Marathi Bible Reading | Wednesday 22nd March 2023 | 4th Week of Lent

 

उपवासकाळातील चौथा  सप्ताह 

बुधवार दि. २२ मार्च २०२३

✝️ 

जसा पिता मेलल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. 

ट्रेंट संत सायमन व नॉर्वीचचे संत विल्यम

- रक्तसाक्षी , (१४७२ आणि ११४४,)


✝️
 “रक्तसाक्ष्यांच्या चिमुकल्या फुलांनो, तुम्हाला नमस्कार असो.” अशा भावपूर्ण शब्दात देऊळमाता २८ डिसेंबर रोजी निरपराध बालकांच्या सणाच्या दिवशी त्यांना श्रद्धांजली वाहात असते.
त्या बालकांप्रमाणे ट्रेंट येथील संत सायमन व नॉर्वीच येथील संत विल्यम ह्यांचा विशेषत्वाने परिचय देऊळमाता करून देते व त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या श्रद्धेशी एकनिष्ठ राहण्याचे आवाहन करते.
इ. स. १४७२ साली इटलीतील ट्रेंट येथल्या यहुद्यांनी क्रुसावरील येशूचा उपहास करण्याच्या हेतूने त्या वर्षीच्या वल्डांडण सणावेळी एखाद्या ख्रिस्ती बालकाचा बळी देण्याचा अभद्र विचार त्यांच्या बैठकीत संमत केला. ज्यू तोबिअस नावाच्या व्यक्तीवर हे काम सोपविण्यात आले. त्याला ख्रिस्ती वस्तीमध्ये फिरताना सायमन नावाचे एक गोंडस बालक आपल्या घरासमोर खेळत असताना आढळले. त्या बाळाचे रक्षण करण्यासाठी आसपास कोणीही नसल्याचे पाहून तोबिअस ह्याने आपला फासा त्या निरपराध बाळकाभोवती टाकला.
तो बालकाच्या जवळ गेला. त्याने त्याच्या गुबऱ्या गालावर हळूच एक टिकची मारली. तसे ते बालक दिलखुलास हसले. तोबिअसने सायमन नावाच्या ह्या बालकाला आपली करंगळी धरण्यास सांगितले. दोन वर्षांहूनही लहान असलेल्या ह्या बालकाने अत्यंत निर्धास्तपणे तोबिअसचा हात घट्ट पकडला. जेव्हा आपण घरापासून बरेच दूर आलेले आहोत असे त्या बालकाला समजले, तेव्हा ते बालक आपल्या मातेच्या नावाने टाहो फोडू लागले. त्याला शांत करण्यासाठी तोबिअसने त्याला एक चकाकते नाणे दाखविले आणि चांगल्या मधाळ शब्दांनी गोड गोड बोलून त्याला गुंतवून ठेवले. शेवटी तो त्याला आपल्या घरी घेऊन गेला.
पवित्र गुरूवारच्या मध्यरात्री ह्या बालकाच्या जीवनातील चित्तथरारक शोकनाट्याला सुरूवात झाली. त्याच्या तोंडामध्ये कापडाचा बोळा कोंबण्यात आला. क्रूसावर टांगलेल्या ख्रिस्तासारखे त्याचे हात पसरविण्यात आले. त्याच्या कोवळ्या लुशलुशीत शरीरात, कुशीत भाला भोसकण्यात आला. रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे त्यांनी त्याची घोर थट्टा आरंभिली. बिचाऱ्या बालकाला काय चाललंय ते कळेना. एक तासाभराच्या अमानवी क्रूस अशा छळानंतर व प्राणांतिक यातनानंतर त्या बालकाने आपली नजर स्वर्गाकडे लावली आणि आपला निष्कलंक आत्मा देवाच्या हाती सोपविला. ज्यू लोकांनी त्याचा निष्प्राण देह नदीमध्ये फेकून दिला. परंतु त्यांचा गुन्हा उघडकीस आला आणि त्यांना शिक्षा करण्यात आली. ह्या बालसंताचे अवशेष ट्रेंट येथील संत पीटरच्या चर्चमध्ये ठेवण्यात आले. ह्या अवशेषामुळे पुढे असंख्य चमत्कार घडत राहिले होते.
इंग्लडमधील नॉर्विच येथल्या विल्यम नावाच्या बालकाची कथादेखील काहीशी अशीच आहे. त्याचे मातापिता हे साधे भोळे नागरिक होते. विल्यमच्या आईला देवाने दृष्टांत देऊन आपल्या बालकाच्या भवितव्याविषयी पूर्वसूचना दिलेली होती. त्याच्याठायी एक ख्रिस्ती संत दडलेला आहे, असे तिला कळविण्यात आले होते. विल्यम अगदी बालवयापासूनच आपल्या भवितव्याची चुणूक दाखवू लागला होता. तो आठवड्यातून तीन वेळा उपवास करीत असे आणि सतत प्रार्थनेमध्ये दंग असे. त्याला जेव्हा रक्तसाक्षीत्वाचे मरण आले तेव्हा तो नॉर्वीच येथील एका चांभाराच्या घरी चाकरी करीत होता. त्यावेळी त्याचे वय अवघे १२ वर्षाचे होते.
इ. स. ११३७ साली इस्टर सणाच्या काही दिवस आधी विल्यम ह्याला एका ज्यूच्या घरी बांधून ठेवण्यात आले. क्रूसावरील येशूच्या निषेधार्थ ज्यू लोकांनी विल्यमला क्रुसावर खिळून ठार मारले. पाच वर्षे त्याचे शरीर सापडले नाही. पाच वर्षांनी त्याचे शरीर न कुजलेल्या अवस्थेत आढळले. ह्या बालसंताचे उर्वरित अवशेष कॅथिड्रल चर्चच्या आवारात पुरण्यात आले.

