Marathi Bible Reading | Thursday 23rd March 2023 | 4th Week of Lent

 

उपवासकाळातील चौथा  सप्ताह 

गुरुवार  दि. २३ मार्च २०२३

✝️ 

"मी स्वतःविषयी साक्ष दिली, तर माझी साक्ष खरी नाही; माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे 



संत तुरिबियस डी मोग्रोवेजो

महागुरू, वर्तनसाक्षी (१५३८-१६०६)

त्यांच्या समर्पित वृत्तीतून असंख्य शाळा, हॉस्पिटले, दवाखाने, कॉन्व्हेन्ट, ख्रिस्तमंदिरे आणि प्रार्थनागृहे ह्यांचा पाया रचला गेला. इ.स. १५९१ साली लिमा येथे उघडण्यात आलेली पहिली अमेरिकन सेमिनरी हा त्यांच्या कारकीर्दीतला उच्चांक मानावा लागेल.
आर्चबिशप तुरिबियुस ह्यांचा मृत्यू २३ मार्च १६०६ साली झाला आणि
इ.स. १७२६ साली त्यांना संत म्हणून घोषित करण्यात आले.
चिंतन : वेळेवर आपले नियंत्रण नाही. मात्र वेळेचा वापर आपण कसा केला त्याचा हिशेब आपल्याला द्यावा लागेल. • संत तुरिबियुस

देवपित्याने सोपविलेली मानवाच्या उद्धाराची जबाबदारी प्रभू येशू  ख्रिस्ताने पूर्णत्वास नेली. पवित्र आत्मा स्वतः येशूविषयी साक्ष देत आहे की,  प्रभू येशू देवपित्याचा परमपुत्र आहे व त्याचे आपण ऐकावे. आपल्या सर्वांना  आतापर्यंत ख्रिस्तसभेतील संतांनी प्रभू येशू जिवंत देवाचा पुत्र असल्याची साक्ष दिली आहे. आजसुद्धा प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्यांना प्रभूच्या प्रेमाचा,  करुणेचा व आरोग्यदानाचा अनुभव मिळत असतो. म्हणूनच निःशकपणे प्रभूला आपला तारणदाता म्हणून आपण स्वीकार करु या.
✝️
 

पहिले वाचन :  निर्गम ३२:७-१५
वाचक :निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन

"आपल्या लोकांवर अरिष्टे आणण्याच्या हेतूपासून परावृत्त हो, "

परमेश्वर मोशेला म्हणाला, "चल, खाली उत्तर, कारण ज्या तुझ्या लोकांना तू इजिप्त देशातून आणले ते बिघडले आहेत. ज्या मार्गाने त्यांनी जावे म्हणून मी त्यांना आज्ञापिले होते तो माग लवकरच सोडून ते बहकून गेले आहेत. त्यांनी एक ओतीव वासरू करून त्याची पूजाअर्चा केली व त्यास बली अर्पण केले आणि हे इस्राएला, ज्यांनी तुला इजिप्त देशातून सोडवून आणले आहे तेच हे तुझे देव! असे ते म्हणू लागले आहेत. "मग परमेश्वराने मोशेला म्हटले, "मी या लोकांना पाहून चुकलो आहे. हे केवळ ताठ मानेचे लोक आहेत. तर आता मला आड गेक नको, मी आपला कोप त्यांच्यावर भडकवून त्यांना भस्म करतो आणि तुझेच एक मोठे राष्ट्र करतो."
तेव्हा मोशे आपला देव परमेश्वर याची विनवणी करून म्हणाला, "हे परमेश्वरा, तू आपल्या लोकांना महासामध्याचे व भुजबलाने इजिप्त देशातून सोडवून बाहेर आणले त्यांच्यावर तुझा कोप का भडकावा? त्यांना पहाडांमध्ये मारून टाकावे आणि पृथ्वीवरून त्यांना नष्ट करावे म्हणून त्यांना इजिप्त देशातून त्याने दुष्ट हेतूने बाहेर काढले असे इजिप्तवासी लोकांनी का बोलावे ? आपल्या तीव्र कोपापासून निवृत्त हो आणि आपल्या लोकांवर अरिष्टे आणण्याचे तू योजले आहे त्यापासून परावृत्त हो. तुझे दास आब्राहाम, इसहाक व इस्राएल गांची आठवण कर तू त्यांना स्वतःची शपथ वाहून सांगितले होते की, मी तुमची संतती आकाशातील तान्यांसारखी बहुगुणित करीन आणि ज्या ह्या देशाविषयी मी तुम्हांला सांगितले तो सगळा तुमच्या संततीला देईन आणि ती त्याची निरंतरची वतनदार होईल," तेन्हा मी आपल्या लोकांचे अनिष्ट करीन असे जे परमेश्वर म्हणाला होता त्यापासून तो परावृत्त झाला,
ह्यावर सियोन म्हणाले, 'परमेश्वराने माझा त्याग केला आहे, प्रभू मला विसरला आहे.' परंतु परमेश्वर म्हणतो, 'स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय ? कदाचित 'स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही."
हा प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १०६: १९-२३
प्रतिसाद :  प्रभो, तू आपल्या लोकांवर प्रसन्न होतोस 

१) होरेब येथे त्यांनी वासराची एक मूर्ती बनवली,
 त्या ओतीव मूर्तीला दंडवत घातले; 
त्यांनी आपल्या वैभवशाली देवाच्या 
मोबदल्यात गवत खाणाऱ्या बैलाची प्रतिमा स्वीकारली. 

