पवित्र गुरुवार ६ एप्रिल २०२३
प्रभू भोजन विधी
सायंकाळचा मिस्साबली
मी प्रभू व गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत.
आजच्या पवित्र गुरुवारी ख्रिस्त शरीर संस्कार, धर्मगुरुपद आणि सेवाव्रत असा तिहेरी सोहळा आपण साजरा करीत आहोत. आपण सर्वजण प्रभू येशूच्या पवित्र ख्रिस्त शरीराचे अवयव आहोत. आपणासर्वांना त्याच्या धर्मगुरुपदात सहभागित्व मिळालेले आहे. आपल्या सर्वांना सेवा करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. प्रभूच्या जीवनातून एकरुप होऊन खरे ख्रिस्ती जीवन आचरण्यासाठी कृपा मागू या. खास करून सर्व धर्मगुरूंसाठी प्रार्थना करू या
पहिले वाचन निर्गम १२:१-८,११-१४
वाचक निर्गम या पुस्तकातून घेतलेले वाचन
"प्रभूच्या वल्हांडणाचे नियम."
परमेश्वराने इजिप्त देशात मोशे व अहरोन यांस सांगितले की, “हा महिना तुम्हांला आरंभीचा महिना व्हावा, तुमचा हा वर्षाचा पहिला महिना व्हावा, इस्राएलच्या सर्व मंडळीला सांग की ह्या महिन्याच्या दशमीस तुम्ही आपआपल्या वाडवडिलांच्या घराण्यांप्रमाणे एकाएका घराण्यामागे एकेक कोकरू घ्यावे आणि एक कोकरू खपावयाचे नाही इतकी थोडकी माणसे कोणाच्या घराण्यात असली तर त्याने व त्याच्या घराजवळच्या शेजाऱ्याने आपल्या घराण्यातील संख्येप्रमाणे कोकरू घ्यावे. प्रत्येकाच्या आहाराच्या मानाने एक कोकरू किती माणसांना पुरेल याचा हिशोब करावा. कोकरू घ्यावयाचे ते निर्दोष असून तो एक वर्षाचा नर असावा, हा नर मेंढरातला किंवा बोकडातला तुम्हांला वाटेल तो घ्यावा, या महिन्याच्या चतुर्दशीपर्यंत ते राखून ठेवावे आणि संध्याकाळी इस्राएल मंडळीतील लोकांनी ते वधावे. त्याचे रक्त घेऊन ज्या घरात त्या कोकराचे मांस खाणार त्याच्या दोन्ही दारबाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला लावावे आणि त्यांनी त्याच रात्री
मांस विस्तवावर भाजून ते बेखमीर भाकरीबरोबर आणि कडू भाजीबरोबर खावे. ते तुम्ही या रितीने खावे: तुमच्या कंबरा कसून, पायात जोडे घालून आणि हातात काठी घेऊन ते घाईघाईने खावे. हा परमेश्वराचा वल्हांडण सण होय. कारण या रात्री इजिप्त देशात फिरून त्यांतील मनुष्य व पशू या व सर्वांचे प्रथम जन्मलेले मी मारून टाकीन आणि इजिप्तमधील सर्व देवांचे मी शासन करीन. मी परमेश्वर आहे आणि ज्या घरात तुम्ही असणार त्यावर ते रक्त तुम्हाप्रीत्यर्थ खूण होईल. मी जेव्हा रक्त पाहीन तेव्हा तुम्हाला ओलाडून जाईन, इजिप्त देशाच्या लोकांना मी मारीन तेव्हा तुम्हांवर अनर्थ येणार नाही, तुमचा नाश व्हावयाचा नाही.
हा दिवस तुम्हांला स्मारकादाखल होईल. ह्या दिवशी तुम्ही परमेश्वराप्रीत्यर्थ मेळा भरवून सण पाळावा, पिढ्यांन्पिढ्या अगदी कायमचा विधी समजून हा सण तुम्ही पाळावा.
सर्व : देवाला धन्यवाद.
प्रतिसाद स्तोत्र ११६:१२-१३,१५-१६
प्रतिसाद : आपण आशीर्वादित करतो तो प्याला ख्रिस्तरक्ताच्या सहभागितेचा प्याला आहे.
१) परमेश्वराने माझ्यावर केलेल्या उपकारांचा
मी कसा उतराई होऊ ? परमेश्वराच्या नामाचा धावा करीन.
मी तारणाचा प्याला हाती घेऊन
२) परमेश्वराच्या दृष्टीने त्याच्या भक्तांचे मरण अमोल आहे.