या दोन्ही संतांचा सण देऊळमाता २२ मार्च रोजी साजरा करते.

पहिले वाचन :  यशया  ४९:८-१५
वाचक :यशया या पुस्तकातून घेतलेले वाचन
“देशाचा उत्कर्ष व्हावा म्हणून लोकांच्या कराराप्रीत्यर्थ मी तुला नेमतो."
परमेश्वर म्हणतो, प्रसादसमयी मी तुझे ऐकले, उद्धारदिनी मी तुला साहाय्य केले; देशाचा उत्कर्ष व्हावा, उजाड झालेल्या वतनांची पुनः वाटणी व्हावी म्हणून मी तुझे रक्षण करतो व लोकांच्या कराराप्रीत्यर्थ तुला नेमतो. तू बंदिस्त असलेल्यांना म्हणावे, बाहेर या; अंधारात आहेत त्यांना म्हणावे, उजेडात या. ते रस्त्यांवर चरतील, सगळ्या उजाड टेकड्यांवरही त्यांना चारा मिळेल. त्यांना तहानभूक लागणार नाही. झळई व ऊन यांची बाधा त्यांना होणार नाही, कारण त्याच्यावर दया करणारा त्यांचा नेता होईल; पाण्याचा झऱ्यांवर तो त्यांना नेईल. मी आपले सर्व पर्वत धोपट मार्ग करीन, माझे राजमार्ग उंच होतील. हे पाहा, हे लांबून येत आहेत; हे पाहा, हे उत्तरेकडून व पश्चिमेकडून येत आहेत; हे सिनी लोकांच्या देशातून येत आहेत. हे आकाशा, जयजयकार कर; हे पृथ्वी, आनंद कर, अहो पर्वतांनो, जयघोष करा! कारण परमेश्वराने आपल्या लोकांचे सांत्वन केले आहे, आपल्या पीडलेल्या लोकांवर दया केली आहे.
ह्यावर सियोन म्हणाले, 'परमेश्वराने माझा त्याग केला आहे, प्रभू मला विसरला आहे.' परंतु परमेश्वर म्हणतो, 'स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय ? कदाचित 'स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही."
प्रभूचा शब्द आहे. 
सर्व : देवाला धन्यवाद.


प्रतिसाद स्तोत्र  १४५: ८-९,१३-१४,१७-१८
प्रतिसाद :  प्रतिसाद प्रभू प्रेमळ आणि दयानिधी आहे.

१) प्रभू, प्रेमळ आहे. प्रभू दयानिधी आहे. 
तो मंदक्रोध व प्रेमसागर आहे. प्रभू सर्वांशी चांगला आहे. 
त्याने निर्मिलेल्या सर्वांवर त्याची कृपादृष्टी असते.

