मिकतेच्या प्रतिफळावर विश्वास ठेवत नाहीत व धर्मात्म्याच्या पुरस्कारावर विश्वास ठेवत नाहीत.
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  ३५: १६,१८-२२
प्रतिसाद : ज्यांची कंबर खचली आहे, अशांच्याजवळ प्रभू असतो.

१) वाईट करणारांची आठवणदेखील 
पृथ्वीवरून बुजवून टाकावी म्हणून 
प्रभू त्यांना विन्मुख होतो.
सात्त्विक धावा करतात, प्रभू ऐकतो, 
तो सर्व संकटातून त्यांना सोडवतो.

२) ज्यांची कंबर खचली आहे, 
अशांच्या जवळ प्रभू असतो; 
ज्याचे अवसान गळाले आहे, 
अशांचा तो उद्धार करतो. 
सात्त्विकावर अनेक आपत्ती ओढवतात; 
पण प्रभू त्या सर्वांतून त्याला सोडवतो.

३) त्याचे एकूणएक हाड तो सांभाळतो, 
त्यातले एकही मोडत नाही. 
प्रभू आपल्या सेवकांचे प्राण वाचवतो. 
त्याला शरण जाणारे कुणीही दोषी ठरणार नाहीत.


जयघोष        

जे वचन ऐकून, सालस व चांगल्या अंत:करणात धरून  ठेवतात 
आणि धीराने फळ देत जातात, ते धन्य होत.



शुभवर्तमा योहान ७:१-१०,२५-३०

वाचक : योहान  लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

" ते त्याला धरायला पाहत होते पण त्याची वेळ तोवर आलेली नव्हती. "

येशू गालिलात फिरू लागला; कारण यहुदी त्याला जिवे मारायला पाहत होते, म्हणूण त्याला यहुदियात फिरावेसे वाटले नाही. यहुद्यांचा सण म्हणजे मंडपांचा सण जवळ आला होता. त्याचे भाऊ सणाला गेल्यानंतर तोही, उघडपणे न जाता गुप्तपणे वर गेला.

ह्यावरून येरुशलेमकरांपैकी कित्येकजण म्हणू लागले, “ज्याला जिवे मारायला पाहतात तो हाच ना? पाहा, तो उघड उघड बोलतो व ते त्याला काही म्हणत नाहीत! हा ख्रिस्त आहे, हे अधिकाऱ्यांनी खरोखरच ओळखले आहे काय? तरी हा कोठला आहे हे आम्हांला ठाऊक आहे; पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठला आहे हे कोणालाही कळणार नाही." ह्यावरून येशू मंदिरात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, "तुम्ही मला ओळखता व मी कोठला आहे हेही तुम्हांला ठाऊक आहे. तरी पण मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे, त्याला तुम्ही ओळखत नाही. मी तर त्याला ओळखतो; कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे." ह्यावरून ते त्याला धरायला पाहत होते; तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ तोवर आली नव्हती.

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: आजच्या शुभवर्तमानामध्ये, आपण पाहतो की, जरी येशूच्या जीवाला धोका असला तरीही येशू गुप्तपणे मंडपाच्या सणाला उपस्थित राहण्यासाठी
यहूदीयात जातो. त्याने जीव धोक्यात घालून मंदिर परिसरात धैर्याने भाषण केले. त्यात ही हिम्मत कुठून येते? त्याचा उगम देवाशी असलेल्या त्याच्या खोल एकात्मता आणि जवळीकेतून होतो. परमेश्वर जेव्हा आपल्या जीवनात असा मोठा बदल घडवून आणतो तेव्हा ते आपण व्यक्त केले पाहिजे. जेव्हा आपण परमेश्वराशी एकात्म साधून त्याच्या जवळ जाऊ तेव्हाच ते व्यक्त करण्याचे धैर्य आपल्याला मिळेल.
आपणही परमेश्वराशी अशीच जवळीक साधण्याची इच्छा बाळगू या. जेणेकरून आपण आपल्या मार्गावर येणाऱ्या समस्या आणि परीक्षांना तोंड देऊ शकू आणि त्यावर मात करू शकू.

प्रार्थना:हे प्रभू येशू, तूच एकमेव तारणारा व जीवनदाता आहेस ही श्रद्धा दृढबनविण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या