हे परमेश्वरा, मी तुझा दास, मी खरोखर तुझा दास आहे,
तू माझी बंधने सोडली आहेत.
३) मी तुला उपकारस्तुतीचा यज्ञ अपन,
मी परमेश्वराच्या नामाचा धावा करीन.
परमेश्वराला नेलेले नवस मी त्याच्या सर्व लोकांसमक्ष फेडीन.
दुसरे वाचन १ करिंथ ११:२३-२६
वाचक : पौलचे करिंथकरांस पहिले पत्र यातून घेतलेले वाचन
"जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची घोषणा करता."
पौल म्हणतो, जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हांला सांगितले आहे. ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, “हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे. माझ्या स्मरणार्थ हे करा." मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, "हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. जितक्यांदा तुम्ही ही भाकर खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करता."
जयघोष
प्रभू म्हणतो मी तुम्हांला नवी आज्ञा देतो की,
तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी,
जशी मी तुम्हांवर प्रीती केली
तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.
शुभवर्तमान योहान १३: १-१५
वाचक : योहानलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन
"येशूने त्यांच्यावर शेवटपर्यंत प्रेम केले. "
वल्हांडण सणापूर्वी येशूने आता ह्या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले. शिमोनचा मुलगा यहुदा इस्कार्योत ह्याच्या मनात त्याला धरून द्यावे असे सैतान घालून चुकला होता. तेव्हा आपल्या हाती पित्याने सर्व काही दिले आहे आणि आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होतेवेळी येशू भोजनावरून उठला आणि त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली व रुमाल घेऊन कमरेला बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला, तेव्हा तो त्याला म्हणाला, “प्रभो, आपण माझे पाय धुता काय ?" येशूने त्याला उत्तर दिले “मी जे करतो ते तुला आता कळणार नाही, ते तुला पुढे कळेल.” पेत्र त्याला म्हणाला, “मी तुम्हांला माझे पाय कधीही धुवू देणार नाही.' येशूने त्याला उत्तर दिले, "मी तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुझा वाटा नाही.” शिमोन पेत्र त्याला म्हणाला, “प्रभो, माझे केवळ पाय धुऊ नका, तर हात व डोकेही धुवा!” येशूने त्याला म्हटले, “ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायांखेरीज दुसरे काही धुण्याची गरज नाही. कारण तो सर्वांगी शुद्ध आणि तुम्ही शुद्ध आहा, पण सगळेजण नाही.” कारण आपणांला धरून देणारा इसम त्याला ठाऊक होता. म्हणून तो म्हणाला, “तुम्ही सगळेजण शुद्ध नाही."
मग त्यांचे पाय धुतल्यावर व आपली वस्त्रे चढवून पुन्हा बसल्यावर त्याने त्यांना म्हटले, "मी तुम्हांला काय केले आहे हे तुम्हांला समजले काय ? तुम्ही मला गुरू व प्रभू असे संबोधता आणि ते ठीक बोलता, कारण मी तसा आहेच. ह्यास्तव मी प्रभू व गुरू असूनही जर तुमचे पाय धुतले तर तुम्हीही एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. कारण जसे मी तुम्हांला केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे.”
प्रभूचे हे शुभवर्तमान
सर्व : हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो.
चिंतन: आजच्या उपासनेतील शास्त्रवाचने आपल्याला पवित्र मिस्सा, धर्मगुरूपद आणि प्रीतीची नवी आज्ञा ह्या तीन विषयांवर तीन चिंतने सादर करतात :
अ. मानवाला पापाच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी प्रभू येशू वल्हांडणाचे कोकरू बनला : आजचे पहिले वाचन (निर्गम १२:१-८, ११- १४). मत्तय, मार्क व लूक हे शुभवर्तमानकार येशूच्या अखेरच्या भोजनाला वल्हांडणाचे भोजन म्हणत असले तरी योहान मात्र येशू हाच त्या वल्हांडणाचे कोकरू आहे असे मानतो. “त्याचे एकही हाड मोडले जाणार नाही", "एजोबाच्या काठी"चा उल्लेख, ओलांडणाचे भोजन करता यावे म्हणून सरकारवाड्यात न जाणारे यहूदी इत्यादिंचा उल्लेख योहानच्या भूमिकेला पुष्टी देतो. ज्याप्रमाणे कोकराच्या रक्ताने इस्राएली लोकांचा बचाव झाला त्याप्रमाणे येशूने आपल्या रक्ताने मानवाचे पापांपासून तारण केले असे योहान सुचवितो.