२) प्रभू आपल्या प्रत्येक वचनाला जागतो. 
त्याची प्रत्येक कृती प्रेमाची असते. 
अडखळणाऱ्या सर्वांना प्रभू सावरतो.
 वाकून गेलेल्या सर्वांना ताठ उभे करतो.

३) प्रभूचे सारे करणे न्यायाचे असते. 
त्याची सगळी करणी दयेची असते. 
जे प्रभूचा धावा करतात, 
मनापासून त्याचा धावा करतात, 
त्यांच्या समीप तो असतो.


जयघोष        
मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, 
तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.



शुभवर्तमा योहान ५:१७-३०

वाचक : योहान  लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन 

"जसा पिता मेलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो."

येशने यहुद्यांना उत्तर दिले, “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे." ह्यामुळे तर यहुदी त्याला जिवे मारायची अधिकच खटपट करू लागले; कारण तो शब्बाथ मोडीत असे इतकेच नाही, तर देवाला आपला पिता म्हणून स्वतःला देवासमान करीत असे.
ह्यावरून येशूने त्यांना उत्तर दिले, "मी तुम्हांला सत्य तेच सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून त्याला स्वतः होऊन काहीही करता येत नाही; कारण जे काही तो करतो तसेच पुत्रही करतो. कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि स्वतः जे काही करतो ते सर्व त्याला दाखवतो; तुम्हांला आश्चर्य वाटावे म्हणून तो ह्यांहून मोठी कामे त्याला दाखवील. कारण जसा पिता मेलल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. पिता कोणाचाही न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे; ह्यासाठी की, जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने मला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही. मी तुम्हांला नक्की सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही, तो मरणातून जीवनात पार गेला आहे. “मी तुम्हांला नक्की सांगतो की, मेलेले लोक देवाच्या पुत्राची वाणी ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे कारण पित्याच्या ठायी जसे स्वत:चे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायी स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्याला दिले. तो मनुष्याचा पुत्र आहे, ह्या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकार त्याला दिला. ह्याविषयी आश्चर्य करू नका कारण कबरीतील सर्व माणसे त्याची वाणी ऐकतील आणि ज्यांनी सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील, अशी वेळ येत आहे.
“मला स्वतः होऊन काही करता येत नाही; जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो आणि माझा निवाडा यथार्थ आहे; कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो."
प्रभूचे हे शुभवर्तमान 
सर्व : हे प्रभू येशू ख्रिस्ता  तुझी स्तुती असो.

चिंतन: आजचे पहिले वाचन खूप दिलासा देणारे आहे. हे अनुकूल वेळेबद्दल म्हणजेच तारणाच्या दिवशी आपल्याला मिळणाऱ्या परमेश्वराच्या मदतीविषयी बोलते. संत पौल संदेष्टा यशयाच्या वरील वचनाचा आधार घेत म्हणतो: “पाहा, आताच समय अनुकूल आहे, पाहा, आताच तारणाचा दिवस आहे. "(२ करिंथ ६:२). परमेश्वराची मदत आपल्याला कोणत्याही क्षणी सहज उपलब्ध आहे यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे. लेखक एकहार्ट टोले आपल्या “पावर ऑफ नाव” या पुस्तकात म्हणतात, भूतकाळातील दोष आणि भविष्यातील चिंतांसह जगण्याऐवजी, आपण वर्तमानकाळ जो देवाची देणगी आहे त्याचा आनंद घेतला पाहिजे. आजचा दिवस आशीर्वादाचा दिवस आहे हे आपण समजून घेऊया आणि त्याचा स्वतःसाठी आणि इतरांसाठी चांगला उपयोग करू या.

प्रार्थना:हे प्रभू येशू, तुझे वचन सत्य आहे. तूच खरा मार्ग व तूच आमचे जीवन  आहेस. आम्हाला तुझ्या वचनाप्रमाणे आचरण करण्यास प्रेरणा शक्ती दे, आमेन.


सिनडसाठी प्रार्थना

हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन  
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.

तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस, 
आमच्या हृदयात तू वस्ती कर; 
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर 
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.

आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत; 
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव; 
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस, 
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.

हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः 
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू 
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.

पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात 
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस 
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !

✝️      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या