२) ज्याने इजिप्त देशात महान कार्य केले होते, 
म्हणजे हामाच्या देशात अलौकिक कृत्ये केली होती 
आणि तांबड्या समुद्रावर भीतीदायक गोष्टी केल्या होत्या. 
त्या आपल्या उद्धारक देवाला ते विसरले.

३) तेव्हा त्यांचा नाश करायचा देवाने विचार केला,
 पण त्याचा राग शांत करून त्यांचा नाश 
टाळण्यासाठी त्याचा निवडलेला भक्त मोशे मध्ये पडला. 


जयघोष        

प्रभू म्हणतो, पश्चात्ताप करा, 
कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे..



शुभवर्तमा योहान ५:३१-४७

वाचक : योहान  लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली आहे तो मोशे तुम्हांला दोष लावणार आहे."

येशू यहुद्यांना म्हणाला, "मी स्वतःविषयी साक्ष दिली, तर माझी साक्ष खरी नाही; माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे आणि जी साक्ष तो माझ्याविषयी देतो, ती खरी आहे हे मला ठाऊक आहे. तुम्ही योहानकडे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली आहे. पण मी माणसांची साक्ष मान्य करीत नाही; तथापि तुम्हांला तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे "सांगतो. तो जळता व प्रकाश देणारा दिवा होता आणि तुम्ही त्याच्या प्रकाशात काही वेळ हर्ष करावयास राजी झाला. परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानच्या साक्षीपेक्षा मोठी आहे; कारण जी कार्ये सिद्धिस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे.  आणखी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही त्याची वाणी कधीही ऐकली नाही व त्याचे स्वरूपसुद्धा पाहिले नाही आणि त्याचे वचन तुम्ही आपणांमध्ये दृढ राखले नाही, कारण ज्याला त्याने पाठवले त्याचे तुम्ही खरे मानत नाही. तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता, कारण त्याच्याद्वारे तुम्हांला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हांला वाटते आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत; तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हांला इच्छा होत नाही. मी मनुष्यांकडून प्रशंसा करून घेत नाही. परंतु मी तुम्हांला ओळखले आहे की, तुमच्या ठायी देवाची प्रीती नाही. मी आपल्या पित्याच्या नावाने आलो आहे पण तुम्ही माझा स्वीकार करीत नाही; दुसरा कोणी स्वत:च्या नावाने आला तर त्याचा तुम्ही स्वीकार कराल. जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करीत नाही, त्या तुम्हांला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे? मी पित्यासमोर तुम्हांला दोष लावीन असे समजू नका; ज्याच्यावर तुम्ही आशा ठेवली आहे तो मोशे तुम्हाला दोष लावणार आहे. तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता; कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही तर माझ्या वचनांवर विश्वास कसा ठेवाल ?”

प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: मोशे एक महान नेता, संदेष्टा, कायदा देणारा आणि इजिप्त देशातून इस्रायली लोकांना मार्ग दाखवणारा म्हणून प्रसिद्ध आहे. इजिप्तमधील प्लेग आणि तांबडा समुद्र ओलांडल्याची माहिती आपल्या सर्वांना आहे. तथापि, समेट करणाऱ्या मोशेच्या भूमिकेबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही.. कृतघ्नपणामुळे, त्याला नाकारल्याबद्दल आणि सोन्याच्या वासराची उपासना केल्याबद्दल देव इस्रायलवर अत्यंत रागावला होता. या मूर्तिपूजक कृत्यासाठी त्याला त्यांचा संपूर्ण नाश करावयाचा होता. तथापि, मोशेने संतप्त देव आणि दोषी लोकांमध्ये उभे राहण्याचे धाडस केले. त्याने देवाला त्याच्या दयाळू स्वभावाची आठवण करून दिली आणि लोकांना त्याच्या क्रोधापासून वाचवले. आजच्या जगात आपण मोशेची सामंजस्यपूर्ण भूमिका कशाप्रकारे बजावू शकतो ?

प्रार्थना:हे प्रभू येशू, तूच एकमेव तारणारा व जीवनदाता आहेस ही श्रद्धा दृढबनविण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या