ब. मानवाला सार्वकालिक जीवन देण्यासाठी येशू मिस्साबलीचा केंद्रबिंदू बनला : आजचे दुसरे वाचन (१ करिंथ ११:२३-२६) भाकर मोडणे व द्राक्षारस पिणे ह्यांचा संबंध येशूच्या क्रुसावरील बलिदानाशी जोडतात. ख्रिस्तसभा हे ख्रिस्ताचे रहस्यमय शरीर असून तिला पवित्र मिस्साबलीकडून आध्यात्मिक शक्ती लाभत असते असे संत पॉल सूचित करतो.
क. मानवाला बिनशर्त प्रेमाचा कित्ता घालून देण्यासाठी येशू आपल्या प्रेषितांचे पाय धुतो: आजचे शुभवर्तमान (योहान १३:१-१५) येशूच्या प्रेमाचा सेवाभावी पैलू अधोरेखित करतो. पवित्र मिस्साबलीत येशूच्या पंक्तीस बसल्यामुळे मानवाला सेवेची प्रेरणा मिळायला हवी असे खुद्द येशू सूचित करतो.
आत्मपरीक्षण : येशूच्या अखेरच्या भोजनाचा कोणता पैलू आपल्याला प्रेरणादायी वाटतो? त्याद्वारे निष्ठावंत ख्रिस्ती जीवन जगण्यास आपणांस कशी प्रेरणा मिळते ?
प्रार्थना : हे प्रभू येशू, तुझ्या पवित्र संस्काराचे सहभागिदार बनून तुझी सुवार्ता जगजाहीर करण्यास आम्हाला कृपा दे, आमेन.
धर्मगुरूंसाठी प्रार्थना
हे प्रेमळ प्रभो, /आमच्या धर्मगुरूंचा / सांभाळ कर. / ते तुझे आहेत. तुझ्या पवित्र मंदिरात / त्यांच्या जीवनाचे दीपतेवत आहेत./ ते जगात आहेत, परंतु जगाचे नाहीत. / जेंव्हा त्यांना ऐहिक सुखाचा / मोह होईल तेव्हा तुझ्या हृदयात / तू त्यांना सुरक्षित ठेव. / ते एकाकी असताना, / तू त्यांना सांभाळ./ धर्मगुरू म्हणून / आपण करीत असलेला त्याग / व्यर्थ आहे, असे त्यांना वाटू लागेल / तेव्हा त्यांना दिलास दे. त्यांना तुझ्या शिवाय / कोणीच नाही, तरीही त्यांना संवेदनशील / मानवी हृदय आहे./ देहाचा दुर्बलपणा आहे, ह्याची आठवण ठेव. / जी पवित्र श्माकर / ते दररोज हाती घेतात, त्या भाकरीसारखे / त्यांना अतिनिष्कलंक ठेव. / त्यांचे सर्व विचार, शब्द आणि कृती / ह्यांना तू आशीर्वाद दे / आमेन.
सिनडसाठी प्रार्थना
हे पवित्र आत्म्या, तुझ्या नावाने एकत्र येऊन
आम्ही तुझ्यासमोर उभे राहतो.
तू आमचा एकमेव मार्गदर्शक आहेस,
आमच्या हृदयात तू वस्ती कर;
आम्ही पुढे कसे जावे याबद्दल आम्हांला मार्गदर्शन कर
आणि त्या मार्गाशी आम्हांला एकनिष्ठ ठेव.
आम्ही दुर्बळ आणि पापी आहोत;
अस्थिरतेपासून आम्हाला दूर ठेव;
अज्ञानाने आमचा मार्ग भ्रष्ट होऊ देऊ नकोस,
पक्षपाताचा आमच्या कृतीवर प्रभाव पडू देऊ नकोस.
हे पवित्र आत्म्या,
तुझ्यामध्ये आम्हाला आमचे ऐक्य पाहू देः
म्हणजे आम्ही शाश्वत जीवनाकडे एकत्र वाटचाल करू
आणि सत्याच्या व योग्यतेच्या मार्गापासूनआम्ही भरकटणार नाही.
पिता आणि पुत्र ह्यांच्या ऐक्यात
तू सर्वत्र आणि सर्वकाळ कार्य करतोस
त्या तुझ्याकडे हे सर्व आम्ही मागतो, आमेन !
✝️
0 टिप्पण्या